‘आंतरभाषा’ म्हणजे द्वितीय भाषा किंवा नंतरची कितवीही लक्ष्यभाषा शिकत असताना, तिच्या काही अभिव्यक्तींच्या आधारे व्यक्तीने मनात तयार केलेली मर्यादित भाषिक व्यवस्था. ‘आंतरभाषा’ ही संज्ञा वेगवेगळ्या संदर्भात उपयोगात आणलेली दिसते. आज विशेषत्वाने वापरात असलेल्या ‘आंतरभाषा’ या संकल्पनेलाच ‘संक्रमण भाषा’, ‘भाषाध्ययनातील मध्यावस्था’ असे पर्यायही उपयोगात आणले गेले आहेत. मूळ इंग्रजी संज्ञा इंटरलँग्वेज (Interlanguage) ही काही वेळा एकमेकांशी आपापल्या भाषेत बोलू न शकणाऱ्या भिन्न भाषक व्यक्तींमधील कामचलाऊ संप्रेषणव्यवस्थांसाठी (पिजिन व क्रिओल प्रकारच्या भाषांसाठी) वापरली जाते. तिच्यासाठी मराठीमध्ये ‘आंतरभाषा’ किंवा ‘अंतर्भाषा’ हा पर्याय सुचविलेला दिसतो. काही वेळा अनेक निरनिराळ्या भाषांमधील भाषांतरांसाठी मध्यस्थ म्हणून वापरल्या जाणाऱ्या भाषेसाठीसुद्धा ही संज्ञा उपयोजली जाते. भिन्न घटकांमधील संबंध सूचित करताना मराठीमध्ये ‘आंतर’ हा पर्याय उपयोगात येत असल्याने ‘आंतरभाषा’ ही संज्ञा अधिक योग्य आहे.
द्वितीय भाषेच्या अध्ययनाच्या संदर्भात, लॅरी सेलिन्कर या भाषावैज्ञानिकाने इ.स. १९७२ मध्ये मांडलेला सिद्धांत म्हणून ‘आंतरभाषा’ ही संज्ञा पुढे आली. यापूर्वीच्या अभ्यासांमध्ये, विद्यार्थी द्वितीय भाषा शिकत असताना त्यात त्रुटी राहतात, हे अनुभवास येत होते. या त्रुटी म्हणजे विद्यार्थांकडून पुरेशा ज्ञानाअभावी होणाऱ्या ‘चुका’ आहेत, अधिक अध्यापन आणि सरावानंतर त्या दूर होतील, अशी धारणा होती. संबंधित दोन भाषांचे तौलनिक विश्लेषण करून त्यातून विद्यार्थ्यांना चुका टाळण्याबाबत मार्गदर्शन करणे शक्य आहे, असे मानले गेले. त्यातून अपेक्षित परिणाम मिळत नसल्यामुळे, भाषांच्या विश्लेषणाऐवजी या चुकांकडेच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे एस. पिट कॉर्डर (१९६७) यांनी नमूद केले. त्यातून या चुकांमधील नियमितता लक्षात येऊ लागली आणि सेलिन्कर यांची मांडणी पुढे आली.
विद्यार्थी द्वितीय भाषा शिकत असताना राहिलेल्या त्रुटी या ‘चुका’ नसून; विद्यार्थ्याने त्याच्या द्वितीय भाषेच्या अनुभवांमधून जाणवलेल्या नियमांनुसार केलेली अभिव्यक्ती असते. प्रथम भाषेच्या अध्ययनावेळी मानवी मेंदूत विकसित झालेली सुप्त भाषिक चौकट द्वितीय भाषेच्या अध्ययनावेळी जागृत होते. त्या आधारे द्वितीय भाषेत बोलण्या-लिहिण्याच्या काही नियमांचे सुलभीकरण/ अतिसाधारणीकरण केले जाते. त्या आधारे व्यक्ती आपल्यापुरती मर्यादित भाषिक व्यवस्था तयार करून घेऊन द्वितीय भाषेत व्यवहार करीत असते. ही मर्यादित भाषिक व्यवस्था म्हणजेच ‘आंतरभाषा’ होय. कोणतीही सर्वसाधारण व्यक्ती नवीन भाषा शिकत असताना अशीच प्रक्रिया घडते, असा हा सिद्धांत आहे.
व्यक्तिगत पातळीवरील या व्यवस्थेचे स्वरूप हे संबंधित भाषांमधील साम्यभेद, प्रथम भाषेचे कोणते नियम द्वितीय भाषेला लावले जातात (स्थानांतरित होतात), आधीच्या भाषाध्ययनाच्या पद्धती कोणत्या होत्या, द्वितीय भाषाशिक्षणाची कारणे व धोरणे कोणती आहेत, तिच्यातील संप्रेषणव्यवहाराच्या पद्धती कशा आहेत यांनुसार बदलत जाते. प्रत्येकाला गरजेची वाटणारी द्वितीय भाषेच्या वापराची क्षेत्रे आणि त्यांच्यातील भाषाशैली भिन्न असतात. त्यानुसार त्या व्यक्तीच्या आंतरभाषेची नियमव्यवस्था तयार होत असते. त्यामुळे आंतरभाषा ही व्यक्तिबोली (Idiolect) या स्वरूपाचीही असते. अर्थात तिच्यात खूप मोठ्या प्रमाणात वैविध्य आढळते.
