संस्तरित बॅराइट्स (मंगमपेटा, कडप्पा, आंध्र प्रदेश)

जगातील सर्वात मोठ्या बॅराइट्स साठ्यांपैकी एक आणि भूपृष्ठावर असलेली मंगमपेटा संस्तरित बॅराइट्स खाणीची महत्वाची जागा. समुद्रतळातील ज्वालामुखीच्या उद्रेकातून (Volcanic Explosion) निघालेल्या बाष्पाच्या अवक्षेपणातून (Precipitation from vapors), तसेच हवाई वर्षावातील राख (Sub aerial ash) आणि वितळलेल्या बॅराइट्स लॅपिलीच्या (Melted Barites lapilli) संचयनाने (Deposition) मोठ्या प्रमाणातील हे संस्तरित निक्षेप (Bedded Deposits) साठे निर्माण झाले असावेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. भूशास्त्रीय कालमापीमध्ये (Geological Timescale) कडप्पा महासंघातील (Cuddapah Super Group), नल्लमलई संघामधील (Nallamalai Group) पुल्लंपेट संचामध्ये (Pullampet formation) या स्तरित खडकांचे वर्गीकरण केलेले आहे.

मंगमपेटा बॅराइट्सचे संस्तरित निक्षेपामध्ये तळातील संस्तर हे सर्वात चांगल्या प्रतीचे असून ते शुद्ध बेरियम सल्फेट रूपात आढळतात. या ठिकाणी ७४ दशलक्ष टनांहून अधिक साठा असून तो भारताच्या एकूण साठ्यांपैकी ९८ टक्के आणि जगाच्या एकूण ज्ञात साठ्याच्या २८ टक्के आहे.

बॅराइट्स हे त्यांच्या जास्त गुरुत्वामुळे वजनदार असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या त्यांच्या पावडरचा उपयोग मुख्यतः वायू व कच्चे तेल (क्रूड ऑइल) विंधन विहिरींच्या उत्खनना वेळी, खोल जाताना जड चिखल (Heavy mud / Suppressing mud) म्हणून केला जातो. तसेच पेंट निर्मितीमध्ये याचा उपयोग होतो. कुर्नूल – रेणीगुंटा राज्य महामार्ग मंगमपेटा खाणी भागातून जातो. दक्षिण मध्य रेल्वेच्या कुर्नूल-तिरुपती मार्गावरील कोडुरु हे रेल्वे स्थानक या खाणीपासून १० किमी. अंतरावर आहे.

संदर्भ :

समीक्षक : पी. एस. कुलकर्णी