प्राचीन मानवी वसाहतींच्या उत्खननात मानव, मानवेतर प्राणी व वनस्पतींचे अवशेष मिळतात. अशा अवशेषांचा सविस्तर अभ्यास करणाऱ्या पुरातत्त्वविद्येच्या शाखेला जैवपुरातत्त्वविज्ञान असे म्हणतात. यूरोप व इतर अनेक देशांमध्ये ही व्याख्या प्रचलित आहे. तथापि अमेरिकेत फक्त मानवी अवशेषांच्या अभ्यासाला जैवपुरातत्त्वविज्ञान ही संज्ञा वापरली जाते. नवाश्म युगामध्ये मानवाने पशुपालनाला व शेतीला सुरुवात केली. या काळापासून आपल्याला प्राचीन वसाहतींच्या ठिकाणी अन्नधान्य, मांस व इतर प्राणिजन्य पदार्थांचा वापर केल्याचे पुरावे मोठ्या प्रमाणात मिळतात. प्राणी व वनस्पतींच्या अवशेषांमध्ये प्राण्यांचे व वनस्पतींचे जीवाश्म, हाडे, दात (उदा., हस्तिदंत) व शिंगांच्या वस्तू, शंखशिंपल्यांचे व हाडांचे बनविलेले अलंकार, प्राण्यांची व मानवी विष्ठा, वनस्पतींचे पराग, धान्यांचे अवशेष, रानफळांच्या बिया, लाकूड-बांबू यांच्या घरगुती वस्तू, कापड व नैसर्गिक धागे, मानवी अथवा प्राण्यांचे सांगाडे अशा नानाविध प्रकारच्या वस्तूंचा समावेश होतो. अन्न शिजविण्यासाठी वा साठविण्यासाठी वापर केलेल्या मातीच्या भांड्यांच्या तुकड्यांमध्ये काही वेळा सेंद्रिय पदार्थांचे (उदा., मांसमासळी, रक्त, पीठ, दूध वगैरे) अवशेष अत्यंत सूक्ष्म प्रमाणात आढळतात. जीवाश्म अथवा अशा इतर अवशेषांतील प्राचीन जैविक रेणूंचे रासायनिक विश्लेषण करून अनुमान काढणे हादेखील जैवपुरातत्त्वविज्ञानाचा भाग आहे.
वनस्पती, मानव व मानवेतर प्राणी यांचा व्यापक अभ्यास करण्यासाठी जैवपुरातत्त्वविज्ञानाच्या अनेक उपशाखा विकसित झाल्या आहेत. मानव प्राचीन काळापासून कोणत्या वनस्पतींचा वापर करीत आला आहे, हे सांगण्यासाठी पुरातत्त्वीय वनस्पतिविज्ञान आणि पुरापरागविज्ञान या पुरावनस्पतिविज्ञान शाखांशी जवळीक असणाऱ्या उपशाखा आहेत. पुरातत्त्वीय प्राणिविज्ञान या जैवपुरातत्त्वविज्ञानाच्या एका उपशाखेत गेल्या दहा हजार वर्षांमधील मानवेतर प्राणी-मानव संबंधांकडे विशेष लक्ष दिले जाते. पुरातत्त्वीय उत्खननात मिळणाऱ्या मानवी अस्थिपंजरांचा जीववैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करून प्राचीन मानवांची जैविक रचना, शारीरिक उत्क्रांती, आहार, व्याधी आणि त्यांच्या जीवनक्रमावर प्रकाश टाकण्याचे काम पुरामानवशास्त्र करते. पुरातत्त्वीय अभ्यासात ही शाखा जैविक मानवशास्त्र या नावानेही ओळखली जाते.
मानवी वसाहतींचे अवशेष जमिनीत गाडले गेल्यानंतर शेकडो अथवा हजारो वर्षे उलटून जातात. जमिनीखाली दीर्घकाळ राहिल्याने सजीवांचे अवशेष सहसा पूर्ण अवस्थेत नसतात. उपलब्ध पुराव्याची योग्य व तार्किक मांडणी करून प्राचीन काळातील मानव-सजीवसृष्टी-निसर्ग या त्रयीमधील परस्परसंबंधांवर भाष्य करणे, ही पुरातत्त्वीय संशोधनामधील जीवविज्ञानाची मुख्य भूमिका आहे. यासाठी अनेक वैज्ञानिक ज्ञानशाखांमधील तांत्रिक प्रगतीचा एकत्रित उपयोग करून पुरातत्त्वीय अनुमानांमध्ये भर घालण्याचे काम जैवपुरातत्त्वविज्ञान करते.
संदर्भ :
- Brothwell, Don & Higgs, Eric Eds., Science in Archaeology, New York, 1963.
- Buikstra, Jane E. & Ubelaker, Douglas H. Eds., Standards for Data Collection from Human Skeletal Remains, Fayetteville, 1994.
समीक्षक : सुषमा देव