अनेर धरण अभयारण्य : प्रवेशद्वार

अनेर धरण वन्यजीव अभयारण्य हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर आहे. हे अभयारण्य नाशिक प्रशासकीय विभागात येते. हे अभयारण्य सातपुडा पर्वतरांगांच्या नैऋत्य दिशेला पसरलेले असून तापी नदीची उपनदी असलेल्या अनेर नदीच्या पाणलोट क्षेत्रात, विशेषत: अनेर धरणाच्या आसपासच्या उच्च पूर पातळीच्या वरच्या भागात पसरलेले आहे. याचे भौगोलिक स्थान अक्षांश २१२१’००” उत्तर आणि रेखांश ७५०१’२१” पूर्व आहे.

अनेर धरणाचा परिसर १० ऑक्टोबर १९८६ रोजी ‘अनेर धरण वन्यजीव अभयारण्य’ म्हणून घोषित करण्यात आला. या अभयारण्याचे सु. ८३ चौ.किमी. क्षेत्रफळ हे राखीव असून शुष्क पानगळीच्या व खुरट्या काटेरी वनांसाठी ते प्रसिद्ध आहे. या अभयारण्याची सीमा जळगाव जिल्ह्यातील यावल वन्यजीव अभयारण्य आणि मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील वनक्षेत्राला लागून आहे.

अनेर धरण अभयरण्यामध्ये बिबट्या, रानमांजर, काळवीट, कोल्हा, लांडगा, घोरपड, साळिंदर, भेकर, चिंकारा, मुंगूस, रानडुक्कर, तरस इ. वन्यजीव आढळतात. वन्यप्राण्यांचे आकर्षण नसले तरी जलाशयामुळे हे अभयारण्य पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. पक्ष्यांमध्ये मोर, बगळे, करकोचे, ब्राह्मणी बदक, हरियाल, पानकोंबडी, हॉर्नबिल, गिधाड, तित्तर, सुतारपक्षी, सुगरण इ. पक्षी आढळतात. शिवाय काही स्थलांतरीत पक्षीही नोव्हेंबर ते मार्च महिन्यात पहायला मिळतात.

अनेर धरण परिसर

अनेर धरण अभयारण्यात साग (Tectona grandis), अंजन (Hardwickia binata), चिंच (Tamarindus indica), आवळा (Phyllanthus emblica), आपटा (Bauhinia racemosa), खैर (Acacia catechu), हिवर (Acacia leucophloea), बाभूळ (Acacia nilotica), बेल (Aegle marmelos), शिरस (शिरीष; Albizzia lebbek), धावडा (Anogeissus latifolia), पळस (Butea monosperma), अर्जुन (Terminalia arjuna), हिरडा (Terminalia chebula), बेहडा (Terminalia behada), ऐन (Terminalia ain), सालई (Boswellia serrata) इ. मोठी झाडे आढळतात; तर सामान्य झुडुपांमध्ये निरगुडी (Vitex negundo), बोर प्रजाती, तरवड (Cassia auriculata), करवंद (Carissa carandus) आणि मुरुडशेंग (Helicteres isora) यांचा समावेश होतो.

अनेर धरण अभयारण्याच्या क्षेत्रात कडरागडच्या जवळ अखंड दगडात कोरलेल्या ऐतिहासिक पाषाण गुंफा आहेत. या गुंफातील चित्रे आणि शिल्पे अजिंठा-वेरूळ येथील चित्र-शिल्पांच्या तोडीची आहेत.

मोठ्या प्रमाणात होणारी अवैध वृक्षतोड, वणवे, अतिक्रमण, प्राण्यांची शिकार आणि घुसखोरी या कारणांमुळे अनेर धरण अभयारण्यातील वन्यजीवन धोक्यात आले आहे. तसेच लँटाना कॅमारा (Lantana camara) किंवा घाणेरी या झुडूपवर्गीय तणाच्या प्रसारामुळे अभयारण्यातील गवताळ प्रदेशाचे नुकसान होत आहे. या तणामुळे विशेषत: पावसाळ्यामध्ये अभयारण्यात प्रवेश करणे अतिशय कठीण असते.

अनेर धरण अभयारण्याला भेट देण्याचा उत्तम कालावधी सप्टेंबर ते फेब्रुवारी असा आहे. धुळे ते शिरपूर बससेवा उपलब्ध आहे. शिरपूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे आणि रोहिणी व चोपडा येथे वन विश्रामगृह आहे. इथे पर्यटकांची राहण्याची व्यवस्था होऊ शकते. अनेर धरण परिसरात पर्यटकांसाठी बोटची सुविधा उपलब्ध आहे. तसेच येथील निसर्ग पाउलवाटांवर तयार केलेले नक्षत्र वन व चिरंजीव वन ही ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

अनेर धरण वन्यजीव अभयारण्य नकाशा :

 

संदर्भ :

  • https://mahaforest.gov.in/index.php/sanctuarydetail/index/19#
  • https://mahaforest.gov.in/writereaddata/managementpdf/1767969083_MANAGEMENT_FILE.pdf
  • https://vushii.com/place.php?name=Aner%20Dam%20Wildlife%20Sanctuar
  • http://www.mahaecotourism.gov.in/ecotourism/sites/default/files/inline-files/

समीक्षक : मोहन माद्वाण्णा


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.