आधुनिक अर्थशास्राच्या इतिहासाचे अवलोकन केले असता विसाव्या शतकाच्या शेवटास या विषयामध्ये फार मोठे गुणात्मक बदल झाले आहे. अभिजात व नवअभिजात अर्थशास्त्रातील सिद्धांत व प्रतिमाने यांचा प्रभाव साधारणपणे विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत जाणवत असल्याचे दिसते; पण त्यावेळचे अर्थशास्त्राचे स्वरूप व उपयोजन यांच्यात काही अपूर्णता असल्याचे दिसू लागले. अर्थशास्त्र विषयाची व्याप्ती वेगाने वाढत असली, तरी त्याचे स्वरूप बरेचसे अमूर्त बनले होते. त्याचा आशय मुख्यतः विगमनात्मक (डिडक्टिव्ह) पद्धतीवर आधारित होता. त्या विचारसरणीमागील गृहिते बरीचशी अवास्तव होती. त्यामुळे त्यातून निघणारे निष्कर्ष अत्यंत मर्यादित स्वरूपाचे असल्याचे जाणवत होते. उदा., उपभोक्त्याला महत्तम समाधानाची किंवा उत्पादनसंस्थेला महत्तम नफ्याची अपेक्षा असते, असे गृहित बहुतेक सिद्धांतांमागे दडलेले होते किंवा उपभोक्त्याच्या उत्पादनसंस्थेच्या निर्णयांवर आजूबाजूच्या सामाजिक तसेच राजकीय परिस्थितीचा काही परिणाम होत नाही, असे मानले जात असे किंवा उपभोक्ते अथवा उत्पादनसंस्था यांना बाजाराची पुरेपूर व बिनचूक माहिती आहे, असेही बहुतेक वेळा गृहित धरले जात असे. अशा गृहितांमुळे या सिद्धांतांच्या केंद्रस्थानी असणारा उपभोक्ता अथवा असणारी उत्पादनसंस्था निरपवादपणे विवेकी वागणूक अंगीकारते असे मानले जात असे; पण प्रत्यक्षात असे सरळ वर्तन कधीच घडत नसते, असे अनुभवास येऊ लागले. महत्तम समाधानाची अपेक्षा बाळगणारा उपभोक्ता विमा पॉलिसी घेणे, लॉटरीची तिकिटे खरेदी करणे अशा विसंगत वाटणाऱ्या गोष्टी एकाच वेळेस करताना आढळतो. नफ्यासाठी धडपड काणाऱ्या उत्पादनसंस्था प्रत्यक्षात नफा गौण मानून इतर अनेक उद्दिष्टांसाठी झटत असतात. अशा तऱ्हेच्या संमिश्र घडामोडींचे स्पष्टीकरण अर्थशास्त्रात असावे, असा विचार प्रकर्षाने पुढे येऊ लागला. त्यासाठी अर्थशास्त्राची विचारसरणी पूर्णपणे बदलून निगमनात्मक (इनडक्टिव्ह) पद्धती वापरण्याचे प्रयत्न झाले. यामुळे अर्थशास्त्राची समर्पकता व उपयोजकता वाढली.

