पुरातत्त्वीय अवशेषांचा अन्वयार्थ लावण्याची एक पद्धती. चार्ल्स डार्विन (१८०९—१८८२) या निसर्गशास्त्रज्ञांनी सुचवलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताने जीवविज्ञानाखेरीज सामाजिक विज्ञानाच्या अनेक ज्ञानशाखांवर मोठा प्रभाव टाकला. पुरातत्त्वविद्याही त्याला अपवाद नाही. मानवी संस्कृतीच्या अभ्यासात उत्क्रांतीच्या सिद्धांतातील तत्त्वांचा वापर करून प्राचीन मानवी वर्तनासंबंधी निष्कर्ष काढणे या दृष्टीकोनांना उत्क्रांतिवादी पुरातत्त्व असे म्हणतात. म्हणजेच ही पुरातत्त्वाची वेगळी आणि एकसंध शाखा नसून पुरातत्त्वीय अवशेषांचा अन्वयार्थ लावण्यासाठीची त्या उत्क्रांतिवादावर आधारलेल्या अनेक सैद्धांतिक मांडण्या आहेत. अशा मांडण्यांसाठी प्रामुख्याने डार्विन यांच्या सिद्धांताचा वापर केला जात असल्याने या सर्व दृष्टीकोनांना डार्विनवादी पुरातत्त्व असेही म्हटले जाते. सांस्कृतिक स्थिरता आणि संस्कृतीमध्ये होणारा बदल यांसंबंधीच्या प्रक्रिया जैविक उत्क्रांतीप्रमाणेच असतात हा विचार उत्क्रांतिवादी पुरातत्त्वाचा मुख्य गाभा आहे. सजीवांमध्ये समूहाच्या पातळीवर जनुकांमधील वारंवारतेत बदल घडून उत्क्रांती होते. त्याचप्रमाणे सांस्कृतिक लक्षणांमध्ये होणाऱ्या वैविध्यामुळे काळाच्या ओघात संस्कृतीमध्ये बदल होत जातो, असे मानले जाते. तसेच उत्क्रांतिवादातील नैसर्गिक निवडीचे तत्त्व येथे विचारात घेतले जाते.
पुरातत्त्वात, विशेषतः प्रागैतिहासात एकोणिसाव्या शतकातच उत्क्रांतीच्या सिद्धांताचा उपयोग करायला सुरुवात झाली. यूरोप आणि अमेरिकेत निरनिराळ्या सांस्कृतिक स्तरांवर असलेल्या लोकसमूहांची ’साध्या’ ते गुंतागुंतीची सामाजिक रचना असलेल्या ’प्रगत’ अशा पातळ्यांमध्ये मांडणी करण्याची पद्धत प्रचलित होती. त्या मागे संस्कृतींचा विकास एका रेषेत होतो, ही कल्पना होती. याच कल्पनेमधूनच ’उच्च दर्जाच्या’ आणि ’हलक्या दर्जाच्या’ संस्कृती असतात व काहीजण जगण्यास योग्य, तर काही अयोग्य असतात या वंशवादी विचारधारेचा (racism) उगम झाला.
सर जॅान लबक (१८३४—१९१३) उर्फ लॉर्ड एव्हबरी या विख्यात ब्रिटिश पुरातत्त्वज्ञांनी डार्विन यांच्या उत्क्रांती सिद्धांताचा प्रागैतिहासात मोठा उपयोग केला. नैसर्गिक निवडीमुळे केवळ सांस्कृतिक दृष्ट्याच नव्हे, तर जैविक दृष्ट्याही लोकसमूह एकमेकांपासून भिन्न झाले, असे त्यांचे प्रतिपादन होते. यूरोपीय लोक हे जोमदार जैविक आणि सांस्कृतिक उत्क्रांतीचा परिपाक आहेत, तर कमकुवत तंत्रज्ञान असणारे लोक बौद्धिक आणि जैविक दृष्टीने मागास असतात, असे त्यांचे मत होते. लबक यांच्या विचारांचा मोठा प्रभाव अमेरिकेतील पुरातत्त्वज्ञांवर होता. त्यांनी डार्विन यांच्या उत्क्रांती सिद्धांताचा उपयोग करून लबक यांच्या यूरोपीय लोकांच्या अधिक प्रगत संस्कृतीसमोर स्थानिक आदिम जमाती टिकू न शकण्याचे स्पष्टीकरण दिले. पुरातत्त्वीय पुराव्यांनुसार स्थानिक आदिम जमातीमध्ये काहीही बदल घडत नसल्याने त्या जमाती विनाशाकडे जाणे स्वाभाविक आहे, असा या विचारसरणीचा रोख होता. अशाच प्रकारे यूरोपीय पुरातत्त्वज्ञांनी यूरोपीय लोकांपेक्षा पूर्णपणे भिन्न संस्कृती असलेल्या आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियातील आदिवासींना अप्रगत असे संबोधले होते. त्यामुळे या तीन खंडांमधील पुरातत्त्वीय पुराव्यांचा उपयोग अशा संस्कृतींचे वर्गीकरण करताना कमी प्रगत ते अधिक प्रगत या व्याख्यांच्या आधारे केला.
एकोणिसाव्या शतकातील पुरातत्त्वात उत्क्रांतिवाद वापरण्याच्या समर्थकांमध्ये सर जॅान लबक यांच्याखेरीज गॅब्रिएल डी मोर्तिए (१८२१—१८९८) हे फ्रेंच पुराजीवशास्त्रज्ञ व पुरातत्त्वज्ञ आघाडीवर होते. त्यांनी पुरातत्त्वीय पुराव्यांच्या आधारे विविध प्रागैतिहासिक संस्कृतींचे कालखंडांनुसार वर्गीकरण करताना उत्क्रांतिवादाचा उपयोग केला. मानवाचे अस्तित्व फार प्राचीन काळापासून आहे आणि जगभरातील सर्व अप्रगत संस्कृती प्रगतीच्या एकाच दिशेने वाटचाल करतात, असे त्यांचे मत होते.
पुरातत्त्वीय सिद्धांतांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे दीर्घ काळ उत्क्रांतिवाद उपयोगात होता. अप्रगत तंत्रज्ञानाच्या अवस्थेतून अधिक प्रगत तंत्रज्ञानाच्या पातळीवर मानवी समूह जातात, हे गृहीतक प्रागैतिहासात नैसर्गिक तत्त्व मानले जात होते. प्रक्रियावादी पुरातत्त्व या विचारधारेच्या उगमानंतर १९६०-१९८० दरम्यान पुरातत्त्वविद्येत पुन्हा एकदा नव-डार्विनवादी (Neo-Darwinism) संकल्पनेकडे लोक आकर्षित झाले. तसेच १९८० नंतर पुरातत्त्वीय सिद्धांतांमध्ये त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले जाऊ लागले. रॉबर्ट सी. डनेल (१९४२—२०१०) यांचा १९८० मधील शोधनिबंध हे याचे उदाहरण आहे. त्यांनी उत्क्रांतिवादातील नैसर्गिक निवडीचे तत्त्व वापरले होते; तथापि संस्कृतींमधील वैविध्याचे स्पष्टीकरण करण्यासाठी जैविक उत्क्रांतिवाद पुरेसा नाही, असे त्यांचे मत होते.
पुरातत्त्वीय सिद्धांतांमध्ये मानवी वर्तनाशी संबंधित परिस्थितिकी ही वेगळी उत्क्रांतिवादी विचारसरणी १९९० नंतर पुढे आली. मानवी वर्तनात लवचिकपणा असल्याने पर्यावरणातील बाह्य परिणामांना इष्टतम प्रतिसाद देण्याची क्षमता मानवांमध्ये असते. त्यामुळे ते बदलत्या परिस्थितीत टिकून राहतात व याचमुळे लोकसमूहांमध्ये अनुकूलन घडून येते, असे या विचारसरणीत मानले जाते. या विचारसरणीतून जीवविज्ञानातील ‘इष्टतम अन्नशोध सिद्धांत’ (Optimal Foraging Theory) पुरातत्त्वविद्येत समाविष्ट झाला. अनेक पुरातत्त्वीय संशोधनांमध्ये १९९० नंतर तो वापरला जातो. अन्न शोधताना अथवा अन्न मिळवताना खर्च होणारी ऊर्जा आणि मिळालेली ऊर्जा यांच्यात संतुलन साधले जाते आणि अधिक ऊर्जा देण्याऱ्या स्रोतांना प्राधान्य दिले जाते, हा या सिद्धांताचा गाभा आहे. यूरोपात शेतीचा प्रसार होताना आरंभी ज्या समूहांनी सर्वोत्तम जमिनी कसायला घेतल्या ते टिकून राहिले, आणि त्यांच्या संस्कृतीचा विकास झाला. सर्वोत्तम जमिनी वापरणारे शेतकरी आकाराने मोठ्या घरांमध्ये आणि गावाच्या सर्वांत चांगल्या भागामध्ये राहत होते आणि संसाधने त्यांच्या ताब्यात होती, या अनुषंगाने इष्टतम अन्नशोध सिद्धांत नवाश्मयुगीन पुरातत्त्वात वापरला गेला आहे.
जीवविज्ञानात समूहांमधील जनुकांच्या वारंवारता आणि नैसर्गिक निवड यासंबधी विवेचन करताना जनुकीय अपवहन (Genetic drift) हा सिद्धांत वापरला जातो. कोणत्याही एका दिशेने न जाता केवळ यादृच्छिक प्रकारे जनुकांच्या वारंवारतेत बदल घडतात, असा हा सिद्धांत आहे. ही कल्पना वापरून संस्कृतीच्या विविध लक्षणांमधील बदल केवळ यादृच्छिक प्रकारे घडतात, असा सांस्कृतिक अपवहनाचा (Cultural drift) सिद्धांत उत्क्रांतिवादी पुरातत्त्वात मांडण्यात आला आहे. रिचर्ड डॉकिन्स (जन्म १९४१) या ब्रिटिश उत्क्रांतिवादी जीववैज्ञानिकांनी संस्कृतीच्या लक्षणांचे पुढील पिढ्यांमध्ये वहन होण्यासाठी जनुकांप्रमाणेच मीम (Meme) ही संकल्पना मांडली. त्यांच्या मते, मीम हे ज्ञानाचे (संकल्पना, विचार) एकक असून कोणती संस्कृती कशी बदलते व टिकून राहते हे या मीमवर होणाऱ्या नैसर्गिक निवडीशी निगडित असते. ज्या संस्कृतीमध्ये मानवी वर्तनात भरपूर वैविध्य असते त्या संस्कृती पर्यावरण अथवा प्रतिस्पर्धी संस्कृतीने निर्माण केलेल्या आव्हानानंतर टिकून राहतात, असा या सिद्धांताचा आशय आहे. तथापि डॉकिन्स यांचा मीम सिद्धांत पुरातत्त्वात फारसा मान्य झालेला नाही, याचे कारण म्हणजे संस्कृतीच्या वहनाची व वारशाची प्रक्रिया जनुकांच्या वहनापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीची असल्याचे पुरातत्त्वीय संशोधनातून दिसून येते.
संदर्भ :
- Dawkins, R. The Selfish Gene, Oxford, 1976.
- Muscio, Hernán Juan, ‘A Synthetic Darwinian Paradigm in Evolutionary Archaeology’, Theoretical and Methodological Issues in Evolutionary Archaeology (Hernán Juan Muscio & Gabriel Eduardo José López Eds.), pp. 73-82, Oxford, 2009.
- O’Brien, M. & Lyman, R. L. ‘Evolutionary Archeology : Current Status and Future Prospects’, Evolutionary Anthropology, 11 : 26-36, 2002.
- Shennan, Stephen J. Eds., Renfrew, Colin & Bahn, Paul, ‘Darwanian Archaeology’, Archaeology : The Key Concepts, pp. 44-47, London and New York, 2005.
- Trigger, Bruce, A History of Archaeological Thought, Cambridge, 1996.
समीक्षक : सुषमा देव