पुरातत्त्वविद्येची एक महत्त्वाची उपशाखा. पुरातत्त्वीय उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा अर्थ लावणे आणि प्राचीन काळातील धार्मिक-सामाजिक जीवन व विविध सांस्कृतिक घटनांचा मागोवा घेणे यासाठी ही शाखा उपयोगी पडते. विविध पुरास्थळांवर मिळणार्‍या अवशेषांचा अभ्यास करून पुरातत्त्वविद्येत प्राचीन काळातील धार्मिक-सामाजिक जीवन व चालीरिती यांसंबंधी निष्कर्ष काढले जातात. तथापि पुरातत्त्वविद्या ही शोधावर आधारलेली असल्यामुळे संस्कृतीमधील अशा अभौतिकी आणि अव्यक्त (intangible) परंतु महत्त्वाच्या पैलूंचे आकलन होण्यासाठी आवश्यक भौतिक पुरावे प्रत्यक्ष वस्तूंच्या स्वरूपात प्रत्येक पुरास्थळावर मिळतातच असे नाही. पुरातत्त्वीय संशोधन पद्धतीमधील ही त्रुटी दूर करण्याच्या उद्देशाने लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व ही उपशाखा उदयास आली. लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व या संज्ञेचा वापर सर्वप्रथम एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अमेरिकन इंडियन लोकांचा अभ्यास करताना जेसे फ्युकेस (१८५०—१९३०) या अमेरिकन मानवशास्त्रज्ञांनी केला.

समकालीन लोकसमूहांमधील भौतिक घटकांचे त्यांच्यातील सामाजिक, आर्थिक, वैचारिक, धार्मिक, तंत्रज्ञानविषयक आणि पर्यावरणीय पैलूंशी असणार्‍या संबंधांचे निरीक्षण करणे हा लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वाचा मुख्य गाभा आहे. समाजशास्त्रामध्ये किंवा अर्थशास्त्रीय अभ्यासातदेखील लोकसमूहांच्या पाहणीचे व निरीक्षणाचे हे तंत्र वापरले जाते. तथापि अशा निरीक्षणांपेक्षा लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व वेगळे असून त्यात विशिष्ट पुरातत्त्वीय समस्यांची उकल करणे हा मुख्य विचार असतो. लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वातील निष्कर्ष हे तर्कशास्त्रातील साम्यानुमान (Analogical reasoning) या पद्धतीवर आधारित असतात. लोकजीवनशास्त्रीय निरीक्षणांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुरातत्त्वीय सिद्धांतकल्पना मांडणे आणि ही सिद्धांतकल्पना  पुरातत्त्वीय पुराव्यांच्या उपयोग करून पडताळून पाहणे, या प्रकारे साम्यानुमान पद्धती वापरली जाते. पुरातत्त्वीय पुराव्यांचा अर्थ लावताना मूळ मानवी वर्तन अथवा घटना घडल्यानंतर त्यांचे अवशेष उपलब्ध होणे या दरम्यान जे काही घडले त्याचा विचार करणे गरजेचे असते. प्राचीन काळातील मानवी जीवन ते पुरातत्त्वीय अवशेषात परिवर्तन होणे या प्रक्रियेवर परिणाम करणार्‍या घटकांच्या संदर्भात मायकेल शिफर या अमेरिकन पुरातत्त्वज्ञांनी मांडलेल्या एन-ट्रान्सफॉर्म (नैसर्गिक घटक) आणि सी-ट्रान्सफॉर्म (सांस्कृतिक घटक) या संकल्पना महत्त्वाच्या मानल्या जातात.

लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वात महत्त्वाची भर अनेक मानवशास्त्रज्ञ आणि पुरातत्त्वज्ञांच्या कामामुळे १९६०-१९७० या दशकानंतर पडली. या काळात रिचर्ड गूड यांचे ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटातील आदिवासींवरील संशोधन, जॉन येलेन (जन्म १९४१) यांची आफ्रिकेच्या कलहारी  वाळवंटातील बुशमन आदिवासींसंबंधी लोकजीवनशास्त्रीय अनुमाने, लुइस बिनफोर्ड (१९३१—२०११) यांचे अलास्कातील नुनामियुट (Nunamiut) शिकार व अन्न गोळा  करून जगणार्‍या आदिवासींवरील संशोधन, ब्रिटीश पुरातत्त्वज्ञ इयन हॉडर (जन्म १९४८) यांचा केनियातील विविध आदिवासीच्या अलंकाराचा अभ्यास ही लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वाची ठळक उदाहरणे आहेत.

एम. एल. के. मूर्ती (१९४१—२०१६), वीरेंद्रनाथ मिश्र (१९३५—२०१५) आणि मालती नागर (१९३४—२०११) या तीन पुरातत्त्वज्ञांनी भारतात लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्वाचा पाया घातला. एम. एल. के. मूर्ती यांचे आंध्र प्रदेशातील शिकार व अन्न गोळा  करून जगणार्‍या यनाडी, चेंचू, येरुकुला आणि बोया या आदिवासींवरील संशोधन (१९८१) आणि कर्नुल भागातील संशोधन (१९८५) हा महत्त्वाचा टप्पा आहे. गोंड, पारधी, वनवाघरी, कंजार, काळबेलीया, भिल्ल आणि कुचबंदी या अशा अनेक जमातींच्या लोकजीवनाचा पुरातत्त्वीय दृष्टीकोनातून अभ्यास करणे हे वीरेंद्रनाथ मिश्र आणि मालती नागर यांचे महत्त्वाचे योगदान आहे.

संदर्भ :

  • David, N. & C. Kramer, Ethnoarchaeology in Action, Cambridge, 2001.
  • Fewkes, J. W. ‘The prehistoric culture of Tusayan’, American Anthropologist, 9 : 151-173, 1896.
  • Murty, M. L. K. ‘Hunter-Gatherer Ecosystems and Archaeological Patterns of Subsistence Behaviour on the South-East Coast of India : An Ethnographic Model’, World Archaeology, 13 (1) : 47-58, 1981.
  • Murty, M. L. K. ‘Ethnoarchaeology of the Kurnool cave areas, South India’, World Archaeology, 17(2) : 192-205, 1985.
  • Nagar, Malti, Hunter-Gatherers in North and Central India : An Ethnoarchaeological Study, British Archaeological Reports International Series, 2008.

                                                                                                                                                                                  समीक्षक : सुषमा देव