भारतीय ज्ञानपरंपरेत अतुलनीय योगदान देणाऱ्या दार्शनिकांमध्ये महर्षि पतंजलींची गणना होते. पतंजलींना योगदर्शनाचा प्रणेता, व्याकरणमहाभाष्याचा कर्ता व आयुर्वेदातील चरक परंपरेचा जनक मानले जाते. इ. स.पू. सुमारे दुसरे शतक हा त्यांचा काळ मानला जातो. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यांचे जन्मस्थान ‘गोनर्द’ असावे असे मानतात. गोनर्द हे ठिकाण नेमके कोणते आहे याविषयी पुढील मतमतांतरे आहेत − उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्हा; विदिशा व उज्जैन यांच्यामध्ये कोठेतरी असलेला प्रदेश; बिहारमधील तत्कालीन मगध राज्याच्या पूर्वेकडील प्रदेश; काश्मीर इत्यादी. सतराव्या शतकातील व्याकरणकार नागेश भट्ट यांच्या मते पतंजलींच्या आईचे नाव गोणिका होते. दक्षिण भारतातील चिदंबरम् हे पतंजलींचे कार्यक्षेत्र होते. चिदंबरम् येथील नटराजाच्या मंदिरात पतंजली शिष्यांना व्याकरण शिकवत असत, असे म्हटले जाते.

महर्षी पतंजली

पतंजली हे शुंग वंशातील राजा पुष्यमित्राच्या काळात होऊन गेले आणि त्यांनी त्याच्या अश्वमेध यज्ञात पुरोहित म्हणून काम केले असे अनुमानमहाभाष्यातील (३.२.१२३) ‘येथे आम्ही पुष्यमित्राकडून याग करवून घेतो’ या अर्थाच्या उल्लेखावरून केले जाते.

महर्षि पतंजलींविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. पतंजलि हे शेषनागाचे अवतार होते अशी धारणा आहे. ध्यानात असताना शेषाला पुत्रप्राप्तीसाठी सूर्याची प्रार्थना करीत असलेली गोणिका नावाची धार्मिक स्त्री दिसली. ‘हीच आपली आई आहे’ असा दृष्टांत त्याला झाला आणि तो सूर्याला अर्घ्य देत असलेल्या गोणिकेच्या ओंजळीत छोट्या सर्पाच्या रूपात येऊन पडला. ओंजळीत येऊन पडल्यामुळे त्याचे नाव ‘पतंजलि’ असे पडले, अशी आख्यायिका प्रचलित आहे.

पतंजलींनी चिदंबरम् येथे शंकराची आराधना केली. शंकराने प्रसन्न होऊन त्यांना आपले तांडवनृत्य दाखविले आणि सर्व प्रकारचे ज्ञान दिले. त्याच ठिकाणी त्यांनी योगसूत्रेव्याकरण-महाभाष्य लिहिले, अशीही एक आख्यायिका आहे. व्याकरणाच्या ज्ञानामुळे त्यांना प्रसिद्धी मिळून अनेक शिष्य त्यांच्याकडे अध्ययनासाठी येऊ लागले. त्या शिष्यांना ते एक अट घालीत की, कोणत्याही शिष्याने त्यांना प्रत्यक्ष पाहू नये. ही अट मान्य केल्यावरच ते शिष्याचा स्वीकार करीत. पतंजलींच्या यौगिक सामर्थ्यामुळे ते एकाच वेळी अनेक शिष्यांना वेगवेगळे विषय शिकवत असत. याप्रमाणे त्यांनी अनेक वर्षे व्याकरणाचे अध्यापन केले. एकदा त्यांच्या शिष्यांनी पतंजलि एकाच वेळी अनेक विषय कसे काय शिकवतात हे जाणण्यासाठी कुतूहलापोटी मधला पडदा सरकवला, परंतु सहस्रमुख अशा शेषनागाच्या रूपात अध्यापन करणाऱ्या पतंजलींचे तेज सहन न झाल्यामुळे सर्व शिष्य जळून गेले. काही कामानिमित्त अन्यत्र गेलेला एक शिष्य मात्र वाचला. पतंजलींनी त्याला व्याकरणाची परंपरा पुढे चालविण्याची आज्ञा दिली. कालांतराने तो शिष्य उज्जैनला गेला व त्याने सत्पात्र शिष्यांना महाभाष्य शिकवायला सुरुवात केली. आजही उत्तर भारतामध्ये नागपंचमीच्या दिवशी बडा गुरू (पतंजलि) आणि छोटा गुरू (त्यांचा शिष्य) यांच्या चित्राची घरोघरी पूजा करण्याची प्रथा आहे. भागवतपुराणामध्ये (६.१५.१४) महर्षि पतंजलींचा उल्लेख सिद्ध पुरुष म्हणून केला आहे. मत्स्यपुराणानुसार (१९६.२५) पतंजलींपासून एका गोत्र-प्रवराचीही सुरुवात होते.

