सारत म्हणजे धातुघटकांच्या ऊतकांचे उत्तम बल, त्यांचे योग्यप्रमाण व गुणवत्ता होय; तर सारता म्हणजे धातूंची विशुद्धता होय. आयुर्वेदशास्त्राने नेहमीच शरीरातील दोष, धातू, मल तथा अग्निसाम्य टिकवून ठेवण्यासाठी व फलस्वरूप शरीरक्रिया सुरळीत राहावी यावर भर दिला आहे. प्रसन्न चित्त व इंद्रिये हे उत्तम आरोग्याचे लक्षण आहेत.
चिकित्सकाला स्वस्थ व्यक्ती अथवा रुग्णाची परीक्षा करत असताना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. शरीराचा समतोल, आरोग्य, उत्तम व्याधी क्षमत्व हे शरीरातील धातुघटकांवर अवलंबून असते. याउलट आजार हे शरीरघटक असार किंवा कमी गुणवत्तेचे समतोल बिघडल्याचे सूचक आहेत. गुणवान, निरोगी धातू म्हणजे सारवान धातू हे उत्तम ओज उत्पत्तीसाठी जबाबदार आहे. शरीरधातूंचे प्रमाण व गुणवत्ता ठरविण्यासाठी जे निकष चिकित्सा अनुभवावरून चरक आदि आचार्यांनी वर्णन केले आहेत ते विशेष परीक्षण म्हणजे ‘सारता परीक्षण’ होय.
प्रत्येक धातू किंवा ऊतक यांचे सामर्थ्य फक्त बाह्य शरीर पाहून ठरविणे शक्य नाही म्हणून रोगनिदान किंवा चिकित्सा करताना सारता परीक्षण महत्त्वाचे ठरते. चरकाचार्यांनी सारता परीक्षणाच्या पुढील आठ निकषांचा उल्लेख केला आहे — शरीर धारण करणाऱ्या प्रत्येक धातूचे (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र) असे सात व सातही मिळून सर्व सार असे आठ निकष. तसेच सुश्रुताचार्यांनी वेगळे असे सत्वसाराचेही वर्णन केले आहे.
सारवान धातूचे महत्त्व – उत्तम प्रतिकारशक्तीस सारवान किंवा विशुद्ध धातू जबाबदार आहेत. केवळ दूषित झालेले धातू शरीरामध्ये दोष किंवा रोग उत्पन्न करतात असे नाही, तर त्यांना शरीरातील कमकुवत धातू देखील दोष उत्पन्न करण्यास कारणीभूत असतात. प्रत्येक सारता परीक्षणातही ऊतींच्या तसेच धातूंच्या दर्जावरून प्रवर (उत्तम), मध्यम व अवर (हीन) असे वर्गीकरण केले आहे. जे दोष हीन दर्जाच्या धातूठिकाणी जाऊन लगेच रोग उत्पन्न करतात ते चिकित्सा करण्यास तितकेच कठीण असतात. याउलट उत्तम दर्जाच्या धातूच्या ठिकाणी दूषित दोषांना आधार न मिळाल्यामुळे रोग उत्पन्न होणे कठीण असते.
जर रुग्ण हीन किंवा मध्यम सार आढळल्यास वैद्याने धातूंची, ऊतकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी औषधी किंवा रसायन चिकित्सा कल्पांचा सल्ला दिला पाहिजे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून आजारपणाची शक्यता कमी होते. शरीर कमकुवत असल्यास विविध जिवाणू-विषाणू इत्यादिंची बाधा लवकर होते. अन्यथा रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यास त्यांचा शरीरावर परिणामही दिसत नाही. किंबहूना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने केल्या जाणाऱ्या विविध परिक्षणासह विविध आजारांपासून बचाव करण्यासाठी व निदानातील अचूकतेसाठी सारता परीक्षण करणे महत्त्वाचे ठरते.
संदर्भ : चरक – विमानस्थान ८ वा आध्याय रोगभिषग्जितीयं श्लोक नं. १०२-११५, चक्रपाणी टिका, चौखंबा प्रकाशन.
समीक्षक : कौस्तुभ चौंडे