जांभा खडक, अंगडिपुरम् (मल्लापुरम्; केरळ)

अंगडिपुरम् (केरळ) येथील जांभा खडक हे अम्लधर्मी चार्नोकाइट खडकांपासून आणि अनुकूल वातावरणात विशिष्ट प्रकारच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे तयार झालेले आहे. या प्रदेशात पायरोक्झिन ग्रॅन्युलाइट, चार्नोकाइट आणि मिगमाटाइट (Pyroxene Granulite, Charnockite and Migmatite) अशा ३ स्फटिकरूपी खडकांचे (Crystalline Rocks) आढळ आहे. भूशास्त्रीय कालखंडात अनुकूल परिस्थितीमध्ये मुख्यत: अति रासायनिक झीज (Chemical Weathering) होऊन जांभा खडकांचे अवशिष्ट साठे (Residual Deposits) तयार झाले आहेत.

आर्थिक दृष्टिकोनातून या जांभा खडकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या रासायनिक घटकांनुसार यांच्यापासून ॲल्युमिनियम धातू खनिज (बॉक्साइट), लोह धातू खनिज आणि निकेल धातू खनिज मिळू शकते. या ठिकाणी असलेले जांभा खडक हे समुद्रसपाटीपासून सरासरी ६० मी. उंचीवरील सर्व भागातून आढळतात.  हे स्मारक मल्लापुरमपासून पालघाटच्या रस्त्यावर सु. १६ किमी. अंतरावरील शोरानूर-निलांबूर रेल्वे मार्गावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह आवारात आहे.

संदर्भ :

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी