‘स्वेदन’ ही आयुर्वेदात पंचकर्म करण्यापूर्वीची, स्नेहनानंतर करण्याची एक तांत्रिक प्रक्रिया आहे. तसेच वातदोष आणि कफदोष ह्यांनी होणाऱ्या रोगांमधे चिकित्सा म्हणून वर्णन केले आहे. ज्या प्रक्रियेमुळे किंवा औषधांमुळे शरीरात घामाची निर्मिती होते, त्याला ‘स्वेदन’ असे म्हणतात. शरीर अकडले असल्यास, शरीरात जडपणा किंवा थंडपणा असल्यास ते दूर करण्याचे काम स्वेदनाने होते. ज्याप्रमाणे तेल लावून आणि शेकून कोरडे लाकूड देखील वळवता येते, त्याचप्रमाणे शरीरातील अकडलेले भाग स्वेदनाने ठीक होतात.
स्वेदनाचे अग्नीच्या वापरानुसार अग्नी स्वेदन आणि निरग्नी स्वेदन असे दोन प्रमुख प्रकार पडतात. अग्नि स्वेदन ह्या प्रकारात स्वेदन करण्यासाठी प्रत्यक्ष अग्नीचा वापर केला जातो; तर निरग्नी स्वेदन ह्यात अग्नीचा वापर न करता घामाची निर्मिती होते. उदा., व्यायाम, गरम खोलीत बसणे, गरम पांघरूण पांघरणे, भूक, जास्त प्रमाणात मद्यसेवन, भिती, राग येणे, पोटीस बांधणे आणि उन्हात बसणे.
तसेच स्वेदनाचे एकांग स्वेदन आणि सर्वांग स्वेदन असेही दोन प्रकार होतात. एकांग स्वेदनात मर्यादित स्थानी स्वेदन करतात. उदा., नाडी स्वेद, वाळू गरम करून त्याने सांध्यांना दिलेला स्वेद. ज्यावेळी संपूर्ण शरीराला स्वेदन दिले जाते, तेव्हा त्याला ‘सर्वांग स्वेदन’ असे म्हणतात. उदा., बंद पेटीत दिलेला शेक. स्वेदनासाठी जी औषधे वापरली जातात, त्यांच्या गुणधर्मांवरून स्वेदनाचे स्निग्ध स्वेदन आणि रुक्ष स्वेदन असे दोन प्रकार होतात. कोमट तेलाची धारा हे स्निग्ध स्वेदन, तर गरम वाळूने शेकणे हे रुक्ष स्वेदन होय.
ज्यांना सर्दी, खोकला, उचकी लागणे, मान, कान, किंवा डोके दुखत असेल, तोंड वाकडे झाले असेल, शरीर जड वाटत असेल, लकवा असेल, शरीर अकडलेले असेल त्यांना स्वेदन देतात. थंडी वाजणे बंद होणे, वेदना थांबणे, अकडलेले शरीर मोकळे होणे, शरीर अधिक मऊ होणे, घाम येणे ही लक्षणे दिसली म्हणजे स्वेदन झाले असे समजावे.
पहा : पंचकर्म, स्वेद.
संदर्भ :
- चरकसंहिता — सूत्रस्थान, अध्याय १०, श्लोक ५ ; अध्याय १४, श्लोक ३, १३, १६-२४, ६४, ६५, ६६; अध्याय २२, श्लोक ११.
समीक्षक – जयंत देवपुजारी