महाराष्ट्र राज्यातील एक विद्यापीठ. पश्चिम विदर्भातील ग्रामीण भागातील लोकांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने तत्कालीन नागपूर विद्यापीठाचे (सध्याचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ) विभाजन होऊन १ मे १९८३ रोजी अमरावती विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. या विद्यापीठाचे शैक्षणिक अधिकारक्षेत्र अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांत आहे. अमरावती विद्यापीठाचे ४ मे २००५ मध्ये नाव बदलून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती असे नामकरण करण्यात आले. अज्ञानाच्या अंधकारातून तरुणांची मुक्तता करून समाजाच्या उन्नतीसाठी ज्ञान व बुद्धीचा भरणा करणे हा विद्यापीठाचा दृष्टांत आहे. तसेच उच्च स्तरावर शिक्षण, अध्ययन आणि संशोधन करून समाजामध्ये शैक्षणिक योगदान देणे हे विद्यापीठाचे लक्ष्य आहे. ‘जनमन जागर करिती निरंतर…’ हे विद्यापीठाचे गीत असून प्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांनी ते लिहिले आहे. विद्यापीठाच्या स्थापने वेळी डॉ. के. जी. देशमुख हे पहिले कुलगुरू होते. सध्या डॉ. दिलीप मालखेडे हे विद्यापीठाचे कुलगुरू असून डॉ. विजय चौबे हे प्र-कुलगुरू, तर डॉ. तुषार देशमुख हे कुलसचिव आहेत (२०२२).

विद्यापीठाच्या स्थापने वेळी एकूण ६७ महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नित होती आणि सुमारे २७ हजार विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या प्रवाहात होते. आज हे विद्यापीठीय वृक्ष विस्तारून याच्या प्रगतीचा आलेख वृद्धिंगत झाला आहे. विद्यापीठाच्या अगदी स्थापनेपासून संत गाडगे बाबांच्या दशसूत्रीचा अवलंब करीत शिक्षणप्रसाराचे कार्य करणाऱ्या या विद्यापीठांतर्गत आज ३९८ महाविद्यालये संलग्नित असून त्यांपैकी १४१ महाविद्यालये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या २ (एफ) १२ (बी) सूचिमध्ये समाविष्ट झालेली आहेत. आज विद्यापीठ व विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांतून सुमारे ४.५ लाख विद्यार्थी उच्च शिक्षण संपादन करीत आहेत. विद्यापीठांतर्गत विविध महाविद्यालयांत शिक्षण संपादन करणारे अनेक विद्यार्थी शिक्षण, संशोधन, क्रिडा, सांस्कृतिक, राजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत. विद्यापीठामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, कला आणि सामाजिकशास्त्रे या चार विद्याशाखांतर्गत गृहविज्ञान, उपयोजित परमाणू विद्युत, व्यवसाय प्रशासन व प्रबंधन, संगणकशास्त्र, शारीरिक शिक्षण, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवतंत्रशास्त्र, माहितीशास्त्र, प्राणिशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, सांख्यिकी, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मराठी, अनुवाद हिंदी, इंग्रजी, विधी, ग्रंथालयशास्त्र, प्रादर्शिक कला विभाग, पाली व बुद्धिझम विभाग, संस्कृत इत्यादी सुमारे ३१ शैक्षणिक विभागांचा समावेश आहे. यांव्यतिरिक्त विद्यापीठाने बुलडाणा येथे मॉडेल पदवी महाविद्यालय सुरू केले आहे.

