अर्थशास्त्रीय अभ्यासाची एक शाखा. यामध्ये अनिश्चिततेच्या स्थितीत असणाऱ्या बाजारपेठेत घेतल्या जाणाऱ्या वित्तीय निर्णयांचा अभ्यास केला जातो. हे आर्थिक निर्णय साधनसंपत्तीचा उपयोग आणि त्यांचे वाटप यांविषयी असतात. वैयक्तिक गुंतवणुकीशी निगडित किंवा बाजारपेठेतील बदलांशी निगडित भविष्यात निर्माण होणाऱ्या विविध शक्यतांचा विचार या आर्थिक निर्णयांमध्ये समाविष्ट असतो.
पारंपरिक अर्थशास्त्रीय अभ्यासात पैसा हा विविध विनिमयांतला केवळ एक घटक असतो; तर वित्तीय अर्थशास्त्रात पैसा हा प्रत्येक विनिमयातला अविभाज्य भाग असतो. वास्तव अर्थव्यवस्थेपेक्षा किंमत, व्याजदर अशा वित्तीय घटकांवर वित्तीय अर्थशास्त्र लक्ष केंद्रित करते. वित्तीय अर्थशास्त्राचे प्रामुख्याने दोन अभ्यासविषय असतात. एक, गुंतवणूक सिद्धांत किंवा संपत्तीसाधनांचे किंमतनिर्धारण आणि दुसरा, कंपनी वित्त. पहिला दृष्टीकोन हा भांडवल पुरवठादारांचा असतो, तर दुसरा भांडवल वापरकर्त्यांचा असतो.
गुंतवणुकीचा काळ, या गुंतवणुकीतील जोखीम, उपलब्ध माहिती आणि एखाद्या संपत्तीसाधनाचा एका हेतूने वापर झाल्यास इतर वापरातून प्राप्त होऊ शकणाऱ्या उत्पन्नाचा त्याग (संधी खर्च) या सर्व घटकांतून जी प्रोत्साहने (इन्सेंटिव्ह्ज) किंवा प्रतिबंधक (डिसइन्सेंटिव्ह्ज) निर्माण होऊ शकतात, त्यासंदर्भातील आर्थिक सिद्धांतांचा उपयोग वित्तीय अर्थशास्त्रात केला जातो. एखाद्या वित्तीय निर्णयावर परिणाम करू शकणारे घटक तपासण्यासाठी आवश्यक अशी अद्ययावत प्रतिमाने (मॉडेल्स) वित्तीय अर्थशास्त्रात मांडली जातात. व्यक्ती किंवा संस्था तर्कशुद्ध पद्धतीने आर्थिक निर्णय घेतील, असे या प्रतिमानांनी गृहीत धरलेले असले, तरी प्रत्यक्षात ते खरे असेलच असे अनिवार्य नसते. किंबहुना, आर्थिक घटकांचे तर्काला सोडून वर्तन हा वित्तीय अर्थशास्त्रामध्ये संभाव्य जोखमीचा घटक मानला जातो.
वित्तीय अर्थशास्त्र हे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रातील मुलभूत संकल्पना आणि काही लेखाशास्त्रीय संकल्पना यांच्या पायावर उभे आहे. जोखमीचे मापन आणि विश्लेषण करू शकणाऱ्या काही संख्याशास्त्रीय संकल्पनांची तोंडओळख ही वित्तीय अर्थशास्त्राच्या अभ्यासात अनिवार्य ठरते. वित्तीय अर्थमिती आणि गणितीय वित्तीय अर्थशास्त्र या वित्तीय अर्थशास्त्राच्या दोन प्रमुख उपशाखा आहेत.
एखाद्या संपत्तीसाधनाचे वर्तमानातील मूल्य आणि बाजारपेठेतील सर्व प्रकारच्या बदलांविषयीच्या अपेक्षा या संपूर्ण वित्तीय अर्थशास्त्राच्या पायाभूत अशा संकल्पना आहेत. एखाद्या संपत्तीसाधनात पैसा गुंतवत असताना त्याची किंमत जशी लक्षात घेतली जाते, तशी हे साधन भविष्यात किती उत्पन्न देणार आहे त्याचाही विचार केला जातो; परंतु भविष्यात काही वर्षांनी मिळणारे उत्पन्न वाढत्या महागाईचा विचार करता आपल्याला अपेक्षित तितक्या मूल्याचे राहात नाही. त्यामुळे वटणावळ (डिसकाउंटिंग) पद्धतीचा वापर करून या संपत्तीसाधनाचे वर्तमानातील मूल्य मोजता येते. एखाद्या संपत्तीसाधनाचे वर्तमानातील मूल्य मोजल्याने गुंतवणूकदाराला भविष्यात आपल्याला किती उत्पन्न प्राप्त होऊ शकेल, याचा अंदाज येतो. त्याबरोबरच दोन संपत्तीसाधनांचे वर्तमानातील मूल्य मोजल्याने त्यांच्यातून मिळणाऱ्या उत्पनाची तुलना करता येते आणि शेवटी कोणत्या साधनात पैसे गुंतवावे याचा निर्णय घेता येतो. वर्तमान मूल्याच्या अशा सगळ्या शक्यता किंवा संभाव्यता (प्रोबॅबिलिटीज) एकत्र केल्या, तर संबंधित संपत्तीसाधनाचे अपेक्षित मूल्य आणि ते मूल्य मिळण्याच्या शक्यताही मोजता येतात. अर्थात, गुंतवणूकदाराची जोखीम घेण्याची किंवा टाळण्याची प्रवृत्ती वा क्षमता ही गुंतवणुकीच्या अंतिम निर्णयात सर्वांत महत्त्वाचा घटक असते. त्याचा विचार या वर्तमान मूल्याधारित निर्णयपद्धतीत केलेला दिसत नाही, ही या पद्धतीची मर्यादा आहे.
मूल्यांतर पणनमुक्त किंमतनिर्धारण आणि समतोल यांचा विचार हाही वित्तीय अर्थशास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे. संपत्तीसाधनाच्या किमतीत होणाऱ्या बदलांमुळे त्याची बाजारात खरेदीविक्री होते आणि त्याचे अंतिम किंमतनिर्धारण होते. अशा प्रकारच्या खरेदी-विक्रीपासून मुक्त बाजारपेठेत संपत्तीसाधनाच्या किमतीचा समतोल साधला जातो. यालाच ‘मूल्यांतर पणन समतोल’ असेही म्हणतात. जेथे मूल्यांतर पणनाची संधी असते, तेथे किमती बदलण्याची शक्यता असते. म्हणूनच किमतीचा समतोल साधला जात नाही.
गुंतवणुकीचे पद्धतशीर आणि शास्त्रशुद्ध निर्णय घेण्याच्या दृष्टीने वित्तीय अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा थेट फायदा गुंतवणूकदाराला होतो. गुंतवणुकीचा कालावधी, गुंतवणूक संपत्तीसाधनाची किंवा प्रकल्पाची किंमत, त्याचा संधीखर्च आणि जोखीम लक्षात घेता सर्वोत्तम फल देणारे गुंतवणूकसाधन निवडताना गुंतवणूकदाराला (व्यक्ती, संस्था, सरकार) वित्तीय अर्थशास्त्राचा अभ्यास उपयोगी पडतो. या ठिकाणी या गुंतवणूकदाराची भूमिका ही भांडवल पुरवठादाराची किंवा भांडवल वापरकर्त्याची असू शकते.
संदर्भ : McGraw Hill, 4th Edition, 2006
समीक्षक : विनायक देशपांडे