थोरात, सुखदेव (Thorat, Sukhadev) : (१२ जुलै १९४९). प्रसिद्ध भारतीय अर्थतज्ज्ञ व शिक्षणतज्ज्ञ. त्यांचा जन्म महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यातील महिमापूर या खेड्यात झाला. त्यांचे वडील किसनराव व आई पारूबाई हे
अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण महिमापूर येथे झाले. त्यांनी बी. ए. मिलिंद महाविद्यालय, औरंगाबाद येथून; तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम. ए. ही पदवी मिळविली (१९७३). पदवीनंतर त्याच वर्षीपासून ते वसंतराव नाईक महाविद्यालय, औरंगाबाद येथे व्याख्याते म्हणून रुजू झाले; मात्र पुढील शिक्षण सुरू ठेवले. तेथे त्यांनी १९८० पर्यंत सेवा दिली. महाविद्यालयीन काळात ते औरंगाबाद शाखेच्या रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशन व दलित पँथरच्या औरंगाबाद शाखेचे उपाध्यक्ष होते. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम. फिल (१९७६) आणि तेथूनच पीएच. डी. (१९८६) या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर मेन स्कूल प्लॅनिंग, वॉर्सा (पोलंड) येथून आर्थिक नियोजन या विषयात पदविका प्राप्त केली. त्यांना भारतातील आणि भारताबाहेरील विद्यापीठांनी मानद डी. लिट, डी. एससी. (डॉक्टर ऑफ सायन्स), एड. डी. (डॉक्टर ऑफ एज्युकेशन) आणि एलएल. डी. (डॉक्टर ऑफ लॉ) या पदव्या बहाल केल्या आहेत. त्यांचा १९७५ मध्ये ज्येष्ठ साहित्यिका विमल थोरात यांच्याशी विवाह झाला असून त्यांचे सुपुत्र अमित हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.
थोरात यांच्या संशोधन विषयांमध्ये कृषी विकास, ग्रामीण गरिबी, संस्था व आर्थिक वाढ, वंचित गटांच्या समस्या, जातिव्यवस्थेचे अर्थशास्त्र, जातिभेद, मानव विकास, मानवी हक्क व समस्या, आंबेडकरांचे आर्थिक व सामाजिक विचार, झोपडपट्टी, शिक्षण, उपेक्षित गटांसाठीची धोरणे इत्यादींचा समावेश होतो. त्यांनी जानेवारी २००३ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीज (आयआयडीएस) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ते संचालक व अध्यक्ष होते. संस्थेमार्फत त्यांनी दलित, आदिवासी आणि इतर दुर्बल घटकांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती, तसेच त्यांच्या समस्यांबद्दल प्रश्न निर्माण करून सरकार व नागरी समाज संघटनांना धोरणे विकसित करण्यास आणि त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यास मदत केली. त्यामुळे सामाजिक विज्ञान संशोधनात दुर्लक्षित झालेल्या बाजारपेठेतील आणि बाजारपेठ नसलेल्या संस्थांमध्ये जात आणि अस्पृश्यतेवर आधारित आर्थिक भेदभावाच्या जटिल समस्या समजून घेण्यास मदत झाली. त्यांनी जात, धर्म आणि अस्पृश्यता आधारित असलेली बाजारपेठ आणि नसलेली बाजारपेठ या परस्परविरोधी भेदभावांची संकल्पना विकसित करून आर्थिक भेदभावामुळे गरिबी कशी वाढते, हे दर्शविले आहे. त्यामुळे शोषणाचे स्वरूप उघड करण्यास येणाऱ्या हजारो पिढ्यांना मार्गदर्शक असणार आहे. त्यांच्या संकल्पनेमुळे सरकार, स्वयंसेवी संस्था आणि निधी संस्थांना भेदभावावर मात करणे सोयीचे झाले. तसेच दलित, आदिवासी, इतर मागास प्रवर्ग, मुस्लिम व स्त्रिया यांच्या सक्षमीकरणासाठी विविध धोरणे विकसित करणे व त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेत बदल घडवून आणण्यास मदत झाली आहे. त्यांच्या संशोधन कार्याने सरकारच्या समाजहिताच्या विविध धोरणांवर प्रभाव पाडला आणि एससी, एसटी, ओबीसी, स्त्रिया आणि अल्पसंख्याकांसाठी योग्य उपाययोजना करण्यास सरकारला मदत केली; ज्यामुळे आंतरगट विषमता कमी करण्यास आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यास मदत झाली. त्यांच्या या संशोधनामुळे अनेक संशोधकांना आर्थिक भेदभावामुळे विविध प्रदेशांतील गरिबीवर झालेला परिणाम यांवर संशोधन करण्यास प्रेरित केले. थोरात यांनी स्थापन केलेल्या सामाजिक व आर्थिक समता संघाशी नागपूर शहरातील सर्व जाती धर्मांच्या एकूण ८० पुरोगामी संघटना जोडल्या गेल्या त्यामुळे सामाजिक अभिसरणास मदत झाली.
