नाथ संप्रदायातील एक थोर योगी. कौल योगिनी संप्रदायाचे प्रवर्तक. चौऱ्याऐंशी सिद्धांपैकी एक महत्त्वाचे सिद्ध. मत्स्येंद्रनाथांना मच्छंद, मच्छघ्नपाद, मच्छेंद्रपाद, मत्स्येंद्रपाद, मीनपाद, मीननाथ, मच्छेंदपाद, मत्स्येंद्र, मच्छिंद्रनाथपाद, मच्छेंद्रार, मच्छिंदर, भृंगपाद या अन्य नावांनीही ओळखले जाते. दक्षिणेकडील वीरशैव पंथाचे एक श्रेष्ठ संत अल्लमप्रभू त्यांच्या गुरूंना ‘अनिमिषदेव’ असे संबोधत. अनिमिष शब्दाचा अर्थ ‘मत्स्य’ असा होतो. तिबेटात प्रचलित असलेले बौद्ध सिद्ध ‘लुईपा’ यांच्याशीही मत्स्येंद्रनाथांचे साधर्म्य दाखविले जाते. त्यांचा जीवन-काळ सुमारे १० वे शतक सांगण्यात येतो. त्यांचा सर्वप्रथम उल्लेख १० व्या शतकाच्या उत्तरार्धात अभिनवगुप्त लिखित तंत्रालोक या ग्रंथात ‘मच्छंद विभु’ म्हणून आलेला आहे. चौऱ्याऐंशी सिद्ध व नवनाथांच्या बहुतेक सूचींमध्ये त्यांचे नाव आढळून येते.

मत्स्येंद्रनाथांचे शिल्प, पिंपरी दुमाला.

मत्स्येंद्रनाथांच्या माता-पित्यांविषयी माहिती उपलब्ध नसून ते मासे पकडणाऱ्या ‘कैवर्त’ (कोळी) जातीचे असावेत, असा बंगाली अभ्यासक हरप्रसाद शास्त्री यांचा कयास आहे. हजारीप्रसाद द्विवेदी यांच्या मते, ते आसाममधील कामरूपातील ‘चंद्रद्वीप’ येथील असावेत, तर प्रबोधचंद्र बागचींच्या मते, बंगाल ही त्यांची जन्मभूमी असावी. ‘चंदावर’ किंवा ‘चंद्रपुरी’ नावाचे अन्य एक स्थान भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर देखील असून ते नाथ संप्रदायाशी निगडित आहे. कदलीमंजुनाथमहात्म्यम् या ग्रंथानुसार ते तौलवी (तुळू) देशाचे रहिवाशी असून ‘मंगला’ हे त्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. काही विद्वान त्यांना दक्षिण भारतीय समजतात. नाथ संप्रदायात आदिनाथ आणि गिरीजानंतर मत्स्येंद्रनाथांना पूज्य मानले जाते. त्यांना नाथ संप्रदायातील पहिला ऐतिहासिक पुरुष समजले जाते. त्यांच्यावर आधारित हजारो दंतकथा भारतीय उपखंडात प्रचलित आहेत. एका कथेनुसार, एकदा कोणत्या तरी द्वीपावर बसून आदिनाथ गिरिजेला गूढ उपदेश करीत होते. जवळच पाण्यात असलेल्या एका माशाने ते ज्ञान आत्मसात केले. आदिनाथांना हे समजताच त्यांनी त्याच्यावर जलप्रोक्षण केले. त्याचबरोबर त्या मत्स्यातून मत्स्येंद्रनाथ अवतरीत झाले. अशा आशयाची कथा थोड्याफार फरकाने कौलज्ञाननिर्णय, ज्ञानेश्वरी, तत्त्वसार, ब्रह्मानंदाची हठयोगप्रदीपिका, गोरक्षविजय, मीनचेतन, बुद्धपुराण, नवनाथभक्तिसार इत्यादी ग्रंथांत आलेली आहे. या कथेवर आधारित शिल्पे रत्नागिरी जिल्ह्यातील पन्हाळे काजी व श्रीशैलम् येथे कोरण्यात आलेली आहेत. श्रीशैलम् येथील मल्लिकार्जुन मंदिराच्या प्राकारावर त्यांच्या विषयीचे पट्ट पाषाणात कोरलेले आहेत. या कथेच्या अनुषंगाने मत्स्येंद्रनाथांच्या शिल्पांसोबत विशेषतः पादपीठावर मासाही दाखविला जातो.

मत्स्येंद्रनाथांना समर्पित काही ग्रंथही आहेत. कौलज्ञाननिर्णय, मत्स्येंद्रसंहिता, अकुलवीरतंत्रम, कुलानंदतंत्रम, ज्ञानकारिका, योगविषय, श्रीकामाख्यागुह्यसिद्धी, अकुलागमतंत्रम, कुलार्णवतंत्र, कौलोपनिषद, कौलावलीनिर्णय इत्यादी ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. यांपैकी कौलज्ञाननिर्णय हा ग्रंथ सर्वांत प्राचीन मानला जातो.

मत्स्येंद्रनाथ शिल्प, ब्राम्हणी (अहमदनगर).

