महर्षि पतंजलींनी ‘चित्ताच्या वृत्तींचा निरोध म्हणजे योग’ अशी योगाची व्याख्या केली आहे. सामान्य भाषेत चित्ताच्या वृत्ती म्हणजे ‘विचार’ असे समजता येईल. चित्ताच्या सर्व वृत्तींचा निरोध करणे म्हणजे चित्त निर्विचार होणे हे जरी योगाचे लक्ष्य असले, तरीही ते सहजासहजी प्राप्त होऊ शकत नाही. कारण सर्वसामान्य व्यक्तीच्या चित्तात क्षणाक्षणाला नवीन वृत्ती उत्पन्न होतात आणि अशा अनेक वृत्तींचा निरोध करावयाचे ठरविले तरी ते अशक्य आहे. त्यामुळे हळूहळू अनेक वृत्ती असणाऱ्या चित्ताला त्या (सर्वार्थता) अवस्थेकडून एक वृत्ती असणाऱ्या (एकाग्रता) अवस्थेकडे वळवावे लागते व त्यानंतर एकाग्रता अवस्थेत असलेल्या त्या एका वृत्तीचा निरोध करणे शक्य होते. योगाच्या परिभाषेत एक वृत्ती असणाऱ्या एकाग्रतेलाच सम्प्रज्ञात समाधि आणि एकही वृत्ती नसलेल्या निरुद्ध अवस्थेलाच असम्प्रज्ञात समाधि म्हटले जाते. अशा प्रकारे सम्प्रज्ञात आणि असम्प्रज्ञात हे समाधीचे दोन प्रकार होत.

ज्या वेळी चित्त चंचल असते, चित्तामध्ये अनेक वृत्ती असतात, अशा वेळी कोणत्याही विषयाचे संपूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. कारण चित्त एखाद्या विषयावर स्थिरच होत नाही. परंतु, सम्प्रज्ञात समाधीमध्ये चित्त एकाग्र असते व त्या एकाग्रतेमुळे चित्ताला त्या विषयाचे यथार्थ आणि संपूर्ण ज्ञान होते, म्हणूनच या समाधीला ‘सम्प्रज्ञात’ असे म्हणतात. विज्ञानभिक्षूंनी योगवार्त्तिक (१.१) ग्रंथामध्ये सम्प्रज्ञात या शब्दाचा अर्थ ‘ज्या योगामध्ये ध्येय पदार्थाचे ध्यान केले जाते आणि त्यामुळे त्या पदार्थाचे यथार्थ आणि प्रत्यक्ष ज्ञान होते, त्याला सम्प्रज्ञात योग असे म्हणतात,’ असा दिला आहे (सम्यक् प्रज्ञायते साक्षात्क्रियते ध्येयमस्मिन् निरोधविशेषरूपे योगे इति संप्रज्ञातो योग:|). योगदर्शन हे सांख्यदर्शनावर आधारित असल्यामुळे अचेतन त्रिगुणात्मिका प्रकृति आणि चेतनपुरुष ही दोन तत्त्वे पूर्णपणे वेगळी आहेत हे समजून घेणे हे ‘सम्यक् ज्ञान’ होय, असे सर्वदर्शनसंग्रह या ग्रंथांत माधवाचार्यांनी स्पष्ट केले आहे (सम्यक्प्रज्ञायते अस्मिन्प्रकृतेर्विविक्ततया ध्येयमिति |).

चित्ताची एकाग्रता होण्यासाठी ज्यावर चित्त एकाग्र होऊ शकेल असा कोणता तरी विषय (ध्येय पदार्थ) असावा लागतो. योगशास्त्रानुसार ॐकार किंवा प्राण किंवा ईश्वर अशाच विषयांवर एकाग्रता साधली पाहिजे, असा कोणताही नियम नाही. महर्षि पतंजलींनी ‘यथाभिमत-ध्यानाद्वा’ (योगसूत्र १.३९) या सूत्राद्वारे स्पष्ट केले आहे की, ध्यानाचा व एकाग्रतेचा विषय कोणताही असू शकतो. साधकाने आपल्या आवडीनुसार कोणत्याही विषयावर चित्त एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्या विषयावर चित्त एकाग्र केले जाते, त्या विषयाच्या स्वरूपानुसार सम्प्रज्ञात समाधीचे चार भेद होतात –

