देशपांडे, दि. य. : ( २४ जुलै १९१७ – ३१ डिसेंबर २००५ ). महाराष्‍ट्रातील एक ज्‍येष्‍ठ तत्‍त्‍वज्ञ व प्राध्यापक. महाराष्‍ट्रात ते दि. य., डि. वाय. आणि नाना या नावांनी ओळखले जातात. १९३३ साली मॅट्रिकची परीक्षा पास होऊन त्‍यांनी कलाशाखेत प्रवेश घेतला. नागपूरच्‍या मॉरिस कॉलेजमधून बी.ए.ची पदवी संपादन करून ते सर्वप्रथम आल्‍याने रॉबर्टसन सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. १९४० मध्‍ये सर ऑर्थर ब्‍लेनरहॅसेट रौप्‍यपदक मिळवून तेथूनच ते एम.ए. झाले.

त्‍यांची विलिंग्‍डन कॉलेज, सांगली येथे १९४४ साली अधिव्‍याख्‍याता म्‍हणून पहिली नेमणूक झाली. एक व्‍यासंगी, विषयाशी प्रामाणिक, शिस्‍तबद्ध, विद्यार्थीप्रिय प्राध्‍यापक अशी त्‍यांची ख्‍याती होती. त्‍यानंतर त्यांनी मॉरिस कॉलेज, नागपूर (१९४५‒४७), रॉबर्टसन महाविद्यालय, जबलपूर (१९४७‒५०) व विदर्भ महाविद्यालय, अमरावती (१९५०‒६५) या विविध ठिकाणी अधिव्‍याख्‍याता म्हणून काम केले. १९६५ साली विदर्भ महाविद्यालयात त्यांना प्राध्‍यापक म्‍हणून पदोन्‍नती मिळाली आणि तेथूनच ते १९७५ साली सेवानिवृत्‍त झाले. त्यानंतर ते नागपूरला स्‍थायिक झाले व तेथेच त्‍यांचे निधन झाले.

दि. य. यांचे आवडते लेखक जेरोम के जेरोम, लीलॉक वोडहाऊस हे होत. यांशिवाय त्यांच्यावर प्रभाव पाडणारे अनेक विचारवंत होते. त्यांपैकी प्रामुख्‍याने विज्ञानाचे प्रा. श्रीपाद विनायक भावे हे होते. दि. य. म्‍हणतात की, प्रा. भावे यांची बुद्धिमत्‍ता अव्‍वल दर्जाची होती. त्‍यांच्‍याशी चर्चा करताना दि. यं. चा वेळ छान जात असे. अमळनेरच्‍या वास्‍तव्‍यात त्‍यांच्‍यावर प्रभाव पाडणारी आणखी एक व्‍यक्‍ती म्‍हणजे रासबिहारी दास. “प्रा. दास यांच्‍या जवळ राहून मला माझ्या अज्ञानाची तीव्र जाणीव झाली”, अशी नम्रपणे दि. य. कबुलीही देतात. सी. इ. एम. जोड यांबद्दल बोलताना म्‍हणतात की, “तत्‍त्‍वज्ञानाचा परिचय करून देणारे त्‍यांच्‍या इतके कुशल लेखक मला आढळले नाहीत”. तसेच प्रा. मे. पुं. रेगे यांच्‍या नवभारत  मासिकातील व मौज या साप्ताहिकातील लेखांनी दि. य. प्रभावित झाले होते.

दि. यं. नी १९४७ साली विमेन, फॅमिली अँड सोशिॲलिझम हा ग्रंथ लिहिला. त्‍यातील समतावाद व व्‍यक्तिस्‍वातंत्र्यवाद त्‍यांना पूर्णपणे मान्‍य होता. स्‍वत:च्‍या जीवनातही त्‍यांनी तो उतरविला होता. त्‍यांच्‍या प‍त्‍नी श्रीमती मनुताई नातू यांचे स्‍मारक म्‍हणून आजचा सुधारक हे वैचारिक मासिक त्‍यांनी १९९० सालापासून सुरू केले. आपली सुधारणावादी मते त्‍यांनी याच मासिकातून मांडण्‍यास सुरुवात केली. १९९८ पर्यंत या मासिकाचे संपादकपदही सांभाळले. त्‍यांच्‍या पत्‍नी मराठीच्‍या प्राध्‍यापिका होत्‍या. त्‍यांचा मूळ पिंड सुधारकाचाच होता. थोर समाजसुधारक आगरकर त्‍यांना गुरुस्‍थानी होते. सामाजिक-राजकीय सुधारणेचे त्‍यांना वेड होते. दि. यं. ही स्‍त्री-पुरुष समानतावादी होते. त्‍यांच्‍या मते सर्व मनुष्‍यप्राणी स्‍वतंत्र असावेत. त्‍यांना समान स्‍वातंत्र्य असावे. ही तत्‍त्‍वे मानवी जीवन सुखी व सफल होण्‍यास अपरिहार्य आहे, असे त्‍यांचे मत होते.

मानवी अस्तित्‍वाची समृद्ध अवस्‍था त्‍यांच्‍या १९४६ साली प्रकाशित झालेल्या एथिक्स फॉर एव्हरी मॅन या ग्रंथातील ‘अ नोट ऑन सिव्हिलायझेशन’ या प्रकरणात व्‍यक्‍त होते. “जिथे विज्ञान, तत्‍त्‍वज्ञान, कला, स्‍वातंत्र्य, सुख यांना गौ‍रविले जाते, जिथे स्त्रिया आणि पुरुष या गोष्टींचा स्‍वार्थसाध्‍य म्‍हणून पाठपुरावा करतात आणि जिथे यांच्‍या जपणुकीसाठी इतर सर्व काही सोडायला ते तयार असतात, तिथे सभ्‍यता नांदते, वाढीस लागते; आणि या अर्थाने सभ्‍य जीवन जगणे व असे जीवन अधिकतम माणसांना शक्‍य करून देणे यातच आपण आपल्‍या अस्तित्‍वाचे समर्थन शोधू शकतो”, असे दि. य. सांगतात.

दि. य. यांनी १९४९ साली ‘इंडियन फिलॉसॉफिकल असोसिएशन’ची स्‍थापना केली. तसेच १९५३ साली ‘जर्नल ऑफ द फिलॉ‍सॉफिकल असोसिएशन’चा प्रारंभ केला आणि १९७२ पर्यंत ते प्रमुख संपादक म्‍हणून राहिले. महाराष्‍ट्र तत्‍त्‍वज्ञान परिषदेचे ते सुरुवातीपासून सलग नऊ वर्ष अध्‍यक्ष होते. १९७० साली पुण्‍यास झालेल्‍या व १९७५ साली दिल्‍ली येथे झालेल्‍या ‘इंडियन फिलॉसॉफिकल काँग्रेस’चे ते विभागीय अध्‍यक्ष होते.

दि. यं. चे संस्‍कृत, मराठी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्‍व होते. त्‍यांना जर्मन भाषा अवगत असल्‍यामुळे इमॅन्युएल कांट, लूटव्हिख व्हिट्गेन्श्टाइन, गोटलोप फ्रेग यांचे जर्मन भाषेतील मूळ लेखन अभ्‍यासून ते त्‍यांनी मराठीत शब्‍दबद्ध केले.

तत्‍त्‍वज्ञानाचा अभ्‍यास विद्यापीठ व महाविद्यालयांतून अगदी पदवीपासून ते पीएच. डी.पर्यंत मातृभाषेतून होऊ लागल्‍यामुळे त्‍या स्‍तरापर्यंत मराठीतून पुस्‍तके उपलब्‍ध नसल्‍यामुळे महाराष्‍ट्रातील विद्यार्थ्‍यांसाठी दर्जेदार ग्रंथांचे दि. यं. नी मराठीतून अनुवाद केले.

तत्‍त्‍वज्ञान हा विषय समजून घ्‍यायचे असेल, तर तर्कशास्‍त्र विषयाचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे. त्‍यासाठी त्‍यांनी मे. पुं. रेगे यांच्‍या ‘पंडित फिलॉसॉफर प्रोजेक्‍ट’च्‍या बरोबरीने १९७२ सालापासून नागपूर येथे तर्कशास्‍त्राचे उन्‍हाळी वर्ग प्राध्‍यापकांसाठी सुरू केले. आकारिक तर्कशास्‍त्र शिकविण्‍याकरिता दि. यं. नी १५ दिवसांचा उद्बोधन वर्ग घेतला. तसेच तत्‍त्‍वज्ञानाच्‍या चिकित्‍सक व विश्‍लेषणवादी परंपरेत त्यांना विशेष रुची असल्‍याने ही परंपरा पुढे नेण्‍याचा त्‍यांनी प्रयत्‍न केला. ज्ञानाचे व विधानाचे तार्किक वर्गीकरण, संशयवाद, धादांतवाद, कालसंकल्‍पना, नैतिक आदेशाचे स्‍वरूप, नीतिविषयक वाद, सौंदर्यविधाने यांसारख्‍या महत्‍त्‍वपूर्ण प्रश्‍नांवर त्‍यांनी चिकित्‍सक विचार मांडले. तत्त्वज्ञान विभाग, पुणे विद्यापीठातर्फे दि. यं. च्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने १९९३ साली त्‍यांच्‍या तत्‍त्‍वज्ञानावरील कारकिर्दीवर परामर्श या त्रैमासिकाद्वारे दोन विशेषांक काढण्‍यात आले.

तत्‍त्‍वज्ञानाच्‍या ज्‍येष्‍ठ प्राध्‍यापकांनी मिळून नागपूर येथे एक अभ्‍यासवर्ग स्‍थापन केला होता. त्‍यांच्‍या मासिक बैठकीत तत्‍त्‍वज्ञानाच्‍या विविध विषयांवर निबंध वाचन होत असे. दि. य. त्‍या प्रत्‍येक बैठकीला आवर्जून उपस्थित राहात असत.

