सुरण ही वनस्पती कंदवर्गीय असून ती अळूच्या कुलातील आहे. हिंदीमध्ये जिमीकंद, इंग्रजीमध्ये एलेफंट्स फूट यॅम, संस्कृतमध्ये अर्शोघन, कण्डूल, चित्रदण्डक, कन्दनायक, कंदवर्धन, वातारी, ओल, वज्रकंद, चित्रकंद, सुरकंद, रुच्यकंद, सुकंद, गुदामयहर इ. नावे आहेत. अर्श म्हणजे मूळव्याध. सुरण मूळव्याधीचा नायनाट करते म्हणून त्यास अर्शोघन म्हणतात.  कण्दू म्हणजे खाज.  सुरण प्रक्रिया न करता खाल्ले असता घशास खाज सुटते, म्हणून त्यास कण्डूल म्हणतात. तसेच त्याच्या पानाच्या हिरव्या देठावर पांढरे चट्टे असल्यामुळे त्यास चित्रदण्डकही म्हणतात.  सुरण हे औषधी गुणांनी सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून त्याची ‘कन्दनायक’ अशी सुद्धा ओळख आहे.  त्याचे शास्त्रीय नाव अमॉर्पोफ्यलस पिऑनिफोलियस (Amorphophallus paeonifolius (Dennst.) Nicolson) असे आहे.  ही वनस्पती विदर्भ, कोकण आणि पश्चिम घाटातील जंगलांत आढळते. काही ठिकाणी तिची लागवडसुद्धा करतात. तिचा समावेश आय.यू.सी.एन. (IUCN) च्या संकटग्रस्त वनस्पतींच्या  यादीत केला आहे.

सुरण ही वनस्पती ‘बहुऋतुजीविता’ असून तीस घनकंद (Corm) असतो. सुरणाचा कंद ओबडधोबड, अर्धगोलाकृती, चपटा आणि गर्द तपकिरी रंगाचा असतो. हा कंद म्हणजे सुरणाचे रूपांतरीत खोड (Modified Underground Stem) असते. अन्न साठविणे हा या बदलामागचा प्रमुख उद्देश आहे.  ही वनस्पती वर्षातील सु. आठ महिने सुप्तावस्थेत असते. पावसाळा आला की तिच्या कंदाला कोंब येतो आणि तिची झपाट्याने वाढ सुरू होते. या वनस्पतीचे वैशिष्ट्य असे की तिला एका वर्षी केवळ एक पान आणि त्याच्या पुढील वर्षी फुले येतात. जमिनीबाहेर सरळ उंच खोडासारखा वाढणारा, पांढरे चट्टे असणारा अवयव म्हणजे सुरणाच्या पानाचा देठ.  या देठाच्या वरच्या टोकाला छत्राकार संयुक्त पान असते. पानांद्वारे प्रकाशसंश्लेषण करून सुरण त्याच्या कंदामध्ये स्टार्चच्या रूपात अन्न साठविते आणि पुढील वर्षी याच ऊर्जेचा वापर करून फुलोरा किंवा पुष्पविन्यास तयार करते.  मोठ्या कंदावर छोटे-छोटे कंद तयार होतात, ज्याचा उपयोग शाकीय अभिवृद्धीसाठी होतो.

सुरणाची पाने

सुरणामध्ये पुष्पविन्यास हा स्थूलकणिश (Spadix inflorescence) प्रकार पाहावयास मिळतो. त्याच्या तळाशी १०.१ – १२. ७  इंचाची दोन ते तीन तपकिरी रंगाची शल्कपर्णे (Cataphyll) असतात. या प्रकारात सहपत्रीचे रूपांतर स्थूलकणिशाला संरक्षण देण्यासाठी चॉकलेटी-गुलाबी रंगाच्या मोठ्या पानासारख्या जाड अवयवात अर्थात महाछदामध्ये (Spathe) झालेले असते. यात मध्यभागी सु. १ मी. उंचीचा जाड दंडगोलीय भरीव दांडा (पुष्पविन्यासवृंत/पुष्पबंधाक्ष Peduncle) असतो. या दांड्याच्या टोकाला कीटकांना आकर्षित करण्यासाठी गडद चॉकलेटी किंवा गुलाबी रंगाचे उपांग (Appendix) असते. त्याखाली पिवळ्या रंगाचा ४-५ इंच लांबीचा नर पुष्पविन्यास आणि थोड्या अंतरावर मादी पुष्पविन्यास असतो. या स्थूलकणिशाला एक मंद प्रकारचा घाण वास असल्याने माश्या आकर्षित होऊन त्या परागीभवनाचे काम करतात.

