बौद्धमताचे एक प्रसिद्ध केंद्र व मठ. कान्हेरी लेणी मुंबईपासून सु. ३२ किमी., ठाण्यापासून सु. ८ किमी., तर मुंबई उपनगरातील बोरीवलीपासून पुढे ६ किमी. अंतरावर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आहेत. येथे सु. शंभराच्या वर बौद्ध धर्मीय लेणी असून त्या साधारणतः इ. स. पू. पहिल्या शतकापासून ते सातव्या-आठव्या शतकांदरम्यान खोदल्या आहेत. पुढे सु. पंधराव्या शतकापर्यंत या लेणींचा वापर भिक्षूंनी केलेला दिसतो. कान्हेरीचा प्राचीन उल्लेख येथूनच प्राप्त झालेल्या शिलालेख व ताम्रपटात ‘कन्हगिरी’ व ‘कृष्णगिरी’ असा आहे. हीनयान (थेरवाद), महायान आणि वज्रयान संप्रदायाचा पगडा या लेणींवर दिसून येतो. येथील लेण्यांत शंभरावर अभिलेख असून काही भित्तिचित्रेही आहेत. उत्कृष्ट जल व्यवस्थापन, दुर्मीळ बौद्ध शिल्पे व विशिष्ट लयन स्थापत्य रचना ही या लेण्यांची प्रमुख वैशिष्ट्ये.
कान्हेरी लेणींचे प्रारंभिक उल्लेख संभवतः इ. स. ३९९–४११ या कालावधीत भारत भेटीस आलेल्या फाहियानच्या वृत्तांतात मिळतात. यानंतर या लेणींचा अभ्यास व संशोधन कार्य गार्सिया दा ऑर्टा (१५३४), जाओ दे कॅस्ट्रो (१५३९), डायगो दा कौटो (१६०३), फ्रायर (१६७५), जेम्स बर्ड (१८४७), जे. स्टिव्हन्सन (१८५२ व १८५३), वेस्ट (१८६०), भाऊ दाजी लाड (१८६४-६६), जेम्स बर्जेस व भगवानलाल इंद्रजी (१८८१), ब्यूलर (१८८३), ल्युडर्स (१९११), एम. जी. दीक्षित (१९४२), व्ही. व्ही. मिराशी (१९५५), शोभना गोखले (१९७६), एस. नागराजू (१९८१), सुरज पंडित (२००५; २०१२), एम. के. ढवळीकर (२०१६) अशा अनेक विद्वानांनी केले आहे.
येथील लेणी दक्षिणेकडील डोंगर उतारावर वेगवेगळ्या स्तरांवर खोदण्यात आलेली आहेत. बहुतेक लेणींत शिलालेख आढळून येतात. त्यांचा मुख्य विषय विविध भिक्षू आणि उपासकांनी लेणी व संबंधित कार्यांसाठी दिलेल्या दानधर्माचा व भेटीगाठींचा आहे.
एम. के. ढवळीकर यांनी या लेणींचे शैलीगत वैशिष्ट्य व शिलालेखांवरून ठळकपणे तीन कालखंड केले आहेत. १) हीनयान लेणी (इ. स. सु. १५०–२००), २) प्रारंभिक महायान लेणी (इ. स. २००–३५०) व ३) नंतरच्या महायान लेणी (इ. स. सु. ४५०–७००). कान्हेरी लेणींचा आराखडा पाहता, या प्रामुख्याने सहा समूहांत टेकड्यांच्या संरचनेचा विचार करून खोदण्यात आलेल्या दिसतात. यात समूह क्र. १ ते ६ मध्ये क्रमशः लेणी क्र. २ ते ७, १४ ते ३०, ४९ ते ७०, ३१ ते ४०, ८८ ते ९३ व ८ ते १२ यांचा समावेश होतो. येथील बहुतेक लेणींची रचना खोल्यांसह मंडप, बाक व समोर व्हरांडा अशी आहे. अशा प्रकारची रचना भारतीय लयन स्थापत्याच्या इतिहासात अद्वितीय मानली जाते. बहुतेक शिल्पे मूळतः प्रारंभिक काळात खोदलेल्या लेणींमध्ये मागावून ५-६ व्या शतकात नव्याने कोरलेली आढळून येतात. काही लेणींची संपूर्ण भिंतच शिल्पांनी व्यापलेली दिसते.
पहिला कालखंड : लेणी क्र. २ ते ७ या लेणींत बुद्ध अथवा बोधिसत्त्वांच्या प्रतिमा नसल्याकारणाने (लेणी क्र. २, ३, व ५ वगळता), यांना पहिल्या कालखंडात ठेवता येते. अभिलेखीय पुराव्यानुसार कान्हेरीमध्ये सर्वप्रथम दुसऱ्या शतकाच्या मध्यात क्र. ५ मध्ये पाण्याची एक पोढी खोदण्यात आली. यानंतर बहुधा दुसऱ्या शतकाच्या मध्यावधीत क्र. ३ चा चैत्यगृह खोदण्यात आला. हे कान्हेरीतील एक अतिभव्य व महत्त्वपूर्ण लेणे आहे. यातील चैत्य व्यवस्थित कोरला असला, तरी तो मंडपाच्या संरचनेत लेणे क्र. ४ चे स्थान जवळच असल्याने व्यवस्थित बसत नाही. हा स्तंभयुक्त चैत्यगृह २६.३६ X १३.६६ मी. व उंचीला १२.९ मी. असून आकाराने कार्ला येथील चैत्यापेक्षा थोडासा लहान आहे. लेण्याबाहेर समोरच विटांच्या एका स्तूपाचे अवशेष आहेत. या लेण्याच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना दोन द्वारपाल असून, व्हरांड्यातील दक्षिण स्तंभावर दुसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात कोरलेल्या, पश्चिम भारतातील सर्वांत प्राचीन ज्ञात दोन लहानशा बुद्ध प्रतिमा आहेत. या लेण्यात ५-६ व्या शतकातील बुद्धाच्या विराट प्रतिमेसह इतर बुद्ध व बोधिसत्त्वांच्या प्रतिमाही कोरण्यात आलेल्या आहेत. याशिवाय या लेण्यात यक्षसदृश्य शिल्प, पाच फण्यांयुक्त नाग व मिथुन शिल्पे आहेत.
लेणी क्र. ‘२ एʼ ते ‘२ एफʼ हा सहा लेणींचा एक समूह असून ‘२ सीʼ, ‘२ डीʼ व ‘२ इʼ मध्ये स्तूप आहेत. लेणे क्र. ‘२ एफʼ हे विहार लेणे असून आकाराने मोठे आहे. ढवळीकरांच्या मते, लेणे क्र. ७ चा तलविन्यास लेणे क्र. ‘२ एफʼ सारखाच असून भिक्षुंसाठी खोदण्यात आलेला कान्हेरी येथील हा सर्वांत प्राचीन विहार आहे. लेणे क्र. ४ एक सपाट छतयुक्त गोलाकार चैत्य आहे.
दुसरा कालखंड : या कालखंडात, समूह क्र. २ ते ५ मधील लेणींचा प्रामुख्याने समावेश केला जातो. कान्हेरी येथील बहुतेक लेणी, प्रारंभिक महायान कालखंडात (इ. स. २००–३५०) खोदण्यात आलेली आहेत. दुसऱ्या समूहातील लेणी क्र. १४ ते ३० उत्तरेकडील टेकडीत ओढ्याच्या (जलप्रवाह) उत्तरेला आहेत. हीनयान संप्रदायाचा हा शेवटचा कालखंड समजला जातो. या कालखंडातील लेणी पहिल्या कालखंडातील लेणींजवळ स्थित आहेत. या कालखंडातील प्राचीनतम लेणे, २१ क्रमांकाचा सुनियोजित विहार आहे. हे लेणे इ. स. सु. १८६ मधील असून लेणे क्र. २२ शी मिळते-जुळते आहे.
तिसऱ्या समूहातील लेणी क्र. ४९ ते ७० दक्षिणेकडील डोंगरभागावर तिसऱ्या शतकाच्या उत्तरार्धात खोदलेली आहेत. या समूहातील बहुतेक लेणी किरकोळ फरक वगळता एक सारखीच आहेत. या लेणी सातवाहन काळातील शेवटच्या टप्प्यातील समजल्या जातात.
लेणे क्र. ५० सुद्धा कान्हेरीतील दुसऱ्या कालखंडातील एक महत्त्वाचे लेणे असून, यात शिलालेखही आहे. लेणे क्र. ६५ मधील शिलालेखात एका महिला भिक्षुणीने ‘अपरासेलिय’ नामक पंथातील भिक्षूंसाठी लेणे व पोढी दान दिल्याचा उल्लेख आहे. लेणे क्र. ६७ मध्ये दीपांकर बुद्ध, बुद्ध, मानुषी बुद्ध, मैत्रेय, बोधिसत्त्व व इतर शिल्पे आहेत. येथील शिल्पांवरती रंगकाम केल्याच्या खुणा आढळून येतात.
चौथ्या समूहातील (३१ ते ४०) लेणींच्या तलविन्यासांत विविधता आढळते. यांच्या मागील बाजूस गाभारा असून, पूजेसाठी देवता कोरलेली दिसत नाही. या समूहातील लेणी, लयन स्थापत्य विकासक्रमातील पुढील टप्पा दर्शवितात. बहुतेक विहारांमध्ये आता स्वतंत्र गाभारे (गर्भगृह) दिसायला लागतात. यातील बहुतेक लेणी तिसऱ्या शतकाशी संबंधित आहेत. लेणे क्र. ३२ परिपूर्ण असून येथे कान्हेरी समूहातील एक संपूर्ण विहार दिसून येतो. या समूहात वेदिका पट्टी व वाळूचे घड्याळ (hour glass) सदृश्य सजावट पहिल्यांदाच दिसून येते. येथून तारा या बौद्ध देवतेची एक लाकडी प्रतिमा प्राप्त झाली होती. हे लेणे ‘भद्रयानिय’ पंथाच्या भिक्षूंसाठी दान दिले होते, हे विशेष. या पंथाचे नाव चैत्यलेणे क्र. ३ व लेणे क्र. ५० मध्येही आढळते.