दि. यं. ची तत्‍त्‍वज्ञानात्‍मक भूमिका : भारतीय व पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञानातील विविध प्रश्‍नांची चिकित्‍सा करताना त्‍यांची भूमिका विवेकवादी राहिलेली आहे. आपल्‍या तत्‍त्‍वज्ञानात्‍मक भूमिकेबद्दल दि. य. म्‍हणतात “ती प्रामुख्‍याने धादांतवादी आहे. अतिभौतिकी (Metaphysics) (म्‍हणजे दृष्‍य जगताच्‍या पलीकडचे जग जाणण्‍याचा प्रयत्‍न) अशक्‍य आहे, हे ह्यूमचे मत मला बरोबर वाटते. तसेच जी नास्तिक आहे म्‍हणजे ईश्‍वराने हे जग निर्माण केले आहे किंवा तो त्‍याचे नियमन करतो, तसेच शरीराहून वेगळे स्‍वतंत्र असे काही अस्तित्‍व आहे, हेही मला मान्‍य नाही. याबाबतीत स्‍ट्रॉसनचे मत मला निर्णायक वाटते. काही शरीरे अशी असतात की, ज्‍यांना शरीर आणि मानस अशी दोन्‍ही प्रकारची विधेये लागू पडतात. माझ्या ठिकाणी आस्तिक्‍य भावनेचा लवलेशही मला दिसत नाही. धर्म मला कल्‍पनेचा खेळ वाटतो. नीती धर्माहून वेगळी आहे आणि धर्माहून स्‍वतंत्र आहे. नीतिशास्‍त्रात माझी भूमिका स्‍थूलमानाने उपयोगितावादी आहे. ‘स्‍थूलमानाने’ असे म्‍हणण्‍याचे कारण उपयोगितावाद काही बाबतीत अपुरा आहे. न्‍यायाच्‍या तत्‍त्‍वाकडे त्‍याचे दुर्लक्ष होते म्‍हणून न्‍यायाच्‍या तत्‍त्‍वाची त्‍याला जोड द्यावी लागेल”.

नीतिशास्‍त्रातील योगदान : नीतिमीमांसा हा दि. यं. चा अत्‍यंत जिव्‍हाळ्याचा विषय. त्‍यांच्‍या नीतिशास्‍त्राचा अभ्‍यास दोन भागांत विभाजित केला आहे, तो असा :

  • भारतीय नैतिक चिंतन : भारतीय नीतिशास्‍त्र स्‍वार्थ प्रेरित आहे, म्‍हणून त्‍याला नैतिकमूल्‍य असू शकत नाही. त्‍यांच्‍या मते भारतीयांचे सबंध तत्‍त्‍वज्ञान मोक्षशास्‍त्राच्‍या अनुषंगानेच वाढले आहे. तसेच भगवद्गीता हा नीतिशास्‍त्रावरील ग्रंथ आहे, हेही म्‍हणणे त्‍यांना चुकीचे वाटते. धर्माची शिकवण ही नैतिक सामर्थ्‍यावर आधारलेली व वाणिज्‍यवृत्‍तीवर पोसलेली आहे. त्‍यामुळेच कर्मसिद्धांत, पूर्वजन्‍म, पुनर्जन्‍म, ईश्‍वर, अध्‍यात्‍म, नियती, दैव इ. भारतीय तत्‍त्‍वज्ञानाचा गाभा असलेल्‍या संकल्‍पना दि. यं. ना कधीच आकृष्‍ट करू शकल्‍या नाहीत. त्‍यांचा फोलपणा सिद्ध करण्‍यासाठी त्‍यांनी विवेकवादासारखे आयुध वापरले. भारतीय नैतिक चिंतनात मूलभूत मानलेल्‍या बाबींचे त्‍यांनी खंडन केले. ते म्‍हणतात, “आपल्‍याकडे नीतिशास्‍त्र नावाचे स्‍वतंत्र स्‍वत:च्‍या पायावर उभे राहणारे, अन्‍य विद्यांच्‍या आश्रयाने न वावरणारे असे शास्‍त्र निर्माण झालेच नाही. नीतिचा विचार येथे धर्म व अध्‍यात्‍म यांच्‍या आश्रयानेच झाला आहे. नैतिक मूल्यांना आपल्‍या नीती-विचारांत मुळीच स्‍थान नाही. त्‍यांच्‍यामध्‍ये गीतेतील स्थितप्रज्ञेची अवस्‍था मनुष्‍याला शक्‍य नाही, शक्‍य असली तरी इष्‍ट आहे काय, हा विचार प्रत्‍येकाने करावा”.
  • पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञानातील नीतिमीमांसा : अमेरिकन तत्‍त्‍वज्ञ विल्यम फ्रँकेना यांच्‍या १९७३ साली प्रसिद्ध झालेल्या एथिक्स या ग्रंथाप्रमाणे विषय व विवेचनाचा क्रम तोच ठेवून दि. यं. नी नीतिशास्‍त्राचे प्रश्‍न हा ग्रंथ लिहिला (१९८७). फ्रँकेना यांनी केलेली ‘नैतिक मूल्‍य व न-नैतिक मूल्‍य’ ही चर्चा मराठीत प्रथमच दि. यं. नी आणली. दि. यं. च्‍या मते नैतिक कर्तव्‍याच्‍या उपपत्‍तीत फ्रँकेनानुसार ‘शुभंकरणाचे तत्‍त्‍व’ व ‘न्‍यायाचे तत्‍त्‍व’ स्‍वीकारावयास हवे. यांतील एक तत्‍त्‍व साध्‍यवादी व दुसरे तव्‍यवादी आहे. म्‍हणजे साध्‍यवादास अनुसरून कर्माची निवड आणि तव्‍यवादानुसार प्रत्‍यक्ष कृती, अशाप्रकारे दि. यं. नी मिश्रतव्‍यादी भूमिका स्‍वीकारली आहे. आपल्‍या उपपत्‍तीत त्‍यांनी कांट व मिल यांची सांगड घालण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

दि. यं. च्‍या मते परिमाणात केवळ न-नैतिक मूल्‍यच असते. नैतिक मूल्‍य कर्माचे परिणाम असू शकत नाही. त्‍यांच्‍या मते नैतिक ध्‍येयाबरोबर आपण न-नैतिक ध्‍येयही बाळगतो. तेव्‍हा दोन्‍हीमध्‍ये गल्‍लत करता कामा नये. कांटच्‍या नीतिमीमांसेबाबत बोलताना दि. य. म्‍हणतात, “कांटच्‍या नीतिमीमांसेत उपयोगितावादाची भर घातली, तर ती एक परिपूर्ण नीतिमीमांसा होऊ शकेल”. दि. यं. चे नैतिक मत स्‍थूलमानाने उपयोगितावादी आहे. त्‍यांना न सुखवादी उपयोगितावाद स्‍वीकार्ह आहे. उपयोगितावादात स्‍वतोमूल्‍याची कल्‍पना केंद्रस्‍थानी आहे.

सुरुवातीच्‍या काळात दि. यं. नी जी. ई. मुरचे स्‍वतोमूल्‍याविषयीचे मत स्‍वीकारले होते. परंतु अनुभववादी स्‍वतोमूल्‍याची कल्‍पना कशी करू शकतो ? या मे. पुं. रेगे यांच्‍या प्रश्‍नामुळे दि. यं. चे स्‍वतोमूल्‍याविषयीचे मत बदलले, ते त्‍यांनी नोव्‍हेंबर १९९८ च्‍या आजचा सुधारक या मासिकामध्‍ये स्‍पष्‍ट केले आहे. दि. य. म्‍हणतात, “विषयनिष्‍ठ स्‍वतोमूल्‍य असू शकत नाही, स्‍वतोमूल्‍य विषयिनिष्‍ठच असू शकते, अशी माझी खात्री झाली आहे”.

तर्कशास्‍त्रातील योगदान : तर्कशास्‍त्र हा दि. यं. चा आवडीचा विषय. पाश्‍चात्त्य देशांप्रमाणे आपल्‍या देशातही तर्कशास्‍त्र विषयाला चालना मिळावी, या उद्देशाने महाराष्‍ट्रातील तर्कशास्‍त्राचा अभ्‍यास करणाऱ्या शिक्षकांकरिता त्‍यांनी प्रा. रेगे यांचे उन्‍हाळी वर्ग नागपूरला सुरू केले. तसेच ॲल्‍फ्रेड टार्स्‍की यांच्‍या अत्‍यंत उच्‍च दर्जाच्‍या अभिजात ग्रंथाचा अनुवाद (तर्कशास्‍त्राचा परिचय : निगामी रीत) त्‍यांनी केला. तर्कशास्‍त्राचा परिचय : निगामी रीत या ग्रंथाच्‍या प्रस्‍तावनेत दि. य. म्‍हणतात, ‘‘जे नवे तर्कशास्‍त्र किंवा सांकेतिक तर्कशास्‍त्र म्‍हणून ओळखले जातात त्‍याचा जन्‍म १८७९ मध्‍ये गोटलोप फ्रेग या जर्मन तत्‍त्‍वज्ञाच्‍या Begriffsschrift या युगांतकारी ग्रंथात झाला आणि त्‍याचे विस्‍तृत आणि पूर्ण विवेचन ॲल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड आणि बर्ट्रंड रसेल या इंग्लिश तत्‍त्‍वज्ञांच्‍या प्रिंसिपिया मॅथेमॅटिका ह्या त्रिखंडांत्‍मक ग्रंथात १९१०−१३ या वर्षांत झाले. तेव्‍हापासून या विषयाची अभूतपूर्व वाढ होऊन त्‍याचा स्‍वीकार सर्व पाश्‍चात्त्य राष्‍ट्रांत झाला आहे. भारतात मात्र त्‍याचा म्‍हणण्‍यासारखा प्रवेश झालेला नाही. या ग्रंथाच्‍या अभ्‍यासाने तर्कशास्‍त्राच्‍या अभ्‍यासाला चालना मिळेल, या हेतूने दि. यं. नी हे अनुवादाचे काम केले. या ग्रंथात दि. यं. नी जागोजागी थोर तार्किकांच्‍या कार्याची संक्षिप्‍त माहिती तळटिपांमध्‍ये दिली आहे. खास मराठीतून शिक्षण घेणाऱ्यांसाठी युक्तिवादाची उपकरणे (१९७६), सांकेतिक तर्कशास्‍त्र (१९७६), सांकेतिक तर्कशास्‍त्र आणि उद्गमन  हे ग्रंथ त्यांनी लिहिले.

त्‍यांच्या युक्तिवादाची उपकरणे या ग्रंथात त्‍यांनी साधके प्रथम व त्‍यावरून निष्‍पन्‍न होणारा तर्क नंतर यात भेद असला, तरी प्रतिज्ञा व पुरावा तसेच साधक व निष्‍कर्ष यांचा संबंध एकच आहे, हा सूक्ष्‍म भेद लक्षात आणून दिला. तसेच तत्‍त्‍वज्ञानात केलेले भाषेचे विश्‍लेषण व व्‍याकरण इत्‍यादींत केलेले भाषेचे विश्‍लेषण यांतील भेद त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. त्‍यांच्‍या मते भाषेच्‍या शब्‍दमय अंगाचा अभ्‍यास व्‍याकरण करते, तर अर्थमय अंगाचा अभ्‍यास तत्‍त्‍वज्ञान करते.

दि. यं. नी भाषेच्‍या तीन प्रकारच्‍या उपयोगांवर प्रकाश टाकला. १) भाषेचा वर्णनात्‍मक उपयोग, २) भाषेचा मूल्‍यनात्‍मक उपयोग, ३) भाषेचा प्रवर्तनात्‍मक उपयोग. तसेच तार्किकीय सत्‍याची कल्‍पना ही विन्‍यासशास्‍त्रीय (Syntactical) आहे आणि आनुभविक सत्‍याची कल्‍पना अर्थमीमांसीय (Semantical) आहे, याचाही उल्‍लेख त्‍यांनी केला आहे.

बुद्धीवर म्‍हणजेच तर्कावर विसंबून चिकित्‍सक पद्धतीने समस्‍यांची उकल करणे, ज्‍याचे समर्थन न करता येईल तेवढेच सत्‍य स्‍वीकारणे, असे त्‍यांचे मत होते. यासाठीच प्रत्‍येकाने तर्कशास्‍त्र शिकलेच पाहिजे, असा त्‍यांचा आग्रह होता.

पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञानातील योगदान : रने देकार्तने ‘ईश्‍वर’ व ‘आत्‍मा’ यांचे अस्तित्‍व स्‍वीकारूनही ज्ञानाच्‍या लौकिक साधनांवरच तत्‍त्‍वज्ञानाची उभारणी केली. याच गोष्‍टीने प्रभावित होऊन दि. यं. नी १९७४ साली देकार्तच्‍या मेडिटेशन्स या ग्रंथाचा देकार्त : चिंतने  असा अनुवाद करून मराठीतील आपले तत्‍त्‍वज्ञानात्‍मक लेखन सुरू केले. शिवाय त्यांचा आणखी एक अनुवादित ग्रंथ म्‍हणजे अर्वाचीन पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञान : प्रज्ञावाद (१९९९) हा होय. या अनुवादित ग्रंथाच्‍या प्रस्‍तावनेत त्‍यांनी देकार्तच्‍या महान कार्याचा आवर्जून उल्‍लेख केला आहे.

१९८२ मध्‍ये जॉर्ज बर्क्लीच्‍या ट्रीटीज ऑन द प्रिंसिपल ऑफ ह्यूमन नॉलेज  या ग्रंथाचा अनुवाद दि. यं. नी मानवी ज्ञानाच्‍या सिद्धांताविषयी प्रबंध  या नावाने केला. अनुवादाच्‍या प्रस्‍तावनेत दि. य. लिहितात की, ‘‘तत्‍त्‍वज्ञांची मते भाषेच्‍या दुरुपयोगातून निर्माण झालेली असतात, अलीकडील तत्‍त्‍वज्ञानात भाषेचा विचार फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. एवढेच नव्‍हे, तर तत्‍त्‍वज्ञान म्‍हणजे भाषिक विश्‍लेषण (Linguistic Analysis) असे मत मान्‍यता पावलेले आहे. त्‍या दृष्‍टीने पाहता बर्क्‍लीने तीनशे वर्षांपूर्वी भाषाविषयक विचारांना जे महत्‍त्‍व दिले, ते खरोखर अतिशय कौ‍तुकास्‍पद आहे’’. तत्‍त्‍वज्ञानात उद्भवणाऱ्या अनेक अडचणी भाषिक गोंधळामुळे निर्माण होतात (ही बाब ३०० वर्षांपूर्वीच बर्क्‍लीने लक्षात आणून दिली). याच प्रस्‍तावनेत दि. य. दाखवून देतात की, लॉकच्‍या अवकृष्‍ट कल्‍पना व बर्क्‍लीच्‍या नामवादाचा अर्थ एकच आहे. हे दाखवून देताना दि. य. भाषेचा अर्थ, भाषेचे कार्य, भाषेविषयी असलेले गैरसमज यांवरही प्रकाश टाकतात.

