मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यावरील एक महत्त्वाचे कौशल्य. आधुनिक मानव आणि उत्क्रांतीच्या विविध टप्प्यांवर असलेले जीवाश्म स्वरूपातील मानव यांचा अभ्यास केल्यावर असे दिसते की, मानवांमध्ये अमूर्त संकल्पनांचा विचार करण्याची क्षमता असल्याने नवनिर्मितीक्षम व सृजनशील मन हे केवळ मानवी वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मानवांमध्ये विविध प्रकारच्या कला निर्माण झाल्या. सर्व मानवी संस्कृती व लोकसमूहांमध्ये दृश्यकला आणि संगीत, नृत्य व विविध सणसमारंभ (जन्ममृत्यूसह सर्व धार्मिक विधी) यांची सांगड दिसून येते.

कोणत्याही संस्कृतीच्या वाटचालीत नृत्य, संगीतचित्रकला तीन कलांचा मोठा वाटा असतो. अगदी प्राचीन काळापासून मानवाने आपल्या मनातल्या भावभावना प्रकट करण्यासाठी, अतिमानवी दैवी शक्तींना पूजण्यासाठी आणि निखळ मनोरंजनासाठी या तीन कलांचा वापर केला आहे व आजही या कलांना आपल्या सांस्कृतिक जीवनात मोठे स्थान आहे. मानवी मनाची सृजनशीलता आणि सौंदर्य जाणवण्याची व कलेचा आस्वाद घेण्याची क्षमता या दोन खास गोष्टींमधून कलेचा आविष्कार होतो. कला व संस्कृती यांचा विकास एकत्रितपणे झालेला दिसतो. म्हणूनच कोणत्याही समाजात सांस्कृतिक बदलांचे प्रतिबिंब कलेत पडलेले दिसते. तसेच विविध कलांच्या माध्यमातून समाजात बदल घडू शकतात. म्हणूनच  मानवी उत्क्रांतीचा विचार करताना कलेचा अथवा नवनिर्मितीक्षम मनाचा विचार करणे अत्यावश्यक ठरते, कारण मानवी उत्क्रांतीत केवळ जैविक घटना नसून जैविक व सांस्कृतिक बदलांच्या परस्परांवर परिणाम करण्याच्या सहउत्क्रांतीचा तो एकत्रित परिणाम आहे. मानवी उत्क्रांतीच्या प्रदीर्घ प्रवासात कलात्मक वस्तू तयार करण्याची आणि मनातील विचार रंगरेषांच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रारंभ कधी व कसा झाला हे पाहणे मनोरंजक आहे.

विशिष्ट प्रकारचे आवाज काढणे (उदा., पक्ष्यांचे कूजन), ठरावीक प्रकारे नाचल्याप्रमाणे हालचाली करणे आणि चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारे हावभाव करणे हे सगळे मानवेतर प्राण्यांमध्येही आढळते. तो विरुद्धलिंगी जोडीदाराला आकर्षित करण्याच्या खेळातला अथवा प्रतिस्पर्ध्याला घाबरवून पळवून लावण्याच्या युक्तीचा भाग असतो. म्हणूनच मानवांमधील संगीत, नृत्य व अंग रंगवणे यांचे मूळ मानवेतर प्राण्यांपासून झालेल्या उत्क्रांतीत असावे असे वाटते. फरक इतकाच आहे की, मानवात प्रगल्भ व सृजनशील मन तयार होत गेल्याने या सगळ्याचा विकास निराळ्या प्रकारे झाला आणि त्यांना विशिष्ट प्रतीकात्मक अर्थाची जोड मिळाली. उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितले तर जगण्याच्या व टिकून राहण्याच्या झगड्यात कलाकृती निर्माण करणे अथवा कलेसाठी वेळ व संसाधने खर्च करणे या वर्तनाचे स्पष्टीकरण देणे हे एक कोडे आहे. कलेची उत्पत्ती ही लैंगिक जोडीदाराच्या निवड प्रक्रियेशी संबंधित आहे, असे चार्ल्स डार्विन यांनी सुचवले होते. अल्बुकर्क येथील न्यू मेक्सिको विद्यापीठातील जेफ्री मिलर यांनी अशीच कल्पना मांडली आहे. त्यांना वाटते की, कला ही मोराच्या शेपटीमधील रंगीत पिसांसारखी असून ते जैविक दृष्टीने केलेले महागडे प्रदर्शन आहे. मिलर यांच्या अभ्यासातून असे दिसून आले की, बुद्धिमत्ता आणि नवीन अनुभव घेण्यासाठी खुले व्यक्तिमत्त्व असणे या दोन्ही गोष्टी कलात्मक सृजनशीलतेशी संबंधित आहेत; तथापि कलेला केवळ लैंगिक निवड प्रक्रियेत महत्त्व असल्याचे त्यांच्या संशोधनातून सिद्ध झाले नाही. कदाचित उत्क्रांतीच्या प्रवासात कलात्मक मनाचा उगम कोणत्यातरी वेगळ्या कारणाने झाला असावा. कलात्मक मन आणि भाषा वापरण्याचे कौशल्य यांच्यात सहसंबंध असल्याचे दिसणे हे या दृष्टीने लक्षणीय आहे.

