डॅन्येल मॅक्फॅडन : (२९ जुलै १९३७). अमेरिकन अर्थमीतिज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी. विविक्त (डिस्क्रीट) निवड सिद्धांत विकसित करून त्याचे आर्थिक विश्लेषण केल्याबद्दल त्यांना २००० मध्ये अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृती पुरस्कार अमेरिकन अर्थतज्ज्ञ जेम्स जोसेफ हेकमन (James Joseph Heckmann) यांच्या बरोबरीने देण्यात आला.
मॅक्फॅडन यांचा जन्म नॉर्थ कॅरोलायना प्रांतातील रॅले येथे झाला. त्यांनी १९५७ मध्ये मिनेसोटा विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयातील बी. एस. पदवी प्राप्त केली. पुढे १९६२ मध्ये त्याच विद्यापीठातून अर्थशास्त्रांतर्गत वर्तनवादीशास्त्र (बिहेविअरल सायन्स) हा विषय घेऊन पीएच. डी. पदवी मिळविली. सुप्रसिद्ध पोलिश-अमेरिकन अर्थतज्ज्ञ व नोबेल पारितोषिक प्राप्त लिओनीड हुर्विक्झ (Leonid Hurwicz) हे त्यांचे पीएच. डी.चे मार्गदर्शक होते.
मॅक्फॅडन यांनी १९६३ – १९७९ या काळात कॅलिफोर्नियातील बर्कली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. त्यानंतर १९७९ – १९९१ या काळात एम. आय. टी.मध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून काम केले. १९७७-७८ या वर्षात ते येल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. इकॉनॉमेट्रिक्स लॅबोरेटरीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. २०११ मध्ये त्यांची University Of The Southern California या खाजगी विद्यापीठात प्रेसिडेन्शियल प्रोफेसर ऑफ हेल्थ इकॉनॉमिक्स या पदावर नियुक्ती झाली.
मॅक्फॅडन यांनी ग्राहकाकडून मागणीत सातत्य नसलेल्या विविक्त अगर अनियमित वस्तूंच्या (सेवा) निवडी संदर्भातील सिद्धांत व प्रणाली विकसित केली. त्यापूर्वी केवळ मागणीमध्ये सातत्य असलेल्या वस्तूंच्या निवडीसंदर्भातील घटकांचाच विचार अर्थतज्ञांनी केलेला होता. साखरेसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या मागणीमध्ये सातत्य असते, तर रिफ्रिजरेटरसारख्या वस्तूंच्या खरेदीमध्ये असे सातत्य अगर नियमितपणा दिसून येत नाही. बहुसंख्य लोकांकडे एकच फ्रिज असतो व त्याची निवड अगर मागणी अनियमित अशी असते. तीच गोष्ट गरजे व ऐपतीनुसार विशिष्ट साधन जास्तीत जास्त वापरले जाते. अशा विविक्त निवडीसंदर्भात ग्राहक कोणत्या अर्थशास्त्रीय घटकांना प्राधान्य देतात याबाबतचे विश्लेषण करणाऱ्या प्रणालीची गरज मॅक्फॅडन यांच्या संशोधनामुळे अधोरेखित केली होती.
१९६५च्या सुमारास मॅक्फॅडन यांची बर्कली विद्यापीठातील पीएच. डी.ची विद्यार्थिनी कॅलिफोर्निया राज्यातील महामार्गासंबंधी संशोधन करत होती . त्या वेळी राज्याच्या वाहतूक विभागाने स्वैर मार्गांची (Free Way) निवड वा निर्मितीही अनियमित असल्याने ती वारंवार केली जाणारी निवड वा निर्मिती असत नाही. डॅनियल यांनी सदर विद्यार्थिनीचा प्रबंध पूर्ण झाल्यानंतर १९७६ मध्ये आपल्या अधिकच्या संशोधनाद्वारे वरील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यात आपण विकसित केलेल्या विविक्त निवडीसंदर्भातील अर्थनीतिच्या आधारे तांत्रिक प्रणालीची मांडणी केली. सॅन फ्रॅन्सिस्कोच्या समुद्र किनाऱ्याजवळून प्रवासी वाहतुकीसाठीच्या वेगाने धावणाऱ्या आगगाडीसंबंधी आकडेवारी विचारात घेऊन सदर प्रणालीचे निष्कर्ष तपासले. त्यात असे दाखवून दिले की, केवळ ६.२% प्रवासीच आगगाडीचा वापर करतात. ज्येष्ठ नागरिकांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या घरांच्या निवडीसंदर्भातही सदरची प्रणाली उपयुक्त असल्याचे मत नोंदवले.
मॅक्फॅडन यांनी स्वतंत्रपणे तसेच इतरांबरोबर लिहिलेले ग्रंथ पुढीलप्रमाणे : अर्बन ट्रॅव्हल डिमांड : ए बिहेविअरल ॲनालिलिस (१९७६), स्ट्रक्चरल ॲनालिसिस ऑफ डिस्क्रिट डेटा वुइथ इकॉनॉमेट्रिक ॲप्लीकेशन्स (१९८१), हँडबुक ऑफ इकॉनॉमेट्रिक्स (१९९४), इन्डिव्ह्युज्वल सब्जेक्टिव्ह सर्व्हायवल कर्व्ह्ज (२००३), हेल्थी वेल्थी ॲण्ड वाइज (२००३), न्यू सायन्स ऑफ प्लेझर (२००४), स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस ऑफ चॉइस एक्सपिरिमेंट्स ॲण्ड सर्व्हेज (२००५), हू कोल्ड टू एनरोल इन मेडिकेअर (२००६), सायन्स ऑफ प्लेझर (२०१२). शिवाय त्यांचे अनेक शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
मॅक्फॅडन यांनी त्यांच्या संशोधनकार्याबद्दल पुढील पुरस्कार लाभले : जॉन बेट्स क्लार्क मेडल (१९७५), अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सेस संस्थेवर निवड (१९७७), एम. आय. टी. आउटस्टँडिंग टिचर अवॉर्ड (१९८१), नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व (१९८१), फ्रीश मेडल (१९८६), आयर्विन प्लेन नेमर्स प्राइस इन इकॉनॉमिक्स (२०००), युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन-मानद डॉक्टरेट (२००३), अमेरिकन फिलॉसॉफी सोसायटी सदस्यत्व (२००६).
समीक्षक – संतोष दास्ताने