विसावे शतक हे प्रामुख्याने मुर, रसेल, व्हिट्गेन्श्टाइन या महान तत्त्वज्ञांचे होते. मुरच्‍या अत्‍यंत गाजलेल्‍या तीन निबंधांचा अनुवाद दि. यं. नी केला : १) ‘रिफुटेशन ऑफ आयडिॲलिझम’ (१९०३)—’कल्‍पनावादाचे खंडन’, २) ‘अ डिफेंस ऑफ कॉमन सेन्स’ (१९२५)—’धादांतमताचे समर्थन’, ३) ‘प्रूफ ऑफ एक्स्टर्नल वर्ल्ड’ (१९५९)—’बाह्य जगाची सिद्धी’. या तिन्‍हींच्‍या अनुवादाला विमर्शक प्रस्‍तावना जोडून त्यांनी मुरचे तत्‍त्‍वज्ञान  या शीर्षकाचा ग्रंथ डिसेंबर १९८६ मध्‍ये प्रकाशित केला.

रसेलच्या फिलॉसॉफी ऑफ लॉजिकल ॲटोमिझम  या ग्रंथाचे भाषांतर तार्किकीय परमाणुवादाचे तत्‍त्‍वज्ञान  या नावाने दि. यं. नी मराठीत आणले (१९८८). या ग्रंथाच्‍या प्रस्‍तावनेतसुद्धा दि. य. असा उल्‍लेख करतात की, “रसेलचे तत्‍त्‍वज्ञान समजण्‍याकरिता त्‍याचे तर्कशास्‍त्र आधी समजून घ्‍यावे लागेल”. त्‍यासाठी त्‍यांनी प्रस्‍तावनेत रसेलच्‍या तर्कशास्‍त्राची स्‍थूल आणि केवळ अत्‍यावश्‍यक अशी रूपरेषा दिली. म्‍हणून प्रत्‍येकालाच तर्कशास्‍त्र आले पाहिजे, यावर त्‍यांचा भर होता.

यानंतर रने देकार्त, बारूख स्पिनोझा, गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स या प्रज्ञावादी परंपरेतील तत्‍त्‍वज्ञांचे निवडक लेखन अनुवादून त्‍यालाही विवेचक प्रस्‍तावना जोडून अर्वाचीन पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञान : प्रज्ञावाद  हा ग्रंथ दि. यं. नी प्रसिद्ध केला (१९९६). या तिघांचा ‘रॅशनॅलिझम’ इंद्रियानुभवाला गौण स्‍थान देणारा व स्‍वतंत्र तर्काला विश्‍वाचे ज्ञान देण्‍यास असमर्थ आहे, तेव्‍हा हा तर्क इंद्रियानुभवावर आधारलेला असला पाहिजे, असा त्‍यांचा आग्रह होता. पहिल्‍या ‘रॅशनॅलिझम’शी दुसऱ्याचा गोंधळ होऊ नये म्‍हणून पहिल्‍याला ‘प्रज्ञावाद’ हा शब्‍द वापरावा, असे प्रथमच दि. यं. नी सुचविले. ह्या दुसऱ्या ‘रॅशनॅलिझम’ला ‘विवेकवाद’ हा शब्‍द आगरकरांनी वापरला तसाच तो दि. यं. नीही वापरला.

त्यानंतर जॉन लॉक, जॉर्ज बर्क्‍ली, डेव्हिड ह्यूम या अनुभववादी परंपरेतील तत्‍त्‍वज्ञांचे लिखाण प्रस्‍तावनेसह १९९९ मध्‍ये अर्वाचीन पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञान : अनुभववाद  या नावाने दि. यं. नी मराठीत आणले. याच तत्‍त्‍वज्ञान ग्रंथमालेत ‘कांट’वरील (अर्वाचीन पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञान : कांट) हा ग्रंथ मराठीत आला. कांटच्‍या क्रिटिक ऑफ प्युअर रिजन  या ग्रंथाचा दि. यं. नी शुद्ध प्रज्ञेची चिकित्‍सा  या अनुवादित ग्रंथाच्या प्रस्‍तावनेत परिचय करून दिला. त्‍यामुळे कांटचे तत्‍त्‍वज्ञान समजायला बरीच मदत होते. अशा प्रकारे या त्रिखंडात्‍मक ग्रंथाद्वारे देकार्तपासून सुरू होऊन विसाव्‍या शतकातील मुर-रसेलपर्यंत मराठी भाषेत या ग्रंथांचा अनुवाद करून पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञानात्‍मक दर्जेदार साहित्‍य निर्माण करण्‍यात दि. यं. चा मोलाचा वाटा आहे.

पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञानात मोलाचे योगदान असलेला, एक महत्‍त्‍वपूर्ण व स्‍वतंत्रपणे लिहिलेला तत्‍त्‍वज्ञानाच्‍या मूलभूत समस्‍या  हा ग्रंथ दि. यं. नी महाराष्‍ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळासाठी १९९० साली प्रकाशित केला. या ग्रंथात दि. यं. नी पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञानातील विविध समस्‍यांचा उदा., ज्ञानमीमांसीय समस्‍या, नैतिक समस्‍या, अतिभौतिकीय समस्‍या यांची सविस्‍तर चर्चा केली आहे. यांपैकी त्‍यांचे महत्‍त्‍वपूर्ण योगदान असलेले प्रकरण म्‍हणजे ‘अवकाश व काल’. यात दि. यं. नी अवकाश व काल हे सत् नाहीत, अंतत: किंवा परमार्थत: सत् नाही या प्राचीन काळापासून चालत आलेल्‍या मताचा परामर्श घेतला आहे. कालाच्‍या सत्‍तेवर हल्‍ला करणाऱ्या अनेक तत्‍त्‍वज्ञांच्‍या युक्तिवादांचा विचार त्‍यांनी केला आहे. त्‍यांनी आपल्‍या लेखातून ‘काल’ या संकल्‍पनेविषयीचे अनेक गैरसमज दूर करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. तसेच ‘काल’ या संकल्‍पनेवर १९४८ ते १९५६ या कालावधीत त्‍यांचे सहा लेख प्रसिद्ध झालेत. त्यांद्वारे आंरी बेर्गसाँ, जॉन मक्टॅगर्ट आणि ए. जे. एअर यांच्‍या युक्तिवादाची चिकित्‍सा करून त्‍यांची मते त्‍यांना का मान्‍य नाहीत, हे स्‍पष्‍ट केले.

मक्टॅगर्टचा कालविषयक युक्तिवाद हा तत्‍त्‍वज्ञानाच्‍या क्षेत्रातील एक महत्‍त्‍वपूर्ण योगदान समजले जाते. त्‍याच्‍या युक्तिवादातून जो वैचारिक गोंधळ निर्माण होऊ शकतो त्‍यातून सुटका कशी होऊ शकेल, याचे दिग्‍दर्शन दि. यं. नी केले आहे. तसेच एअरसारख्‍या तार्किकीय अनुभववादी विचारवंताच्‍या दृष्टिकोनावर आपली प्रतिक्रिया परखडपणे त्यांनी मांडली आहे.

दि. यं. ची विवेकवादी भूमिका : भारतीय व पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञानातील प्रश्‍नांची चिकित्‍सा करताना त्‍यांची भूमिका विवेकवादी राहिली आहे. “विवेकवाद ही केवळ विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धती आहे. मनुष्‍याने आपले जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्‍याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्‍हावीत”, ही त्‍यांची विवेकवादी भूमिका त्‍यांच्‍या ज्ञानमीमांसा, नीतिमीमांसा व सद्वस्‍तुमीमांसा यांतून प्रतिबिंबित होते. विवेकवादाच्‍या व्‍यापाराची अनेक क्षेत्रे आहेत. त्यांपैकी ज्ञानक्षेत्र व कर्मक्षेत्राशी संबंधित विवेकवाद दि. यं. नी त्‍यांच्‍या विवेकवाद या ग्रंथातून मांडला आहे. त्‍यांची वैचारिक भूमिका ज्ञानशास्‍त्रीय बाबतीत अनुभववादी आणि नी‍तीच्‍या बाबतीत उपयुक्‍ततावादी आहे.

दि. यं. चा विवेकवाद श्रद्धाविरोधी आहे; त्‍यात आध्‍यात्मिक ज्ञानाला स्‍थान नाही. ज्‍या विधानाची सत्‍यता प्रत्‍यक्ष वा अनुमानाद्वारे परीक्षणीय नाही, ते विधान सत्‍य म्‍हणता येणार नाही. आप्‍तवचन, आत्‍मा, पुनर्जन्‍म, स्‍वर्ग, ईश्‍वर, साक्षात्‍कार, धार्मिक अनुष्‍ठाने या संदर्भातील सर्व विधाने आपण श्रद्धेने स्‍वीकारतो. त्‍यामुळे ती व्‍यर्थ व निरर्थक आहेत. या बाबतीत त्‍यांचे मत तार्किक प्रत्‍यक्षवादाच्‍या दृष्टिकोनासारखे आहे. या संदर्भात अनेक प्रश्‍न उपस्थित करून—जसे सत्‍य सर्वदा ईष्‍ट असते काय ?, ईश्‍वरावरील श्रद्धा आवश्‍यक आहे का ?, मी आस्तिक का नाही ? इत्‍यादी मूलभूत प्रश्‍न उपस्थित करून—त्‍यांची चिकित्‍सा विवेकवादी भूमिकेतून दि. यं. नी केली आहे.