मानवांमध्ये नवजात बालकांच्या मेंदूत जे अनुभव घेण्याची क्षमता नसते ते घेण्यासाठी मेंदूतील सौंदर्याकडे ओढ घेणारे केंद्र सतत बालकांना प्रवृत्त करते आणि त्यामुळे जगाबद्दलच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तार पावतात, अशी एक कल्पना मांडण्यात आली आहे. दुसरी कल्पना अशी आहे की, कला हे एक सामाजिक अनुकूलनाचे साधन आहे. विशिष्ट सुरांमध्ये गाऊन भावनांना आवाहन करणे, नृत्याप्रमाणे लयबद्ध हालचाली करून लक्ष वेधणे किंवा रंग व आकृत्यांचा वापर करून एखादी वस्तू किंवा प्रसंग ‘विशेष’ बनवणे हा कलेचा मूळ उद्देश असावा. असे केल्याने आपले पूर्वज लोकांना एका गटात एकत्र बांधून ठेवत असत. त्यामुळे त्यांची टिकून राहण्याची क्षमता विकसित झाली असावी व जगण्याची संधी वाढवता आली असावी. तरीही आपल्या मनातली सौंदर्याची भावना नेमकी कोठून येते याचे स्पष्टीकरण मिळालेले नाही. कॅलिफोर्निया विद्यापीठातील मायकेल गझानिगा यांनी असे सुचवले आहे की, आपल्याला सममितीय रचना व काही प्रकारच्या दृश्य प्रतिमा अधिक सुंदर (सौंदर्यदृष्ट्या सुखकारक) वाटतात, कारण आपल्या प्रगल्भ मेंदूत त्यांच्यावर अधिक जलद प्रक्रिया करण्याची उपजत क्षमता उत्क्रांतीच्या काळात निर्माण झालेली आहे. आपण कलाकृती निर्माण करतो अथवा कलाकृतीचा सौंदर्यशास्त्रीय आस्वाद घेतो त्या प्रत्येक वेळी मेंदूतील आकलन, स्मृतीचा वापर, अवकाशाचे ज्ञान, आठवणी व पूर्वीचे अनुभव आणि अंर्तमनात असणारे प्रतिमांचे आकृतीबंध या सगळ्या बोधनप्रक्रियेशी संबंधित गोष्टी घडतात.

कलेच्या उगमांसंबंधात मर्लिन डोनाल्ड यांचे मानवी बोधनविकासाचे तीन टप्पे आपण वापरू शकतो. त्यांनी मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीचे मिमेटिक (अंदाजे वीस लक्ष वर्षपूर्व), मिथिक (अंदाजे दीड लक्ष वर्षपूर्व), आणि थिअरोटिक (मागील दोन हजार वर्षे) असे तीन टप्पे कल्पलेले आहेत. मिमेटिक टप्पा हा हावभाव, अनुकरण, नाचणे, दृश्य प्रतिमांमधून संदेश देणे आणि विधी करणे असा आहे. या काळातील बोधनविकासामुळे पुढील काळात भाषेच्या उगमाची पार्श्वभूमी तयार झाली. मिमेटिक टप्प्यात इतरांचे अनुकरण याला विशेष महत्त्व होते. अनुकरणामुळेच मानवांमध्ये समूहात एकत्र राहणे व सामाजिक सहकार्य शक्य झाले. काही मानवेतर प्रायमेट प्राण्यांमध्ये अनुकरणावर आधारलेले सामाजिक वर्तन आढळते, हे खरे असले तरी मानवांइतके ते बळकट नसते. मिथिक टप्पा हा बोलीभाषेच्या उदयानंतरचा असून प्रत्येक समाजात सामाजिक प्रथा व वर्तनाचे प्राथमिक नियम सांगणाऱ्या कथा (लोककथा व बोधकथा) तयार झालेल्या आहेत. याच टप्प्यावर जगभरातल्या सर्व सांस्कृतिक समूहांमध्ये कलेसंबंधी विशिष्ट विचार व धारणा तयार झाल्या आहेत. तिसरा टप्पा आत्ताच्या काळातला असून त्यात कलेसंबंधी लिखित साधने, प्रतिमा आणि त्यांच्याबद्दलचे आपले सिद्धांत यांचा समावेश होतो. कलेचा उगम तुलनेने अलीकडच्या काळात झालेला असला तरी कलात्मक व नवनिर्मितीक्षम मनाच्या विकासाचा प्रारंभ मिमेटिक टप्प्यावर झाला असावा, असे मर्लिन डोनाल्ड यांचे प्रतिपादन आहे.

प्राचीन काळातील कलात्मक वस्तूंचा विचार केला तर असे दिसते की, त्यांचा मुख्य संबंध धार्मिक अथवा लोकसमजुतींशी असावा. प्रागैतिहासिक काळातील कलाकृती निव्वळ सौंदर्याचा आनंददायक अनुभव देण्याघेण्यासाठी निर्माण झाल्या होत्या किंवा नाही हे सांगणे शक्य नाही, कारण तसे सांगण्यास पुरातत्त्वीय पुरावे असमर्थ ठरतात. मुळात कला म्हणजे काय याची सर्वमान्य व्याख्या अद्याप तयार झालेली नाही. बहुतेक सर्व व्याख्यांमध्ये सौंदर्यदृष्टी हा महत्त्वाचा घटक आहे. एच. हासेलबर्गर या मानववैज्ञानिकांनी कलाकृती म्हणजे काय हे सांगताना कोणत्याही मानवनिर्मित कलाकृतीत केवळ व्यावहारिक उपयोगापेक्षा त्यात सौंदर्य असणे अत्यावश्यक असल्याचे नमूद केले आहे (१९६१). प्रागैतिहासिक काळातील कलाकृती व कलेचा विकास यांचा अभ्यास करताना कला म्हणजे काय यात ढोबळमानाने पुढील गोष्टींचा समावेश करता येतो : (१) अंगाला रंग लावून सुशोभित करणे, (२) इतर कोणतीही नैसर्गिक (उदा., दगडाचा पृष्ठभाग) अथवा मानवनिर्मित वस्तू (उदा., मातीची घडवलेली मूर्ती) रंगवणे, (३) रेषा-रेघोट्यांचे प्रतीकात्मक अथवा कसलाही प्रतीकात्मक भाग नसलेले आकृतिबंध रेखाटणे किंवा कोरणे, (४) कोणत्याही नैसर्गिक वस्तूमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवणे (उदा., दगडातून मातीची मूर्ती घडवणे) आणि (५) सर्वस्वी नवीन द्विमिती अथवा त्रिमिती प्रतिमा बनवणे. यांतील पहिल्या चार गोष्टींचा उगम स्वतंत्रपणे झाला असला तरी पाचवी गोष्ट मात्र मानवातील उच्च बोधन क्षमतेतून झालेला कलेचा आविष्कार आहे.