बागचींच्या मते, मत्स्येंद्रनाथ सर्वप्रथम ‘सिद्धामृत’ मार्गाचे अनुयायी होते. तसेच ते कौल तंत्राच्या पूर्वाम्नय, पश्चिमाम्नय व नंतरच्या काळातील दक्षिणेकडील ‘शांभव’तंत्र या प्रकाराशीही संबंधित होते. ते चौऱ्याऐंशी सिद्धांमधील एक प्रमुख सिद्ध होते. तसेच त्यांचा संबंध ‘त्रिका कौल’ संप्रदायाशीही असल्याचे म्हटले जाते. त्यांना गोरक्षनाथांचे गुरू मानले जाते. तसेच नेपाळी कथेनुसार त्यांना अवलोकितेश्वराचा अवतार म्हटले जाते. नवनाथभक्तिसार या सांप्रदायिक मराठी ग्रंथात त्यांना नव-नारायणांच्या अवतारांपैकी कविनारायणाचा अवतार मानले जाते. त्यांच्याविषयी असेही सांगितले जाते की, त्यांना ‘पारसनाथ’ व ‘निमनाथ’ नावाची दोन मुले होती. ती जैन उपासक होती.

तेराव्या शतकातील मत्स्येंद्रसंहिता आणि १५ व्या शतकातील मैथिली ग्रंथ गोरक्ष शतकात मत्स्येंद्रनाथ कदलीबनातील तंत्र-मार्गीय योगिनींच्या जाळ्यात कसे अडकले व त्यानंतर गोरक्षांनी त्यांची सुटका कशी केली, याचे वर्णन आलेले आहे.

मत्स्येंद्रनाथांची शिल्पे भारतात अनेक ठिकाणी मिळतात. सर्वांत प्राचीन ज्ञात शिल्पे महाराष्ट्र व गुजरातमध्ये आढळून आलेली आहेत. महाराष्ट्रात त्यांची आरंभिक काळातील शिल्पे माणकेश्वर मंदिर (झोडगे), महादेव मंदिर (माणकेश्वर), नागनाथ मंदिर (औंढा नागनाथ), कांकाळेश्वर मंदिर (बीड), पुतळा बारव (सिंदखेड राजा), बगीचा मंदिर (लोणार), लेणी क्र. १४ व २९ (पन्हाळे-काजी), खुराची देवी मंदिर (चारठाणा), रामेश्वर महादेव मंदिर (येळंब), महाकाळेश्वर मंदिर (राशीन) व इतर अन्य ठिकाणांतून प्राप्त झाली आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील ब्राम्हणी येथील मत्स्येंद्रनाथांचे शिल्प ज्ञात शिल्पांमध्ये सर्वांत मोठे आहे. गुजरातमधील दीव व दभोई येथील शिल्पेही आरंभिक काळातील आहेत. दक्षिण भारतात विजयनगर काळातील अनेक मत्स्येंद्र शिल्पे विभिन्न मंदिरांवरती कोरण्यात आलेली दिसून येतात. कर्नाटकातील मंगलोर येथील मत्स्येंद्रनाथांचे शिल्प १२ व्या शतकातील मानले जाते.

मत्स्येंद्रनाथांच्या स्वतंत्र पूजेचे पुरातत्त्वीय पुरावे महाराष्ट्रात सर्वसाधारणपणे १४ व्या शतकापासून मिळून येतात. जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ-चिंचोली तसेच ब्राम्हणी (अहमदनगर) येथे १४-१५ व्या शतकातील त्यांची स्वतंत्र मंदिरे आहेत. परभणी जिल्ह्यातील चारठाणा येथील ‘खुराची देवी’ मंदिरात त्यांना मुख्य देवतेसोबत गर्भगृहात स्थान मिळाले आहे.

मुर्तिशास्त्रात मत्स्येंद्रनाथांना पद्मासन, अर्धपद्मासन, सिद्धासन, पर्यंकासन,  ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रेत तसेच इतर विभिन्न आसनांमध्येही दर्शविले जाते. अंगावरती यज्ञोपवीत (जानवे), केयूर (दंडातील कडे), वलय, हार, कौपीन, कर्णकुंडले, शृंगी, पगडी व जटा मत्स्येंद्रनाथांच्या शिल्पांमध्ये दर्शवितात. त्यांची शिल्पे प्रामुख्याने शैव, वैष्णव, शाक्त मंदिरे, लेणी, तोरणद्वार, पुष्करणीवर कोरलेली आढळून येतात. मंदिरांमध्ये ती अधिष्ठान, जंघा, स्तंभ, गर्भगृह, वितान (छत) व देवकोष्टकावरती कोरलेली आढळून येतात. आंध्र प्रदेशातील बोज्जनकोंडा येथील बौद्ध लेणीत देखील त्यांचे शिल्प गोरक्षनाथांसह कोरण्यात आलेले आहे. सर्वसाधारणपणे मत्स्येंद्रनाथांना इतर नाथ योग्यांसोबत दर्शविले जाते. पन्हाळे-काजी व दभोई येथील चौऱ्याऐंशी सिद्धांच्या शिल्पांमध्ये त्यांना एक प्रमुख स्थान दिलेले दिसून येते.

मत्स्येंद्रनाथांची आरंभिक शिल्पे ११ व्या शतकात सापडतात. यावरून निश्चितपणे ते ११ व्या शतकापूर्वीच हयात असावेत, हे सिद्ध होते.

संदर्भ :

  • Bagchi, P. C. Ed., Kaulajñāna-nirṇaya and Some Minor Texts of the School of  Matsyendranātha,  Calcutta, 1934.
  • Deshpande, M. N. The Caves of Panhāle-Kājī (Ancient Pranālaka), New Delhi, 1986.
  • ढेरे, रा. चिं. नाथ संप्रदायाचा इतिहास, पुणे, २०१०.
  • द्विवेदी, हजारीप्रसाद, नाथ संप्रदाय, अलाहाबाद, १९५०.

                                                                                                                                                             समीक्षक : अभिजित दांडेकर