 

सुरणाच्या पुष्पविन्यास उभा छेद व त्याचे विविध भाग

 

फुलांमध्ये दल किंवा निदल नसून ती सूक्ष्म आणि जवळजवळ एकवटलेली असतात. नर फुलांमध्ये २-४ अवृंत पुंकेसर असतात. तर मादी फुलामध्ये १-४ कप्पी स्त्रीकेसर असते. कुक्षीपुंज आखूड असून कुक्षी साधी किंवा खंडित असते. परागीभवनानंतर मादी पुष्पविन्यासामध्ये फलधारणा अर्थात कणीस तयार होते. फळ लाल रंगाचे अनष्ठिल प्रकारचे असून त्यात दोन ते तीन बिया असतात. बिया अभ्रूणपोषी असून बृहत अधोबीजपत्री असतात.

सुरणाच्या औषधी गुणांमुळे  ‘सर्वेषा कन्दशाकाना सुरण: श्रेष्ठ: उच्चते।’असे भावप्रकाशात म्हटले आहे. याचा अर्थ सर्व कंदवर्गीय भाज्यांमध्ये सुरण श्रेष्ठ आहे.  त्याच्या कंदाची आणि पानांची भाजी तसेच काप-कटलेटस सुद्धा करतात. सुरणाचे फूल, कंद, पाने आणि दांडा या सर्वांचा आहारात वापर करतात. त्याच्या कंदात कॅल्शियम ऑक्झॅलेट असल्याने खाज येते.  हा खाजरेपणा घालविण्यासाठी त्याचे तुकडे चिंच किंवा आमसुलाच्या पाण्यात भिजत ठेवतात किंवा उकडतात.

सुरणाचे औषधी उपयोग व गुणधर्म :

  • सुरण रूक्ष, तुरट, तिखट गुणधर्मांचे आहे. भूक व चव वाढविते. दमा, श्वासनलिकेचा दाह, वांती, पोटदुखी, मूळव्याध, रक्तविकार, हत्तीरोग यांवर ते उपयुक्त आहे.
  • सुरणाचा ताजा कंद क्रियाशील व उद्दीपक, कफोत्सारक असून पुनःबलस्थापित करण्याची क्षमता त्यात आहे.
  • सुरणात , तसेच ही जीवनसत्त्वे आहेत.
  • सुरणाचा कंद लोणच्याच्या स्वरूपात वायुनाशी समजला जातो.
  • सुरण अरुची, अग्निमांद्य, दमा, खोकला, जंत, यकृताचे व प्लीहेचे विकार यांवर गुणकारी आहे.
  • संधिवातात कंद व बियांचा लेप लावल्यास सूज कमी होते.
  • सुरणाच्या कंदाची भाजी मूळव्याधीवर गुणकारी आहे. अर्शातील रक्तवाहिन्याचे संकोचन होते, म्हणून रक्त वाहणाऱ्या अर्श रोगांत सुरण फार हितावह आहे.
  • सुरणाच्या कंदाची भाजी खाल्ल्याने यकृताची क्रिया सुधारते आणि शौचास साफ होते तसेच बद्धकोष्ठता कमी होते.
  • आतड्यांच्या तक्रारींवर सुरणाची भाजी खाणे हितकारक असते. तो कृमींचा नायनाट करतो, म्हणून तो कृमिघ्नही आहे.
  • आयुर्वेद औषधांमध्ये सुरणाच्या कंदाची पावडर मोठ्या प्रमाणात वापरतात. सुरणापासून बृहतसुरणकबाय आणि सुरानादिवटक हे कल्प तयार केले जातात.

समीक्षक बाळ फोंडके

This Post Has 3 Comments

  1. Jayashree Sane

    Goood. Pharch chhan mahiti. Thank u

Jayashree Sane साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.