विद्यापीठ हे सुमारे ४७० एकर निसर्गरम्य परिसरामध्ये वसले असून परिसरात शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी अकॅडेमिक स्टफ कॉलेज, संतांचा प्रचार-प्रसार व संशोधन करण्यासाठी श्री. श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्र, संत गाडगे बाबा अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, स्वामी विवेकानंद स्टडिज सेंटर, बुद्धीस्ट स्टडिज सेंटर, विद्यापीठ महानुभव पंथ केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्ययन व नियमन केंद्र, सामाजिक शास्त्रे विभाग, विज्ञान व तंत्रविज्ञान विभाग, परिक्षा विभाग, आस्थापन विभाग, ग्रंथालय, बँक व टपाल कार्यालय, विद्यापीठ रोजगार व स्वयंरोजगार माहिती व मार्गदर्शन केंद्र, स्त्री अभ्यास केंद्र, विद्यापीठ परिसर अभ्यास केंद्र, मुला-मुलींचे वसतीगृह, आरोग्य केंद्र, जलतरण तलाव, विद्यार्थांच्या सोयीसाठी अमरावती महानगरपालिकेच्या परिवहन सेवा इत्यादी सेवा विद्यापीठ परीसरात उपलब्ध आहेत.

उद्दिष्टे : विद्यापीठाने विद्यार्थी केंद्रित दृष्टी ठेवली असून विद्यार्थी व शैक्षणिक दृष्ट्या काही उद्दिष्टे ठरविले आहेत.

  • विशेष कार्याच्या गुणवत्तेवर भर देऊन शैक्षणिक विषय, संशोधन आणि विस्तार उपक्रमांमध्ये उत्कृष्टता प्राप्त करणे.
  • समाजातील आर्थिक दृष्ट्या अपंग आणि वंचित घटकांना उच्च शिक्षणापर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष प्रयत्न करणे.
  • विशेषत: ग्रामीण भागामध्ये ज्ञानाचा प्रचार-प्रसार, कला आणि संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी विशेष तरतूद करणे.
  • संशोधनाभिमुख आणि कुशल प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत सक्षम वातावरणात त्यांची कौशल्ये शिकलेल्या वैज्ञानिक बुद्धी, उद्योजकीय कौशल्य आणि नावीन्यपूर्ण सक्षम असलेल्या विद्यार्थ्यांचे ज्ञान व्यावसायिक दृष्ट्या रूपांतर करणे.
  • शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून मानवी मूल्ये आणि नीतीमत्तेद्वारे तरुणांमध्ये चारित्र्य निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक आत्म संकल्पना, स्त्रीयांच्या समस्यांबद्दल जागरूकता आणि समाजाकडे तर्कशुद्ध दृष्टिकोण बाळगणे.
  • विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे आचरण, शिस्त यांचे पर्यवेक्षण व नियंत्रण करणे आणि त्यांचे आरोग्य व सामान्य कल्याण यांना चालना देणारी व्यवस्था करणे.
  • आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आकर्षित करून आणि प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांसोबत सहयोगी कार्यक्रम स्थापन करून जागतिक संबंध वाढविणे इत्यादी.

विद्यापीठाद्वारे मागसलेल्या आणि वंचितांच्या शैक्षणिक उन्नतीकडे विशेष लक्ष दिले जाते. युवकांना कौशल्य विकासाच्या विविध पैलूंचे प्रशिक्षण देऊन विविध आव्हानांचे संधित रूपांतर करण्यास आणि सक्षम मानवसंसाधन निर्माण करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध व वचनबद्ध आहे. अध्यापनासाठी जास्तीत जास्त आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे व अंमलात आणण्याकडे विद्यापीठाचा कल आहे. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य विकसित करण्यासाठी केवळ शैक्षणिकच नव्हे, तर सह-अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमेत्तर उपक्रमांनाही विद्यापीठामध्ये महत्त्व दिले जाते. संशोधन हे विद्यापीठाचा आत्मा माणून संशोधनाला चालना देण्यासाठी विद्यापीठ स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जातात. एकस्व (पेटंट) प्रमाण वाढविण्यासाठी विद्यापीठाने एकस्वाचे सेल सुरू केले आहे. यामुळे सहभागी शिक्षक व संशोधक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये परीक्षा आवेदनपत्र भरण्याची सुविधा सुरू करण्यात आल्यामुळे माजी व बहि:शाल विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करणे सोयीचे झाले आहे. विद्यापीठाच्या विविध विभागांची व कार्यपद्धतींची, विविध योजना व उपक्रमांची माहिती विद्यार्थी आणि इतरांना व्हावी यासाठी विद्यापीठाद्वारे जनसंपर्क विभागातर्फे चौकशी केंद्र सुरू केली आहे. तसेच परीक्षाविषयक माहिती परीक्षा विभागांतील विविध कक्षांद्वारे दिली जाते. क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय व पश्चिम विभागीय स्तरावर नेत्रदिपक कामगिरी करून विद्यापीठाचा गौरव देशपातळीवर पोहोचविला आहे.