पाचवा समूहही दक्षिणेकडील डोंगरभागावरच असून चौथ्या समूहाच्या थोड्याशा पूर्वेला आहे. या समूहातील लेणी क्र. ८४-८७ ‘निर्वाण विथी’ समजली जातात. ही लेणी, चैत्यलेणे क्र. ३ च्या दक्षिणेला दीड किमी. अंतरावर असून एका विशाल शैलाश्रयात खोदण्यात आलेली आहेत. यात सु. ६० बांधीव स्तूप आहेत, जे कान्हेरीत निर्वाणप्राप्त भिक्षूंच्या स्मृतिप्रित्यर्थ बांधले असावेत. या परिसरातून १९७५ साली शोभना गोखले यांना सु. ६ व्या शतकातील प्रसिद्ध आचार्यांची नावे असलेले प्राकृत भाषेतील १८ ब्राह्मी शिलालेख प्राप्त झाले होते. लेणे क्र. ९० मध्ये ३ पहलवी (११ वे शतक) आणि २ जपानी शिलालेख आढळून आले आहेत.
एकादशमुखी अवलोकितेश्वराचे एक शिल्प, लेणे क्र. ४१ च्या प्रांगणातील एका छोट्या कक्षात कोरलेले आहे. ही या देवतेची जगातील सर्वांत प्राचीन ज्ञात दगडी मूर्ती मानली जाते.
तिसरा कालखंड : (सु. ४५०—७००). सहाव्या समूहातील लेणी (८ ते १२) ज्यावेळी खोदण्यात आली, त्यावेळी काही आद्य लेणींमध्ये नव्याने काही शिल्पे कोरण्यात आली. तसेच काही भित्तिचित्रेही रेखाटण्यात आली. या समूहातील लेणी, वरील समूहात जागा उपलब्ध झालेल्या ठिकाणी खोदण्यात आली असून, यातील शिल्पकाम ५ ते ६ व्या शतकाशी सुसंगत आहे. यावेळी कोकणात त्रैकुटकांचे राज्य नांदत होते. यानंतर विशेष असे लेणी-खोदकाम हाती घेण्यात आलेले दिसत नाही.
क्र. ८ ही एक पोढी असून यात लहान खोल्या पाहावयास मिळतात. लेणे क्र. ११ हे कान्हेरीतील सर्वांत विशाल लेणे असून ‘दरबार लेणे’ या नावानेही प्रसिद्ध आहे. यात एक गाभारा व भिक्षूंसाठी खोल्या आहेत. यात बुद्ध, अवलोकितेश्वर, पद्मपाणी इ. प्रतिमा आहेत. हा विहार वेरूळ येथील लेणे क्र. ५ सारखा असून सातव्या शतकात खोदला गेला आहे. यात शिलाहार राजा कापार्दिनच्या काळातील एक शिलालेख असून यात या लेण्याला ‘श्री कृष्णगिरी महाराज महाविहार’ असे संबोधित केले आहे. तिसऱ्या कालखंडातील लेणींत बोधिसत्त्व, ध्यानी बुद्ध, अक्षोभ्य, तारा व भृकुटी इ. महत्त्वाची शिल्पे आढळतात.
लेणे क्र. ३४ मध्ये सु. सहाव्या शतकातील अर्धवट भित्तिचित्रे आहेत. लेणे क्र. ४१ मध्ये व्याख्यान मुद्रेतील बुद्ध (अमिताभ) प्रतिमेसह इतर प्रतिमा पाहायला मिळतात. लेणे क्र. १ अर्धवट असून कान्हेरीतील सर्वांत शेवटी खोदण्यात आलेले लेणे आहे. लेणे क्र. ९३ मध्ये बुद्धांची ‘मुचलिंद’ नागासह एक सुंदर मूर्ती दिसते.
सातव्या शतकात चिनी बौद्ध भिक्षू ह्यूएनत्संग याने या लेणींना भेट दिली होती. कान्हेरी एक शिक्षा केंद्र होते, जेथे प्रसिद्ध आचार्य निवास करीत असत. श्रेष्ठ बौद्ध तत्त्वज्ञ आचार्य ‘दीपांकर’,‘अचल’ आणि ‘दिन्नाग’यांचे वास्तव्य काही काळ येथे होते.
संदर्भ :
- Dhavalikar, M. K. Cultural Heritage of Mumbai, Mumbai, 2016.
- Gokhale, Shobhana, Kanheri Inscriptions, Pune, 1991.
- Nagaraju, S. Buddhist Architecture of Western India (B.C.250-300 AD), Delhi, 1981.
- Pandit, Suraj & Narayan, Arun, Stories in Stone (Historic Caves of Mumbai), Mumbai, 2013.
समीक्षक : सुरज पंडित