एक विलुप्त मानवी जाती. दक्षिण आफ्रिकेतील गौतेंग प्रांतातील रायझिंग स्टार गुहांमधील दिनलेदी (Dinaledi) या गुहेच्या एका पोकळीत (चेंबर) अनपेक्षितपणे १५५० जीवाश्मांचा शोध लागल्यानंतर (२०१३) मानवी उत्क्रांतीची कहाणी वाटते तेवढी सरळसोट नाही हे दिसून आले. हे जीवाश्म किमान १५ जणांचे आहेत व त्यांत सर्व वयाच्या लोकांचा समावेश आहे. हे अवशेष तेथे मुद्दाम दफन केल्याप्रमाणे भासतात. या शोधानंतर जवळच असलेल्या लेसेदी (Lesedi) या गुहेत असेच आणखी जीवाश्म मिळाले. हे सगळे वेगळ्या मानव जातीचे असल्याचे दिसून आले. पुरामानवशास्त्रज्ञ ली रॉजर्स बर्गर व त्यांच्या सहसंशोधकांनी २०१५ मध्ये जेथे ही जाती सापडली त्या रायझिंग स्टार वरून या जातीला ‘होमो नलेदी’ (नलेदी मानव) असे नाव दिले. ‘नलेदी’ हा शब्द दक्षिण आफ्रिकेतील सेसोथो (Sesotho) या भाषेतील असून त्याचा अर्थ ‘तारा’ असा आहे. तर ‘दिनलेदी’ हे नलेदीचे अनेकवचन असून त्याचा अर्थ ‘तारे’ असा होतो. ‘लेसेदी’ हा शब्द सेट्स्वाना (Setswana) या भाषेतील असून त्याचा अर्थ ‘प्रकाश’ असा आहे.

नलेदी मानवाचे जीवाश्म.

नलेदी मानव ३,३५,००० ते २,३६,००० वर्षपूर्व असे सु. एक लाख वर्षे अस्तित्वात होते. या मानवांच्या संस्कृतीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही; कारण त्यांच्याबरोबर प्राण्यांचे जीवाश्म किंवा दगडी अवजारे आढळलेली नाहीत. तथापि त्यांना समकालीन असलेल्या इतर मानव जातींपेक्षा यांचे दात निराळे होते. त्यांच्या मेंदूचे आकारमान व हातपाय हे जरी स्पष्टपणाने मानव प्रजातीचे असले तरी त्यांच्या कमरेचे हाड व खांदे यांची रचना ऑस्ट्रॅलोपिथेकस प्राण्यांप्रमाणे होती. नलेदी मानवांची उंची साधारणपणे १५० सेंमी. असून वजन ४५ किग्रॅ. होते.

नलेदी मानवाचे कल्पनाचित्र.

दिनलेदी या गुहेच्या पोकळीत मिळालेल्या अवशेषांनंतर अधिक संशोधन करत असताना ली रॉजर्स बर्गर व त्यांच्या सहसंशोधकांना या जागेपासून काही अंतरावर एका लहान मुलाच्या कवटीचे २८ तुकडे व ६ दात २०१७ मध्ये मिळाले. या बालकाचे ‘लेटी’ (Leti) असे नामकरण करण्यात आले. लेटी हे नाव सेट्स्वाना या भाषेतील असून त्याचा अर्थ ‘हरवलेला’ असा होतो. लेटीच्या मेंदूचे आकारमान ४८० ते ६१० घ. सेंमी. असून ते पूर्ण वाढ झालेल्या नलेदी मानवाच्या मेंदूच्या ९० ते ९५ टक्के आहे. लेटीच्या कवटीवर ती गडगडत अथवा वाहत आल्याच्या किंवा कोणा शिकारी प्राण्याने आणल्याच्या कसल्याही खुणा आढळल्या नाहीत. तसेच ही कवटी सोडून तेथे इतर काही हाडे न मिळाल्याने लेटीबाबतचे गूढ वाढलेले आहे. लेटीची कवटी तेथे जाण्यामध्ये इतर नलेदी मानवांचा हात असावा, असे मत मांडण्यात आले आहे.

नलेदी मानवांचा इरेक्टस किंवा ⇨सेपियन मानव जातीशी काय संबंध होता, तसेच एवढ्या मोठ्या संख्येने त्यांचे जीवाश्म फक्त दिनलेदी व लेसेदी या दोन गुहांमध्येच का सापडावेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मानंवाचे अवशेष गुहेच्या तोंडापासून ९० मीटर अंतरावर आत असून तिथे जाण्याचा मार्ग अत्यंत चिंचोळा आहे. तसेच गुहेच्या आत इतक्या खोलवर ही हाडे कशी गेली की तो मुद्दाम दफन करण्याचा प्रकार होता, हे प्रश्न सुटलेले नाहीत.

संदर्भ :

  • Berger, L. R.; Hawks, John; Dirks, Pawl H. G.M.; Elliott, M.; Roberts, Eric. M. ‘Homo naledi and Pleistocene hominin evolution in subequatorial Africa’, eLife, 6, 2017.
  • Brits, Elsabe, ‘Child’s skull fossil found in the Cradle of Humankind’, Nature, 2021. https://doi.org/10.1038/d44148-021-00109-x

छायाचित्रे संदर्भ :

  • नलेदी मानवाचे जीवाश्म : https://www.nhm.ac.uk/discover/homo-naledi-your-most-recently-discovered-human-relative.html
  • नलेदी मानवाचे कल्पनाचित्र : https://www.sci.news/othersciences/anthropology/science-homo-naledi-03224.html

समीक्षक : मनीषा पोळ