विद्यापीठाचे स्वतंत्र ग्रंथालय असून याची स्थापना १९८७ मध्ये झाली. ग्रंथालय सर्व सोयी-सुविधांनी युक्त आहे. ग्रंथालय संगणीकृत असून विद्यार्थी व इतर अभ्यासक जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातून अगदी सहजतेने पाहिजे ती माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावरून प्रप्त करू शकतात. ग्रंथालयामध्ये निवडक आणि दुर्मिळ ग्रंथ (संदर्भग्रंथ, क्रमिकग्रंथ इत्यादी) आहेत. तसेच उपलब्ध ग्रंथ आणि आचार्य पदवीसाठी संशोधन केलेले शिक्षक व संशोधकांचे शोधप्रबंध, संशोधन प्रकल्प, तज्ज्ञांचे हस्तलिखिते, विविध नियतकालिके, सुमारे १५ हजार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्स, तज्ज्ञांची भाषणे इत्यादी माहिती ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ग्रंथालयाद्वारे महाविद्यालयांकरिता ‘ओपन कन्सोरटीया फॉर यु. जी. व पी. जी.’ सुरू केले असून अशा प्रकारचा कन्सोरटीया विकसित करणारे हे विद्यापीठ पहिले ठरले आहे. ग्रंथालयाद्वारे विद्यार्थ्यांकरिता कमवा व शिका ही योजनासुद्धा राबविली जाते.

संत गाडगे बाबांच्या विचार व कार्यानुसार कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दरवर्षी विद्यापीठाद्वारे स्व. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतिप्रित्यर्थ ‘संत गाडगे बाबा सामाजिक कार्य पुरस्कार’; उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्राचार्य, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी यांना ‘उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार’; पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना ‘विद्यापीठ पर्यावरण पुरस्कार’; संशोधनासाठी ‘कल्पना चावला यंग लेडी रिसर्च पुरस्कार’ इत्यादी पुरस्कार विद्यापीठाद्वारे दिले जातात. तसेच विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरामुळे विद्यापीठाला महाराष्ट्र राज्य वनश्री पुरस्कार, १९९७; स्व. अजय किनखेडे स्मृती वनशेती पुरस्कार, १९९८; इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र राष्ट्रीय पुरस्कार, १९९८; वसंतराव नाईक पुरस्कार, १९९९; इंदिरा गांधी राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार, २००५ इत्यादी राष्ट्रस्तरावरील पर्यावरण पुरस्कार देऊन मा. राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

विद्यापीठाला युजीसी, डीएसटी, डीबीटी, एआयसीटीई, डीआरडीओ, डीएई, आरजीएसटीसी इत्यादी संस्थांकडून भरीव अनुदान किंवा निधी प्राप्त होतो. विद्यापीठाद्वारे शैक्षणिक आणि प्रशासकीय गुणवत्तेवर अधिक भर देऊन कार्य करीत असल्यामुळे विद्यापीठाला २०१६ मध्ये ‘नॅक’ या संस्थेकडून विद्यापीठाला ‘अ’ श्रेणी देण्यात आली आहे.

समीक्षक : मोना चिमोटे