आफ्रिका खंडाच्या पूर्वेकडील ‘द ग्रेट रिफ्ट व्हॅली’ (महाखचदरी) भागातील एक प्रसिद्ध पुरातत्त्वीय स्थळ. ‘ओल्डुपायी गॉर्ज’ या नावानेही प्रसिद्ध. हे स्थळ आफ्रिकेच्या टांझानिया देशातील आरूश प्रांतातील एन्गोराँगगोरो जिल्ह्यात असून ओल्डुवायी गॉर्ज ही अतिशय निमुळती घळई आहे. येथे आदिमानवाच्या दगडी हत्यारांसोबत मानवी उत्क्रांतीच्या सिद्धांतास निर्णायक ठरलेले पुरामानवाचे अश्मीभूत सांगाडे मिळाले. याशिवाय नामशेष झालेल्या अनेक प्राण्यांचे अवशेष आणि अश्मयुगीन हत्यारे आढळून आली.
जर्मन कीटकशास्त्रज्ञ विल्हेल्म कॅटविंकेल (१८६६-१९३५) यांना फुलपाखरांचा अभ्यास करत असताना या घळईत काही प्राण्यांचे जीवाश्म सापडले (१९११). पुढे १९१३ मध्ये जर्मन भूशास्त्रज्ञ हॅन्स रेक (१८८६-१९३७) यांनी या घळईत सर्वेक्षण सुरू केले. त्यांनी तेथे असलेल्या गाळाच्या स्तरांना ओल्डुवायी स्तर (ओल्डुवायी बेड्स) असे नामकरण करून एकूण ५ स्तरांत विभागणी केली (Bed I to V); तथापि रेकने जमा केलेले अनेक जीवाश्म पहिल्या महायुद्धात नष्ट झाली. अर्थात रेकच्या कामामुळे प्रेरित होऊन पुरामानवशास्त्रज्ञ लुई लीकी आणि मेरी लीकी या दांपत्याने १९३१ पासून येथे संशोधनाचे काम सुरू केले. १९५९ मध्ये येथे लीकी दांपत्याला येथील उत्खननात पुरामानवाचे अश्मीभूत मानवी सांगाडे मिळाले. या सांगाड्याना त्यांनी ओल्डुवायी होमिनिड्स (ओएच) असे संबोधित केले. ओएच – ५ आणि ओएच – ७ हे अश्मीभूत सांगाडे खऱ्या अर्थाने पुरामानवशास्त्राच्या सुवर्णयुगाच्या आरंभीचे साक्षीदार असून मानवी उत्क्रांतीचे प्रमुख दावेदार आहेत.
भूशास्त्रीयदृष्ट्या ओल्डुवायी गॉर्ज ही अतितीव्र उताराच्या दोन उपघळयांनी मिळून तयार झालेली आहे. साधारणपणे ४८ किमी. लांब आणि ९० मी. खोली असलेल्या या घळईच्या निमुळत्या भागात सु. ९० मी. जाडीच्या स्तरांमध्ये अग्निजन्य खडकांसह काही ज्वालामुखीय राखेचे थर मिळाले. कालमापनानुसार हे स्तर साधारणपणे २० लाख ते १५ हजार वर्षांपूर्वीचे आहेत. या स्तरांमध्ये झालेल्या अनेक उत्खननांतून ‘होमो’ वर्गातील ६० जीवाश्म सापडली आहेत. यांत प्रामुख्याने ऑस्ट्रॅलोपिथेकस, हॅबिलिस मानव, सेपियन मानव जातींचा समावेश आहे.
लीकी दांपत्याने येथे अनेक ठिकाणी केलेल्या उत्खननांतून अश्मयुगाची सुरुवात कशी झाली असावी, यासंबंधीचे ठोस पुरावे सादर केले. यात त्यांना आद्यपुराश्मयुगातील दगडी हत्यारे तयार करणाच्या पद्धतीवर आधारित ओल्डोवान आणि ॲश्युलियन या दोन परंपरा दर्शविणारे, तसेच मध्य आणि उत्तर पुराश्मयुगीन हत्यारांचे अनेक संचय वेगवेगळ्या स्तरांतून मिळाले. यावरून अश्मयुगीन दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रामध्ये कालानुरूप कसे बदल झाले, याचे एक प्रारूप विकसित करण्यात आले आहे. आफ्रिका खंडात सर्वांत प्राचीन दगडी हत्यारे बनविण्याच्या पद्धतीला ‘ओल्डोवान परंपरा’ असे संबोधण्यात येते. त्याची सुरुवात साधारणतः २६ लाख वर्षांपूर्वी झाली. या परंपरेची दगडी हत्यारे सर्वप्रथम लीकी दांपत्याने ओल्डुवायी गॉर्जमध्ये शोधली व त्यावरून ओल्डोवान हे नाव दिले गेले. ओल्डोवान दगडी हत्यार समूहामध्ये प्रामुख्याने लहान आकाराचे गाभे, तासण्या, कातड्यात किंवा लाकडात भोके पाडण्याचे साधन आणि छोटे छिलके यांचा समावेश होतो.
