फर्जंद, कोंडाजी : (मृत्यू १६८२). शिवकालीन इतिहासातील एक पराक्रमी योद्धा, निष्ठावान सरदार आणि गनिमी काव्यातील निष्णात सेनानी. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या कार्यकाळात त्यांनी आपल्या शौर्याचा ठसा उमटवला. स्वराज्याच्या इतिहासात ‘पन्हाळगडचा विजय’ (१६७३) आणि ‘जंजिरा मोहीम’ (१६८२) या दोन अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रोमांचक ऐतिहासिक घटनांशी कोंडाजींचे नाव अजरामर झाले आहे. कोंडाजी फर्जंद यांच्या संदर्भात कागदपत्रांच्या अभावी विस्तृत माहिती प्राप्त होत नाही. काही कागदपत्रामध्ये ‘फर्जंद’ उपाधी असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे कोंडाजी यांचे आडनाव काय, किंवा त्यांच्या जीवन चरित्राबद्दल इतर माहिती मिळत नाही.
अफझलखानाच्या वधानंतर २८ नोव्हेंबर १६५९ रोजी पन्हाळगड प्रथमच स्वराज्यात आला. मात्र, १६६० मध्ये सिद्दी जौहरच्या प्रदीर्घ वेढ्यामुळे आणि पावनखिंडीच्या बलिदानानंतर हा किल्ला पुन्हा विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. तब्बल १३ वर्षे पन्हाळा स्वराज्यापासून दूर होता. कोल्हापूर प्रांतात वर्चस्व राखण्यासाठी आणि स्वराज्याचा दक्षिण विस्तार सुरक्षित करण्यासाठी पन्हाळा ताब्यात असणे ही छ. शिवाजी महाराजांसाठी एक सामरिक गरज होती. पन्हाळ्याचे भौगोलिक स्थान असे होते की, तेथून कोकणातील व्यापारी मार्गांवर आणि विजापूरच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे सुलभ होते.
सिद्दी जौहरने पन्हाळगड स्वराज्यातून हिरावून घेतल्यापासून तो किल्ला परत मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड उत्सुक होते. तानाजी मालुसरे यांनी सिंहगड जिंकल्यानंतर महाराजांनी पन्हाळ्यावर आपले लक्ष केंद्रित केले आणि ही जबाबदारी आपले विश्वासू सरदार अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांच्यावर सोपवली. मोहिमेच्या गांभीर्याची जाणीव असल्याने, महाराजांनी मोहिमेपूर्वीच कोंडाजींना सोन्याचे कडे देऊन त्यांचा सन्मान केला. कोंडाजींसोबत गणोजीमामा आणि मोत्याजीमामा रवलेकर हे दोन बलदंड सरदार व निवडक मावळे देण्यात आले होते. पन्हाळ्यावर पहारेकऱ्यांचा नाईक बाबू खान याच्या नेतृत्वाखाली सु. २५०० सैनिकांचा कडा पहारा होता. एवढ्या मोठ्या सैन्याशी समोरासमोर लढणे अशक्य असल्याने कोंडाजींनी मानसिक युद्ध आणि भेदनीतीचा अवलंब केला. त्यांनी किल्ल्यातील शिबंदीमधील काही लोकांना आधीच फितवून ठेवले होते.
कोंडाजींनी ६ मार्च १६७३ च्या अंधाऱ्या रात्री केवळ ६० निवडक मावळ्यांसह पन्हाळ्याच्या पश्चिमेकडील पुसाटी बुरुजाकडील दुर्गम कड्यावरून दोरखंडांच्या साहाय्याने चढाई केली. गडावर पाऊल ठेवताच मावळ्यांनी अचानक शिंगे, तुताऱ्या आणि रणवाद्ये वाजवण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीच्या त्या शांततेत झालेल्या प्रचंड गर्जनेमुळे शत्रूला असा भास झाला की जणू हजारो मराठा सैन्य गडावर घुसले आहे. याच गोंधळाचा फायदा घेत कोंडाजी थेट किल्लेदारावर तुटून पडले आणि आपल्या तीक्ष्ण तलवारीने त्याचा शिरच्छेद केला. किल्लेदाराचा अंत होताच आदिलशाही सैन्याची दाणादाण उडाली आणि अवघ्या साडेतीन तासांत मराठ्यांनी पन्हाळा काबीज केला.
पन्हाळा विजयासंबंधीची विस्तृत माहिती जयराम पिंडे कृत ‘पर्णालपर्वतग्रहणाख्यान’ या ग्रंथात आहे, ‘धन्याच्या कामी साह्य करणारे ते मोठ्या मेटाकुटीने व प्रयासाने पन्हाळगडाच्या पायथ्याशी पोचले व तुटलेल्या कड्याजवळ आले. लोकालोका पर्वताप्रमाणे उंच अशा त्या कड्याकडे वर पाहिले तेव्हा सर्वत्र गडाची उंचीच उंची पाहून त्यांचा गर्व नाहीसा झाला. नंतर काही लोकांनी एकमेकांच्या साहाय्याने व शिड्यांचा वापर करून गडाची माची गाठली.’ या विजयाची बातमी जासुदाने रायगडावर पोहोचवताच महाराजांनी त्याला १०० होन बक्षीस देऊन त्याचे तोंड गोड केले आणि तोफा डागून विजयाचा आनंद साजरा केला. ९ मार्च १६७३ रोजी स्वतः महाराज पन्हाळगडावर आले आणि त्यांनी कोंडाजींच्या अतुलनीय शौर्याचा गौरव केला. महाराजांनी पन्हाळ्याचे मजबुतीकरण केले. पुढे हा किल्ला स्वराज्याची दक्षिणेकडील राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यरक्षणाची जबाबदारी छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावर आली. त्या वेळी जंजिऱ्याचा सिद्दी स्वराज्यासाठी एक मोठे आव्हान ठरत होता. जंजिरा जिंकणे हे केवळ लष्करी बळावर शक्य नसल्याने, संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंद यांच्यावर एक अत्यंत धाडसी आणि गुप्त मोहिमेची जबाबदारी सोपवली. कोंडाजी आपले काही विश्वासू मावळे घेऊन जंजिऱ्याचा किल्लेदार सिद्दी खैरतखान याच्याकडे आश्रयाला गेले. या मोहिमेचा मुख्य उद्देश जंजिऱ्यावरील दारूगोळ्याचे कोठार उडवून देणे हा होता, जेणेकरून गडाबाहेरून मराठा नौदलाला हल्ला करणे सोपे जाईल. कोंडाजींनी अत्यंत सावधगिरीने गडाच्या अंतर्गत भागाची माहिती गोळा केली होती. मात्र, मोहीम यशाच्या उंबरठ्यावर असतानाच एका फितुरीमुळे सर्व नियोजन कोलमडले. सिद्धीने तात्काळ कोंडाजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कैद केले. या कठीण प्रसंगीही कोंडाजींनी मोठ्या धैर्याने शत्रूचा सामना केला. अखेर अमानुषपणे त्यांचा शिरच्छेद करण्यात आला (१६८२).
कोंडाजी फर्जंद यांच्या बलिदानाची विशेष नोंद ‘चिटणीस बखरी’मध्ये आढळते. त्यांचे बलिदान स्वराज्यासाठी असलेल्या त्यांच्या अढळ निष्ठेचे प्रतीक मानले जाते.
संदर्भ :
- गोखले, कमल, ‘शिवपुत्र संभाजी’, ज्ञान-विज्ञान विकास मंडळ, पुणे, १९७१.
- दिवेकर, स. म., संपा., ‘जयरामकविविरचित पर्णालपर्वतग्रहणाख्यान’, कल्याण, १९२७.
- साने, काशिनाथ नारायण, संपा., ‘श्री मल्हार रामराव चिटणीस विरचित श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि थोरले छत्रपती राजाराम महाराज यांचे चरित्र’, वरदा प्रकाशन, पुणे, १९१५.
समीक्षक : संदीप परांजपे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.