मानवी संस्कृतीच्या मूल्यमापनाचे धर्म आणि तत्त्वज्ञान हे मुलभूत घटक होत. मानवी संस्कृतीचा उदय, विकास आणि लय यांची सप्रमाण सिद्धता या घटकांच्या अनुषंगाने आपण करीत असतो. धर्माच्या मुलभूत संकल्पनेला धर्मापासून निर्माण झालेले पंथ, संप्रदाय, विचारप्रवर्तक, आधारभूत ग्रंथ इ. अधिक प्रकाशित करीत असतात. कोणत्याही धर्माच्या उगमामागील सामाजिक आणि सांस्कृतिक जडण घडण, त्याच्या प्रचारामागील आर्थिक व राजकीय कारणे, धर्मा-धर्मांतील, पंथा-पंथातील वैचारिक संघर्ष आणि संघर्षातूननिर्माण झालेले तत्त्वज्ञान या मुद्द्यांचा विचार करणे आवश्यक ठरते. धर्मांचा विचार करीत असताना प्रामुख्याने जगात मान्य असलेले जागतिक धर्म, विशिष्ट प्रदेशापुरते मर्यादित असलेले प्रादेशिक धर्म आणि त्याचप्रमाणे नव्याने उत्पन्न झालेल्या धार्मिक चळवळी व संप्रदाय आदींचा अंतर्भाव या ज्ञानमंडळात प्रामुख्याने केलेला आहे.
भारतीयेतर देशांमध्ये भारतीय धर्मांचे स्वरूप काहीसे बदललेले दिसते. प्रादेशिक धर्मांमध्ये विशेषत: पूर्वप्रचलित धर्म व नवीन धर्म संस्थापक या सर्व बाबींचा प्रभाव पडून धर्माची जडण-घडण होताना दिसते. याचाविचार विशिष्ट धर्माचा इतिहास या विभागाच्या अंतर्गत करण्यात आलेला आहे. धर्मातील तत्त्वांची तर्कसंगत उकल करण्याच्या दृष्टीने तत्त्वज्ञानाचा विकास झालेला दिसतो. महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांच्या चरित्रविषयक नोंदी, त्यांनी मांडलेले महत्त्वाचे सिद्धांत व संकल्पना यांचा समावेश या ज्ञानमंडळात केला गेला आहे. विविध धर्मांचा उगम व विकास, रूढी व परंपरा, समजुती, कर्मकांडात्मक विधी-निषेध, सण-ऊत्सव, प्रार्थना/स्तुती/मंत्र, धर्म संस्थापक आणि धार्मिक संस्था, प्रमुख ग्रंथ आणि ग्रंथकार, दैवतशास्त्र, पुराकथा, प्रमुख तत्त्वज्ञ आणि त्यांचे तत्त्वज्ञान आणि महत्त्वपूर्ण संकल्पना अशा विविध अंगांनी “धर्म आणि तत्त्वज्ञान” या ज्ञानशाखेचा अभ्यास केलेला आहे.
सृष्ट्युत्पत्तीशास्त्र, आधिभौतिकशास्त्र, पारलौकिकशास्त्र, परमतत्त्वाचे स्वरूप, विश्वाची सत्यासत्यता, मोक्ष, प्रमाणशास्त्र, मरणोत्तरशास्त्र, तर्कशास्त्र इत्यादी गोष्टींचा विचार अधिक समर्पकपणे वाचकांस आत्मसात होईल अशा सुलभ आणि सोप्या भाषेत लघु, मध्यम आणि दीर्घ नोंदींच्या स्वरूपात या ज्ञानमंडळाच्या माध्यमातून केलेला आहे.