शरीराला मूर्त रूप देणाऱ्या घटकांना आयुर्वेदात धातू असे म्हणतात. धातू निर्मितीचा क्रम पाहिल्यास मज्जा हा सहाव्या क्रमांकाचा धातू आहे. मज्जाधातू स्निग्ध स्वरूपाचा धातू आहे. शरीरात स्नेहभाव निर्माण करणे, बल निर्माण करणे, पुढच्या धातूचे म्हणजेच शुक्रधातूचे पोषण करणे व अस्थिंच्या सुषिरतेमुळे त्यांच्या ठिकाणी निर्माण झालेली पोकळी भरणे हे मज्जाधातूचे कार्य आहे.
मज्जाधातूचे शरीरातील स्थान सांगताना सुश्रुताचार्य म्हणतात की, मज्जा विशेषत: मोठ्या अस्थिंमध्ये असते. वायू महाभूतामुळे अस्थिच्या ठिकाणी सुषिरता (सच्छिद्रता) निर्माण होते. त्यात एक प्रकारचा स्नेह स्वरूप धातू भरला जातो, ज्याला मज्जा असे म्हणतात. डोक्याच्या कवटीच्या आत असणाऱ्या मेंदूचा अंतर्भाव मज्जाधातूत केला जाऊ शकतो. शौच, नेत्र व त्वचेच्या ठिकाणी उत्पन्न होणारी स्निग्धता हा मज्जाधातूचा मल सांगितला आहे. ज्या पदार्थांच्या सेवनाने शरीरात स्निग्धपणा येतो त्यांना स्नेहद्रव्य म्हणतात. चरकाचार्यांनी असे चार उत्तम प्रकारचे स्नेहद्रव्य सांगितले आहे की, ज्यात मज्जेचा समावेश आहे. मज्जेच्या सेवनाने शरीराचे बल, शुक्र, रस, कफ, मेद, व मज्जा यांची वाढ होते. विशेषत: यामुळे हाडांना बळकटी मिळते. म्हणजेच शरीरधारणातच नव्हे, तर प्रत्यक्ष चिकित्सेतही या धातूचा उपयोग होतो.
शरीरात मज्जेचे प्रमाण कमी झाल्यास हाडांमध्ये दुबळेपणा, हलकेपणा जाणवतो व शरीर सतत वातरोगाने पीडित असते. सुश्रुतांनी या संदर्भात शुक्र कमी होणे, सांध्यांमध्ये वेदना होणे ही लक्षणे विशेषत्वाने सांगितली आहेत. मज्जाधातू अधिक प्रमाणात वाढल्यास सर्व शरीरात विशेषत: डोळ्यांच्या ठिकाणी जडपणा जाणवतो. तसेच सांध्यांमध्ये वेदना होणे, चक्कर येणे, डोळ्यांपुढे अंधारी येणे, बेशुध्द होणे, हातापायांच्या बोटांवर खोलवर पसरलेले फोडं होणे ही लक्षणे दिसतात.
ज्या व्यक्तीमध्ये मज्जा धातू उच्च प्रतिचा असतो त्याला मज्जासार म्हणतात. मज्जासार व्यक्ती कोवळ्या अंगकाठीचे परंतु, कृश नसलेले व बलवान असतात. त्यांचा वर्ण स्निग्ध व बोलणेही स्निग्ध असते. त्यांचे सांधे आकाराने मोठे, गोलाकार व लांब असतात. डोळेही मोठे असतात. ते दीर्घायू, बलवान, उत्तम शास्त्रज्ञान असलेले, कलाकौशल्य असलेले, आर्थिकदृष्या संपन्न, संततीयुक्त व समाजात सन्माननीय असतात.
पहा : धातु, धातु-२, दोषधातुमलविज्ञान.
संदर्भ :
- सुश्रुत संहिता –सूत्रस्थान, अध्याय १५ श्लोक ५, १३ व १९, अध्याय ३५ श्लोक १८.
- सुश्रुत संहिता –शारिरस्थान, अध्याय ४ श्लोक १३.
- चरक संहिता –चिकित्सास्थान, अध्याय १५ श्लोक १८-१९, ३०-३५.
- चरक संहिता –सूत्रस्थान, अध्याय १२ श्लोक १३, अध्याय १७ श्लोक ६८, अध्याय २८ श्लोक १७-१८.
- चरक संहिता –विमानस्थान, अध्याय ८ श्लोक १०८.
- चरक संहिता –शारिरस्थान, अध्याय ६ श्लोक १०.
समीक्षक – जयंत देवपुजारी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.