अश्मीभूत लाकूड जीवाश्म (Petrified wood fossil) यामध्ये जीवाश्माचा आकार, आकारमान व रचना ही थेट मूळच्या सांगाड्यासारखी असतात. पण मूळच्या घटकाची जागा एखाद्या निराळ्याच रासायनिक संघटनाच्या खनिजाने (Mineral Composition) घेतलेली असते. मुरणाऱ्या पाण्यातील एखाद्या द्रव्याची आणि सांगाड्याच्या घटकांची कणाकणाने अदलाबदल होऊन असे जीवाश्म तयार होतात. उदा., वृक्षांच्या खोडांचे काष्ठतंतूंच्या (Cellulose) जागी गारेची (Silica) स्थापना होते. जैव पदार्थाच्या (Organic) जागी खनिज पदार्थ (Mineral matter – Inorganic) आणणाऱ्या प्रक्रियेस अश्मीभवन (Petrification) म्हणतात.

राजस्थानातील जैसलमीर जिल्ह्याचा हा भाग प्रसिद्ध अशा थरचे वाळवंटाचा भाग आहे. अशा वाळवंटी भागातील अकाल गावात राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय अश्मीभूत लाकूड उद्यान स्मारक असणे हे एक आश्चर्य मानले जाते. आजचा वाळवंटी असलेला भाग (अति उष्ण आणि कोरडे हवामान असलेला) सु. १८० द.ल. वर्षांपूर्वीच्या भूशास्त्रीय कालखंडात दाट हरित वनांचा, कमी उष्ण आणि दमट हवामान असलेला आणि समुद्रांनी वेढलेला होता. नंतरच्या भूशास्त्रीय कालखंडात विविध भूवैज्ञानिकीय घडामोडी (Geological activities) आणि हवामानात तीव्र प्रकारचे बदल झाल्याने (Climate Change) आजची परिस्थिती निर्माण झालेली असावी.

२१ हेक्टर जागेत पसरलेल्या या जीवाश्म उद्यानात डझनावारी अशी अश्मीभूत लाकूड ओंडके (Petrified wood logs), आडवे व इतस्ततः पसरलेले आहेत. यांच्यातील सर्वांत मोठा लाकडी ओंडका १३.४ मी X ०.९ मी. लांबी रुंदीचा आहे. या ठिकाणी त्या वेळच्या मध्यजीव महाकल्पातील (Mesozoic Era) जुरासिक कल्प (Jurassic Period) काळातील अस्तित्वात असलेल्या वनस्पती प्रकारातील पेट्रोफायलम (Petrophyllum), टीलोफायलम (Ptilophyllum), इक्विसेटिटिस (Equisetitis) प्रजाती (Species) आणि द्विबीजपत्रकाचे लाकूड (Dicotyledonous wood) ही अश्मीभूत जीवाश्मे आहेत. यांच्याबरोबर त्याच काळातील गॅस्ट्रोपॉड (Gastropod) प्रकारातील शंख (Shell) पाहता येतात. जैसलमीर शहराच्या आग्नेयेला १८ किमी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्र. १५ वरील अकाल गावाजवळ हे राष्ट्रीय भूवैज्ञानिकीय स्मारक आहे.

संदर्भ :

  • संकेतस्थळ – Geological Survey of India, https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/pageGeoInfo/pageGEOTOURISM?_adf.ctrl-state=dvd210a27_5&_afrLoop=29220469476959168#!

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी