पुराणे हा संस्कृत साहित्यातील एक वाङ्मयप्रकार असून त्यात योगशास्त्राशी संबंधित अनेक विषयांचे विस्तृत प्रतिपादन आढळते. सर्वसामान्य व्यक्तींना वेदांचे ज्ञान सोप्या भाषेत समजावे या हेतूने व्यास महर्षींनी पुराणांची रचना केली असे म्हटले जाते. संस्कृतमध्ये अठरा महापुराणे आणि अठरा उपपुराणे उपलब्ध आहेत. पुराणांमध्ये फक्त काल्पनिक भाकड कथा नसून त्यातील कथा सांकेतिक किंवा लाक्षणिक आहेत. कथांच्या माध्यमातून मुख्य विषयाचे प्रतिपादन करण्याचा त्यांचा उद्देश आहे. पुराणांचे (१) सर्ग – सृष्टीची उत्पत्ती, (२) प्रतिसर्ग – सृष्टीचा प्रलय, (३) वंश – प्रमुख ऐतिहासिक घराण्यांची वंशावळ, (४) मन्वंतर – कालमापनाची वेगवेगळी परिमाणे आणि (५) वंशानुचरित – ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे हे मुख्य पाच विषय आहेत. काही पुराणांमध्ये संपूर्ण अध्यायच योगसाधनांविषयी आहेत, उदा.,ब्रह्मपुराण (अध्याय २३५); भागवतपुराण (स्कंध ११, अध्याय १५); नारदपुराण (पूर्वभाग, पाद १, अध्याय ३३) इत्यादी.
विविध पुराणांमध्ये योग शब्दाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी काही व्याख्या पुढीलप्रमाणे :
(१) संपूर्ण आत्मज्ञान प्राप्त होणे म्हणजेच योग होय. ते ज्ञान चित्ताच्या एकाग्रतेद्वारे प्राप्त होते आणि संपूर्ण समर्पण व भक्ती असणाऱ्या व्यक्तीला चित्ताची एकाग्रता प्राप्त होते. (लिंगपुराण १.८.३)
(२) चित्ताच्या वृत्तींचा निरोध (निर्विचार अवस्था) म्हणजे योग होय. ही अवस्था प्राप्त होण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधि ही आठ साधने सांगितली आहेत. (लिंगपुराण १.८.७)
(३) परमात्मा हा निर्गुण आणि जीवात्मा हा सगुण आहे. प्रत्येक जीवात्म्यामध्ये ‘मी’ पणाची भावना आहे, ज्यामुळे ‘मी’ इतरांपेक्षा वेगळा आहे हा भाव उत्पन्न होतो. परंतु जीवात्मा आणि परमात्मा यात वास्तविक भेद नसून ते एकच आहेत याचे प्रत्यक्ष अनुभूतीद्वारे होणारे ज्ञान म्हणजे योग. (नारदपुराण १.१.३३.५७)
(४) मनाद्वारे कायम भौतिक वस्तूंचे आणि सुख-दुःख यांचे ज्ञान होते, परंतु मनाला बाह्य विषयांवरून वळवून ते आत्म्यावर एकाग्र होण्यासाठी केला जाणारा प्रयत्न आणि त्याद्वारे आत्मा आणि ब्रह्म हे एकच आहेत असे होणारे ज्ञान म्हणजे योग. (विष्णुपुराण ६.७.३१, नारदपुराण १.१.४७.७, अग्निपुराण ३७९.२४-२५)
(५) केवळ पद्मासन इत्यादी केल्याने योग सिद्ध होत नाही. केवळ नाकाच्या टोकाचे निरीक्षण केल्यानेही योग सिद्ध होत नाही. एखादे कर्म करत असतांना ते कर्म जेव्हा संपूर्ण एकाग्रतेने म्हणजेच मनाची इंद्रियांशी पूर्णपणे एकरूपता असताना केले जाते तेव्हा त्याला योग म्हटले जाते. (ब्रह्मपुराण २३५.२८)
(६) काही लोक आत्मा आणि मन यांच्या संयोगाला योग असे म्हणतात, काही श्वास आणि प्रश्वास यांच्यातील समन्वयाला (प्राणायामाला) योग म्हणतात. तर, काही इंद्रिय आणि भौतिक विषय यांच्या संयोगाला योग म्हणतात. भौतिक विषयांची आसक्ती चित्तात असतांना ज्ञान आणि मोक्ष प्राप्त होणे अशक्य आहे. (स्कंदपुराण ४.४१.४८-४९)
योगसाधनेतील विविध मार्ग :
योगाचे अंतिम लक्ष्य ज्ञान प्राप्त करून घेणे असले, तरी प्रत्येक व्यक्तीची साधनापद्धती एक असेलच असे नाही. महर्षी पतंजलींनीही योगसूत्रांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साधना सांगितलेल्या आहेत. प्रत्येकाने आपल्या स्वभावानुसार, आवडीनुसार, सोयीनुसार किंवा योग्यतेनुसार कोणता मार्ग आपल्याला अनुकूल आहे हे जाणून त्यानुसार साधना करणे आवश्यक असते. यासाठीच प्रामुख्याने ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग यांचे प्रतिपादन योगाच्या ग्रंथांमध्ये आढळते. त्याचे वर्णन योगसूत्र, गीता आणि पुराणांमध्ये विस्तृतपणे केलेले आहे. त्याव्यतिरिक्तही इतर काही साधनापद्धतींचे वर्णन पुराणांमध्ये आढळते, ते पुढीलप्रमाणे :
(१) मंत्रयोग : ध्यान धारणेच्या वेळी एखादा मंत्र जपणे आणि त्या योगाने चित्ताची एकाग्रता साधणे याला मंत्रयोग म्हणतात. लिंगपुराणानुसार एखाद्या मंत्राचा ध्यानयुक्त जप करणे म्हणजे मंत्रयोग होय. शिवपुराणानुसार मंत्राचा जप करीत असताना मनात अन्य कोणताही विचार न येता केवळ मंत्राच्या अर्थावर चित्त एकाग्र होणे म्हणजे मंत्रयोग होय. देवीभागवतपुराणानुसार मूलाधार चक्राच्या ठिकाणी असलेली कुंडलिनी शक्ती योगसाधनेने सहस्रार चक्रापर्यंत जाऊन पुन्हा मूलस्थानी परत येते. त्या वेळी प्रत्येक चक्राच्या दलांशी संबंधित असणारी सर्व बीजाक्षरे व सर्व मंत्र सिद्ध होतात, यालाच मंत्रयोग असे म्हणतात. पतंजलींनी योगसूत्रांमध्ये ‘मंत्रयोग’ या शब्दाचा उल्लेख केलेला नाही परंतु ॐकाराचा जप करणे आणि ईश्वरावर ध्यान केंद्रित करणे ही साधना त्यांनी सांगितलेली आहे.
(२) स्पर्शयोग : श्वास आणि प्रश्वास पूर्णपणे रोखून (कुंभक केल्यावर) जीवात्म्याच्या विश्व, तैजस आणि प्राज्ञ या तीन अवस्थांवर चित्ताची धारणा केल्यास या तीन अवस्थांमधील भेदांचे ज्ञान प्राप्त होते. या साधनेलाच स्पर्शयोग म्हणतात. जीवात्मा जागृत अवस्थेत असताना त्याला ‘विश्व’, स्वप्न अवस्थेत असताना ‘तैजस’ आणि सुषुप्ती अवस्थेत असताना ‘प्राज्ञ’ अशा तीन संज्ञा उपनिषदांनी दिलेल्या आहेत. शिवपुराणानुसार प्राणायाम आणि मंत्रयोग यांच्या एकत्रित अभ्यासाला स्पर्शयोग असे म्हणतात. या स्वरूपाच्या एकत्रित अभ्यासाचा उल्लेख योगसूत्रांमध्ये आढळत नाही.
(३) भावयोग : सर्व चेतन आणि अचेतन पदार्थांमध्ये समान रूपाने राहणाऱ्या ईश्वराप्रती संपूर्ण समर्पण भाव असणे म्हणजेच भावयोग होय. यामुळे चित्ताची शुद्धी होते असा उल्लेख लिंगपुराणात आढळतो. यालाच भक्तियोग असेही म्हणता येऊ शकते. पतंजलींनी वर्णिलेले ईश्वर-प्रणिधान भावयोगाशी संबंधित आहे.
(४) अभावयोग : लिंगपुराणानुसार ज्या वेळी योग्याच्या चित्तातील सर्व वृत्ती शांत होतात आणि चेतन किंवा अचेतन अशा कोणत्याही पदार्थाचे ज्ञान होत नाही, त्या वेळी असणारी शून्य आणि शांत अवस्था म्हणजे अभावयोग होय. या अभ्यासामुळे संकल्प-विकल्प करणाऱ्या मनाचा हळूहळू लय होतो. पुराणांमधील अभावयोगाचे वर्णन हे योगसूत्रांतील ‘असम्प्रज्ञात समाधि’शी मिळतेजुळते आहे.
(५) महायोग : लिंगपुराणानुसार ज्या ध्यानावस्थेत योग्याला आत्मज्ञान प्राप्त होते त्याला महायोग म्हणतात. योगाच्या सर्व साधनांमध्ये महायोग सर्वश्रेष्ठ मानला आहे. शिवपुराणानुसार ज्या वेळी साधक केवळ शिवाच्या निष्कलंक शुद्ध स्वरूपाचे ध्यान करतो, त्या वेळी त्याला महायोग असे म्हणतात.
(६) ध्यानयोग : अग्निपुराणानुसार साधक स्वतःच्या हृदयस्थानात कमळाच्या फुलासदृश असणाऱ्या अनाहत चक्रामध्ये विष्णुतत्त्वाचे ध्यान करतो आणि सतत त्याचेच स्मरण करतो, यालाच ध्यानयोग असे म्हणतात. स्कंदपुराणानुसार ध्यानयोग करणाऱ्या साधकाच्या चित्तातील सर्व अशुद्धी नष्ट होतात.
या योगसाधनापद्धतींव्यतिरिक्त वायुपुराणात माहेश्वर-योग, देवीभागवतपुराणात चित्त-धारणा योग, नारदपुराणात क्रियायोग यांचे उल्लेख आढळतात. अष्टांगयोगाचे वर्णन पुराणांमध्ये विस्ताराने केलेले दिसून येते. त्याचे वर्णन येणेप्रमाणे :
(१) यम : स्वतः आचरण करण्याचे व्रत म्हणजे यम. योगसूत्रांमध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य, अपरिग्रह (अनावश्यक वस्तूंचा संग्रह न करणे) हे पाच यम सांगितले आहेत. नारदपुराणात याव्यतिरिक्त अक्रोध आणि अनसूया (असूया न करणे) हेही दोन यम तर भागवतपुराणामध्ये मूळ पाच यमांव्यतिरिक्त असंग (आसक्ती नसणे), ह्री (लज्जा), आस्तिक्य, मौन, स्थैर्य (मनाची स्थिरता), क्षमा (सहनशक्ती) आणि अभय (निर्भयता) हे सात यम सांगितले आहेत.
(२) नियम : योगसूत्रांमध्ये शौच (शरीर आणि मनाची शुद्धता), संतोष, तप, स्वाध्याय (शास्त्रांचे अध्ययन किंवा ॐकार जप) आणि ईश्वर-प्रणिधान (भक्ती) हे पाच नियम, तर भागवतपुराणामध्ये याव्यतिरिक्त होम, श्रद्धा, आतिथ्य, तीर्थाटन, परार्थेहा (दुसऱ्यांना मदत करणे), आचार्य-सेवा, ईश्वर-अर्चन हे सात नियम सांगितले आहेत. यम आणि नियमांविषयी अन्य काही पुराणांत वेगवेगळे उल्लेख आढळून येतात.
(३) आसन : स्थिर आणि सुखकर अशा स्थितीला आसन म्हणतात. ही योगसूत्रातील आसनाची व्याख्या भागवतपुराणातही समान रूपाने सांगितलेली आहे. कूर्मपुराण, शिवपुराण, स्कंदपुराण यांमध्ये अनेक आसनांची नावे आणि ती आसने कशी करावीत यांविषयी माहिती आहे. विशेषतः पद्मासन आणि स्वस्तिकासन ही दोन आसने अनेक ठिकाणी उल्लेखिलेली आहेत.
(४) प्राणायाम : प्राणाची गती रोखून धरणे किंवा प्राण आणि अपान (श्वास आणि प्रश्वास) यांची गती थांबवणे म्हणजे प्राणायाम होय. लिंगपुराण,स्कंदपुराण,मार्कंडेयपुराण आणि वायुपुराण यांमध्ये प्राणायामाचे उल्लेख आढळतात. १२ मात्रांपर्यंत केला जाणारा लघू, २४ मात्रांपर्यंत केला जाणारा मध्यम आणि ३६ मात्रांपर्यंत केला जाणारा उत्तम असे प्राणायामाचे तीन प्रकार वायुपुराणात वर्णिलेले आहेत. रेचक, पूरक आणि कुंभक हे तीन प्रकार कूर्मपुराणात, तर सगर्भ आणि अगर्भ हे प्रकार शिवपुराणात सांगितलेले आहेत. लिंगपुराणात प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान या पाच महाप्राणांची आणि नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय या उपप्राणांची कार्ये सांगितलेली आहेत. प्राणायामाचा अभ्यास करणाऱ्या साधकाच्या चार अवस्था मार्कंडेयपुराणात पुढीलप्रमाणे वर्णिलेल्या आहेत. (१) प्राणायामाच्या सतत अभ्यासामुळे योग्याच्या चित्तातील शुभ-अशुभ कर्मांचे संस्कार नष्ट होतात आणि योग्याला कोणत्याही कर्माचे फळ मिळत नाही, या अवस्थेला ध्वस्ति असे म्हणतात. (२) चित्तातील काम, लोभ, मोह इत्यादी वासना नष्ट होतात व योग्याच्या चित्तात वैराग्याचा उदय होतो, या अवस्थेला प्राप्ती असे म्हणतात. (३) योग्याला भूत-वर्तमान-भविष्य अशा तीनही काळातील वस्तूंचे आणि दूर अंतरावरील वस्तूंचे ज्ञान होऊ लागते, या अवस्थेला संवित् असे म्हणतात. (४) पाच प्राण, मन, इंद्रिये आणि त्यांचे विषय साम्य अवस्थेत राहतात या अवस्थेला प्रसाद असे म्हणतात.
(५) प्रत्याहार : इंद्रियांना आपापल्या ग्राह्य विषयांपासून विलग करून प्रयत्नपूर्वक त्यांना नियंत्रित करणे म्हणजे प्रत्याहार होय. हे प्रत्याहाराचे वर्णन अनेक पुराणांमध्ये कमी-अधिक फरकाने सारखे आढळते.
(६) धारणा : एका विशिष्ट स्थानी चित्ताला एकाग्र करणे म्हणजे धारणा होय, या अर्थाची धारणेची व्याख्या वायुपुराण,मार्कंडेयपुराण आणि विष्णुपुराण यांमध्ये आढळते. चित्ताला एकाग्र करण्याविषयी कोणत्याही विशिष्ट स्थानाचा उल्लेख पतंजलींनी केलेला नाही. परंतु, गरुडपुराण, मार्कंडेयपुराण आणि वायुपुराणात शरीरातील नाभी, हृदय, कंठ, छाती, चेहरा, नाकाचा शेंडा, डोळे, दोन भुवयांमधील जागा, मस्तकाचा मध्यभाग आणि त्यावरील असणारे (सहस्रार चक्राचे) स्थान या दहा स्थानांचा उल्लेख आहे; ज्यांवर योगी धारणा करू शकतो. विष्णुपुराणात सर्वशक्तिमान विष्णूवर केली जाणारी धारणा शुद्ध आणि त्याव्यतिरिक्त इतर वस्तूंवर केली जाणारी धारणा अशुद्ध असा भेद सांगितला आहे. वायुपुराण आणि मार्कंडेयपुराणात पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन आणि बुद्धी या सात तत्त्वांवर केल्या जाणाऱ्या सात सूक्ष्म धारणा सांगितल्या आहेत. स्कंदपुराणात पंच महाभूतांवर केल्या जाणाऱ्या धारणांची स्तम्भनी, प्लवनी, दहनी, भ्रमणी आणि शमनी अशी विशिष्ट नावे सांगितली आहेत.
(७) ध्यान : ज्या विषयावर चित्ताची धारणा आहे, त्याच विषयावर अविरत चित्तवृत्तीची एकतानता होणे म्हणजे ध्यान होय, असे वर्णन कूर्मपुराण तसेच अन्य काही पुराणांत आढळते. गरुडपुराणानुसार आत्मा आणि ब्रह्म यांच्या एकत्वाचे अनुसंधान म्हणजे ध्यान होय.
(८) समाधि : ज्या वेळी केवळ ध्येय वस्तूचे भान राहते आणि साधकाला स्वतःचेही भान राहत नाही अशा द्वंद्वातीत एकाग्र अवस्थेला समाधि म्हणतात असे वर्णन गरुडपुराणात आढळते. याव्यतिरिक्त अन्यही पुराणांमध्ये केले गेलेले समाधिचे वर्णन योगसूत्रातील वर्णनाशी मिळतेजुळते आहे.
योगदर्शनामध्ये वर्णिलेल्या चित्तविक्षेप (एकाग्रतेतील अडथळे), वेगवेगळ्या सिद्धी, शरीरातील चक्रे, कर्मसिद्धान्त, योगचिकित्सा, योगाभ्यासाचे नियम, क्लेश इ. विषयांचे विवेचन पुराणांमध्येही आढळते.
पहा : पुराणे व उपपुराणे.
संदर्भ :
- ब्रह्मलीन मुनि, स्वामी,पातञ्जलयोगदर्शनम्: व्यासभाष्य सहित शोधपूर्ण संस्करण, चौखम्भा प्रकाशन, वाराणसी, २०१०.
- Banerji, S. C., Studies in the Mahāpurāṇas, PunthiPustak, Calcutta, 1991.
- Bhatt, G. P. (Ed.), Ancient Indian Tradition and Mythology (in volumes), Motilal Banarasidass, Delhi.
- Pai, G. K., Yoga Doctrines in Mahāpurāṇa-s, Bhandarkar Oriental Research Institute, Pune, 2007.
- Rocher, Ludo, The Purāṇas,A History of Indian Literature, Vol. 2, Ed. by Jan Gonda, Otto Harrassowitz, Wiesbaden, 1986.
समीक्षक : राजश्री खडके
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.