एक महत्त्वाचा प्राचीन ईजिप्शियन देव. तो सत्य, सचोटी, प्रामाणिकपणा, बुद्धी आणि लिखाणाचा देव म्हणून ओळखला जातो. थोथ (टोट) आणि माआट या देवतांचा एकमेकांशी कोणताही नातेसंबंध नसला, तरी दोघांचा उल्लेख नेहमीच एकत्रित केलेला आढळतो. थोथची पूजा ईजिप्तमध्ये राजेशाहीच्याही आधीपासून (इ.स.पू. ६०००–इ.स.पू.३१५०) शेवटच्या टॉलेमी (इ.स.पू. ३२३−इ.स.पू.३०) राजघराण्यापर्यंत केली जात असे.

सामान्यत:आयबिस या करकोचासारखा दिसणाऱ्या पक्ष्याचे मस्तक असलेला व मस्तकावर चंद्रबिंब/चंद्रकोर धारण केलेला आणि हातात लिखाणाचे साहित्य पकडून असलेल्या मानवी स्वरूपात थोथचे चित्रण केलेले दिसते. त्याने चित्रलिपी, गणित, खगोलशास्त्र या विषयांचा शोध लावला असून त्याला भाषेतील अलंकार, वस्तूंची नावे आणि वर्णमालेचा स्रोत मानले जाते. शिवाय त्याला साहित्याचा संशोधक, मानवतेचा हितकारक दैवी मित्र, ग्रंथालयांचा आश्रयदाता आणि लिखाणाचा प्रायोजक मानले जाते. त्याला काळाची देवता (Lord of Time) आणि संवत्सरांचा गणनाकार (Reckoner of Years) असेही म्हटले जाते.

असे म्हटले जाते की, थोथने स्वर्गाचा आढावा घेतला आणि पृथ्वीला आकार दिला. ऋतूंचे मोजमापन आणि काळाचे नियमन करून त्यांच्या नोंदी ठेवल्या. आपल्या दैवी शाब्दिक ज्ञानाच्या मदतीने राजाला पृथ्वीवरील न्यायपूर्ण शासनासाठी दीर्घ कारकीर्द दिली. त्याने आपल्या धारदार चाकूने राजाला/देवांना हानी पोहोचविणाऱ्यांचे हृदय कापून त्यांचे डोके उडविले. तो अधोलोकातील मृतात्म्यांच्या न्यायनिवाड्याच्या निर्णयाच्या नोंदी ठेवतो. तो देवांचा संरक्षक आणि दूत होता. इत्यादी अनेक उल्लेख त्याच्याविषयी सापडतात.

पिरॅमिडमधल्या एका सर्वांत प्राचीन लेखानुसार थोथ अधोलोकात मृतात्म्यांना आपल्या पंखांवरून वादळी जलमार्ग पार करण्यास मदत करीत असे. मृत्युपश्चात सत्याच्या दरबारात मृतात्म्याच्या हृदयाचे वजन करण्याच्या विधीत तो ओसायरिसबरोबर राहात असे व नोंदी ठेवायचे कार्य करीत असे.

सूर्यदेव रा याचा थोथ हा ज्येष्ठ पुत्र मानला गेला आहे. एका प्राचीन लेखात थोथ स्वत:ला ‘आतुम’निर्मित रा देवतेचा पुत्र आणि खेप्री देवतेने त्याला निर्माण केले, असे म्हणतो. आतुम आणि खेप्री ही राचीच अन्य रूपे असल्याने थोथला ह्या तीनही पित्यांचे सामर्थ्य लाभले, म्हणून त्याच्याकडे जन्मतःच विशेष गुप्तशक्ती होत्या, असे मानले जाई. काही ठिकाणी थोथची पत्नी/सहचारिणी म्हणून सेशाट देवतेचा उल्लेख येतो. ती पुस्तके आणि ग्रंथालयाची आश्रयदाती मानली जात असे.

थोथविषयी अनेक आख्यायिका प्रसिद्ध असून त्यांपैकी काही आख्यायिका खालीलप्रमाणे आहेत :

  • एका आख्यायिकेनुसार राने आपली काही कर्तव्ये इतर देवांना वाटून दिली आणि थोथला आपला सचिव नेमले. थोथचा उल्लेख राचे हृदय म्हणजेच ज्ञानाचा स्रोत असाही येतो. राच्या सूर्यनौकेत थोथ आणि माआट एकत्र असत आणि ते दोघे दिवसाचा गतीमार्ग ठरवीत. अन्य लेखात त्याला ओसायरिसचा सचिव म्हटले आहे.
  • दुसऱ्या आख्यायिकेनुसार थोथने इसिस देवतेला काही मंत्र दिले, ज्यामुळे ओसायरिसला होरसचे पितृत्व निभाविण्यासाठी नवजीवन मिळाले. थोथने होरसला विंचवाच्या दंशापासून बरे केल्यामुळे त्यास विज्ञानाचा आणि औषधींचा सुद्धा देव मानला जातो.
  • तिसऱ्या आख्यायिकेनुसार थोथचा जन्म अभद्र मानल्या गेलेल्या सेत(थ) या देवतेच्या मस्तकातून झाला. थोथ हा वनस्पतींचा आणि मृतांचाही देव असल्याने तो ओसायरिस देवतेच्या दफनकार्यांत तिला मदत करू शकला. इसिस, होरसच्या पालनपोषणातदेखील थोथने मदत केली. होरसनंतर ईजिप्तच्या सिंहासनावर थोथ बसला. त्याने ३००० वर्षांपेक्षा जास्त काळ न्यायपूर्ण राज्य केले आणि मग आकाशात चंद्राची जागा घेतली.
  • चौथ्या आख्यायिकेनुसार राने थोथला रात्रीच्या वेळी आकाश प्रकाशमान करण्याचा आदेश दिला. त्यानुसार तो चंद्र बनून आकाश प्रकाशमान करतो; तथापि काही अक्राळविक्राळ राक्षस त्याला हळूहळू गिळून नंतर जबरदस्तीने हळूहळू वमन करतात. या घटनेचा प्राचीन ईजिप्शियनांनी चंद्राच्या बदलणाऱ्या कलांशी संदर्भ लावलेला दिसून येतो.

एका लेखानुसार नट देवता पहिल्या पाच देवांना जन्म देईपर्यंत तिला वेळ मिळावा म्हणून थोथ सलग पाच दिवस जुगार खेळत होता. तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार तो त्या वेळी देवांचे निरोप पोहोचविण्याचे काम करीत होता. थोथने एक जादूचे पुस्तक (The book of Thoth) लिहिले असून ते आजही मेम्फिसमधल्या एका थडग्याखाली पुरलेले असून त्यात असलेल्या मंत्रात देवांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती आहे, असे मानले जाते.

थोथ देवाच्या पूजेचे मुख्य केंद्र मध्य ईजिप्तमधील हीलिओपोलीस मॅग्ना येथे होते. तिथे आज थोथचे १५ फूट उंचीचे, क्वार्टझाइट दगडाचे, प्रत्येकी ३५ टन वजनाचे दोन भव्य पुतळे असून ते राजा आमेनहोतेप याने इ.स.पू. १३९०−इ.स.पू.१३५२ या काळात बांधले होते.

थोथ हा टॉलेमी राजांच्या काळात ग्रीक देवता हर्मिस म्हणून ओळखला जाऊ लागला आणि प्राचीन ख्मून शहर ‘हर्मोपोलीस’ नावाने ओळखले जाऊ लागले.

संदर्भ :

  • Armour, Robert A. Gods and Myths of Ancient Egypt, Cairo, 1986.
  • Cotterell, Arthur; Storm, Rachel, The Ultimate Encyclopedia of Mythology, London, 2012.
  • Oakes, Lorna; Gahlin, Lucia, Ancient Egypt, Pennsylvania, 2007.
  • Willis, Roy, World Mythology : The Illustrated Guide, London, 1993.
  • https://www.ancient.eu/article/885/egyptian-gods—the-complete-list/

                                                                                                                                                                    समीक्षक : शकुंतला गावडे