मिस्त्री, आबान : (६ मे १९४० — ३० सप्टेंबर २०१२). भारतातील प्रसिद्ध महिला तबलावादक तसेच संगीतशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. त्यांचे वडील एरचशाह पी. मिस्त्री हे व्हायोलिनवादक तर आई सोरशेद या दिलरूबा या वाद्याचे वादन करत असत. आबान यांनी वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांची मावशी मेहरो वर्किंगबॉक्सवाला यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यानंतर पं. लक्ष्मणराव बोडस यांच्याकडे त्यांनी सुमारे २७ वर्षे गायनाचे धडे घेतले. याच सुमारास त्यांनी पं. केकी जिजीना यांच्याकडून सतार व तबलावादनाचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. नंतर त्यांनी तबलानवाज उ. अमीर हुसेन खॉं यांच्याकडे तबल्याचे उच्च शिक्षण घेतले. फरूखाबाद, दिल्ली, लखनौ, अजराडा या तबल्यातील प्रसिद्ध घराण्यांचे समृद्ध तबलावादन आबान यांना उ. अमीर हुसैन खॉंसाहेबांकडून शिकायला मिळाले. या चारही घराण्यांच्या बंदिशी, त्यांचा निकास, विचारप्रक्रिया त्या बारकाईने शिकल्या व या शैलींचा अभ्यास करून त्यावर चिंतन करून त्यांनी या शैलींचा संगम असणारी स्वतःची अशी एक खास तबलावादनाची शैली निर्माण केली. त्यांनी पं. नारायणराव मंगळवेढेकर यांच्याकडून पखावज वादनाचेही शिक्षण घेतले होते. याशिवाय कथ्थक नृत्यकलेतही त्या प्रविण होत्या; पण पुढे वादन कलेवर त्यांनी अधिक लक्ष देण्याचे ठरविले.
आबान मिस्त्री या उच्चविद्याविभूषित होत्या. त्यांनी हिंदी व संस्कृत या विषयांची ‘साहित्यरत्न’ ही परीक्षा उत्तीर्ण केली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाकडून सतार हा विषय घेऊन संगीत विशारद ही पदवी त्यांनी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. याशिवाय त्यांनी गायनामध्ये संगीत अलंकार व संगीत प्रवीण या पदवीही प्राप्त केल्या आहेत. त्यांनी पं. बी. आर. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पखावज और तबला के घरानें : उद्भव, विकास एवं विविध परम्परायें’ हा विषय घेऊन शोधनिबंध लिहिला. या शोधनिबंधासाठी गांधर्व महाविद्यालय मंडळाने त्यांना ‘संगीताचार्य’ या पदवीने गौरविले.
आबान मिस्त्रींचे लयीवरील प्रभुत्व वाखाणण्याजोगे होते. त्यांनी तीनतालाव्यतिरिक्त झपताल, रूपक, पंचम सवारी इत्यादी तालांतही समर्थपणे वादन केले. तत्कालीन भारतीय संगीत कलाविश्वात एका स्त्रीने तबलावादन करणे व गायकांना साथसंगत करणे ही नवीन गोष्ट होती. त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीस स्त्री गायिकाही त्यांना साथसंगतीसाठी घ्यायला कचरत असत; पण त्यामुळे त्या निराश झाल्या नाहीत. त्यांच्या तबलावादनाची त्यांनी ध्वनिमुद्रिका काढली. त्यांनी भारतात आणि भारताबाहेर विविध ठिकाणी एकल तबलावादनाचे यशस्वी कार्यक्रम केले. नंतर त्यांनी अनेक प्रसिद्ध गायकांना तबलावादनाची साथ केली. पहिल्या भारतीय महिला तबलावादक म्हणून त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे.
आबान मिस्त्री यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांना सूरसिंगार संसदेकडून तालमणी, आग्रा संगीत कला केंद्राकडून संगीत कला रत्न, संगीत सेतू तसेच चर्मवाद्य तबला भूषण इत्यादी उपाधी प्रदान करण्यात आल्या. त्यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी स्वतंत्र वादन व तबल्यावर सप्रयोग व्याख्यानांचे कार्यक्रम सादर केले.
प्रसिद्ध तबलावादक पं. केकी जिजीना आणि आबान मिस्त्री यांनी मुंबईमध्ये स्वर साधना समिती या संगीतसंस्थेची स्थापना केली. भारतातील विविध ठिकाणांच्या कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतातील अनेक नवीन कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करण्यासाठी येथे येत असतात. या संस्थेमध्ये असलेल्या वाडिया संगीत क्लासमध्ये आबान यांनी जवळपास पंचवीस वर्षे विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण दिले. त्यांच्या शिष्यांमध्ये सपल जिजीना, आदिल मिस्त्री, सुरेश शिंगाडे इत्यादींचा समावेश आहे.
आबान यांच्या ‘पखावज और तबला के घरानें : उद्भव, विकास एवं विविध परम्परायें’ या शोधनिबंधाचे इंग्लिशमध्ये Pakhawaj and Tabla : History, Schools and Traditions हे यास्मीन तारापोर यांनी भाषांतर केलेले पुस्तक प्रसिद्ध झालेले आहे. हे त्यांचे पुस्तक दोन विभागात आहे. पहिल्या विभागात संगीतातील विविध घराणी, त्यांचे महत्त्व, उद्भव, स्वरूप व विकास यांच्यासह पखावज व मृदंगाची उत्पत्ती आणि विकास यांची माहिती दिलेली आहे. दुसऱ्या विभागात तबल्याची उत्पत्ती, विकास, शैली आणि त्याची विविध घराणी यांची माहिती दिलेली आहे. याशिवाय त्यांनी तबलेंकी बंदिशे (हिंदी) आणि The Contribution of Parsis to Indian Classical Music ही पुस्तके लिहिली.
आबान मिस्त्री यांचे मुंबई येथे वयाच्या बहात्तराव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्याकडून त्यांना मरणोपरांत २० जानेवारी २०१८ रोजी ‘भारतातील पहिल्या महिला तबलावादक’ या उपाधीने सन्मानित करण्यात आले.
संदर्भ :
- व्होरा, आशाराणी, नारी कलाकार, दिल्ली, २००८.
समीक्षक : वर्षा देवरुखकर