देसाई, वसंत कृष्णाजी : (? जून १९१२ – २२ डिसेंबर १९७५). भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संगीतदिग्दर्शक. त्यांचा जन्म सोनवडे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे झाला. त्यांचे वडील कृष्णाजी व आई मुक्ताबाई. मुक्ताबाई या आबा भास्कर परुळेकर या प्रसिद्ध कीर्तनकारांच्या कन्या. त्यामुळे लहानपणापासून वसंत यांच्या कानावर भजन, कीर्तन, दशावतारी संगीत आले व त्याची गोडीही लागली. त्यांचे शालेय शिक्षण गावीच झाले. सर्कशीत जावे असे त्यांना लहानपणी वाटत होते, म्हणून ते कोकणातून कोल्हापुरास त्यांचे काका नरहरी यांच्याकडे आले (१९२९) परंतु सर्कशीत न जाता प्रभात फिल्म कंपनीत गेले. मूकपटांतून किरकोळ भूमिकाही त्यांनी केल्या. १९३० मध्ये प्रभातच्या खूनी खंजर या मूकपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्याच सुमारास प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा (१९३१) या पहिल्या बोलपटात त्यांनी संगीतदिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांचे साहाय्यक म्हणून काम केले. तर १९३४ साली प्रभात फिल्म कंपनीचे कोल्हापुराहून पुण्यास स्थलांतर झाल्यावर वसंतरावांनी केशवराव भोळे आणि मा. कृष्णराव फुलंब्रीकर यांच्यासारख्या संगीत-अभ्यासकांबरोबर साहाय्यक म्हणून काम केले. त्यांच्या सहवासात राहून त्यांनी गाण्यातील स्वर, तान, मुरकी इ. संगीत-विशेष संपादन केले व रसानुकूल भावदर्शन आपल्या गाण्यात आणण्याचे कसब दाखविले तसेच स्वतंत्र स्वररचनेचे तंत्रही त्यांनी हाताळले. कोल्हापुरातील वास्तव्यात ते गायन समाज देवल क्लब या संगीत संस्थेत जात असत. तेथे त्यांना शास्त्रीय संगीतातील दिग्गज उस्ताद अलाउद्दीनखाँ, उस्ताद अब्दुलकरीमखाँ, उस्ताद मंजीखाँ आणि रामकृष्णबुवा वझे यांचा सहवास लाभला. याचाही परिणाम त्यांची शास्त्रीय संगीतातील रूची वाढण्यात झाला.
प्रभातच्या संत ज्ञानेश्वर आणि संत सखू या गाजलेल्या चित्रपटांच्या काही चाली व बरेचसे पार्श्वसंगीत वसंत देसाई यांचे आहे. त्याच वेळी देसाई यांनी प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटांसाठी पार्श्वगायनही केले व चित्रपटांतून भूमिकाही ते करीत होते. प्रभातच्या धर्मात्मामधील राणू महार आणि संत ज्ञानेश्वरमधील भैरू गाडीवान या त्यांच्या विशेष लक्षात राहण्यासारख्या भूमिका होत. हलक्याफुलक्या संगीतापेक्षा रागदारी संगीतामध्ये त्यांना विशेष गोडी असल्यामुळे प्रभात फिल्म कंपनीत असतानाच त्यांनी इनायत खाँसाहेब यांच्याकडे शास्त्रोक्त संगीताची साधना केली. तसेच ख्यातनाम गवयांच्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका वारंवार ऐकून व विविध घराण्यांच्या गायकांच्या बैठकांना जाऊन संगीतातील मर्म समजावून घेण्याचेही त्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यांच्या गाण्याच्या बैठकीही त्या काळात होत असत. १९३९ मध्ये ते प्रभात फिल्म कंपनी सोडून मुंबईला आले.
व्ही. शांताराम यांच्या राजकमल कला मंदिराच्या शकुंतला (१९४३) चित्रपटापासून खऱ्या अर्थाने त्यांना स्वतंत्र संगीतदिग्दर्शनाची संधी मिळाली. त्यानंतर ३२ वर्षे त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपट, नाट्यकृती, बालगीते, समरगीते यांना उत्कृष्ट संगीत दिले. दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या बहुतेक चित्रपटांना देसाईंनी संगीत दिले आहे. त्यांनी संगीत दिलेली सुंदरा मनामध्ये भरली (लोकशाहीर रामजोशी, १९४७); घनश्याम सुंदरा, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला (अमर भूपाळी, १९५१); छडी लागे छमछम, भरजरी गं पितांबर (श्यामची आई, १९५३) इत्यादी मराठी आणि झनक झनक पायल बाजे, जो तुम तोडो पिया (झनक झनक पायल बाजे, १९५५) ; ऐ मालिक तेरे बंदे हम, सैया झूठो का बडा सरताज निकला (दो आँखे बारह हाथ, १९५७); तेरे सूर और मेरे गीत, अखियाँ भूल गयीं है सोना (गूँज उठी शहनाई, १९५९); जीवन से लंबे है बंधू, रेल गाडी (आशीर्वाद, १९६८) व बोले रे पपीहरा, हमको मन की शक्ति देना (गुड्डी, १९७१) इत्यादी हिंदी गाणी विशेष गाजली. अमर भूपाळी या चित्रपटाच्या बंगाली रूपांतरातही संगीत वसंत देसाई यांचेच आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनाप्रसंगी त्यांनी चाल दिलेली ‘घन:श्याम सुंदरा’ ही भूपाळी म्हटली गेली. ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ या त्यांनी स्वरबद्ध केलेल्या गीताने पाकिस्तानात आकाशवाणीवर व शाळांतून प्रार्थनेचा दर्जा संपादन केला. त्यांनी सुमारे ४५ हिंदी व २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. या संगीतात रागदारीबरोबरच महाराष्ट्राच्या लोकगीतांचाही आविष्कार त्यांनी घडविला होता. त्यामुळेच भारतातील सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत दिग्दर्शक म्हणून वसंत देसाई यांचा लौकिक झाला. त्यांच्या संगीताने आपले स्वत:चे वेगळेपण टिकवून ठेवले होते. त्यांच्या गाण्यात त्यांनी शास्त्रीय संगीताचा खुबीने वापर केला. गीतकार गुलजार यांनी निर्मिती केलेल्या अचानक (१९७४) या चित्रपटास देसाईंनी पार्श्वसंगीत दिले होते. या चित्रपटात गाणी नव्हती. वसंत देसाई यांच्या स्वरसाजाने समृद्ध झालेल्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाने मराठी रंगभूमीची संगीतपरंपरा पुन्हा सुरू झाली. या नाटकातील जय गंगे भागिरथी आणि नयन तुझे जादुगार ही गाणी खूप गाजली. याशिवायही जय जय गौरीशंकर, देव दीनाघरी धावला, देह देवाचे मंदिर, शाबास बिरबल इत्यादी नाटकांना त्यांनी संगीत दिले.
१९६२ मधील चीनच्या आक्रमणाच्या वेळी देसाई यांनी स्वरबद्ध केलेले ‘जिंकू किंवा मरू’ हे ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले समरगीत विशेष लोकप्रिय ठरले. ते महाराष्ट्र राज्य शासनाचेही संगीतदिग्दर्शक होते. त्यांनी संगीत दिलेल्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत. १९७१ साली त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविले; १९७३–७४ मध्ये त्यांना मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. राज्यपालांनी त्यांची नियुक्ती १९७५ मध्ये विधान परिषदेवर केली होती.
साधा पोषाख, निगर्वी स्वभाव व हसरा चेहरा हे त्यांचे व्यक्तिमत्त्वविशेष. ते अविवाहित होते. अशा या गुणी संगीततज्ञाला मुंबई येथील पेडर रोडवरील त्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीत वयाच्या एकसष्टाव्या वर्षी लिफ्टमध्ये अपघाती मरण आले.
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.