भाषा शिकण्याच्या या प्रक्रियेत ध्वनी, व्याकरण आणि अर्थ या सर्व पातळ्यांवरील व्यवस्था शोधली जाते आणि वेगवेगळ्या टप्प्यांवर बदल होत, ती लक्ष्यभाषेच्या नियमव्यवस्थेच्या अधिक जवळ जात असते. भाषेतील बारकाव्यांची जाणीव होऊ लागली की आधीच्या गृहीत नियमांमध्ये सुधारणा होत जाते. म्हणून आंतरभाषा विकसनशील असते. मात्र सेलिन्कर यांनी याबरोबरच ‘अश्मीभवन’ (Fossilization) ही संकल्पनाही मांडलेली आहे. परभाषा शिकणाऱ्यांपैकी फार थोड्या व्यक्ती तिच्यात प्रथम भाषकांएवढे प्रावीण्य प्राप्त करतात, असे दिसले. या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांचे सहज, स्वाभाविक रीतीने येणारे भाषिक प्रतिसाद/ त्यांची उच्चारणे (वर्गातील जाणीवपूर्वक सराव वगळून) तपासली गेली. त्या वेळी अनेकांच्या आंतरभाषेत सुधारणा होण्याऐवजी, त्रुटीयुक्त नियमच स्थिरावल्याचे आढळले. जेव्हा आंतरभाषा विकसित होण्याऐवजी आधीच्याच टप्प्यावर स्थिरावते, तेव्हा तिथे ‘अश्मीभवन’ झाले; तिच्यातील चैतन्यशीलता जाऊन दगडासारखी जड अवस्था प्राप्त झाली, असे म्हटले जाते. काही अभ्यासकांनी याचा संबंध व्यक्तिगत गरजेशी जोडला आहे. व्यक्तीला निकड वाटली तर अभ्यासानंतर आंतरभाषा पुन्हा विकसित होऊ लागेल, असे म्हटले आहे.
‘आंतरभाषा’ या संकल्पनेने शिकवण्यापेक्षा शिकण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष वेधले, हे महत्त्वाचे आहे. याविषयी काही अभ्यासकांचे मतभेद असले, तरीही ‘व्यक्तिमनात तयार होणारी व्यवस्था’ आणि तिची अतिशय सापेक्ष असणारी अभिव्यक्ती यांची सिद्धासिद्धता वस्तुनिष्ठ पद्धतीने तपासणे शक्य नाही, असेही म्हटले जाते.
‘आंतरभाषा’ या संकल्पनेची अनेक अभ्यासकांनी विविध प्रकारे चिकित्सा केली आहे. समाजभाषावैज्ञानिकांना ‘आंतरभाषे’तील विविधतेचा शोध घ्यावासा वाटला. सामाजिक संदर्भ, लक्ष्यभाषेविषयीची व्यक्तीची भूमिका, श्रोत्याशी असणाऱ्या नात्यानुसार बदलणारी अभिव्यक्तीची गरज आणि धोरणे (learner strategies) अशा वेगवेगळ्या घटकांच्या संदर्भात संशोधन झालेले आहे. त्याचप्रमाणे नोम चॉम्स्की यांच्या, भाषासंपादनाचा संबंध मानवी मेंदूच्या वैशिष्ट्यपूर्ण अंगभूत सुप्त क्षमतांशी जोडणाऱ्या आणि त्यामुळे सर्वच भाषांच्या अंत:स्तरीय रचनेत साम्य पाहणाऱ्या भूमिकेचाही प्रभाव पुष्कळांवर दिसतो. त्यांचा भर या आंतरभाषांमधील पद्धतशीरपणा, नियमितता (Systematicity) शोधण्यावर आहे. अन्य भाषांप्रमाणेच आंतरभाषांमध्येही वैश्विक व्याकरणाचा शोध त्यातून घेतला गेला आहे.
भाषाशिक्षण, मनोभाषाविज्ञान, समाजभाषाविज्ञान अशा विविध आंतरविद्याशाखीय ज्ञानक्षेत्रात ‘आंतरभाषा’ ही संकल्पना लक्षवेधक, संशोधनास प्रेरक ठरली आहे.
संदर्भ :
- मालशे, मिलिंद, ‘आधुनिक भाषाविज्ञान: सिद्धांत आणि उपयोजन’, लोकवाङ्मय गृह, मुंबई, १९९५.
- Yule, George, The study of language, Cambridge University Press, 1996.
समीक्षक : सोनल कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.