कास्थिमत्स्य वर्गातील सेलेची उपवर्गाच्या प्लुरोट्रिमॅटा गणात शार्क माशांचा समावेश होतो. कॅरकॅऱ्हिनस प्रजातीतील शार्कच्या लहान जातींना मुशी म्हणतात. मुशी हा सागरी मासा भारत, पाकिस्तान, चीन, जपान, दक्षिण आफ्रिका, मलेशिया, इंडोनेशिया इत्यादी देशांच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात आढळतो. भारतात अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या ठिकाणी ते आढळतात. कुत्र्यांना खायला घालण्यासाठी या माशांचा वापर होतो. मुशी माशाची गंधसंवेदना कुत्र्यांप्रमाणे तीक्ष्ण असते. तसेच मुस्कट कुत्र्याच्या मुस्कटासारखे असते, म्हणून त्याला डॉगफिश म्हणतात.

मुशी (कॅरकॅऱ्हिनस डुसीमेरी)

मुशी माशाच्या शरीराची लांबी सु. ६० सेंमी. असते. शरीर लांबट, चपटे, दोन्ही टोकांना निमुळते व प्रवाहरेखित असते. शरीराच्या बऱ्याचशा भागावर दंताभ प्रकारचे सूक्ष्म खवले असतात. शरीराचे डोके, धड व शेपूट असे तीन भाग असतात. डोके त्रिकोणी असते. मुख अधर बाजूला असून ते अर्धचंद्राकृती असते. मुख जबड्यांनी वेढलेले असून दोन्ही जबड्यांत तीक्ष्ण व पाठीमागे वळलेल्या कट्यारीच्या आकाराच्या दातांच्या अनेक रांगा असतात. डोक्याच्या दोन्ही बाजूंना कल्ल्यांच्या पाच जोड्या असून कल्ल्यांवर आवरण नसते. धड जाड असून ते शेपटीकडे निमुळते होते गेलेले असते. धडावर दोन एकल पृष्ठपर असून वक्षपर आणि श्रोणिपर यांची प्रत्येकी एक जोडी असते. धडाच्या खालच्या बाजूस एकच एकल अधरपर असतो. शेपटीला मोठा पुच्छपर असतो. पुच्छपराचा वरचा भाग खालच्या भागापेक्षा मोठा असतो. मुशीला डोळे, घ्राणेंद्रिये, फक्त आंतरकर्ण, त्वचा, पार्श्विक रेखा, लोरेंझिनी कुंभिका आणि पुटिका अशी ज्ञानेंद्रिये असतात.

मुशी मासा झिंगा, शेवंडा, ऑक्टोपस, बांगडा, तरळी व समुद्र कासवे इत्यादी भक्ष्य दातांनी पकडतो आणि चर्वण न करता गिळून टाकतो. शेपटीच्या सुरुवातीस अधर बाजूस अवस्कर छिद्र असते. त्यातून न पचलेले अन्न, जननपेशी व उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकले जातात.

नर मुशीमध्ये श्रोणिपरांच्या आतील बाजूस आलिंगकांची एक जोडी असते. नरात दोन वृषणे व मादीमध्ये दोन अंडाशये असतात. मुशींची लांबी ३८–४६ सेंमी.पर्यंत असताना नर व मादी प्रजननक्षम होतात. मीलनानंतर अंडपेशीचे फलन अंडनलिकेत होऊन पिलांना जन्म दिला जातो. मादी एका वेळी १३-१४ पिलांना जन्म देते.

मुशींचा उपयोग मुख्यत: अन्न व तेल मिळविण्यासाठी करतात. बऱ्याच शार्कप्रमाणे मुशींच्या मांसात ट्रायमिथिल अमाइन ऑक्साइड आणि यूरिया हे पदार्थ असल्यामुळे त्याला उग्र वास येतो. म्हणून हे मासे कमी किंमतीला उपलब्ध असतात. अनेक लोकांच्या खाण्यात मुशीचा समावेश होतो, म्हणून त्याला सामान्यांचा मासा म्हणतात. परांचा उपयोग पिण्याचे सूप करण्यासाठी आणि कातडीचा उपयोग पादत्राणे, पाकिटे व पट्टे तयार करण्यासाठी होतो. मुशीपासून शरीर तेल आणि यकृत तेल मिळवितात. यकृत तेलात – जीवनसत्त्व आणि – जीवनसत्त्व असतात. शरीर तेलावर प्रक्रिया करुन ते खाण्यासाठी व साबण तयार करण्यासाठी वापरतात. या दोन्ही तेलांत स्क्वॅलीन नावाचा पदार्थ असून तो वंगण तसेच सौंदर्यप्रसाधनांत वापरतात. प्राणिविज्ञानात पृष्ठवंशी प्राण्यांच्या शरीररचनेचा अभ्यास करण्यासाठी व संशोधनासाठी मुशीचा वापर करतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा