ज्या माशांच्या शरीराचा अंत:कंकाल हाडांनी म्हणजे अस्थींनी बनलेला असतो, त्यांना अस्थिमत्स्य (Osteichthyes Or Bony fish) असे म्हणतात. मत्स्य अधिवर्गाचा अस्थिमत्स्य हा एक वर्ग आहे. Osteon (bone) म्हणजे हाडे किंवा अस्थी आणि ichthys (fish) म्हणजे मासा या दोन शब्दांपासून Osteichthyes म्हणजे अस्थिमीन किंवा अस्थिमत्स्य हा शब्द तयार झाला आहे. यातील मासे सागरी व गोड्या पाण्यात विपुल संख्येने आढळतात. पृष्ठवंशी प्राण्यांतील हा सर्वांत मोठा वर्ग असून यामध्ये ४५ गण, सु. ४३५ कुले आणि सु. २९,००० जातींचा समावेश होतो. अस्थिमत्स्यामध्ये स्थिर शीर्ष अस्थी व बळकट जबड्याचे स्नायू असतात. डोळ्याच्या पारपटलामागे आधारासाठी चार दृढ अस्थी (Sclerotic plates) असतात. कर्णावर्तामध्ये (Cochlea) दोन मोठे कर्णाश्म असतात. शरीरामध्ये वाताशय असते. वाताशयापासून उत्क्रांतीमध्ये फुप्फुसे विकसित झाली आहेत. त्यामुळे वायूंची देवाणघेवाण सुलभ होते. वाताशायामुळे पाण्यात ठराविक खोलीवर स्थिर राहणे व पाण्यात न बुडणे हे उत्प्लावन (Buoyancy) क्षमतेमुळे शक्य होते.
या माशांच्या परांना आधारासाठी काटे नसतात, तर त्या ऐवजी पर अर (Fin ray) असतात. पर अर नाजूक परांना दृढता देतात. या माशांना कल्ल्यांच्या ४ जोड्या असून त्यावर संरक्षक प्रच्छद (Operculum) आवरण असते. मुखावाटे पाणी घेऊन ते कल्ला विदरातून (Gill cleft) बाहेर सोडले जाते. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन कल्ल्याद्वारे रक्तात शोषला जाऊन श्वसन सुलभ होते. त्वचा खवलेयुक्त असून खवले चक्राभ (Cycloid), कंकताभ (Ctenoid) व जीनाभ (Genoid) प्रकाराचे असतात. यातील मासे विविधतापी (Poikilothermal) किंवा शीत रक्ताचे असून ते त्यांच्या शरीराचे अंतर्गत तापमान नियंत्रित करू शकत नाहीत. काही ट्यूना व तलवार माशासारखे मोठे सागरी मासे काही थोड्या प्रमाणात अंतस्तापी (Endothermal) असतात. यातील माशांचे हृदय दोन कप्प्यांचे (एक अलिंद व एक निलय) असते. फुप्फुसमीनांमध्ये तीन कप्प्यांचे (२ अलिंद व १ निलय) असते. मध्यवर्ती चेतासंस्था असते. जलीय अधिवासात जगण्यासाठी चेतासंस्थेच्या जोडीला अनेक संवेदी अवयव असतात. पार्श्वरेषेवर द्रवगतिक चेता (Hydrodynamic) असतात. त्यांना चेतातुंगक / धाराग्राही (Neuromasts) म्हणतात. त्यांचा उपयोग पाण्याचा दाब, संवदेना कंपने, विहार व भक्ष्य शोधण्यासाठी होतो. यांच्यात जननरंध्र व गुदरंध्र असते. अवस्कर नसते. यातील बहुतेक मासे एकलिंगी तर काही उभयलिंगी आहेत. यांच्यात बाह्यफलन घडून येते. बरेचशे अंडज असून मादी असंख्य संख्येने अंडी घालते. घोडा माशाच्या प्रजातीतील नरात भ्रूणधानी असते. मादी त्यामध्ये आपली अंडी घालते व त्यातच ती उबवली जातात.
अस्थिमत्स्य वर्गाचे अॅक्टिनोप्टेरिजी (Actinopterygii) आणि सार्कोप्टेरिजी (Sarcopterygii) असे दोन उपवर्ग आहेत.
(अ) अॅक्टिनोप्टेरिजी (Ray-finned fish) : या माशांच्या परांमध्ये अस्थिमय धागे असतात. या गटातील माशांच्या परांतील पर अर खालील अस्थींना सरळ जोडलेले असतात. वक्ष पर व श्रोणी पर शरीर मेखलेला जोडलेले असतात. जवळजवळ ३०,००० मत्स्य अधिवर्गातील ९९% जाती अॅक्टिनोप्टेरिजी उपवर्गातील आहेत. सागरी, गोड्या व निमखाऱ्या अशा विविध क्षारतेत हे मासे आढळतात. यांचे अधिवास हिमालयातील प्रवाहापासून सर्व खंडांतील समुद्राच्या पाण्यातील विविध खोलीवर आढळून येतात. यातील माशांच्या आकारात व आकारमानात विविधता आढळते. पीडोसायप्रिस प्रोजेनेटिका (Paedocypris progenetica) ही सर्वांत लहान प्रजाती ८ मिमी. लांबीची आहे. तर सर्वांत मोठा सागरी सूर्यमासा (Ocean sunfish) असून त्याची लांबी सु. ४ मी. व वजन सु. २,००० किग्रॅ. असते. तर फीत माशाची (Oarfish) लांबी सु. ११ मी. इतकी आढळली आहे.
या उपवर्गातील माशांत जोडीपरांच्या मुळांशी मांसल खंड नसतो. जोडीपर पातळ, रुंद असून सर्व परांमध्ये अस्थिशलाका असतात. याचे विभाजन तीन गणांत केले आहे.
(१) काँड्रास्टिआय (Chondrostei) : यातील माशांचे मुख व डोळे मोठे असतात. शरीरावरील खवले समचतुर्भुजी असतात. उदा., (i) पॉलिप्टेरस (Polypterus) : नाईल बिकिर (Nile bichir), (ii) एसिपेन्सर (Acipenser) : स्टर्जन मासा (Sturgeon fish), पॅडल मासा (Paddlefish).
(२) होलोस्टिआय (Holostei) : यातील माशांचे मुख लहान असते. उदा., (i) एमिया (Amia), (ii) लेपिसोस्टस (Lepisosteus) : गार मासा (Gar fish).
(३) टेलिऑस्टिआय (Teleostei) : यातील माशांचे मुख लहान व अग्र टोकास असते. खवले चक्राभ प्रकारचे असतात. यात सु. ९०% मासे समाविष्ट असून त्यात अनेक उपगण व कुले आहेत. हे मासे आधुनिक व प्रगत मानले जातात. उदा., कॉड, सामन, हेरिंग, कार्प, ट्यूना, ईल, पापलेट, सुरमई, बांगडा, बोंबिल इत्यादी.
(आ) सार्कोप्टेरिजी (Lobe-finned fish) : यातील माशांचे पर मांसल स्नायूंचे असतात. उत्क्रांतीच्या प्रवाहात मांसल पर असणाऱ्या पृष्ठवंशी सार्कोप्टेरिजीपासून उभयचर, सरीसृप, पक्षी आणि सस्तन वर्गाचा उदय झाला आहे. सध्या या गटामध्ये मांसल पर असलेल्या सीलॅकँथ (Coelacanth) आणि फुप्फुसमीन (Lungfish) या केवळ दोनच प्रजाती अस्तित्वात आहेत, त्यांना जिवंत जीवाश्मे या नावाने ओळखले जाते. या गटातील माशांत जोडीपरांच्या मुळाशी एक मांसल खंड असतो. हे जोडीपर पायाप्रमाणे असतात. या उपवर्गाचे विभाजन क्रॉसोप्टेरिजीआय आणि डिप्नोई या दोन गणांत केले जाते.
(१) क्रॉसोप्टेरिजी (Crossopterygii) : यातील माशांच्या जोडीपराच्या मुळाशी एक मांसल खंड असतो. पुच्छपर त्रिखंडित असतो. वाताशय अवशेषांग स्वरूपात असते. उदा., सीलॅकँथ (Coelacanth).
(२) डिप्नोई (Dipnoi) : यातील माशांमध्ये पुच्छपर द्विखंडित असतो. कल्ले आणि वाताशय दोन्हींद्वारे श्वसन होते. वाताशयावर केशवाहिन्यांचे जाळे असून ते फुप्फुसासारखे कार्य करते. या गणास फुप्फुसमीन गण असेही म्हणतात. फुप्फुसमीन प्रथम डेव्होनियन कल्पात (सु. ४२ ते ३६·५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) उत्पन्न झाले पर्मियन आणि ट्रायसिक कल्पांत (सु. २७·५ ते २० कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) त्यांची भरभराट झाली, पण पुढे ते दुर्मिळ झाले. उदा., प्रोटोप्टेरस (Protopterus), लेपिडोसायरन (Lepidosiren).
भारताच्या किनारी प्रदेशात सापडणाऱ्या अस्थिमीन माशांची सखोल माहिती केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन संस्था (CMFRI) या संस्थेने संग्रहित केलेली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारच्या मत्स्य विभागाकडे देखील ती उपलब्ध असते. तसेच अशीच सखोल माहिती फ्रान्सिस डे (Francis Day) यांच्या फिश अँड फिशरी ऑफ इंडिया या पुस्तकात देखील मिळते.
पहा : केंद्रिय सागरी मत्स्य संशोधन संस्था, फीत मासा, फुफ्फुसमीन, मत्स्य अधिवर्ग : वर्गीकरण, सीलॅकँथ.
संदर्भ :
- https://animaldiversity.org/accounts/Actinopterygii/classification/#Actinopterygii
- https://www.britannica.com/animal/bony-fish
- https://seaworld.org/animals/all-about/bony-fish/classification/
समीक्षक : नंदिनी देशमुख