सर्व दर्शनांमध्ये ‘कार्य-कारण संबंध’ हा महत्त्वपूर्ण विषय चर्चिला गेला आहे. संस्कृत भाषेमध्ये कार्य शब्दाचा अर्थ — ‘जे उत्पन्न होते ते कार्य’ असा होय आणि त्यासाठी आवश्यक असणारे सर्व घटक म्हणजे कारण होय. कारणांच्या प्रकाराविषयी दर्शनांमध्ये वेगवेगळी मते आहेत. योगदर्शनानुसार कारणे नऊ प्रकारची असतात. व्यासभाष्यातील एका कारिकेमध्ये नऊ कारणे उद्धृत केली आहेत ती पुढीलप्रमाणे – (१) उत्पत्ती-कारण, (२) स्थिती-कारण, (३) अभिव्यक्ती-कारण, (४) विकार-कारण, (५) प्रत्यय-कारण, (६) आप्ति-कारण, (७) वियोग-कारण, (८) अन्यत्व-कारण आणि (९) धृती-कारण.

उत्पत्तिस्थित्यभिव्यक्तिविकारप्रत्ययाप्तय: |

वियोगान्यत्वधृतयः कारणं नवधा स्मृतम् || (व्यासभाष्य २.२८)

(१) उत्पत्ती-कारण : जे कारण पदार्थाला उत्पन्न करते, त्याला उत्पत्ती कारण असे म्हणतात. येथे ‘उत्पत्ति’ या शब्दाचा अर्थ ‘कार्याला नव्याने उत्पन्न करणे’ असा नसून जे कार्य कारणात सूक्ष्म रूपाने विद्यमान असते, त्यालाच प्रकट करणे असा आहे; कारण सांख्य-योग दर्शनांमध्ये सत्कार्यवादाचा सिद्धांत मानला जातो. त्यानुसार कोणत्याही वस्तूची उत्पत्ती आणि विनाश होऊ शकत नाही. मन हे ज्ञानासाठी उत्पत्ती-कारण आहे, कारण मनाद्वारेच ज्ञान उत्पन्न होते.

(२) स्थिती-कारण : पदार्थाचे अस्तित्व कायम राहण्यासाठी जे कारण आवश्यक असते, त्याला स्थिती-कारण असे म्हणतात. अन्न हे शरीराचे स्थिती-कारण आहे. अन्न हे शरीराला उत्पन्न करीत नाही, परंतु त्याचे अस्तित्व अन्नामुळेच टिकून राहते. त्यामुळे अन्न हे शरीराचे स्थिती-कारण होय.

(३) अभिव्यक्ती-कारण : एखाद्या पदार्थाला प्रकट/अभिव्यक्त करण्यासाठी ज्या कारणाची आवश्यकता असते, त्याला अभिव्यक्ती-कारण असे म्हणतात. प्रकाशामुळे वस्तूचे रूप अभिव्यक्त होते, त्यामुळे प्रकाशाला रूपाचे अभिव्यक्ती-कारण म्हणतात. अंधार असतानाही वस्तूला रूप असते, परंतु ते प्रकट होत नाही. प्रकाश असल्यावरच रूपाची अभिव्यक्ती होते.

(४) विकार-कारण : एखाद्या वस्तूमध्ये ज्या कारणामुळे परिवर्तन होते, त्या कारणाला तिचे विकार-कारण असे म्हणतात. विकार म्हणजे वस्तूच्या मूळ स्वरूपात होणारा बदल. आपण जे अन्न भक्षण करतो, त्याचे पचन होऊन अन्नाचे रस, रक्त इत्यादी रूपांमध्ये परिवर्तन होते. आयुर्वेदानुसार उदरातील वैश्वानर अग्निअन्नाचे पचन करतो. त्यामुळे वैश्वानर अग्नि हा रस-रक्त इत्यादींसाठी विकार-कारण आहे असे म्हणता येईल.

(५) प्रत्यय-कारण : जे एक ज्ञान अन्य ज्ञानाप्रति कारण असते, त्याला प्रत्यय-कारण असे म्हणतात. प्रत्यय या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. सर्वसाधारणपणे मन हे ज्ञानाचे उत्पत्ती-कारण असते, परंतु जर एक ज्ञानच अन्य ज्ञानासाठी कारण असेल, तर त्या ज्ञानाला दुसऱ्या ज्ञानाचे प्रत्यय-कारण म्हटले जाते. अनुमानाच्या प्रक्रियेमध्ये धुराचे ज्ञान झाले तर त्यापासून अग्नीचे ज्ञान होते. त्यामुळे धुराचे ज्ञान हे अग्नीच्या ज्ञानासाठी प्रत्यय-कारण आहे.

(६) आप्ति-कारण : आप्ति या शब्दाचा अर्थ ‘प्राप्ति’ असा आहे. एखादी वस्तू/शक्ती पुन्हा प्राप्त होण्यासाठी जे कारण आवश्यक असते, त्याला प्राप्ती-कारण असे म्हणतात. उताराच्या दिशेने वाहणे ही पाण्याची स्वाभाविक शक्ती आहे. पाण्याच्या प्रवाहात बंधारा बांधल्याने त्याची उताराच्या दिशेने वाहण्याची नैसर्गिक शक्ती प्रतिबंधित होते; परंतु, बंधारा काढून टाकल्यावर पाण्याला पुन्हा ती शक्ती प्राप्त होते. ज्या कारणामुळे ती शक्ती प्राप्त होते, त्याला आप्ति-कारण असे म्हणतात. योगदर्शनानुसार चित्ताचा स्वभाव सत्त्वगुणाचा आहे. त्यामुळे विवेकख्याति-रूपी श्रेष्ठ ज्ञान हे चित्तामध्ये स्वाभाविक रूपाने आहे; परंतु, अविद्या आदि अन्य क्लेश आणि रज-तम गुणांच्या प्रभावामुळे ते ज्ञान प्रकट होत नाही. अष्टांगयोगाच्या अभ्यासामुळे तमोगुणामुळे उत्पन्न झालेले ज्ञानावरील आवरण नष्ट होते व स्वाभाविक ज्ञान प्रकट होते. अशा प्रकारे विवेकख्याति-रूप ज्ञानासाठी अष्टांगयोगाचे अनुष्ठान हे आप्ति-कारण आहे.

(७) वियोग-कारण : जे कारण त्याच्या विरोधी स्वभाव असणाऱ्या वस्तूंपासून वियोग उत्पन्न करते, त्याला वियोग-कारण असे म्हणतात. अंधाऱ्या खोलीमध्ये जर व्यक्तीने दिवा घेऊन प्रवेश केला, तर त्या दिव्यामुळे खोलीतील अंधार निघून जातो. त्यामुळे दिवा हा अंधाराचे वियोग-कारण होय. अष्टांगयोगाचे आचरण केल्याने चित्तातील अशुद्धी निघून जाते, त्यामुळे योगाचरण हेही चित्तातील अशुद्धीचे वियोग कारण आहे.

(८) अन्यत्व-कारण : वस्तूचे मूळ स्वरूप तसेच ठेवून त्याच्या बाह्यरूपात परिवर्तन करणाऱ्या कारणाला अन्यत्व-कारण असे म्हणतात. सोनार सोन्यापासून हार, कुंडल इत्यादी विविध दागिने बनवितो. सुवर्णाचे ‘सुवर्णत्व’ तसेच राहते, फक्त त्याच्या बाह्य स्वरूपात आणि नावात फरक होतो. त्यामुळे सोनार हा अलंकारांसाठी ‘अन्यत्व-कारण’ आहे. विकार कारण हे वस्तूच्या मूळ स्वरूपातच परिवर्तन करते; परंतु, अन्यत्व-कारण वस्तूचे मूळ स्वरूप तसेच ठेवून त्याच्या बाह्य रूपात परिवर्तन करते.

(९) धृती-कारण : जी एक वस्तू अन्य वस्तूला धारण करते, तिला दुसऱ्या वस्तूचे धृती-कारण म्हणतात. शरीर हे इंद्रियांसाठी धृती-कारण आहे, कारण शरीराशिवाय इंद्रिये कार्य करू शकत नाहीत. स्थिती-कारण हे अन्य वस्तूशी एकरूप होऊन तिचे अस्तित्व (स्थिती) टिकविण्यासाठी उपयुक्त ठरते; परंतु धृती-कारण अन्य वस्तूपेक्षा स्वत:चे वेगळेपण टिकवून तिला धारण करण्याचे कार्य करते. अन्न हे शरीराशी एकरूप होऊन शरीराचे अस्तित्व टिकविण्याचे कार्य करते, म्हणून अन्न शरीराचे स्थिती-कारण आहे व पंचमहाभूतांनी बनलेले शरीर हे इंद्रियांपेक्षा वेगळे असूनही त्यांना धारण करते, त्यामुळे शरीर हे इंद्रियांसाठी धृती-कारण आहे.

याप्रमाणे व्यासभाष्य तथा योगसूत्रांच्या अन्य टीका ग्रंथांमध्ये या नऊ प्रकारच्या कारणांचे विवेचन केलेले आहे. न्याय आणि वैशेषिक दर्शनांमध्ये समवायि, असमवायि आणि निमित्त अशी तीन प्रकारची कारणे मानतात. वेदान्त दर्शनामध्ये उपादान आणि निमित्त अशी दोन प्रकारचे कारणे मानतात. कारणांचे प्रकार कोणते आहेत याविषयी दर्शनांमध्ये मतभेद असले तरीही ‘प्रत्येक कार्यासाठी कारण आवश्यक आहेच’ हा सामान्य सिद्धांत सर्वांनी मानलेला आहे.

पहा : योगदर्शन; योगसूत्रे; व्यासभाष्य.

                      समीक्षक : कला आचार्य