(१) वितर्क : (अनुगत सम्प्रज्ञात). ज्यावेळी योग्याचे चित्त पाच महाभूतांनी बनलेल्या एखाद्या स्थूल (इंद्रियग्राह्य) वस्तूवर एकाग्र होते, त्यावेळी ती वितर्कानुगत समाधि होय. उदाहरणार्थ, देवाची मूर्ती, फूल इत्यादी. साधनेच्या प्रारंभीच्या अवस्थेत पुरुष (आत्मा) किंवा प्रकृति अशा सूक्ष्म तत्त्वांवर चित्त एकाग्र होणे शक्य नसते, त्यामुळे एकाग्रतेची सुरुवात एखाद्या स्थूल विषयापासून करावी लागते आणि जेव्हा चित्ताला एकाग्र होण्याची सवय लागेल तेव्हा हळूहळू त्याला सूक्ष्म विषयांकडे वळवावे लागते. वितर्कानुगत सम्प्रज्ञात समाधीचे दोन भेद होतात – सवितर्क आणि निर्वितर्क. ज्या वस्तूवर चित्त एकाग्र आहे, त्या वस्तूबरोबरच तिच्या नावाची  आणि तिच्या ज्ञानाची एकत्रित रूपाने जाणीव होत असेल तर तिला सवितर्क समाधि म्हणतात (तत्र शब्द-अर्थ-ज्ञान-विकल्पैः संकीर्णा सवितर्का समापत्ति: | योगसूत्र १.४२). उदाहरणार्थ, योगी एखाद्या फुलाचे (फूल या वस्तूचे) ध्यान करीत असेल, परंतु त्याक्षणी या वस्तूचे नाव ‘फूल’ आहे अशा प्रकारे शब्दाची आणि ‘मला फूल या वस्तूचे ज्ञान आहे’ अशा प्रकारच्या ज्ञानाची जाणीव होत असेल, तर तिला सवितर्क समाधि म्हणतात. जेव्हा वस्तूचे नाव आणि तिचे ज्ञान यांची जाणीव न होता केवळ वस्तूची जाणीव होत असेल तर तिला निर्वितर्क समाधि म्हणतात (स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येवार्थमात्र-निर्भासा निर्वितर्का | योगसूत्र १.४३). या दोन्ही प्रकारांत स्थूल पदार्थावरच चित्त एकाग्र असते.

(२) विचार : (अनुगत सम्प्रज्ञात). ज्यावेळी योग्याचे चित्त सूक्ष्म विषयांवर एकाग्र होते तेव्हा तिला विचारानुगत समाधि म्हणतात. एखाद्या वृक्षात फांद्या, पाने, फुले, फळे, खोड इत्यादी अवयव वेगवेगळे दिसतात. तात्पर्य, वृक्ष स्थूल आहे. परंतु ज्या बीजापासून वृक्ष उत्पन्न झाला त्या बीजामध्ये हे सर्व अवयव दिसत नाहीत, तर त्या ठिकाणी हे सर्व अवयव बीजरूपच असतात. हे बीजरूप अवयव सूक्ष्म आहेत. त्याचप्रमाणे ज्या तन्मात्रांपासून महाभूते उत्पन्न होतात ती तन्मात्रे सूक्ष्म आहेत. महाभूतांपासून बनलेल्या स्थूल विषयावर ध्यान न करता जर त्या त्या महाभूताचे कारण असलेल्या तन्मात्रावर चित्त एकाग्र झाले, तर तिला विचार-अनुगत सम्प्रज्ञात समाधि असे म्हणतात. यातही सविचार आणि निर्विचार असे दोन भेद होतात. उदाहरणार्थ, जर योगी फूलावर ध्यान करीत असेल तर फूल हे पृथ्वी तत्त्वाचे असल्यामुळे त्याचे सूक्ष्म रूप गंध तन्मात्र आहे. या ठिकाणी (देश म्हणजे ज्यावर ध्यान साधले जाते – या संदर्भात फूल), या क्षणी (काल), आणि फुलाच्या निमित्ताने गंध तन्मात्रेचे ज्ञान होत आहे; अशा प्रकारे देश, काल आणि निमित्त यांच्या जाणीवेसहित सूक्ष्म वस्तूचे ज्ञान झाल्यास ती सविचार आणि यांशिवाय फक्त तन्मात्राचे ज्ञान झाल्यास ती निर्विचार सम्प्रज्ञात समाधि होय. तन्मात्रांव्यतिरिक्त इंद्रिय, चित्त, प्राण ही देखील सूक्ष्म विषयांची उदाहरणे होत.

(३) आनन्द : (अनुगत सम्प्रज्ञात). ज्यावेळी पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये ही बाह्येंद्रिये आणि मन, अहंकार आणि बुद्धी (चित्त) ही अंतरिंद्रये यांपैकी कोणत्याही एकावर चित्त एकाग्र होत असेल तर त्याला आनन्द-अनुगत समाधि असे म्हणतात. सांख्य-योगदर्शनानुसार सत्त्वगुण प्रधान असणाऱ्या अहंकारापासून इंद्रियांची उत्पत्ती होत असल्याने त्यामध्ये सत्त्वगुणाचे आधिक्य आहे. सत्वगुणाचा संबंध सुख, आनंदाशीही आहे. ज्यावेळी योगी इंद्रियांवर ध्यान करतो, तेव्हा त्यांचे सत्त्वगुण प्रधान असणारे मूळ स्वरूप योग्याला ज्ञात होते आणि सत्त्वगुणाच्या अभिव्यक्तीमुळे आनंदाचा अनुभव येतो. त्यामुळे या समाधीला आनन्द-अनुगत समाधि असे म्हणतात.

(४) अस्मिता : (अनुगत सम्प्रज्ञात). ज्यावेळी चैतन्यस्वरूप पुरुषावर चित्त एकाग्र होते, त्यावेळी त्या समाधीला अस्मिता-अनुगत सम्प्रज्ञात समाधि म्हणतात. ‘अस्मि’ म्हणजे ‘मी आहे’. प्रत्येक जीवाला ‘मी आहे’ ही जाणीव असते, परंतु ‘मी काय आहे’ याचे ज्ञान सामान्य जीवांना नसते. चित्त चैतन्यस्वरूप पुरुषावर एकाग्र झाल्यावर ‘मी केवळ चैतन्य आहे’ असे ‘स्व’चे ज्ञान होते. पुरुष काय आहे याचे ज्ञान झाल्यावर आपोआपच इंद्रिय, महाभूत किंवा बुद्धी या त्रिगुणांनी युक्त अशा तत्त्वांपेक्षा तो वेगळा आहे, असे विवेकज्ञान प्राप्त होते, यालाच विवेकख्याति म्हणतात. विवेकख्याति ही सम्प्रज्ञात समाधीची अंतिम अवस्था आहे. या चारही अवस्थांमध्ये चित्त एकेका विषयावर एकाग्र असल्याने त्या त्या विषयावरील एकाग्रतेची एकच वृत्ती शिल्लक असते. परंतु, अंतिमत: त्या एका वृत्तीचाही निरोध करणे म्हणजे असम्प्रज्ञात समाधि होय.

सम्प्रज्ञात समाधीलाच समापत्ति व सबीज समाधि असेही म्हणतात. व्यासभाष्यामध्ये (१.१) सम्प्रज्ञात समाधीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे – ‘चित्त एकाग्र झाल्यावर जी समाधि प्राप्त होते, ती ध्येय विषयाचा साक्षात्कार घडवून आणते, अविद्या आदि पाच क्लेशांना क्षीण करते, प्रकृति-पुरुषाला बंध निर्माण करणारी कर्मबंधने शिथिल करते, चित्ताला संपूर्ण निरोधाकडे अभिमुख करते म्हणजे असम्प्रज्ञात योगाकडे नेते,’ म्हणून सम्प्रज्ञात समाधि असम्प्रज्ञाताचे साधन ठरते.

पहा : असम्प्रज्ञात समाधि, विवेकख्याति.

संदर्भ : ब्रह्मलीन मुनि, पातञ्जल योगदर्शन, चौखम्भा संस्कृतसंस्थान, वाराणसी, २००३.

                                                                                                            समीक्षक : रुद्राक्ष साक्रीकर