(डॉर्मँसी). सजीवांच्या जीवनचक्रात जेव्हा वाढ, विकास आणि हालचाल (प्राण्यांच्या बाबतीत) या क्रिया तात्पुरत्या थांबतात, तेव्हा सजीवांच्या त्या अवस्थेला सुप्तावस्था किंवा प्रसुप्तावस्था म्हणतात. या अवस्थेत सजीवांमधील चयापचय क्रिया मंद होतात किंवा थांबतात आणि त्यांच्यातील ऊर्जा टिकून राहायला मदत होते. सुप्तावस्थेचे मुख्य दोन प्रकार आहेत: पूर्वानुमानी सुप्तावस्था आणि आनुषंगिक सुप्तावस्था.
सुप्तावस्था सामान्यपणे पर्यावरणाच्या स्थितीशी संबंधित असून सुप्तावस्थेत जाण्यापूर्वी सजीव त्यांच्या पर्यावरणाशी दोन प्रकारांनी जुळवून घेतात. पर्यावरणाची स्थिती प्रतिकूल होण्याआधी सजीव सुप्तावस्थेत जात असल्यास तिला ‘पूर्वानुमानी सुप्तावस्था’ म्हणतात. जसे वनस्पती हिवाळा सुरू होणार याचा अंदाज दिवसभरात कमी झालेला सूर्यप्रकाश आणि घटलेले तापमान यावरून करतात. याउलट काही सजीव पर्यावरणाची स्थिती प्रतिकूल झाल्यानंतर सुप्तावस्थेत जातात, अशा सुप्तावस्थेला ‘आनुषंगिक सुप्तावस्था’ म्हणतात. सहसा जेथील हवामानाचा अंदाज करता येत नाही तेथील सजीव आनुषंगिक सुप्तावस्थेत जातात. आनुषंगिक सुप्तावस्थेत जाणारे प्राणी पर्यावरणात अचानक बदल झाल्यावर मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडतात. हे खरे असले तरी देखील ही अवस्था त्यांच्यासाठी फायदेशीर असते. कारण त्यामुळे हे सजीव जास्त काळ सक्रिय राहू शकतात आणि उपलब्ध स्रोतांचा वापर जास्त करू शकतात.
प्राण्यांमध्ये सुप्तावस्था शीतनिष्क्रियता, क्रियाशिथिलता, उष्णनिष्क्रियता व ऊष्मायन या स्वरूपात दिसून येते.
प्राण्यांमधील सुप्तावस्था
शीतनिष्क्रियता (हायबर्नेशन) : अनेक सस्तन प्राणी हिवाळ्यात ऊर्जेचा वापर कमी होण्यासाठी आणि अन्नाचा तुटवडा असताना टिकून राहण्यासाठी निष्क्रिय होतात. अशी शीतनिष्क्रियता पूर्वानुमानी किंवा आनुषंगिक असू शकते. जे प्राणी शीतनिष्क्रियतेत जातात ते ऊर्जा मिळावी याकरिता शरीरात चरबीचा जाड थर जमा होईल याची काळजी घेतात. या काळात त्यांच्यात शरीरक्रियांसंबंधी अनेक बदल घडून येतात. जसे हृदयाची स्पंदने हळू होतात आणि चयापचय क्रिया मंदावते. वटवाघूळ, खार, जाहक (हेजहॉग), लेमूर, अस्वल यांसारखे प्राणी शीतनिष्क्रिय होतात. पक्ष्यांमध्ये अमेरिका, मेक्सिको येथे आढळणारा कापूर पक्षीही शीतनिष्क्रिय होतो.
क्रियाशिथिलता (डायापॉज) : ही सुप्तावस्था पूर्वानुमानी असून प्राण्यांच्या जनुकांमध्ये पूर्वनिश्चित झालेली असते. सामान्यपणे कीटकांमध्ये ही अवस्था आढळते. नोव्हेंबर (शरद ऋतू) ते मार्च (वसंत ऋतू) या काळात त्यांची वाढ थांबते. यूरोपियन मृगासारख्या (कॅप्रिओलस कॅप्रिओलस) सस्तन प्राण्यांमध्ये ही अवस्था दिसते. या अवस्थेत मादीच्या गर्भातील भ्रूण गर्भाशयाच्या अस्तराला चिकटून राहतो. वसंत ऋतूमध्ये जेव्हा पर्यावरण अनुकूल बनते तेव्हा मादी पिलाला जन्म देते.
उष्णनिष्क्रियता (एस्टीवेशन) : काही प्राणी पर्यावरण अतिशय उष्ण किंवा शुष्क झाले असता उष्णनिष्क्रिय होतात. सामान्यपणे अपृष्ठवंशी प्राण्यांमध्ये हा प्रकार दिसून येतो. ही सुप्तावस्था आनुषंगिक असते. उदा., गांडूळ, गोगलगाय, सॅलॅमँडर, मगर, फुप्फुसमासा, वाळवंटी कासव इत्यादी. गोगलगायी आपल्या शरीरावरील कवचाचे झाकण बंद करून घेतात आणि सुप्तावस्थेत जातात. तसेच आफ्रिकेतील फुप्फुसमासा उन्हाळ्यात पाणी आटले की तळ्यातील चिखलात स्वत:ला पुरून घेतो, शरीराभोवती मातीचे आवरण अथवा घरटे तयार करतो आणि पुन्हा पाणी जमा झाले की घरट्यातून बाहेर येतो.
