पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या भूशास्त्रीय घटनाक्रम इतिहास काळात विविध शैल प्रणाली (System) निर्माण झालेल्या आहेत. मुख्य दोन शैल संघ (Group) किंवा प्रणालीमध्ये किंवा एकाच कालखंडातील शैल संघ – प्रणालीमधील श्रेणी (Series) व अवस्था (Stage) यांच्यामधील सलग आणि सतत चालणार्या निर्मिती प्रक्रियांमध्ये – काळामध्ये (उदा., निक्षेपण (Deposition), अग्निज अभिस्थापना – अंतर्भेदन – बहि:स्त्राव (Igneous emplacement – intrusion – extrusion), कोणत्याही विवर्तनीक (Tectonic), संरचनी/संरचनात्मक (Structural) हालचाली इ.) जेव्हा काही नैसर्गिक कारणांमुळे खंड पडतो आणि ती प्रक्रिया थांबते व त्या ठिकाणी अपक्षरण क्रिया चालू होऊन अपक्षरण पृष्ठ तयार होते, तेव्हा त्याला अभिविसंगती/विसंगती/अप्रासंगिकता म्हणतात. हा भूशास्त्रीय अपक्षरणीय खंडित काळ समाप्त झाल्यावर शैलनिर्मिती प्रक्रियांची पुन:स्थापना होऊन भूशास्त्रीय कालचक्र पुढे सुरू राहते. या अपक्षरण पृष्ठावरती पिंडाश्म आणि प्रसंगी संकोणाश्म खडक तयार झालेले दिसून येतात. त्यामुळे यांचा आढळ हा क्षेत्रिय पाहणीत विसंगती शोधण्यासाठी सूचक मानला जातो.
पृथ्वीच्या कवचामध्ये प्रस्थापित, घनीभूत अशा सर्वांत प्राचीन आद्य महाकल्पातील (आर्कियन व धारवाड संघ – प्रणाली) अग्निज व रूपांतरित आधारभूत शैल/खडकांच्या दीर्घकालीन क्षरणातून तयार झालेले अवसाद (Sedimentary material) हे खोलगट समुद्री भागातून निक्षेपित झाल्यावर कालांतराने त्यांचे अवसादी खडक तयार झाले आणि त्यांचे पुढे सौम्य रूपांतरण (Metamorphism) झाले. त्या कालखंडाला प्रागजीव (प्रोटिरोझोइक; Proterozoic) महाकल्प संबोधतात आणि त्यातील खडकांना कडाप्पा (शैल) (अधि) महासंघ (Cuddapah super group). अशा तऱ्हेने सर्वांत प्राचीन आणि भूशास्त्रीय कालखंडात प्रथमत: तयार झालेल्या अभिविसंगतीस आद्य महाकल्पोत्तर अभिविसंगती किंवा आर्कियन कालोत्तर महान विसंगती असे म्हटले जाते.
आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरुमला डोंगररांगांमध्ये दिसणारी ही अभिविसंगती, प्रागजीव महाकल्पातील, कडाप्पा (अधि) महासंघातील नागरी क्वॉर्ट्झाइट आणि सर्वांत प्राचीन पायाभूत आर्कियन (अधि) महासंघातील ग्रॅनाइट यांना वेगळे करते. भूशास्त्रीय कालखंडातील या दोन महत्त्वाच्या शैल (अधि) महासंघातील – प्रणालीतील निर्मिती फरक हा ८०० द.ल. वर्षे/८० कोटी वर्षे पेक्षा जास्त आहे. ही अभिविसंगती तिरुपती शहराच्या उत्तर – पश्चिमेला/वायव्येला १० किमी. वर असलेल्या तिरुमला डोंगरामध्ये तिरुमला – तिरुपती घाटरस्त्यावरील १२ किमी. स्थानावर पाहावयास मिळते.
संदर्भ :
समीक्षक : पी. एस. कुलकर्णी