राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा (२००५) च्या प्रकरण ८ च्या कलम ४४ अन्वये २००६ साली राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) ची स्थापना केंद्रीय गृहमंत्रालया अंतर्गत देशात नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्ती प्रतिसाद करण्यासाठी दिनांक १९ जानेवारी २००६ रोजी झाली. एनडीआरएफच्या देशात एकूण १२ बटालियन आहेत. निमलष्करी सैन्यदलातील म्हणजे ३ बटालियन सीमा सुरक्षा दल, ३ बटालियन केंद्रीय राखीव पोलीस दल, २ बटालियन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, २ बटालियन इंडो-तिबेट सीमा पोलीस दल आणि सशस्त्र सीमा बलाचा एनडीआरएफमध्ये सामावेश आहे. प्रत्येक बटालियनमध्ये एकूण ११४९ जवानांनी बनलेला असतो. त्यामध्ये अभियंता, तंत्रज्ञ, वीजतंत्री, कुत्रापथक आणि अर्धवैद्यक (Para Medic) ४५ जवानांच्या १८ स्वयंपूर्ण गट तयार करून प्रदान केले जाते. ‘आपदा सेवा सदैव’ हे एनडीआरएफचे ब्रीदवाक्य आहे. एनडीआरएफच्या प्रमुखास महासंचालक असे संबोधले जाते. याची नेमणूक भारतीय पोलीस संघटनांकडून आयपीएस अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीवर येते.
एनडीआरएफ ही एक अव्वल संस्था आहे, ज्यात महासंचालकाव्यतिरिक्त महानिरिक्षक (IG) उप महानिरिक्षक (Sub IG) आहेत.
बचावकार्य : एनडीआरएफने २००६ पासून २०२० पर्यंत देशातील पाण्यात बुडण्याच्या घटना, इमारत कोसळणे, भूस्खलन, विनाशकारी पूर, चक्रीवादळ इ. अनेक आपत्तींतून सु. १,३३,१९२ एवढ्या लोकांचा जीव वाचवला आहे आणि देशातील ७३ प्रतिसाद कार्यातून २,७६० आपत्तीग्रस्तांचे मृतदेह परत मिळवले आहेत.
देशात एकूण १२ बटालियन असून ती याप्रमाणे : पहिली बटालियन, गुवाहाटी (आसाम); दुसरी बटालियन, कोलकाता (पश्चिम बंगाल); तिसरी बटालियन, कटक (ओडिशा); चौथी बटालियन, अरक्कोणम (तमिळनाडू); पाचवी बटालियन, सुदुंबरे, पुणे (महाराष्ट्र); सहावी बटालियन, गांधीनगर (गुजरात); सातवी बटालियन, भटिंडा (पंजाब); आठवी बटालियन, गाझियाबाद (उत्तर प्रदेश); नववी बटालियन, पाटणा (बिहार); दहावी बटालियन, विजयवाडा (आंध्र प्रदेश); अकरावी बटालियन, वाराणसी (उत्तर प्रदेश) आणि बारावी बटालियन, इटानगर (अरुणाचल प्रदेश) येथे स्थित आहेत.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल प्रामुख्याने खालील आपत्तींमध्ये कार्य करते :
१. भूकंप आणि कोसळलेल्या इमारती
२. पूर आणि पाण्यातून बचाव करणे
३. चक्रीवादळ, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्ती
४. वैद्यकीय प्रथमोपचार
५. रासायनिक, जैविक, रेडिओलॉजिकल आणि आण्विक आणीबाणी
६. कारखाने आपत्ती प्रतिसाद
७. सर्व मानवनिर्मित आपत्ती व निसर्गनिर्मित आपत्ती
नैसर्गिक आणि मानव निर्मित आपत्तींपासून जनतेचा शोध व बचाव करणे, आपत्तींचे शमन करणे, प्रतिबंध करणे, पूर्वतयारी करणे व प्रतिसाद देणे यांसाठी भारताकडे एनडीआरएफ ही जगातील सर्वांत बलाढ्य संस्था आहे. उद्दिष्टाप्रती वचनबद्ध असलेल्या शूर कार्यासाठी एनडीआरएफला ‘आपत्तीमधील देवदूत’ (Angels In Disaster) म्हटले जाते. जपान त्सूनामी (२०११) आणि नेपाळ भूकंप (२०१५) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचा वेगवान प्रतिसादासाठी जागतिक स्तरावर स्तूती करण्यात आली.
संदर्भ :
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५.
- http://www.ndrf.gov.in/
समीक्षक : सतीश पाटील