याशिवाय येथील अनेक ठिकाणच्या उत्खननांत विविध प्राण्यांचे अश्मीभूत हाडे खूप मोठ्या प्रमाणात मिळाली. नवीन संशोधनानुसार स्तर १ मध्ये असलेल्या १८ लाख वर्षपूर्व ज्वालामुखीय राखेत प्राण्यांच्या पायाचे ठसे सापडले आहेत. लीकी दांपत्याने ओल्डुवायी गॉर्जमध्ये अनेक स्थळांवर केलेल्या उत्खननांवर आधारित एकूण ७ स्तर (Beds) निश्चित केले. या सात स्तरांचे कालमापन खालीलप्रमाणे :
स्तर | कालखंड |
स्तर – १ | हा स्तर सर्वांत जुना असून याचे कालमापन २१ ते १७ लाख वर्षपूर्व आहे. |
स्तर – २ | कालमापनानूसार हा स्तर १७ ते ११.५ लाख वर्षांपूर्वीचा आहे. |
स्तर – ३ | हा स्तर ११.५ ते ८ लाख वर्षांपूर्वीचा आहे. |
स्तर – ४ | ८ ते ६ लाख वर्षपूर्व. |
स्तर – ५ | मासेक (Masek) स्तर – ६ ते ४ लाख वर्षपूर्व. |
स्तर – ६ | नडुटु स्तर (Ndutu)- ४ लाख ते ३२,००० वर्षपूर्व. |
स्तर – ७ | नैस्यूस्यू (Naisiusiu) स्तर – २२,००० ते १५,००० वर्षपूर्व. |
ओल्डुवायी गॉर्जमध्ये ५० हून अधिक स्थळांचे नामकरण केले आहे. या सर्व स्थळांवर उत्खननांतून मिळालेल्या अवशेषांचा, तसेच गाळाच्या स्तरांचा अभ्यास करून मिळालेल्या पुराव्यांचा सखोल अभ्यास झाला आहे. यांतील काही उल्लेखनीय स्थळे (संबंधित संशोधकाच्या नावातील आद्याक्षरांसह) खालीलप्रमाणे :
एमएनके सांगाडा (मेरी निकोल कोरोंगो; कोरोंगो – स्थानिक स्वाहिली भाषेत ‘घळ’ या अर्थाने) | हॅबिलिस मानव (ओएच -१३, ओएच -१४, ओएच – १५) |
एफएलके (फ्रिडा लीकी कोरोंगो) | ओएच – ५ पॅरान्थ्रोपस बॉइसीचे जीवाश्म (ज्यास प्रथम झिंझाथ्रोपस/झिंझ असे संबोधले होते). |
एफएलके – एनएन (नॉर्थ नॉर्थ) | ओएच – ७ हॅबिलिस मानवाचे जीवाश्म |
इवास ओल्डुपा (स्थानिक भाषेत ‘खोऱ्याचा मार्ग’ या अर्थाने) | २० लाख ते १८ लाख वर्षपूर्व आदिमानवाचे अस्तित्व |
डीके (डग्लस कोरोंगो) | येथे मेरी डग्लस (लीकी) यांनी उत्खननातून अश्मयुगीन काळातील पृष्ठभाग शोधला. कालातंराने याचे कालमापन १८ लाख वर्षपूर्व केले आहे. |
एचडब्ल्यूके-ईई [हेन्रिटा विलफ्रिडा (फ्रिडा लीकी) कोरोंगो ईस्ट ईस्ट ] | येथील उत्खननातून १७ लाख वर्षपूर्व ओल्डोवान परंपरेची दगडी हत्यारे आणि प्राण्यांचे अश्मीभूत अवशेषांचा सर्वांत मोठ्या संचयापैकी एक संचय मिळाला आहे. |
ईएफ-एचआर (व्ही. इव्हल्यून फक्स आणि हॅन्स रेक) | येथील उत्खननातून आद्य ॲश्युलियन परंपरेची दगडी हत्यारे सापडली. याचे कालमापन १४ लाख वर्षपूर्व केले आहे. |
एलएलके (लुई लीकी कोरोंगो) | ओएच – ९ एर्गास्टर मानव / इरेक्टस मानवाचे जीवाश्म |
ओल्डुवायी गॉर्जला पूर्व आफ्रिकेतील मानवजातीचे उगमस्थान (Cradle of Humankind) म्हणून ओळखले जाते. युनेस्कोने १९९९ मध्ये या स्थळाला ‘जागतिक वारसा स्थान’ म्हणून सन्मानित केले आहे.
संदर्भ :
- Leakey, L. S. B. Olduvai Gorge 1951–1961, Vol. I, ‘A Preliminary Report on the Geology and Fauna’ Eds., Butler, P. M.; Greenwood, M.; Simpson, George G.; Lavocat, R.; Ewer, R. F.; Petter, G.; Hay R. L. & Leakey, M. D., Cambridge : University Press, 1967.
- Plint, Tessa; Magill, Clayton R. ‘Large mammal tracks in 1.8-million year- old volcanic ash (Tuff IF, Bed I) at Olduvai Gorge, Tanzania’, Ichnos, Vol. 28 (2), pp.114-124, June 2021. https://doi.org/10.1080/10420940.2021.1930540
- Torre, Ignacio de la; Mora, Rafael, ‘Oldowan technological behaviour at HWK EE (Olduvai Gorge, Tanzania)’, Journal of Human Evolution, Vol. 120, pp. 236-273, July 2018.
समीक्षक : जयेंद्र जोगळेकर