पतंजलींनी योगशास्त्र, व्याकरण आणि आयुर्वेद या तीन विषयांवर तीन ग्रंथांची रचना केली. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांचा थोडक्यात परिचय पुढीलप्रमाणे –

(१) योगसूत्र : महर्षि पतंजलींनी भारतीय तत्त्वज्ञानातील योगदर्शनाचा मूलभूत ग्रंथ योगसूत्र लिहिला आहे. योगशास्त्राचे सिद्धांत हे पतंजलींच्या पूर्वीही वेद, उपनिषदे आणि अन्य काही ग्रंथांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात होते. पतंजलींनी योगाचे सिद्धांत व साधना यांचे सूत्ररूपाने एकाच ग्रंथामध्ये संकलन केले. आशयगर्भ अशा एकूण १९५ सूत्रांमध्ये त्यांनी योगशास्त्राचे विवेचन केले आहे. ती सूत्रे समाधि-पाद, साधन-पाद, विभूति-पाद आणि कैवल्य-पाद अशा चार प्रकरणांमध्ये विभागलेली आहेत.

पतंजलींनी चित्ताच्या अनेक ज्ञात आणि अज्ञात पैलूंवर प्रकाश टाकला आहे. अतिशय कमी शब्दात त्यांनी अनेक विषयांवर महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे. उदा., चित्त कसे काम करते; चित्त, शरीर, इंद्रिये आणि आत्मा यांचा परस्परसंबंध काय आहे; जाग्रत्, स्वप्न आणि सुषुप्ती या वेगवेगळ्या स्थितीनुसार चित्तामध्ये कोणत्या क्रिया होतात; चित्तामध्ये विचार कसे निर्माण होतात; विचारांचे नियंत्रण कसे करावे; कर्म-सिद्धांत म्हणजे काय; प्रत्येक जीवाला त्याच्या कर्मानुसार फळ कसे मिळते; चित्तामध्ये सूक्ष्म संस्कार कसे साठवले जातात;एकाग्रता कशी प्राप्त करावी; ध्यान कसे करावे; सिद्धी म्हणजे काय; योगाच्या साधनेतील विघ्ने कोणकोणती आहेत; त्यांना कसे पार करावे; आयुष्याचे अंतिम लक्ष्य काय आहे,अशा अनेक विषयांचे विवेचन योगसूत्रांमध्ये येते. योगदर्शन हे तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र, अध्यात्मशास्त्र, मानसशास्त्र व विज्ञान यांचा अनोखा समन्वय आहे. आजच्या काळातही योगाच्या क्षेत्रात योगसूत्रांना अंतिम प्रमाण मानले जाते.