अर्थशास्रीय विश्लेषणात सापेक्षतेने अधिक वास्तवता आली. अर्थशास्त्राने केवळ स्पष्टीकरण आणि विश्लेषण यांच्या पुरते मर्यादित न राहता आर्थिक घडामोडींचे पूर्वानुमान मांडावे, आर्थिक धोरण कसे असावे याचे मार्गदर्शन करावे, समाजातील विविध घडामोडींमागील आर्थिक क्रियांचा वेध घ्यावा असे विविध बदल हळूहळू अर्थशास्त्रात होऊ लागले. त्यासाठी अर्थशास्त्राची इतर विद्याशाखांशी आंतरक्रिया वाढू लागली. गणित, संख्याशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, समाजशास्त्र, तत्त्वज्ञान या विद्याशाखांशी निगडित असणाऱ्या विचारांवर व समस्यांवर आता लक्ष केंद्रित होऊ लागले. याच प्रक्रियेमध्ये वर्तनवादी अर्थशास्त्र ही उपशाखा विकसित झाली. मानवी वर्तन ही एक गतिमान पण गुंतागुंतीची स्वाभाविक प्रक्रिया आहे. त्या मानवी वर्तनास केंद्रभागी मानून आर्थिक विश्लेषणाचा प्रयत्न या उपशाखेत होतो. माणसाच्या वागणुकीबद्दल काही विचारमंथन करून त्यानुसार होणारे बदल टिपत जाणे, असे तेथे केले जाते. असे बदल केवळ उपभोक्त्याच्या बाबतीत न होता उत्पादनसंस्था, व्यवस्थापक, राज्यकर्ता अशा सर्वांच्या बाबतीत होऊ शकतात. याबद्दलचे काही प्रत्यक्ष प्रयोग करीत गेल, तर त्यातून आर्थिक वागणुकीचे अधिक वास्तव व खरेखुरे स्पष्टीकरण मिळू शकेल. त्यातून काही पूर्वानुमानही मांडणे शक्य होईल, असा विचार पुढे आला. या घडामोडींची पुढची तर्कसंगत पायरी म्हणजे प्रयोगात्मक अर्थशास्त्र ही नवी उपशाखा अधिकृतपणे विकसित होत गेली. अशा प्रयोगांमधून उपभोक्ते, उत्पादनसंस्था यांच्या कृतीचे निरीक्षण-विश्लेषण करावे व त्यांतून सामान्यीकरण करावे, असे आता अर्थशास्त्राच्या या उपशाखेतून साधले जाते. आर्थिक विचार व सिद्धांतामागील अमूर्तता व अवास्तवता यामुळे दूर होऊन प्रत्यक्ष वास्तवकृतीच्या विश्लेषणापर्यंत पोचण्याचा तो एक राजमार्ग तयार झालेला आढळतो. अर्थशास्रात प्रस्थापित जे नियम आहेत, त्यांची पडताळणी अशा अर्थशास्त्रीय प्रयोगांद्वारे करता येते. एखाद्या विशिष्ट आर्थिक परिस्थितीमध्ये ग्राहकाची किंवा गुंतवणूकदाराची वागणूक कशी असते, याचा प्रत्यक्ष प्रतिसाद अशा प्रयोगांमार्फत तपासता येतो.

प्रयोगात्मक अर्थशास्त्रामुळे अर्थशास्त्राच्या अभ्यासात ग्रंथप्रामाण्यतेच्या जागी अनुभवप्रामाण्यता आणण्यात येते. अशा छोट्या-मोठ्या प्रयोगांमधून काही सर्वसाधारण धोरण विकसित करण्याच्या दिशेनेही प्रवास साधता येतो. विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट निर्णय घेतले जातात असे आढळले, तर आर्थिक वर्तणुकीचा एक निश्चित असा साचा बनतो किंवा कसे, असेही येथे कळू शकते. आर्थिक धोरण ठरविणे, भविष्यातील आर्थिक घडामोडींचा पूर्व अंदाज बांधणे यांसाठी हे प्रयोग निश्चितच उपयोगी ठरतात. असे प्रयोग मर्यादित स्वरूपामध्ये असू शकतात. उदा., रसायन प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करतात. त्याप्रमाणे काही ग्राहक/गुंतवणूकदार यांना प्रश्नावलीद्वारे प्रश्न विचारून त्यांच्या प्रतिसादावरून निष्कर्ष काढता येतो. असे प्रयोग क्षेत्रपातळीवर किंवा अधिक व्यापक पातळीवरही घेता येतात. उदा., एखाद्या औद्योगिक संस्थेने काही अटींवर स्वेच्छानिवृत्ती योजना राबवायचे ठरविले, तर त्या योजनेस प्रतिसाद कसा काय असेल, या योजनेतून अपेक्षा कशा असतील हे प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या प्रयोगातून साध्य करता येईल किंवा एखाद्या कंपनीने प्रोत्साहक वेतनपद्धती अंमलात आणण्याचे ठरविले, तर त्याबद्दलची प्रतिक्रिया कामगारांकडून थेट जाणून घेण्याचा प्रयोग करता येतो; कारण असे धोरण ठोकळेबाज अंदाजाने राबविल्यास चूक होऊ शकते. अपुरी किंवा संदिग्ध माहिती असताना किंवा व्यवहारात जोखीम असताना एखादी व्यक्ती घरेदी किंवा बचती किंवा गुंतवणुकी यांबाबत कसे काय निर्णय घेईल, हे प्रत्यक्ष प्रयोगाने माडता येईल. असे प्रयोग करीत असताना प्रयोगातील चल घटकांचे मूल्य कमी अथवा जास्त करून कार्यकारण संबंध तपासणे तसेच अशा वारंवारतेतून अशा संबंधांमागील तीव्रता/घनता तसासणे हे करता येते. अशा प्रयोगांची पुनरावृत्ती करणेही शक्य असते.

