पाली ( राजस्थान ) जिल्ह्यातील सेन्द्रा ग्रॅनाइट हे निसर्गाच्या शिल्पकारीचे उत्तम, पण दुर्मिळ असे उदाहरण आहे. भूपृष्ठावर उघड्या असलेल्या पातालीय ग्रॅनाइट खडकांवर कोट्यवधी वर्षांपासून ऊन, वारा, पाणी ह्या भूशास्त्रीय कारकांनी विविध रूपाने अपक्षय क्रिया केल्याने विघटन आणि विलयन प्रक्रियांद्वारे त्यांच्यामध्ये आश्चर्यकारकपणे कोरीव शिल्पासारखे आकार तयार झालेले दिसतात.

सेन्द्रा येथे असलेल्या पुरातन (साधारण १०० ते १५० कोटी वर्षांपूर्वीचे) दिल्ली महासंघाच्या (Delhi Super group) अवसादी (sedimentary) खडकांमध्ये सेन्द्रा ग्रॅनाइट अभिस्थापित (Emplacement) झालेला आहे. या ठिकाणी हा ग्रॅनाइट सुसंवादी पातालीय अंतर्भेदीच्या (Concordant Plutonic Intrusion) प्रकारात आढळतो. त्याचे भूशास्त्रीय वय ९०० दश लक्ष ( ९० कोटी वर्षांपूर्वी) इतके आहे. या सुसंवादी पातालीय अभिस्थापनामधील मोठे वृत्तस्कंध (Large Bosses) हे कॅल्क नाइस ( पट्टिताष्म ) खडकात आहेत, तर त्यांच्या छोट्या शाखा या हॉर्नब्लेंड सुभाजा खडकामध्ये आणि आजूबाजूला पसरलेल्या आहेत.

सेन्द्रा ते पाली या राष्ट्रीय महामार्ग आठच्या दोन्हीबाजूला सेन्द्रा गावाजवळ नैसर्गिक शिल्पकारी असलेले हे ग्रॅनाइट गिरिपिंडीय (massif) स्थान आहे. पश्चिम रेल्वेची अहमदाबाद – अजमेर रेल्वे या ग्रॅनाइटच्या गिरिपिंडातूनच जाते.

संदर्भ :

                                                                                                                                                                                                                        समीक्षक : पी. एस. कुलकर्णी