ऊष्मायन (ब्रुमेशन) : ही अवस्था प्रामुख्याने सरीसृप प्राण्यांमध्ये दिसते. हिवाळ्यात सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी झाला आणि तापमान कमी झाले की सरीसृप प्राणी या अवस्थेत जातात. या अवस्थेत ते केवळ पाणी पिण्यासाठी जागे होतात आणि पुन्हा झोपी जातात. ऊष्मायन सुरू होण्यापूर्वी ते नेहमीपेक्षा जास्त खातात, परंतु तापमान घटले की ते कमी खातात किंवा अन्न नाकारतात. मात्र पाणी पिणे त्यांच्यासाठी गरजेचे असते. अन्नाशिवाय ते काही महिने राहतात. सरीसृप प्राण्यांचा आकार, वय, शारीरिक स्थिती यांनुसार या अवस्थेचा कालावधी १ ते ८ महिने असू शकतो. अनेक सरीसृप लहान वयात या अवस्थेत पूर्णपणे जात नाहीत; मात्र त्यांच्या हालचाली मंदावतात आणि ते कमी खातात. ऊष्मायन हे निष्क्रियतेसारखे असले तरी त्यांच्यात फरक आहे. ऊष्मायनात सरीसृप प्राणी पाणी पितात, ते पूर्ण झोपलेले नसतात आणि काही प्रमाणात त्यांची हालचाल होत असते. याउलट शीतनिष्क्रियतेत सस्तन प्राणी पाणी पित नाहीत, ते पूर्ण झोपलेले असतात आणि त्यांच्या हालचाली पूर्णपणे थांबलेल्या असतात.
वनस्पतींमधील सुप्तावस्था
वनस्पतींमध्ये सुप्तावस्थेमुळे त्यांची वाढ थांबते. ज्या वनस्पतींना हिवाळा किंवा उन्हाळा सोईचा नसतो त्या वेळी अशा वनस्पती सुप्तावस्थेमुळे टिकून राहतात. सुप्तावस्थेत जाणाऱ्या अनेक वनस्पतींमध्ये ‘जैविक घड्याळ’ असते. हे घड्याळ अशा वनस्पतींना थंड हवामानात किंवा पाण्याचा तुटवडा असताना जीवनक्रिया मंद करायला आणि मऊ ऊती निर्माण करायला सुचविते. काही वनस्पतींमध्ये जैविक घड्याळ नसले तरी, तापमान कमी झाल्यास तसेच दिवस लहान किंवा पावसाचे प्रमाण कमी झाले असता त्यांच्यात सुप्तावस्था सुरू होते. वनस्पतींची सुप्तावस्था घालविण्यासाठी रसायनांचे उपचार प्रभावी ठरतात हे आढळले आहे. उदा., द्राक्षे, सफरचंद, सप्ताळू, किवी यांसारख्या वनस्पतींवर हायड्रोजन साइनामाइड फवारले असता, त्यांच्यात पेशीविभाजन होऊन या वनस्पती वाढीला लागतात.
काही बहुवर्षायू वनस्पतींमध्ये खासकरून काष्ठीय वृक्षांमध्ये हिवाळी सुप्तावस्था जाण्यासाठी त्यांना थंड हवामान लागते. ही सुप्तावस्था घालविण्यासाठी रसायने, उष्णता किंवा गोठलेले तापमान यांचा वापर करतात आणि ही सुप्तावस्था काही तासांत दूर करता येते. जेव्हा एखादी पूर्ण वाढलेली, अंकुरणक्षम बी अनुकूल स्थिती असताना अंकुरत नाही तेव्हा ती सुप्तावस्थेत आहे असे म्हणतात. या सुप्तावस्थेला भ्रूणाची आंतरिक गुणवैशिष्ट्ये कारणीभूत असतात.
जीवाणूंमधील सुप्तावस्था
अनेक जीवाणू उच्च तापमान, शुष्कता आणि प्रतिजैविके असे घटक प्रतिकूल असताना टिकून राहण्यासाठी अंतर्बीजाणू (काही जीवाणूंमध्ये तयार होणारी सुप्त, मजबूत, अप्रजननक्षम संरचना), पुटी (सामान्यपणे जीवाणू, प्रोटिस्ट किंवा अपृष्ठवंशी प्राणी यांच्यातील विश्रामावस्था किंवा सुप्तावस्था), विबीजाणू (काही कवकांमधील अप्रजननक्षम अवस्था) अशा अवस्थांत जातात. या अवस्थांमध्ये चयापचयाचा दर अत्यंत कमी असतो.
विषाणूंमधील सुप्तावस्था
विषाणूंना ‘सुप्तावस्था’ ही संज्ञा तंतोतंत लागू होत नाही, कारण त्यांच्यात चयापचय क्रिया घडत नाही. मात्र काही विषाणू जसे ‘पॉक्सव्हायरस’ (देवीचा विषाणू) आणि पिकोर्नाव्हायरस (सर्दी, लाळ रोगाचा विषाणू) हे आश्रयींमध्ये शिरल्यानंतर निष्क्रिय राहतात. नागीण रोगाचे विषाणू आश्रयीला बाधा पोहोचल्यानंतर निष्क्रिय होतात आणि आश्रयीवर ताण आला किंवा अतिनील किरणांचा मारा झाला तर पुन्हा सक्रिय होऊ शकतात.