सर्व सजीवांचे संरचनात्मक, कार्यात्मक आणि जैविक एकक. सर्व सजीव पेशींचे बनलेले असून प्रत्येक पेशी स्वयंपूर्ण असते. सर्व पेशींमध्ये पेशीद्रव्य असून ते पेशीपटलाने वेढलेले असते आणि पेशीद्रव्यात प्रथिने, न्यूक्लिइक आम्ले यांसारखे जैवरेणू असतात. त्यांचा आकार १–१०० मायक्रोमीटर (१०–६) यांच्या दरम्यान असतो. पेशी सूक्ष्मदर्शीखाली पाहता येतात. सजीवांमध्ये असलेल्या पेशींच्या संख्येनुसार त्यांचे एकपेशीय (उदा.,जीवाणू) आणि बहुपेशीय (उदा., वनस्पती, प्राणी इ.) असे वर्गीकरण केले जाते. वनस्पती, प्राणी यांच्या जातींनुसार पेशींची संख्या वेगवेगळी असते. मानवाच्या शरीरात सु. १० लाख कोटी पेशी असतात.
रॉबर्ट हूक या वैज्ञानिकाने १६६५ मध्ये बुचाचा पातळ काप सूक्ष्मदर्शीखाली पाहिला, तेव्हा त्याला कापामध्ये सूक्ष्म कप्पे दिसले. या कप्प्यांना त्यानेच ‘सेल’ अर्थात ‘पेशी’ असे नाव दिले. ओक वृक्षाच्या खोडापासून बुच तयार करतात. हूक यांनी पाहिलेल्या बुचाच्या कापातील कप्पे म्हणजेच ओक वृक्षाच्या खोडाच्या पेशी होत्या. १८३९ मध्ये श्नायडेन आणि श्वान या वैज्ञानिकांनी सिद्धांत मांडला की सर्व सजीव पेशींचे बनलेले असतात, सर्व सजीवांमध्ये पेशी या सजीवांच्या संरचनेचे आणि कार्याचे एकक असतात आणि नवीन पेशी आधी अस्तित्वात असलेल्या पेशींपासून निर्माण होतात.
सर्व पेशींमध्ये काही समान गुणधर्म दिसून येतात. उदा., पेशी श्वसन करते, पेशीला अन्न लागते, पेशी अपशिष्टे उत्सर्जित करते, पेशीची वाढ होते आणि पेशी मृत होते. पेशीच्या पृष्ठभागामधून पोषक घटक, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड इत्यादींची देवाणघेवाण होते.
एकाच सृष्टीतील सजीवांच्या आकारमानात फरक असला तरी त्यांच्या पेशींचे आकारमान सारखेच असते. जसे, हत्ती आणि उंदीर यांच्या शरीराच्या आकारमानात फरक असतो. कारण हत्तीच्या शरीरातील पेशींची संख्या उंदराच्या शरीरातील पेशींच्या संख्येपेक्षा जास्त असते. तसेच हत्तीचे यकृत उंदराच्या यकृतापेक्षा मोठे असते कारण हत्तीच्या यकृतातील पेशींची संख्या उंदराच्या यकृतातील पेशींपेक्षा जास्त असते. पेशीचे आकारमान एका मर्यादेपलिकडे वाढत नाही. याचे कारण जसे पेशीचे आकारमान वाढते, तसे पेशीचे पृष्ठफळ आणि आकारमान यांचे गुणोत्तर कमी होते. पेशीचे पृष्ठफळ आणि आकारमान यांचे गुणोत्तर जास्त असणे पेशीच्या कार्यासाठी आवश्यक असते. कारण पेशीला पृष्ठभागाद्वारे पोषक घटक मिळतात, ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड यांची देवाणघेवाण होते आणि अपशिष्टे बाहेर टाकली जातात.
पेशींचे आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्यकेंद्रकी पेशी असे दोन प्रकार असतात. आदिकेंद्रकी पेशींमध्ये केंद्रक नसते, तर दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये केंद्रक असते.
आदिकेंद्रकी पेशी : मोनेरा सृष्टीतील सजीवांमध्ये म्हणजेच जीवाणूंमध्ये आदिकेंद्रकी पेशी आढळतात. पृथ्वीवर पहिल्यांदा आदिकेंद्रकी सजीव उत्पन्न झाले. आदिकेंद्रकी पेशी दृश्यकेंद्रकी पेशींपेक्षा लहान असून त्यांची लांबी ०.५—२० मायक्रोमीटर (१०–६) असते. आदिकेंद्रकी पेशींमध्ये केंद्रक पटलबद्ध नसून केंद्रकासारखा केंद्रप्रदेश असतो. त्याला आभासी केंद्रक किंवा केंद्रकाभ (न्यूक्लिऑइड) म्हणतात; त्यामध्ये डीएनए रेणूच्या स्वरूपात जनुकीय माहिती असते. पेशीद्रव्यामध्ये फक्त रायबोसोम असून त्याद्वारे प्रथिननिर्मिती होते. आदिकेंद्रकी पेशींचे विभाजन द्विखंडन पद्धतीने होते. या पेशीचे पेशीपटल आणि पेशीद्रव्य असे मुख्य भाग असतात.
पेशीपटल : आदिकेंद्रकी पेशींभोवती पेशीपटलाचे आवरण असते. या आवरणाबाहेर पेशीभित्तिका असते. काही जीवाणूंमध्ये पेशीभित्तिकेबाहेर संपुटिका (कॅप्सूल) असते. या आवरणांमुळे पेशीला आकार प्राप्त होतो आणि पेशीचे संरक्षण होते.
पेशीद्रव्य : पेशीद्रव्यामध्ये डीएनएपासून बनलेली गुणसूत्रे व काही डीएनएचे तुकडे स्वतंत्रपणे असतात. तसेच पेशीद्रव्यामध्ये ग्लायकॉलिसिस आणि प्रथिननिर्मिती या प्रक्रियांसाठी लागणारी विकरे असतात.
आदिकेंद्रकी पेशीपटलाबाहेर कशाभिका आलेली असून ती फ्लॅजेलिन या प्रथिनापासून बनलेली असते. कशाभिकेचा उपयोग पेशीची हालचाल आणि संवेदन याकरिता होतो. सर्व आदिकेंद्रकी पेशींमध्ये कशाभिकाखेरीज अनेक सूक्ष्म आकाराच्या झलरिका (पिलाय) असतात. त्यांचा उपयोग हालचालीसाठी आणि प्रजननाच्या वेळी पेशीसंपर्कासाठी केला जातो.
दृश्यकेंद्रकी पेशी : प्रोटिस्टा सृष्टी, कवक सृष्टी, वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी यांतील सजीव दृश्यकेंद्रकी पेशींचे बनलेले असतात. दृश्यकेंद्रकी पेशींचे केंद्रक़ पटलबद्ध असते आणि ते सूक्ष्मदर्शीखाली ठळकपणे दिसते. म्हणून त्यांना ‘दृश्यकेंद्रकी पेशी’ म्हणतात. या पेशींची लांबी १०—१०० मायक्रोमीटर (१०–६) असते. दृश्यकेंद्रकी पेशी आदिकेंद्रकी पेशींपेक्षा १५ पट रुंद असून आकारमानाने सु. १००० पट मोठ्या असतात. या पेशींचे पेशीपटल आणि पेशीद्रव्य असे भाग असतात.
पेशीपटल : दृश्यकेंद्रकी पेशींचे पेशीपटल आदिकेंद्रकी पेशींच्या पटलासारखेच असते. प्रोटिस्टा सृष्टीतील आदिजीवांमध्ये आणि प्राणिसृष्टीतील सजीवांच्या पेशींमध्ये फक्त पेशीपटल असते, परंतु पेशीभित्तिका नसते. प्रोटिस्टा सृष्टीतील लाल शैवाल व हरित शैवाल, कवकसृष्टी आणि वनस्पतिसृष्टी यांतील सजीवांच्या पेशीपटलावर पेशीभित्तिका असते. अनेक दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये कशाभिका किंवा पक्ष्माभिका असून त्यांचा उपयोग हालचालीसाठी आणि तापमान बदल, रासायनिक बदल स्पर्श यांच्या संवेदनासाठी होतो.
पेशीद्रव्य : दृश्यकेंद्रकी पेशींच्या पेशीद्रव्यामध्ये पेशीकेंद्रक आणि पेशीअंगके असतात. पेशीकेंद्रकाभोवती दुहेरी आवरण असून त्यात डीएनएचे रेणू गुणसूत्रांच्या स्वरूपात असतात. पेशीद्रव्यात आंतरद्रव्य जालिका, रायबोसोम, गॉल्जी यंत्रणा, तंतुकणिका, रिक्तिका, लयकारिका, पेरॉक्सिकाय, तारककेंद्र, सूक्ष्मनलिका, हरितलवके इ. पेशीअंगके असतात.
पेशींतर्गत घटक: एकूणच आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्यकेंद्रकी पेशी या पेशींच्या आतील आणि पेशीबाहेरील घटकांचा येथे विचार केला आहे. या दोन्ही पेशींमध्ये त्यांच्या घटकांच्या बाबतीत असलेले फरक प्रत्येक घटकाची माहिती देताना नोंदलेले आहेत.
पेशीपटल : हे जैविक पटल पेशीतील पेशीद्रव्याला वेढून ठेवते. प्राण्यांमध्ये, पेशीपटल हेच पेशीचे बाह्य आवरण असते, तर वनस्पती पेशी व आदिकेंद्रकी पेशी यांच्यात पेशीपटलाभोवती पेशीभित्तिका असते. सामान्यपणे पेशीपटल फॉस्फोलिपिडांच्या दुहेरी स्तराने बनलेले असते आणि त्याद्वारे पेशी आजूबाजूच्या पर्यावरणापासून स्वतंत्र राहते आणि तिचे संरक्षण होते. पेशीपटलात प्रथिनांचे वेगवेगळे रेणू असतात, आणि ते पेशींमध्ये वेगवेगळे रेणू आत येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी वाहिकेप्रमाणे आणि पंपाप्रमाणे कार्य करतात. पेशीपटल हे अर्धपार्य किंवा निवडक पदार्थांसाठी पार्य असते, म्हणजे ते एखादा पदार्थ (रेणू किंवा आयन) आरपार जाऊ देतात, मर्यादित प्रमाणात जाऊ देतात किंवा अडवतात. पेशीपटलावर काही ग्राही प्रथिने असतात, ज्यांच्यामुळे संप्रेरकासारखे बाहेरील संकेत आणणारे रेणू ओळखले जातात.
पेशीकंकाल : आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी, दोन्ही पेशींमध्ये, पेशींचा आकार नियमित ठेवणे, पेशीअंगके जागच्या जागी ठेवणे, पेशीबाह्य घटक शिरल्यास पेशीय भक्षणात मदत करणे, पेशीविभाजनानंतर पेशी अलग होणे आणि पेशींची वाढ व हालचाल करणे, यासाठी पेशीकंकाल उपयुक्त ठरतो. दृश्यकेंद्रकी पेशींचा पेशीकंकाल लघुतंतू किंवा सूक्ष्मतंतू, मध्यतंतू आणि सूक्ष्मनलिका यांनी बनलेला असतो. या घटकांशी मोठ्या प्रमाणात प्रथिने जुळलेली असतात आणि पेशीतील घटक एकत्रित ठेवणे, तंतू एका रेषेत तसेच एका दिशेत ठेवणे इत्यादी कामे प्रथिने करतात. सूक्ष्मतंतूमध्ये ॲक्टिन नावाचे प्रथिन असते, तर सूक्ष्मनलिकांमध्ये ट्युब्युलिन नावाचे प्रथिन असते, मध्यतंतूमध्ये एकापेक्षा अधिक प्रथिने असतात.
जनुकीय द्रव्य : दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये दोन प्रकारची जनुकीय द्रव्ये, डीएनए आणि आरएनए, असतात. सजीवासंबंधीची जैविक माहिती डीएनए अनुक्रमाच्या स्वरूपात सांकेतिक रूपात साठलेली असते. आरएनए चा वापर माहितीचे वहन होण्यासाठी (एम-आरएनए), विकरांच्या कार्यांसाठी (आर-आरएनए), तसेच प्रथिननिर्मितीत ॲमिनो आम्ले एकत्र येण्यासाठी (टी-आरएनए) केला जातो. (पहा कु. वि. भाग २: न्यूक्लिक आम्ले)
आदिकेंद्रकी पेशींमध्ये जनुकीय द्रव्य पेशीद्रव्यात एका ठिकाणी असते. त्याला केंद्रकाभ म्हणतात. दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये जनुकीय द्रव्य विभागलेले असून ते केंद्रकातील गुणसूत्रांमध्ये आणि काही थोड्या प्रमाणात तंतुकणिका आणि हरितलवके यांच्यात असते.
मानवी पेशींतील, जनुकीय द्रव्य पेशीकेंद्रक आणि तंतुकणिका यांत असते. मानवी जीनोम ४६ गुणसूत्रांमध्ये विभागलेला असतो. त्यांपैकी २२ जोड्या समजात गुणसूत्रांच्या असतात, तर १ जोडी लिंग गुणसूत्राची असते. तंतुकणिकांतील गुणसूत्रे आकाराने वाटोळी असून केंद्रकातील गुणसूत्रांपेक्षा वेगळी असतात. ती मुख्यत: ऊर्जानिर्मितीसाठी आणि टी-आरएनए यांच्या कार्यात सहभागी होतात.
पेशीअंगके: मानवी शरीरात जसे प्रत्येक इंद्रिय विशिष्ट कार्य करते, तसे पेशीअंगके एक किंवा अधिक कार्ये करतात. पेशींमध्ये अनेक प्रकारची अंगके असतात; काही पेशीअंगके जसे, पेशीकेंद्रक, गॉल्जी यंत्रणा इत्यादी संख्येने एकच असतात, तर तंतुकणिका, हरितलवके, पेरॉक्सिकाय, लयकारिका यांसारखी पेशीअंगके संख्येने अधिक असतात. पेशींमध्ये जिलेटिनसारखा पेशीद्राव असून त्यात पेशीअंगके तरंगत असतात. आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्यकेंद्रकी पेशी, या दोन्ही पेशींमध्ये पेशीअंगके असतात, परंतु आदिकेंद्रकी पेशीतील पेशीअंगके पटलबद्ध नसतात.
दृश्यकेंद्रकी पेशींतील पेशीअंगके:
केंद्रक : हे एखाद्या नियंत्रण कक्षाप्रमाणे पेशीतील सर्व क्रिया नियमित करते. केंद्रकाभोवती असलेल्या पटलामुळे केंद्रक पेशीद्रव्यापासून वेगळे असते. केंद्रकात असलेल्या द्रवाला केंद्रकीय द्रव म्हणतात. यातील घटक पेशीद्रवापेक्षा वेगळे असतात. केंद्रकात गुणसूत्रे आणि केंद्रकी असते. गुणसूत्रे ही धाग्यांसारखी, क्रोमॅटिनपासून तयार झालेली सूक्ष्म संरचना असते. प्रत्येक गुणसूत्रात डीएनए रेणू आणि हिस्टोन हे प्रथिन असते. गुणसूत्राद्वारे आनुवंशिक लक्षणे एका पिढीतून पुढल्या पिढीत संक्रमित होतात. गुणसूत्रातील डीएनएच्या विशिष्ट लांबीच्या तुकड्यांना जनुके म्हणतात. पेशीतील डीएनए क्रोमॅटिनच्या स्वरूपात असल्याने गुणसूत्रे सूक्ष्मदर्शीखाली दिसत नाहीत; पेशीविभाजन होताना रंजकद्रव्याचा वापर केल्यास गुणसूत्रे सूक्ष्मदर्शीखाली दिसू शकतात (पहा: गुणसूत्रे). केंद्रकीमध्ये रायबोसोम, आरएनए आणि प्रथिने असतात. रायबोसोम केंद्रकीत तयार होतात. आदिकेंद्रकी पेशींमध्ये, जनुकीय प्रक्रिया किंवा डीएनए प्रक्रिया पेशीद्रव्यात घडतात.
तंतुकणिका आणि हरितलवके: तंतुकणिका हे पेशींचे ऊर्जानिर्मिती केंद्र आहे. पेशीतील तंतुकणिकांची संख्या १०० ते १०,००० असू शकते. तंतुकणिकेभोवती दोन स्तरांचे पटल असते. बाहेरील स्तर गोलाकार असून आतील स्तर वळ्यावळ्यांचा (संवलित) असतो. तंतुकणिकेतील डीएनए केंद्रकातील डीएनएपेक्षा वेगळे असते. पेशीतील तंतुकणिका फक्त स्त्री-युग्मकाकडून आलेल्या असतात. तंतुकणिकांमध्ये असलेल्या विकरांमार्फत पेशीद्रव्यात विनॉक्सिश्वसन क्रियेत (ग्लायकॉलिसीस) तयार झालेल्या पायरूव्हिक आम्लाचे विघटन होते. या क्रियेला ऑक्सिडीकारक फॉस्फॉरिलेशन (क्रेब्ज चक्र) म्हणतात. या क्रियेत कार्बन डायऑक्साइड व पाणी तयार होते आणि ऊर्जा मुक्त होते. मुक्त झालेली ऊर्जा एटीपीच्या स्वरूपात साठवली जाते. तंतुकणिका या आदिकेंद्रकी पेशींप्रमाणे द्विखंडन पद्धतीने गुणित होतात.
हरितलवके फक्त वनस्पती पेशींमध्ये असतात आणि ती प्रकाशसंश्लेषणाची मुख्य केंद्रे असतात (पहा: प्रकाशसंश्लेषण).
आंतरद्रव्य जालिका : एकपदरी पटलाने बनलेली ही जालिका पेशीत तयार झालेले पदार्थ विवक्षित ठिकाणी वाहून नेते. या जालिकेचे कणीदार आणि नितळ असे दोन प्रकार असतात; कणीदार जालिकेवर रायबोसोम असतात. रायबोसोममध्ये तयार झालेली प्रथिने आंतरद्रव्य जालिकेमधून पेशीद्रव्यात सोडली जातात. नितळ आंतरद्रव्य जालिकेतून कॅल्शियमचे आयन वाहून नेले जातात.
गॉल्जी यंत्रणा : ही यंत्रणा केंद्रकाजवळ असून एकपदरी पटलाने बनलेली असते. याची माहिती गॉल्जी या वैज्ञानिकाने करून दिली. एकावर एक रचलेल्या बशांच्या चळतीप्रमाणे ही यंत्रणा असते. पेशीमध्ये तयार झालेली प्रथिने एकत्र करणे, त्यांना आच्छादणे आणि पुटिकेच्या स्वरूपात पेशीबाहेर टाकणे, ही गॉल्जी यंत्रणेची कार्ये असतात.
लयकारिका : लयकारिका गोलाकार असतात. त्यांत असलेल्या पाचक विकरांद्वारे त्या अतिरिक्त किंवा झिजलेल्या पेशीअंगकांचे विघटन करतात, तसेच जीवाणू आणि विषाणू यांचे भक्षण करतात.
पेरॉक्सिकाय : ही पेशीअंगके पटलबद्ध असून त्यात विकरे असून त्यांद्वारे शरीरात निर्माण झालेले विषारी घटक निष्क्रिय केले जातात.
तारककाय : बहुतांशी पेशींमध्ये केंद्रकाजवळ तारककाय हे अंगक असते. यात दोन तारककेंद्रे असतात. पेशीविभाजन होताना ही तारककेंद्रे अलग होतात आणि तर्कुतंतू तयार होण्यासाठी मदत करतात.
रिक्तिका : रिक्तिका या पटलबद्ध असून अपशिष्टे वेगळी करतात. अमीबासारख्या एकपेशीय प्राण्यात संकोची रिक्तिका असतात, त्या पंपाप्रमाणे कार्य करतात आणि पाणी खूप वाढल्यास पेशीतून पाणी बाहेर टाकतात. वनस्पती पेशी आणि कवक पेशी यांच्या रिक्तिका प्राणी पेशीतील रिक्तिकांपेक्षा आकाराने मोठ्या असतात. वनस्पतींतील रिक्तिका पाणी साठवून ठेवतात.
रायबोसोम : रायबोसोम ही दोन्ही पेशींच्या पेशीकेंद्रकात आणि पेशीद्रव्यात सूक्ष्म कणांच्या स्वरूपात पेशीद्रव्यात मुक्तपणे तरंगत असतात किंवा आंतरद्रव्य जालिकेला चिकटलेले असतात. प्रथिननिर्मितीत रायबोसोम महत्त्वाची भूमिका बजावतात.
पेशीपटलबाह्य घटक
अनेक पेशींच्या पेशीपटलाबाहेर काही संरचना असतात. त्यांच्यात अर्धपार्यपटल नसल्याने बाह्य पर्यावरणापासून त्या सुरक्षित नसतात. तसेच त्यांची बांधणी होण्यासाठी त्यांच्यातील घटक पेशींच्या आत शिरलेले असतात.
पेशीभित्तिका : अनेक प्रकारच्या आदिकेंद्रकी तसेच दृश्यकेंद्रकी पेशींमध्ये पेशीभित्तिका असते. पेशीचे तिच्या पर्यावरणापासून, यांत्रिक धक्क्यापासून, रासायनिक घटकांपासून बचाव करणे आणि पेशीपटल वेढून टाकणे, हे पेशीभित्तिकेचे कार्य असते. वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींमध्ये पेशीभित्तिका वेगवेगळ्या पदार्थांची बनलेली असते; वनस्पती पेशींची पेशीभित्तिका सेल्युलोजपासून, कवकांची पेशीभित्तिका कायटीनपासून, तर जीवाणूंची पेशीभित्तिका पेप्टिडोग्लायकॉनपासून बनलेली असते.
आदिकेंद्रकी पेशीमध्ये पेशीपटल आणि पेशीभित्तिका यांना वेढणारी जिलेटिनयुक्त संपुटिका असते. न्यूमोकोकाय, मेनिंगोकोकाय जातीच्या जीवाणूंमध्ये ही संपुटिका पॉलिसॅकराइड, बॅसिलस ॲथ्रासिस जीवाणूंमध्ये पॉलिपेप्टाइड किंवा स्ट्रेप्टोकोकाय जीवाणूंमध्ये हायलूरॉनिक आम्ल यांची बनलेली असते.
कशाभिका : या इंद्रियांद्वारे पेशींची हालचाल होते. कशाभिका लांब व धाग्यांसारख्या असून प्रथिनांनी बनलेल्या असतात. जीवाणूंची कशाभिका पेशीद्रव्यापासून उद्भवून पेशीपटल आणि पेशीभित्तिका यांच्या बाहेर आलेली असते. दृश्यकेंद्रकी पेशींच्या कशाभिका वेगळ्या प्रकारच्या असतात.
झलरीका : यांना ‘रोम’ असेही म्हणतात. ते आखूड, पातळ आणि केसांसारखे असून जीवाणूंच्या पृष्ठभागावर असतात. त्यांद्वारे जीवाणू आश्रयीला पकडून राहतात.
पेशीप्रक्रिया
प्रतिकरण : पेशीविभाजन होते तेव्हा दोन जन्य पेशी तयार होतात. पेशीविभाजनामुळे बहुपेशीय सजीवांची वाढ होते, तर एकपेशीय सजीवांचे प्रजोत्पादन घडून येते. आदिकेंद्रकी पेशींचे विभाजन द्विखंडन पद्धतीने होते, तर दृश्यकेंद्रकी पेशींचे विभाजन सूत्रीविभाजन पद्धतीने होऊन शेवटी पेशीद्रव्य विभागले जाते व पेशीविभाजन होते. एखादी द्विगुणित पेशीचे अर्धसूत्री विभाजन होऊन चार एकगुणित पेशी तयार होऊ शकतात. बहुपेशीय सजीवांमध्ये अशा एकगुणित पेशींना युग्मक पेशी म्हणतात आणि त्यांच्या मिलनाने नवीन द्विगुणित पेशी तयार होतात. डीएनए प्रतिकरण किंवा डीएनए प्रतिकृती तेव्हाच तयार होते, जेव्हा पेशीविभाजन सूत्री विभाजनाने किंवा द्विखंडन पद्धतीने होते.
अर्धसूत्री विभाजन होताना पेशीविभाजन दोनदा होते, डीएनएचे प्रतिकरण केवळ एकदाच होते. हे डीएनए प्रतिकरण अर्धसूत्री विभाजन (Ⅰ) होण्यापूर्वी होते. अर्धसूत्री विभाजन (ⅠⅠ) होताना, जेव्हा पेशीविभाजन दुसऱ्यांदा होते तेव्हा मात्र डीएनए प्रतिकरण होत नाही. डीएनए प्रतिकरणासाठीही प्रथिनांची गरज असते.
वाढ आणि चयापचय : पेशींमध्ये चयापचयाची कार्ये घडून येत असतात. या प्रक्रियेत, प्रत्येक पेशीमध्ये पोषक घटकांवर प्रक्रिया घडून येतात. अपचय क्रियेत, पेशीद्वारे जटिल रेणूंचे तुकडे सरल रेणूंमध्ये होऊन ऊर्जा उत्पन्न होते आणि चय किंवा उपचय क्रियेत, पेशीद्वारे जटिल रेणू तयार होतात आणि अन्य जैविक कार्ये होतात. जसे, सजीवाने सेवन केलेल्या जटिल शर्करेचे रूपांतर ग्लुकोज या एक शर्करेत करता येते. पेशीत शिरल्यानंतर, ग्लुकोजचे अपघटन होऊन एटीपीचे रेणू तयार होतात, त्यांच्यात ऊर्जा साठलेली असते आणि ती शरीरक्रियांसाठी वापरता येते.
प्रथिननिर्मिती : पेशींमध्ये नवीन प्रथिने तयार करण्याची क्षमता असते, जी पेशींतील क्रियांचे नियमन होण्यासाठी आवश्यक असते. या प्रक्रियेत डीएनए किंवा आरएनए रेणूत साठलेल्या सांकेतिक माहितीनुसार ॲमिनो आम्ले जुळली जाऊन प्रथिने तयार होतात (पहा : प्रथिने → प्रथिननिर्मिती).
हालचाल : एकपेशीय सजीव अन्न शोधण्यासाठी किंवा भक्षकापासून सुटका करण्यासाठी हालचाल करतात. त्यासाठी ते कशाभिकेचा वापर करतात. बहुपेशीय सजीवांमध्ये जखम बरी होण्यासाठी, शरीरबाह्य रोगकारकांचा प्रतिकार करण्यासाठी, कर्करोगासारख्या रोगाचा प्रसार टाळण्यासाठी पेशी एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. उदा., जखमेच्या भागात सूक्ष्मजीवांमुळे संसर्ग रोखण्यासाठी व जखम बरी होण्यासाठी, तेथे पांढऱ्या पेशी जमा होतात. पेशींच्या हालचालींसाठी अनेक प्रथिनांची जसे ग्राही, गुच्छकिरण, बांधणी, आसंजन, प्रेरक इत्यादींची गरज असते.
बहुपेशीय सजीवांमध्ये, पेशी त्यांच्या कार्यानुसार अनुकूलित झालेल्या असतात आणि त्यानुसार पेशींना नावे असतात. उदा., सस्तन प्राण्यांमध्ये पेशींचे त्वचा पेशी, स्नायू पेशी, चेतापेशी, रक्तपेशी, मूलपेशी, तंतुजनकपेशी (फायब्रोब्लास्ट) इत्यादी प्रकार असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींचे स्वरूप आणि कार्य वेगवेगळे असले तरी, जनुकीयदृष्ट्या त्या पेशी समरूप किंवा सारख्या असतात. बहुतेक भिन्न प्रकारच्या पेशी एकाच पूर्णक्षम पेशीपासून म्हणजे युग्मनजापासून (विभेदनापूर्वी असलेले फलित अंड) उद्भवतात, जिचा विकास होत असताना विभेदन घडून आल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या शेकडो पेशी तयार होतात.