गरम झऱ्याच्या म्हणजे उन्हाळ्याच्या (Hot springs) वाफमिश्रित पाण्याद्वारे निक्षेपित झालेल्या (साचलेल्या) चुनखडकाच्या प्रकारास ट्रॅव्हर्टाइन म्हणतात. हा खडक प्राचीन काळापासून सुशोभित इमारत बांधकामासाठी जगभर वापरला जातो. बांधकामाचा दगड या अर्थाच्या इटालियन शब्दावरून ट्रॅव्हर्टाइन हे नाव प्रचलित झाले. इटलीमधील ‘कोलिझियम’ ही प्रसिद्ध प्राचीन इमारत व अलीकडील लॉस अँजेल्स (अमेरिका) येथील गेट्टी (Getty) संग्रहालय याच खडकांनी बांधलेले आहे.
चुनखडक असणाऱ्या भागातील कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त भूजलात कॅल्शिअम कॉर्बोनेट विरघळते. असे संपृक्त भूजल उन्हाळ्याच्या रूपाने जेंव्हा भूपृष्ठावर येते, तेंव्हा त्यातील आंशिक दाब कमी झाल्याने त्यातून काही कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. त्यामुळे हे पाणी कॅल्शिअम कॉर्बोनेटने जास्त संपृक्त होते. अशा पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने अवक्षेपणाने झऱ्यांच्या मुखाशी आणि प्रवाहीत असल्यास प्रवाह मार्गातून कॅल्शिअम कॉर्बोनेट प्रामुख्याने आडव्या स्तरित रूपात निक्षेपित होत जाते आणि ट्रॅव्हर्टाइन चुनखडक तयार होतो. या खडकाचे वयन (पोत) तंतुमय व संगमरवरासारखे आहे. परंतु संरचनेत विविधता दिसून येते. हा काहीसा घट्ट व गुठळ्याच्या रूपात आढळतो. काही वेळा यांत पाने व फांद्या यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळतात. जेव्हा यामधे मॅक्रोफाइट, ब्रायोफाइट, अल्गी अशा प्रकरांच्या वनस्पतींची जीवाश्मे आढळतात, तेंव्हा ह्यात स्पंजासारखी सछिद्रता येते. अशा स्पंजी सछिद्र ट्रॅव्हर्टाइनला टूफा (Tufa) म्हटले आहे.
मलिनद्रव्यांमुळे ट्रॅव्हर्टाइनला सुंदर पिवळसर, गुलाबी छटा येतात. कधीकधी हा पट्टेदार किवा दुधी काचेप्रमाणे पारभासी असतो. लोहामुळे याला लालसर, तपकिरी वा पिवळसर रंग प्राप्त होतो. चुनखडकांमधून वाहणाऱ्या नदीमुळे ट्रॅव्हर्टाइनचे असमान जाडींची थर निर्मिती झाल्या ठिकाणी कमी उंचीचे धबधबे तयार होताना आढळतात. न्यू मेक्सिको येथील तिजेरसजवळ अशा धबधब्यांमधे पाय रपेट (Hiking), फरफटत जाणे (Trail running) यासारखी मौज पर्यटकांना आकर्षित करते.
रोम (इटली), ओव्हर्न (फ्रांस), यलोस्टोन नॅशनल पार्क (अमेरिका) इत्यादि ठिकाणी ट्रॅव्हर्टाइचे साठे आहेत. भारतात ओरिसा राज्यात ट्रॅव्हर्टाइन निक्षेपित झाल्याबद्दल संशोधन झाले आहे. बांधकामाबरोबरच याचा उपयोग अंतर्गत सजावटीसाठीसुद्धा करतात. झिलइ केलेले पट्टेदार ट्रॅव्हर्टाइन हे ऑनिक्स मार्बल (Onyx marble) किंवा ईजिप्शियन ॲलॅबॅस्टर (Egyptian alabaster) या नावांनी दागिन्यात वापरतात. काही वेळा कॅल्क सिंटर (Calc sinter) या समशब्दाने याचा चुकीने उल्लेख होतो. कॅल्क सिंटर हे झर्यांच्या थंड पाण्यात अवक्षेपित होतात, तर ट्रॅव्हर्टाइन गरम पाण्यामध्ये अवक्षेपित होतात.
समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर