ख्रिस्ती धर्मदूत व येशू ख्रिस्तांचे मुख्य बारा संदेष्टे. ‘अपॉस्टॉलस’ या ग्रीक शब्दावरून ‘अपॉसल’ ही संज्ञा आली असून तिचा अर्थ ‘पाठविलेली व्यक्ती’ असा होतो. ‘अपॉसल’ म्हणजे प्रेषित नव्हे (ख्रिस्ती लोक सर्व भारतीय भाषांतून ‘अपॉसल’साठी ‘प्रेषित’ ही संज्ञा वापरतात). ‘शिष्य’ हा शब्द शिकणार्याचा अथवा अनुयायाचा उल्लेख करतो. ‘प्रेषित’ म्हणजे “ज्याला पाठविण्यात आले आहे” असे. येशू ख्रिस्तांनी निवडलेले बारा शिष्य त्यांचे अनुसरण करीत; ते त्यांच्यापासून शिकले व प्रशिक्षण घेतले. या बारा शिष्यांकडे सुवार्ता पसरवण्याची जबाबदारी देण्यात आली. ‘नव्या करारा’च्या पाचव्या पुस्तकात मूळ बारांखेरीज पॉलप्रभृती इतर शिष्यांनाही अपॉसल्स संबोधण्यात आले. शेवटी पाचव्या शतकात चर्चचे मुख्याधिकारी बिशप यांनाही अपॉसल म्हणण्यापर्यंत या शब्दाचा अर्थ ताणला गेला. मूळ बारा अपॉसल्सपुरताच तो मर्यादित ठेवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.
‘बायबल’ मत्तय १०:२-४ ह्या वचनांत मूळ शिष्यांची/प्रेषितांची यादी मांडली आहे. तसेच ‘बायबल’ मार्क ३:१३–१६ आणि लूक ६:१३–१६ या वचनांत देखील शिष्यांची/प्रेषितांची यादी मांडली आहे. त्या बारा शिष्यांची/प्रेषितांची नावे अशी : सेंट पीटर, सेंट अँड्र्यू, सेंट जेम्स, सेंट जॉन, सेंट फिलिप, सेंट बार्थोलोम्यू, सेंट थॉमस, सेंट मॅथ्यू, सेंट जेम्स, सेंट सायमन, सेंट थडीअस, सेंट यहुदा इस्कर्योत (नंतर यहुदा इस्कर्योतच्या जागी मथियास).
हे बारा शिष्य/प्रेषित सर्वसाधारण लोक होते. ज्यांचा देवाने असाधारणरित्या उपयोग केला. त्या बारा शिष्यांत मच्छीमार, जकातदार, क्रांतिकारी इ. होते. शुभवर्तमानात येशू ख्रिस्तांचे अनुसरण करणार्या या बारा शिष्यांच्या चुका, संघर्ष आणि शंकांचे लिखाण आहे. येशू ख्रिस्तांचे पुनरुत्थान आणि स्वर्गारोहण यांची साक्ष दिल्यानंतर, पवित्र आत्म्याने या शिष्यांत/प्रेषितांत बदल घडवून आणला आणि त्यांस देवाचे असे सामर्थ्यवान सेवक बनविले.
संदर्भ :
- Albright, F. William; Mann, C. S. Matthew ‘The Anchor Bible Series’, Vols. 26, New York, 1971.
- Clarke, Howard W. The Gospel of Matthew and its Readers : A Historical Introduction to the First Gospel, Bloomington, 2003.
- Eduard, Schweizer, The Good News According to Matthew, Atlanta, 1975.
- France, R. T. The Gospel Acording to Matthew : An Introduction and Commentary, Leicester, 1985.
समीक्षक : आनंद गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.