प्रकाशमय किंवा ज्ञानमय अर्थात ज्ञान करवून देणारी चित्ताची विशिष्ट वृत्ती. योगदर्शनानुसार चित्त एखाद्या विषयाचा आकार धारण करते, त्या विषयाच्या चित्तात उमटलेल्या प्रतिबिंबाला ‘वृत्ति’ असे म्हणतात. प्रवृत्ती म्हणजे काही विशिष्ट विषयांचा आकार ग्रहण केलेली चित्ताची वृत्ती होय. प्रवृत्ती या शब्दाचा प्रयोग योगसूत्रांमध्ये ‘विषयवती प्रवृत्ती’ आणि ‘ज्योतिष्मती प्रवृत्ती’ या दोन्हीसाठी केलेला दिसून येतो. पातंजल योगदर्शनाच्या समाधिपादामध्ये मनाची स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी काही साधनांचा उल्लेख केला आहे, त्यात ज्योतिष्मती प्रवृत्तीचेही वर्णन केले आहे. ज्यावेळी चित्तामध्ये शोकरहित आणि ज्ञान करवून देणारी ज्योतिष्मती प्रवृत्ती उत्पन्न होते, तिच्यामुळे दीर्घ काळापर्यंत मनाची स्थिरता टिकवून ठेवता येते. या ज्योतिष्मती प्रवृत्तीचे बुद्धी आणि अस्मिता हे दोन विषय आहेत.
बुद्धी ज्योतिष्मती प्रवृत्ती : उदर व उर प्रदेशाच्या मध्यभागी असलेल्या हृदय कमळावर धारणा साधल्यास त्याला सात्त्विक, ज्योतीस्वरूप, प्रकाशमान व आकाशाप्रमाणे व्यापक असलेल्या बुद्धीतत्त्वाचे ज्ञान प्राप्त होते. अशा प्रकारची एकाग्रता प्राप्त झाल्यावर योग्याला ते बुद्धितत्त्व सूर्य, चंद्र, नक्षत्र किंवा मणीप्रभेच्या आकाराचे भासते.
अस्मिता ज्योतिष्मती प्रवृत्ती : अस्मिता म्हणजेच अहंकार, ‘मी’पणाची भावना होय. योगदर्शनानुसार ही ‘मी’पणाची भावना अविद्येमुळे उत्पन्न होते. अविद्येमुळे शरीर, मन, इंद्रिये किंवा प्राण यांना ‘मी’ समजून त्यांच्यामध्ये अस्मितेची (‘मी’पणाची) भावना उत्पन्न होते. ज्यावेळी योगी ‘मी’ अर्थात ‘स्व’चे स्वरूप जाणण्याच्या उद्देशाने त्या अस्मितेवर चित्ताची एकाग्रता साधतो, त्यावेळी त्या योग्याला जाणवते की खरा ‘स्व’ हा शरीर, मन, इंद्रिय किंवा प्राण नसून सर्व अनुभवांचा साक्षी असलेले पुरुषतत्त्व म्हणजे चेतना आहे. अस्मिता हा विषय असलेली ज्योतिष्मती प्रवृत्ती उत्पन्न झाल्यावर स्वतःच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान होऊन साधकाचे चित्त तरंगरहित समुद्राप्रमाणे शांत व अनंत बनते. याविषयी व्यासभाष्यामध्ये पंचशिखाचार्यांचे एक वाक्य उद्धृत केले आहे. ‘त्या अत्यंत सूक्ष्म, अणुमात्र आत्म्याला जाणून, ‘मी असा आहे’ याप्रमाणे योगी निजरूपाला जाणतो.’ अशा प्रकारे आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झालेले चित्त शोकमुक्त होऊन ज्योतीस्वरूप निर्मल बनते.
आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर चित्त संपूर्णपणे निर्मल सात्त्विक बनते व अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश या क्लेशांच्या प्रभावापासून ते पूर्णपणे मुक्त होते. ज्योतिष्मती प्रवृत्तीपासून प्राप्त झालेल्या शुद्ध ज्ञानावर संयम (धारणा, ज्ञान आणि समाधी) साधल्यास योग्याला सूक्ष्म, व्यवहित, विप्रकृष्ट विषयांचे ज्ञान प्राप्त होते असे ‘योगसूत्रा’त प्रतिपादित केले आहे. सूक्ष्म म्हणजे आकाराने लहान असलेले पदार्थ, जसे की परमाणु; त्याच्याप्रमाणे स्वभावानेही सूक्ष्म असणारे पदार्थ, जसे की मन. ज्यांचे ज्ञान इंद्रियांद्वारे होऊ शकत नाही त्यांना सूक्ष्म पदार्थ म्हणतात. व्यवहित म्हणजे मध्ये अडथळा असल्यामुळे ज्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होऊ शकत नाही असे पदार्थ. विप्रकृष्ट म्हणजे दूर असलेले पदार्थ. सूक्ष्म, व्यवहित आणि विप्रकृष्ट या सर्व विषयांचे ज्ञान योग्याला ज्योतिष्मती प्रवृत्तीपासून प्राप्त झालेल्या शुद्ध ज्ञानावर संयम केल्यामुळे प्राप्त होऊ शकते.
संदर्भ :
- कर्णाटक विमला, ‘पातञ्जलयोगदर्शनम्’, काशी हिन्दू विश्वविद्यालय, वाराणसी, १९९२.
- ब्रह्मलीन मुनि, स्वामी, ‘पातञ्जलयोगदर्शनम्: व्यासभाष्य सहित शोधपूर्ण संस्करण’, चौखम्भा प्रकाशन, वाराणसी, २०१०.
समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.