थोडक्यात, अर्थशास्राचे स्वरूप रसायनशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र इतके प्रयोगात्मक करून अर्थशास्त्रात व्यापकता, नेमकेपणा व वास्तवता आणणे शक्य आहे. क्रीडा सिद्धात, गुंतवणुकीचे सिद्धांत, निर्णयाचे मानसशास्त्र, लोकप्राशासनाची मूलतत्त्वे या विषयांना पूरक म्हणून अशा प्रयोगात्मक रितीपद्धतीचा वापर होऊ शकतो. उपयोजित अर्थशास्त्र, वर्तणुकीचे अर्थशास्त्र, निर्णय प्रक्रियेची मानसिकता विशद करणारे चेता अर्थशास्र या उपशाखांच्या बरोबरीने आता प्रयोगात्मक अर्थशास्त्र ही उपशाखा ओळखली जाऊ लागली आहे.

विसाव्या शतकाच्या शेवटास या उपशाखेचे अस्तित्व मान्य होऊ लागले. प्रसिद्ध अर्थसास्त्रज्ञ व नोबेल स्मृती पुरस्कार विजेते डॅनियल काहनेमान आणि व्हेर्नॉन लोमॅक्स स्मिथ हे प्रयोगात्मक मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. अर्थशास्त्राच्या प्रयोगामागील मानसशास्त्रीय बैठक लक्षात घेता त्या दोघांना एकत्र असा हा सन्मान मिळणे उचित होते. या पुरस्काराने अर्थशास्त्राच्या या नव्या उपशाखेच्या उपयुक्तता आणि औचित्यावर शिकामोर्तब झाले. यांव्यतिरिक्त मॉरिस ॲले, राइनहार्ट सेल्टन, जॉन नॅश, टॉमस क्राँबी शेलिंग, एलिनॉर इलिनॉर ओस्ट्रॉम इत्यादी विख्यात अर्थतज्ज्ञांच्या लिखाणात प्रयोगात्मक पद्धतीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उल्लेख दिसून येतो. प्रयोगात्मक अर्थशास्त्राचा रीतसर अभ्यास, उपयोजन, संशोधन, प्रकाशने यांसाठी आतापर्यंत २२ देशांमध्ये १३५ प्रयोगशाळा स्थापन झाल्या आहेत. इकॉनॉमिक सायन्स असोसिएशन ही संस्थाही १९८६ मध्ये अॅरिझोना (अमेरिका) येथे अधिकृतपणे स्थापन झाली आहे. ईएसए तर्फे १९९८ पासून जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल इकॉनॉमिक्स हे नियतकालिक नियमितपणे प्रसिद्ध केले जाते.

संदर्भ :

  • Econ Papers Journal, Vol. 73-No.1, 2010.
  • Jacquemet, Nicholas; L’Haridon, Oliver, Experimental Economics : Methods & Applications, Cambridge University Press, 2018.
  • Kagel, John; Roth, Alvin, The Handbook of Experimental Economics, Princeton University Press, 1995.
  • Science Direct Journal, Vol. 73-No. 1, 2010.
  • Springer Link Journal, 2012.
  • Vernon, L. Smith, Bargaining & Market Behaviour, Cambridge University Press, 2000.

समीक्षक : संतोष दास्ताने