थोरात यांनी १९८० ते २०१४ या काळात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सेंटर फॉर द स्टडी ऑफ रिजनल डेव्हलपमेन्ट या विभागात अध्यापन केले. यादरम्यान त्यांनी आयओव्हा स्टेट विद्यापीठ, एम्स आणि ब्रँडीज विद्यापीठ, वॉल्थम (यूएसए) या ठिकाणी अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांनी १९९१ ते २००० या काळात आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था, वॉशिंग्टन डी. सी. येथे संशोधन सहयोगी व सल्लागार या पदाची जबाबदारी पार पाडली. तसेच ते २०१५ – २०१७ या काळात सावित्रीबाई फुले विद्यापीठात मानद प्राध्यापक होते. त्यांनी २००६ – २०११ या काळात विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षस्थान भूषविले असून अध्यक्षीय कारकीर्दीत त्यांनी गरीब विद्यार्थ्यांकरिता विविध संशोधन छात्रवृत्ती सुरू केल्या. त्यांच्या आर्थिक संशोधन, शैक्षणिक आणि साहित्यिक या बहुमूल्य व उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना भारत सरकारद्वारा २००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी राष्ट्रीयच नव्हे, तर अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी संशोधन केले आहे. उदा., आयएलओ, यूएनडीपी, युनिसेफ, एफएओ इत्यादी. त्यांच्या संशोधनामुळे या आंतरराष्ट्रीय संस्थाना भेदभावग्रस्त गटांच्या धोरणांवर काम करण्यासाठी मदत झाली आहे. भारताच्या योजना आयोगाच्या सामाजिक न्याय विभागाची, तसेच तेलंगाना राज्याच्या जातीय जनगणना सल्लागार समितीच्या सदस्यपदाची (२०२५) महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांनी पार पाडली.
थोरात यांनी भारतीय सामाजिक विज्ञान संशोधन परिषद, नवी दिल्ली (आयसीएसएसआर); भारतीय अर्थशास्त्र संघटना; सामाजिक व आर्थिक परिवर्तन संस्था अशा अनेक महत्त्वपूर्ण संस्थांचे अध्यक्षपद भूषविले. धुळे येथे १३ व १४ जुलै २०१९ मध्ये पार पडलेल्या दहाव्या कॉमरेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. ते मुक्ती विमर्श या नियतकालिकाचे संस्थापक संपादक आहेत. महाराष्ट्र इंडिया मॅटर्सद्वारे १०० प्रमुख भारतीय व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांची निवड झाली होती. दलित प्रतिष्ठेच्या मालिकेंतर्गत प्रथमच उच्च पदावर विराजमान झालेल्या १० प्रतिष्ठित दलितांच्या यादीत त्यांचा समावेश होतो. डॉ. बाबासाहेबांचे आर्थिक विचार जागतिक पातळीवर नेऊन त्याची चर्चा घडून आणण्याचे महत्त्वपूर्ण काम थोरात यांनी केले. त्यांचे भारताच्या अर्थशास्त्रीय अभ्यासामध्ये, दलित चळवळीमध्ये आणि धोरणात्मक दृष्ट्या नवनवीन संस्थांच्या निर्मितीमध्ये अमूल्य योगदान आहे. त्यांना अमेरिकेतील आंबेडकर इंटरनॅशनल मिशनतर्फे एप्रिल २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
थोरात यांनी एकूण ३० ग्रंथांचे लेखन केले असून काही ग्रंथांचे हिन्दी व मराठी भाषांत अनुवाद झाले आहेत. मुख्यत: त्यांचे लिखाण हे अनुसूचित जाती व जमाती, इतर मागासवर्ग, गरिबीशी संबंधित, धार्मिक अल्पसंख्याकांच्या समस्या, जातीभेद, अत्याचार, मानवी हक्क, बालकामगार, शहरी झोपडपट्टी, आरक्षण धोरण, जात व वंश, अशा सामाजिक समस्यांवर आधारित आहेत. वोयेज ऑफ ॲन अकॅडेमिशिअन अँड ए सोशल ॲक्टिविस्ट : सुखदेव थोरात हा त्यांच्यावरील गौरव ग्रंथ २०२५ मध्ये प्रकाशित झाला. त्यांचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ : कास्ट, रेस्ट अँड डिस्क्रिमिनेशन, २००४; द हिंदू सोशल सिस्टिम अँड ह्युमन ऑफ दलित, २००४; आंबेडकर रोल इन इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड वॉटर पॉलिसी, २००६; आंबेडकर इन रिट्रोस्पेक्ट, २००७; रेनफेल्ड ॲग्रिकल्चर, २००८; बी. आर. आंबेडकर, २००९; सोशल जस्टिस फिलॉन्थ्रॉफी, २००९; भारतातील दलित समाज, २०१७; सोशल सायन्स रिसर्च इन इंडिया, २०१८; अनटचेबिलिटी इन रुरल इंडिया, २०२३; दलित सशक्तीकरण, २०२३; वंचितांचे वर्तमान, २०२३; शेड्युल्ड कास्ट इन द इंडियन लेबर मार्केट, २०२३; इकॉनॉमिक कास्टिजम, २०२५; कंफ्रंटिंग कास्ट एक्सक्लुजन, २०२५.
थोरात यांना भारतातील सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रांमधील योगदानासाठी अनेक मानसन्मान लाभले आहेत : ‘मिस्टर मिलिंद’ पुरस्कार, १९६९; ‘मिलिंद’ पुरस्कार, २००८; डॉ. भीमराव आंबेडकर रत्न पुरस्कार, २०१२-१३; २०११-१२ : डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार, २०१६-१७; मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, २०१२-१३; डॉ. आंबेडकर चेतना पुरस्कार, जाल्लंदर, पंजाब, २००१; लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार इत्यादी.
थोरात सध्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथे, एमेरिट्स प्रोफेसर आणि बंगलोर येथील सामाजिक व आर्थिक बदल या संस्थेचे अध्यक्ष आहेत (२०२६).
संदर्भ :
- सुखदेव, थोरात, वंचितांचे वर्तमान, मुंबई, २०२१.
- Deshpande, R. S. (edited), Voyage of an academician and a Social Activist : Sukhadeo Thorat, Jaipur, 2025.
समीक्षक : संतोष दास्ताने
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