(२) व्याकरण-महाभाष्य : महर्षि पाणिनी यांनी लिहिलेल्या व्याकरणाच्या अष्टाध्यायी नावाच्या ग्रंथावर पतंजलींनी भाष्य लिहिले आहे. हे भाष्य विस्तृत असल्यामुळे याला महाभाष्य असे म्हटले जाते. संस्कृत व्याकरणातील महान आचार्य पाणिनी, कात्यायन आणि पतंजलि यांना ‘त्रिमुनी’ म्हटले जाते. महाभाष्यात आठ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात चार पाद आहेत. महाभाष्यात एकूण पंच्याऐंशी आह्निके (प्रतिदिन केला जाणारा पाठ) आहेत. महाभाष्य हे संवादात्मक शैलीमध्ये रचलेले आहे. व्याकरणाचे तत्त्वज्ञान मांडणाऱ्या विद्वानांमध्ये पतंजलि अग्रणी आहेत.पतंजलींनी महाभाष्यात भारताच्या निरनिराळ्या भागात रूढ असलेल्या शब्दांचा उल्लेख केला आहे. त्यांच्या काळात संस्कृत भाषा ही लोकव्यवहाराची भाषा होती हे सिद्ध करणारा व्याकरणाचा पंडित आणि रथाचा सारथी यामधला एक संवाद आणि अनेक वाक्प्रचार महाभाष्यात आढळतात.

(३) चरकसंहिता : चरकसंहिता हा आयुर्वेदाचा महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या लेखकाविषयी मतमतांतरे आहेत. हा ग्रंथ पतंजलींनी लिहिला आहे असा एक मतप्रवाह आहे. याला एक आधार म्हणजे नागेश भट्ट यांनी आपल्या मंजूषा या ग्रंथात ‘इति चरके पतञ्जलि:’ असा उल्लेख केला आहे. चरकसंहितेत वर्णिलेले विषय हे आत्रेयांनी आपल्या शिष्यांना शिकवले, कालांतराने अग्निवेशांनी ते ग्रंथबद्ध केलेव चरकांनी त्या ग्रंथावर संस्कार केले. आयुर्वेदाच्या परंपरेत चरकसंहितेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. चरकसंहितासूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान,  शारीरस्थान, इन्द्रियस्थान, चिकित्सास्थान, कल्पस्थान, सिद्धिस्थान या ८ स्थानांत विभागली आहे. चरकसंहितेत एकूण १२० अध्याय व ९२९५ सूत्रे आढळतात.चरकसंहितेच्या प्रतिपाद्य विषयाचे वैद्य, औषध, परिचारक व रोगी असे चार पाद आहेत. काही विद्वानांच्या मते पतंजलींनी चरकसंहितेवर पातञ्जल-वार्त्तिक  नावाचा टीकाग्रंथ लिहिला.

पं. रामभद्र दीक्षित यांनी पतंजलींच्या आयुष्यातील कथा व त्यांचे ग्रंथ यावर आधारित ‘पतञ्जलि-चरितम्’ नावाचे महाकाव्य लिहिले आहे. पतंजलींना शेषनागाचा अवतार मानत असल्याने त्यांच्या मूर्तीमध्ये किंवा चित्रामध्ये त्यांच्या शरीराचा अर्धा भाग मनुष्याच्या रूपात आणि अर्धा भाग सर्पाच्या रूपात दाखविला जातो. कधी कधी मनुष्यरूप मस्तकावर नागाच्या फणा दाखवल्या जातात. मस्तकावर मुकुट असतो आणि दोन्ही हात अंजलिमुद्रेमध्ये असतात. महर्षि पतंजलींच्या ग्रंथकर्तृत्वाचे वर्णन करणारा एक श्लोक परंपरेने प्रचलित आहे.

योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन |

योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि ||

‘ज्यांनी योगाचे ज्ञान देऊन चित्ताचा, व्याकरणाचे ज्ञान देऊन वाणीचा आणि वैद्यकशास्त्राचे ज्ञान देऊन शरीराचा मल दूर केला, अशा मुनिश्रेष्ठ पतंजलींना मी दोन्ही हात जोडून नमस्कार करतो.’

पहा : योगसूत्रे.

संदर्भ : 

  • जोशी, पं. महादेवशास्त्री (भासंपा.) भारतीय संस्कृतिकोश, चतुर्थावृत्ती, अनमोल प्रकाशन, पुणे, २००१.
  • वाडेकर, देवीदास, मराठी तत्त्वज्ञान महाकोश, द्वितीय खंड, चतुर्थावृत्ती, पुणे, १९७४.

                                                                                                                                                                                              समीक्षक : प्राची पाठक