मॅरिएट, ऑगुस्त : (११ फेब्रुवारी १८२१–१९ जानेवारी १८८१). विख्यात फ्रेंच पुरातत्त्वज्ञ आणि इजिप्तविद्या अभ्यासक. पूर्ण नाव ऑगुस्त फर्डिनांड फ्रान्स्वा मॅरिएट. त्यांचा जन्म फ्रान्समधील बूलन-सुर-मेर (Boulogne‐sur‐Mer) येथे झाला. त्यांचे वडील नगरपालिकेत कारकून होते. मॅरिएट यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण जन्मगावातच झाले. शाळेत असतानाच त्यांच्या बुद्धीची आणि कलेतील कौशल्याची चमक दिसून आली होती. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी ते प्राचीन इजिप्तमधील चित्रलिपीतील लेख (Hieroglyphs) वाचू शकत होते. तसेच इजिप्तमधील प्राचीन कॉप्टिक (Coptic) भाषेतील लेखन त्यांना वाचता येत होते.

लहानवयातच मॅरिएट इंग्लंडला गेले (१८३६) आणि स्ट्रॅटफोर्ड-अपॉन-एव्हन (Stratford-upon-Avon) येथील मुलांच्या शाळेत चित्रकला व फ्रेंच भाषेचे अध्यापक म्हणून काम करू लागले. त्यांनी १८४० मध्ये रिबीन बनवण्याच्या कारखान्यासाठी आरेखक म्हणून काही काळ काम केले; परंतु त्याच वर्षी ते जन्मगावी परतले. १८४१ मध्ये त्यांनी डुई (Douai) विद्यापीठातून पदवी घेतली. डुई येथे शिक्षक म्हणून काम करत असताना त्यांनी इतिहास व पुरातत्त्व या विषयांवर खासगी शिकवण्या घेतल्या आणि अर्थार्जनासाठी स्थानिक नियतकालिकांसाठी लेखन केले.

सन १८४२ मध्ये मॅरिएट यांच्या नात्यातील नेस्टर ल्योते (Nestor L’Hôte) हा फ्रेंच चित्रकार व इजिप्तविद्या अभ्यासक मरण पावला. त्याने विख्यात फ्रेंच शोधक व इजिप्तविद्या अभ्यासक ज्याँ-फ्रान्स्वा शाम्पोलिआँ (Jean-François Champollion) यांच्याबरोबर १८२८ ते १८३० आणि स्वतंत्रपणे १८३९ ते १८४१ या काळात इजिप्तमध्ये शोधमोहिमा काढल्या होत्या. नेस्टर ल्योतेच्या रेखाटनांची आणि टिपणांची वर्गवारी करण्याचे काम मॅरिएट यांच्याकडे आले. त्यांनी या कामानंतर स्वतःला चित्रलिपी आणि कॉप्टिक भाषेच्या अभ्यासासाठी वाहून घेतले. बूलन म्युझियममधील इजिप्त गॅलरीची विश्लेषणात्मक सूची तयार केल्यानंतर (१८४७) त्यांना पॅरिसच्या लूव्र संग्रहालयात काही काळ नोकरी मिळाली (१८४९).

लूव्र संग्रहालयातील नोकरी सुरू केल्यानंतर मॅरिएट १८५० मध्ये प्राचीन हस्तलिखिते मिळवण्याच्या कामगिरीवर इजिप्तला गेले; तथापि लवकरच त्यांनी सक्कारा येथे उत्खननाला प्रारंभ केला. तेथे त्यांना पायऱ्यांच्या पिरॅमिडजवळ (Step Pyramid) एपिस (बैल) देवतेची दफने मिळाली आणि दुसरा रामसेस (रॅमसीझ) (Ramesses II) या फॅरोचा खजिना सापडला. पुढील चार वर्षे सर्वेक्षण व उत्खनन करत असताना मॅरिएट यांनी त्या काळच्या प्रथेनुसार असंख्य प्राचीन अवशेष फ्रान्सला रवाना केले. त्यामुळे मॅरिएट यांच्यावर लुटारू अशी टीकाही झाली व त्यांना पॅरिसला परत जावे लागले; तथापि १८५८ मध्ये मॅरिएट यांनी कुटुंबासहित इजिप्तमध्ये कायमचे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला व त्याच वर्षी त्यांची कैरोत एक मोठे वस्तुसंग्रहालय स्थापन करण्याची इच्छा पूर्ण झाली, कारण इजिप्तमध्ये मिळालेल्या पुरातत्त्वीय वस्तू तेथेच राहायला हव्यात, असे ते नेहमीच म्हणत. मॅरिएट यांनी वस्तुसंग्रहालयात अभिरक्षक हे पद स्वीकारले आणि पुढील काळात उत्खनन झालेल्या स्थळांच्या जतन व संवर्धनाचा पाठपुरावा केला.

मॅरिएट यांनी इजिप्तमध्ये सक्कारा व्यतिरिक्त फॅरो पहिला सेती (Seti I) याचे मंदिर, अबिदोस, मेदूम व थेब्ज येथील दफने आणि दंडारा (Dandarah) व इडफू येथील मंदिरे यांचे उत्खनन व संशोधन केले. त्यांनी गिझा, कर्नाक व दार अल्-बहरी (Dayr Al-Bahari) या स्थळांचे उत्खनन केले. मॅरिएट यांनी उत्खनन करताना स्तरविज्ञानाचा पुरेपूर वापर केला होता आणि सर्व महत्त्वाच्या शोधाचे जागेवरच छायाचित्र घेण्याची व्यवस्था केली होती. त्यांनी अनधिकृत उत्खननांना आळा घातला आणि पुरातत्त्वीय वस्तूंच्या जतनाची व्यवस्था केली, हे त्यांचे इजिप्तविद्येतील महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या पुस्तकांमध्ये सेरापियम डी मेम्फिस (१८५७), अबिदोस (१८६९), सर्व्हे ऑफ द हिस्ट्री ऑफ इजिप्त (१८७४) आणि द मस्तबाज ऑफ द ओल्ड किंगडम (१८८९) ही महत्त्वाची मानली जातात. अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्य म्हणून १८६९ मध्ये त्यांची निवड झाली. तसेच त्यांना इजिप्तमध्ये ‘पाशाʼ हा दर्जा देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

कैरो येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • Ridley, Ronald T. Auguste Mariette: One hundred years after, Brill, Leiden, 1984.
  • https://www.britannica.com/biography/Auguste-Mariette
  • https://www.newworldencyclopedia.org/entry/Auguste_Mariette
  • https://www.oxfordreference.com/view/10.1093/oi/authority.20110803100134210

                                                                                                                                                                                      समीक्षक : जयेंद्र जोगळेकर