पुरस्‍कार : दि. यं. च्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण लेखनामुळे त्‍यांच्‍या लेखनाला अनेक पुरस्‍कार प्राप्‍त झाले असून त्यांपैकी ‘आगरकर पुरस्‍कार’ (१९९३), आजचा सुधारक  या मासिकासाठी महाराष्‍ट्र फाउंडेशनचा पुरस्‍कार (१९९५) आणि विवेकवाद या ग्रंथासाठी वंदना प्रकाशनाचा उत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मितीसाठी मिळालेला ‘आशीर्वाद पुरस्‍कार’ (२०११) हे महत्त्वाचे होत.

लेखनशैली : दि. यं.च्‍या लेखनशैलीवर, विचारांवर मूर-रसेल यांचा प्रभाव होता. त्‍यांच्‍या लिखाणात काटेकोरपणा, वैचारिक स्‍पष्‍टता, भाषिक नि:संदिग्‍धता, चिरेबंदी वाक्‍यरचना हे गुण प्रकर्षाने आढळतात. स्‍वत:चे विचार सावधतेने व अनाग्रही वृत्‍तीने मांडणे, दुसऱ्यांच्‍या भूमिका समजून घेऊन त्‍यांची चिकित्‍सा करून आपल्‍या शंका प्रामाणिकपणे अभ्‍यासकांसमोर ठेवणे, त्‍यातून काही नवीन विचारांना चालना देणे, हा त्‍यांचा प्रयत्‍न असे.

इंग्रजी, मराठी व संस्‍कृत या भाषांवर घट्ट पकड असल्‍यामुळे इंग्रजी शब्‍दांना जे पर्यायी मराठी शब्‍द त्‍यांनी सुचविले, ते कठीण जरी वाटत असले, तरी त्‍याचा अर्थ हा इंग्रजी शब्‍दाने व्‍यक्‍त होणाऱ्या अर्थाच्‍या जास्‍तीत जास्‍त जवळ जाणारा आहे. त्‍यामुळेच त्‍यांचा स्‍वत:चा असा शब्‍दसंग्रह तयार झाला होता. आज त्‍यांनी तयार केलेले पारिभाषिक शब्‍द महाराष्‍ट्रात मराठीतून होणाऱ्या तत्‍त्‍वज्ञानात्‍मक लिखाणात स्‍वीकृत केलेले आढळतात.

ग्रंथसंपदा : त्‍यांनी इंग्रजी व मराठी भाषेतून भरपूर लिखाण केले असून त्‍यांची ग्रंथसंपदा प्रचंड आहे. स्वतंत्र लेखन : द ट्रूथ अबाउट गॉड (१९४६),एथिक्स फॉर एव्हरी मॅन (१९४६), विमेन, फॅमिली अँड सोशिॲलिझम (१९४७), युक्तिवादाची उपकरणे (१९७६), सांकेतिक तर्कशास्‍त्र (१९७६), नीतिशास्‍त्राचे प्रश्‍न (१९८७), तत्‍त्‍वज्ञानाच्‍या मूलभूत समस्‍या (१९९०). अनुवाद : देकार्त : चिंतने (१९७४), बर्क्ली : मानवी ज्ञानाच्या सिद्धांताविषयी (१९८२), मुरचे तत्‍त्‍वज्ञान (१९८६), तार्किकीय परमाणुवादाचे तत्‍त्‍वज्ञान (१९८८). त्रिखंडात्मक ग्रंथ : अर्वाचीन पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञान : प्रज्ञावाद (१९९६), अर्वाचीन पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञान : अनुभववाद (१९९९), अर्वाचीन पाश्‍चात्त्य तत्‍त्‍वज्ञान : कांट (२०००). याशिवाय निरनिराळे नियतकालिक, मासिक यांमध्‍ये त्‍यांचे मराठी व इंग्रजीतून सु. १५० च्‍या जवळपास लेख प्रसिद्ध झाले. नवा सुधारक या मासिकातील त्यांची ‘विवेकमाला’ ही लेखमालिका विशेष गाजली. तसेच त्यांनी मराठी विश्‍वकोशातही लेखन केले आहे.

ते जितके गंभीर तितकेच स्‍पष्‍टवक्‍ते होते. विलक्षण आत्‍मीयता, नि:स्‍वार्थी वागणूक, शालीनता, प्रसन्‍न, पारदर्शी व्‍यक्तिमत्‍त्‍व, मितभाषी हे त्‍यांचे स्‍वभावगुण होते. दि. य. धादांतवादी असल्‍यामुळे त्‍यांच्‍या लेखनशैलीवर, विचारांवर रसेल, मुर व ब्रॉड यांचा प्रभाव दिसून येतो.

संदर्भ :

  • बारलिंगे, सुरेन्द्र; गोखले, प्रदीप, संपा. ‘प्रा. दि. य. देशपांडे यांचे तत्त्वचिंतन’ (खंड : २), परामर्श, पुणे विद्यापीठ, मे, ऑगस्ट १९९३.

                                                                                                                                                                 समीक्षक : वृषाली कुलकर्णी