सगळ्या जिवंत प्राण्यांत अगदी साधी शरीररचना असणारा हा प्राणी आहे. आधुनिक वर्गीकरणानुसार दृश्यकेंद्रकी अधिक्षेत्रामधील (Eukaryotic Domain) अमीबोझोआ संघातील (Amoebozoa Phylum) ट्यूब्युलिनिया वर्गातील (Tubulinea Class) अमिबिडी कुलामध्ये अमीबाचा समावेश होतो. अमीबाची अमीबा प्रोटियस (Amoeba proteus) ही जाती सर्वत्र आढळते. यापूर्वी अमीबाचे वर्गीकरण प्रोटोझोआ संघात केले जात होते (पहा : पंचसृष्टी वर्गीकरण).
अमीबा प्रोटियस हे नाव ग्रीक शब्दापासून आले आहे. अमीबा म्हणजे सतत बदलणारा, तर आकार बदलणाऱ्या एका ग्रीक जलदेवतेचे नाव प्रोटियस असे आहे. अमीबा सतत आकार बदलतो, म्हणून याचे नाव अमीबा प्रोटियस असे ठेवण्यात आले. अमीबाचा बदलणारा आकार त्याच्या छद्मपादामुळे आहे. दृश्यकेंद्रकी जीवाणूसुद्धा छद्मपादामुळे आकार बदलतात. जीवाणूच्या पश्च बाजूस असलेल्या अॅक्टिन आणि मायोसिन प्रथिनामुळे त्याचा आकार सतत बदलतो. प्राणी सृष्टीतील ही दोन्ही प्रथिने अगदी प्राचीन काळापासून बनलेली आहेत.
अमीबा हा सजीव एकपेशीय असून तो जवळ जवळ रंगहीन किंवा पारदर्शक असतो. त्याचा व्यास ०.२−०.३ मिमी. असतो. परंतु, याहीपेक्षा अधिक मोठ्या व्यासाचे अमीबा आढळले आहेत. पुरेसा ऑक्सिजन असलेल्या गोड्या पाण्यामध्ये जेथे भरपूर पाणवनस्पती व शेवाळे असतात अशा ठिकाणी अमीबा सापडतो. कमळाच्या पानाखाली किंवा सपाट पाने असलेल्या पाण्यातील पाणवनस्पतीच्या खालील पृष्ठभागावरून अमीबा काचपट्टीवर सहज घेता येतो. त्याचे सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करता येते. तीव्र प्रकाश असल्यास तो प्रकाशापासून दूर जातो.
अमीबा वृद्धीमिश्रणात सहज वाढतो. गहू असलेल्या माध्यमात त्याची वाढ चांगली होते. एका काचेच्या पात्रात भाताची पेज घालून त्यात भरपूर पाणी घालून मिनिटभर उकळा. हे मिश्रण तसेच ठेवल्यास त्यात जीवाणू वाढतात. या मिश्रणात डबक्यातील अमीबा सोडल्यास त्यांची संख्या वाढते. काचेच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी, थोडी कमळाची पाने, तळाशी थोडा चिखल आणि ५−१० भिजवलेले गहू घालून ठेवल्यास पाणवनस्पतीवरील अमीबा भांड्याच्या आतील पृष्ठभागावर साध्या डोळ्यांनी दिसू लागतात.
अमीबा सूक्ष्मदर्शकाखाली अस्फटिकी (Amorphous) दिसतो. जीवंत अमीबा सतत आकार बदलत असतो. त्याच्या छद्मपादांचा वापर हालचाल व अन्नग्रहणासाठी होतो. अमीबा एकपेशीय केंद्रकी सजीव आहे. त्याच्या पेशीत आवरण असलेली आवश्यक पेशी अंगके असतात. अमीबाने अन्नग्रहण केले असल्यास पेशीमध्ये अन्न रिक्तिका दिसतात. अन्न रिक्तिका अन्नग्रहणानंतर तात्पुरत्या निर्माण होतात. एकदा अन्नपचन झाले म्हणजे त्यातील पचलेला भाग रिक्तिका आवरणातून शोषला जातो. अन्न रिक्तिका तात्पुरत्या तयार होतात व नाहीशा होतात. पेशीमधील अनावश्यक पाणी संकोची रिक्तिकेतून (Contractile Vacuole) बाहेर टाकले जाते. अमीबा कर्बोदके, मेदाम्ले व प्रथिन विघटनातून ऊर्जा मिळवतो. जीवाणू, करंडक पेशी (डायाटम) आणि सूक्ष्म शैवाल हे त्याचे अन्न आहे.
अमीबा ऑक्सिश्वसन पद्धतीने श्वसन करतो. म्हणजे पेशी आवरणातून ऑक्सिजन हा विसरणाने (Diffusion) पेशीमध्ये जातो, तर चयापचयातून बाहेर पडलेला कार्बन डाय-ऑक्साइड आणि नायट्रोजन हे उत्सर्जक विसरणाने पेशीबाहेर पडतात.
अमीबामध्ये अलैंगिक प्रजनन होते. बहुतेक वेळा पुनुरुत्पादन पेशी द्विभाजन (Binary fission) पद्धतीने होते. काही प्रजातींमध्ये बहुविभंजन पद्धतीने (Multiple fission) पुनुरुत्पादन होते, परंतु अमीबा प्रोटियसमध्ये बहुविभंजन होत असल्याचा पुरावा मिळालेला नाही. अमीबा प्रोटियसमध्ये लैंगिक पुनुरुत्पादन होत नाही. लहान आतड्यात असणाऱ्या एंटामीबा हिस्टॉलिटिका (Entamoeba histolytica) या अमीबामध्ये पुनुरुत्पादन हे बीजाणूजनन (Sporulation) याप्रकारे होते.
अमीबाचा जीनोम हे एक अजून न समजलेले कोडे आहे. अमीबा प्रोटियस याच्या जीनोमचा आकार २९० बिलियन आधारक (बेस) जोड्या एवढा आहे. (१ बिलियन = १००० मिलियन आणि १ मिलियन = १० लक्ष). एवढ्या मोठ्या जीनोमचे एकपेशीय अमीबामध्ये नेमके काय काम आहे हे अजून नीटसे समजलेले नाही. अमीबा प्रोटियसच्या केंद्रकात ५०० गुणसूत्रे असतात. हा प्रकार बहुगुणीत (Polyploidy) गुणसूत्रांचा आहे. म्हणजे अमीबाची गुणसूत्रे पेशी विभाजनाच्यावेळी वेगळी न होता तशीच राहतात. एरवी कायिक पेशीमध्ये २n म्हणजे गुणसूत्राचे दोन संच (Diploid) असतात. अमीबामध्ये गुणसूत्राचे किती संच आहेत यावर अजून संशोधन चालू आहे.
पहा : अमीबाजन्य विकार (प्रथमावृत्ती नोंद).
संदर्भ :
- https://microbewiki.kenyon.edu/index.php/Amoeba_proteus#Genome_Structure
- https://biologywise.com/amoeba-facts
समीक्षक : मोहन मदवाण्णा