आपल्या मेंदूला सौंदर्य नेमके कशामुळे ओळखता येते व सुंदर वस्तूचा अथवा रंगीत वस्तूचा आनंद कशामुळे घेता येतो हे अद्याप कळलेले नाही. डेसमंड मॉरिस या प्राणिवैज्ञानिकांनी १९५०-६० या दशकात लंडनच्या प्राणिसंग्रहालयातील कोंगो या अत्यंत बुद्धिमान चिंपँझी नराच्या कलेविषयी केलेली निरीक्षणे गाजली आहेत. हा चिंपँझी नर रंग वापरून चित्रे काढण्यात तरबेज झाला होता. वयाच्या चौथ्या वर्षांपर्यंत त्याने जवळपास ४०० चित्रे काढली होती. त्यांतील दोन चित्रे २००५ मधील एका लिलावात भरपूर किंमतीला विकली गेली. या प्रयोगांमधून असे दिसले की, अनुकरणाने चिंपँझी कला शिकू शकतात; तथापि वन्य चिंपँझींमध्ये कुठेही स्वतंत्रपणे चित्रकारीची क्षमता आढळली नाही. कोंगोप्रमाणेच प्राणिसंग्रहालयातील इतर काही चिंपँझींनी रंगवलेली काही चित्रे उपलब्ध आहेत. परंतु माणसांमध्येही प्रत्येकाला चित्रकला येत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक चिंपँझीमध्येही ही कलेची प्रेरणा व अनुकरणाची क्षमता नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे. या प्रयोगांचा मथितार्थ एवढाच आहे की, ८० ते ४० लक्ष वर्षांपूर्वी चिंपँझी व मानवी उत्क्रांतीच्या शाखा अलग होण्याआधीच काही प्राण्यांमध्ये कलासदृश वर्तनाची प्राथमिक अवस्था विकसित झाली असावी.

मानवी उत्क्रांतीच्या वाटचालीत कला प्रथम नेमकी कधी उद्भवली याबद्दल आपण निश्चित सांगू शकत नाही. एवढे मात्र नक्की की आपल्याला काही दशकांपूर्वी वाटत होते त्यापेक्षा कलेचा उगम अधिक जुन्या काळात झालेला आहे. पुरातत्त्वविद्येत सतत नवीन शोध लागत असल्याने असे घडणे स्वाभाविक आहे. प्रागैतिहासिक काळातील पुराव्यांमधून कलेचा उगम शोधताना ज्या घटकांचा विचार केला जातो त्यात मणी व गळ्यातील पदके, शैलाश्रयात काढलेली चित्रे, हाडे व दगडावर खरडलेल्या रेषा-रेघोट्या, कातळशिल्प अथवा खडकात कोरलेल्या आकृती, रंग व रंगद्रव्ये (पिग्मंट), आदिमूर्ती (प्रोटो-फिग्यूरीन) आणि काहीतरी विशेष वाटल्यामुळे मानवांनी उचलून आणलेले नैसर्गिक दगडगोटे (मॅन्युपोर्ट) यांचा समावेश होतो. पुरातत्त्वीय पुराव्यांचा एकंदर आवाका बघितला तर असे दिसते की, कलात्मकतेची प्रेरणा मानव जातीतील इरेक्टस मानवच नव्हे तर त्या आधीच्या मानवपूर्व प्रजातींमध्येच निर्माण झालेली असावी.

पुरातत्त्वविद्या पुरेशी प्रगत नसण्याच्या काळात म्हणजे एकोणिसाव्या शतकातच कलेचा उगम फार प्राचीन आहे याची कल्पना आली होती. प्रागैतिहासिक पुरातत्त्व आणि भूविज्ञान यांची सांगड घालणारे हौशी फ्रेंच पुरातत्त्वज्ञ, नोकरशहा व लेखक जाक बुशे दी पर्थ (१७८८-१८६८) यांना फ्रान्समधील सेंट अशुल येथे दगडी अवजारे (हातकुऱ्हाडी) मिळाली होती, त्याचबरोबर त्यांना स्पंजाचे काही जीवाश्म मिळाले होते. त्यांच्यात मध्यभागी छिद्रे पाडलेली होती. परंतु त्यांचे महत्त्व दीर्घकाळ समजले नव्हते. आय. व्ही. ए. स्मिथ यांना इंग्लंडमध्ये बेडफर्ड भागात अशाच सु. २०० वस्तू आढळल्यानंतर हे मणी असल्याचे लक्षात आले (१८९४). रॉबर्ट बेडनरिक यांनी २००४ मध्ये यांपैकी काहींचा पुन्हा अभ्यास केल्यावर हे खरोखरच ‘पोरोस्फिएरा ग्लोब्युलॅरिस’ (Porosphaera globularis) या स्पंज प्रजातीच्या जीवाश्मांना भोके पाडून पुरापुराश्मयुगीन मानवांनी (सु. ५ लक्ष वर्षपूर्व) त्यांचे मणी बनवल्याचे सिद्ध झाले. याचप्रमाणे ऑस्ट्रियातील ‘रिपोलस्ट केव्ह’ या पुरापुराश्मयुगीन गुहेत लांडग्याचा एक दात मिळाला असून त्याचा वापर गळ्यात घालण्यासाठी केला जात असावा हे स्पष्ट दिसते. या गुहेतील अवशेष सु. ३ लक्ष वर्षपूर्व काळातले आहेत.

जगातील सर्वांत जुनी कातळशिल्पे अथवा खडकात कोरलेल्या आकृती भारतात भीमबेटका या ठिकाणी आहेत. या ठिकाणी खडकात कोरलेले छोटे खळगे आढळले. तसेच मध्य प्रदेशातच ‘दर की चट्टान’ या गुहेत अशाच प्रकारचे छोटे खळगे मिळाले आहेत. या दोन्ही ठिकाणच्या खळग्यांचा कालखंड पुरापुराश्म अथवा मध्य पुराश्मयुग इतका जुना आहे. अशाच प्रकारचे खळगे आफ्रिकेत कोरानाबर्ग प्रदेशात मिळाले असून त्यांचा कालखंड सु. १ लक्ष २० हजार वर्षपूर्व असा आहे.

रंग व रंगद्रव्यांचा पुरावा पाहता असे दिसते की, आधुनिक मानवांच्या अगोदरचे मानवही त्यांचा वापर करत होते. झँबियात कलांबो फॉल्स या अश्युलियन संस्कृतीच्या स्थळावर सु. २ लक्ष वर्षपूर्व या काळात रंगाचा वापर केल्याचा पुरावा मिळाला आहे. मोरोक्कोत टान-टान या गावाजवळ १९९९ मध्ये दगडाची एक मूर्ती मिळाली. तिचा काळ अंदाजे ५ ते ३ लक्ष वर्षपूर्व असा आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती रंगवलेली होती हे दर्शवणारे रंगाचे सूक्ष्म कण पृष्ठभागावर आढळले आहेत. ही आदिमूर्ती ‘व्हिनस ऑफ टान-टान’ (Venus of Tan-Tan) या नावाने प्रसिद्ध आहे.

मानवांनी मुद्दाम बनवलेल्या सर्वांत जुन्या मूर्तींमधील (आदिमूर्ती) दुसरे उदाहरण इझ्राएलमधील बेरेखत राम या उत्तर अश्युलियन संस्कृतीच्या स्थळावर (२ लक्ष ३० हजार वर्षपूर्व) मिळालेल्या एका दगडी वस्तूचे आहे. या वस्तूमधील मानवी अवयव नैसर्गिक आहेत असे मानले जात होते; तथापि सूक्ष्मदर्शकाचा वापर केल्यावर हे आकार मुद्दाम कोरले असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हाडावर काहीतरी कोरल्याचा एक महत्त्वाचा पुरावा जर्मनीतील बिलझिंग्सलेबेन या पुरातत्त्वीय स्थळावर मिळाला आहे. या ठिकाणी सु. एक लाख अवजारे व इरेक्टस मानवांचे जीवाश्म आढळले आहेत. या स्थळाचा काळ सु. ३ लक्ष वर्षपूर्व असा असून तेथे हत्तींची कोरलेली पाच हाडे मिळाली आहेत. या हाडावर कोरलेल्या रेषा मुद्दाम दगडी अवजारांनी केलेल्या असल्याचे (म्हणजेच त्या नैसर्गिक घासून झालेल्या खुणा नाहीत) हे सूक्ष्मदर्शकाच्या वापराने सिद्ध झाले आहे.

आकारात किंवा रंगात काहीतरी विशेष वाटल्यामुळे मानवांनी उचलून आणलेले नैसर्गिक दगडगोटे यांना मॅन्युपोर्ट असे म्हणतात. अशा वस्तूचा सर्वांत प्राचीन पुरावा दक्षिण आफ्रिकेतील माकापन्सगात येथे रेमंड डार्ट यांना १९२५ मध्येच मिळाला होता. सु. ३० लक्ष वर्षपूर्व काळातला हा गोटा मानवी चेहरा असावा असा आहे. हा जास्परचा गोटा ऑस्ट्रॅलोपिथेकस आफ्रिकानस या मानवपूर्व प्रजातीच्या प्राण्यांनी उचलून आणलेला होता असे मानले जाते. तथापि आता त्याच भागात साधारण याचा काळात वावरत असलेल्या केनिॲन्थ्रोपस प्लॅटिओप्स या प्रजातीच्या प्राण्यांचे जीवाश्म मिळाल्याने त्यांनी हा गोटा कुतूहल म्हणून उचलून आणला असावा ही शक्यता दिसू लागली आहे. तथापि या मॅन्युपोर्टचे महत्त्व असे आहे की, निसर्गातील वस्तूंमध्ये आपल्या चेहऱ्याशी साम्य बघण्याची बौद्धिक क्षमता विकसित होण्याचा हा महत्त्वाचा टप्पा होता.

सु. ५०,००० ते ४०,००० वर्षांपूर्वी मानवांमध्ये कलेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची प्रेरणा मोठ्या जोमदारपणे पुढे आली. तथापि त्याच्या अगोदरच्या काळापासूनच (कदाचित ८०,००० वर्षपूर्व काळापासून) अंग सुशोभनासाठी दागदागिने वापरू लागले असावेत आणि चित्रांचा परस्पर संपर्काचे माध्यम म्हणून वापर करू लागले असावेत. या संदर्भात इझ्राएलमधील काफ्जेह (Qafzeh) या स्थळावर मिळालेला पुरावा महत्त्वाचा मानला जातो. तेथे अलंकार म्हणून वापरण्यासाठी भोक पाडलेले अनेक सागरी शिंपले (Glycymeris insubrica ‘ग्लायसिमेरिस इन्सुब्रिका’) मिळाले आहेत. त्यांचा कालखंड ९२,००० वर्षपूर्व असा आहे. अलंकारांचा वापर एवढा प्राचीन असल्याला दुजोरा देणारा पुरावा मोरोक्कोतील ग्रोटे डेस पिजन (Grotte des Pigeons) या गुहेत आढळला आहे. तेथे भोक पाडलेले १३ सागरी शंख (Nassarius ‘नसारियस’) मिळाले असून त्यांचा कालखंड अंदाजे ८०,००० वर्षपूर्व असा आहे.

शहामृगाच्या अंड्याच्या कवचाला भोक पाडून अलंकार बनववण्याचा महत्त्वाचा पुरावा दक्षिण आफ्रिकेतील डिपक्लूफ शैलाश्रयात (Diepkloof Rockshelter) मिळाला आहे. ही कवचे ५२,०००-८०,००० वर्षपूर्व काळातील आहेत. अशाच प्रकारे अंड्याच्या कवचाला भोक पाडून बनवलेले मणी महाराष्ट्रात पाटणे या मध्याश्मयुगीन स्थळावर मिळाले असून त्यांचा कालखंड अंदाजे २०,००० वर्षपूर्व असा आहे.

जर्मनीतील आइनहॉर्नह्योल (Einhornhohle Cave) गुहेत २०१९ मध्ये महाकाय हरणाच्या पायाचे एक हाड मिळाले असून ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. कारण या हाडापासून काहीतरी कलात्मक अथवा उपयुक्त वस्तू बनवण्यासाठी ते कापल्याच्या खुणा आहेत. या हाडाचे रेडिओकार्बन कालमापन केले असून हे हाड ५५,००० ते ४७,००० वर्षपूर्व या काळातले आहे. या काळात तेथे फक्त निअँडरथल मानवांचे जीवाश्म आढळत असल्याने या मानवांनीच असे केले असावे हे स्पष्ट होते. याचा अर्थ असा की, आधुनिक मानवांप्रमाणेच निअँडरथल मानवांकडे अमूर्त आकारांची कल्पना करण्याची व ते तयार करण्याची बौद्धिक क्षमता होती.

एकूण कलेचा व त्यातही चित्रे काढण्याचा विचार केला तर असे दिसते की, चित्रांच्या माध्यमातून इतरांना काहीतरी संदेश देण्याची अथवा मनातील विचार व्यक्त करण्याची पद्धत गेल्या सु. तीस ते पस्तीस हजार वर्षांमध्ये विकसित झाली.

प्रागैतिहासिक चित्रकला व प्रतीकांचा वापर या संदर्भात फ्रान्समधील मार्सेयच्या किनाऱ्याजवळ असलेल्या कॉस्के गुहेचे (Cosquer Cave) उदाहरण विशेष महत्त्वाचे आहे, कारण प्रागैतिहासिक मानवांनी काढलेली चित्रे आणि तळहातांचे ठसे असलेली जगातील ही समुद्राच्या पाण्याखाली (सध्याच्या पातळीच्या ३४ मी. खाली) असलेली एकमेव गुहा आहे. सन १९९१ मध्ये या गुहेत शिरलेल्या तीन हौशी पाणबुड्यांना जलसमाधी मिळाल्यानंतर त्यांचा शोध घेत असताना ती गुहा सापडली. गुहेचा वरचा काही भाग पाण्यात बुडालेला नसल्याने वरच्या भागातील चित्रे व कोरीव आकृती टिकून आहेत. गुहेत काजळी व कोळसा वापरून काढलेली प्राण्यांची चित्रे (१७७) असून त्यात बायसन, रानबैल, रानटी बोकड (आयबेक्स), घोडे, सील, हरिण व मार्जार कुळातील प्राणी यांचा समावेश आहे. तसेच कोरलेल्या काही भौमितिक आकृती (२१६) आहेत. या पोकळीत जवळजवळ सर्व भिंतींवर मिळून मानवी तळहातांचे ६५ ठसे आढळले आहेत. ते काळ्या आणि लाल रंगांचे असून त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे काही ठशांमध्ये पाचपेक्षा कमी बोटे उमटली आहेत. काही बोटे मुद्दाम वळवून असे केलेले आहे. तळहाताच्या काही ठशांवर ठिपके व छोट्या उभ्या रेषा कोरलेल्या दिसल्या.

प्राण्यांची चित्रे आणि मानवी हातांचे ठसे यांचे कालखंड वेगवेगळे आहेत. बायसनचे चित्र, हाताचा एक ठसा आणि गोलाचे चिन्ह यांचा काळ आजपूर्व  २८,००० ते २७,००० असा आहे. हाताचा एक ठसा आणि घोड्याचे चित्र हे आजपासून २५,००० वर्षांपूर्वीचे आहे, तर प्राण्यांची इतर सर्व चित्रे १९,७०० ते १८,५०० वर्षपूर्व या काळातील आहेत.

चित्रकलेच्या विकासाच्या संदर्भात फ्रान्समधील लास्को गुहांना (Lascaux Cave) महत्त्वाचे स्थान आहे. दक्षिण फ्रान्समधील डोर्डोन भागात असलेल्या या गुहांमध्ये उत्तर अश्मयुगीन चित्रे (१७,००० ते १५,००० वर्षपूर्व) असून त्यात रानबैल व घोडे यांची चित्रे आहेत. या गुहांमधील प्राणी प्रजातींच्या चित्रांचे तेथील अवकाशातील संदर्भ पाहून फ्रेंच मानव शास्त्रज्ञ लेरॉ-गुर्हान (१९११-१९८६) यांनी असा सिद्धांत मांडला आहे की, अश्मयुगीन मानवांनी गुहेतील जागेचा विशिष्ट प्रतीकांसाठी जाणीवपूर्वक वापर केला होता. तसेच त्यांच्या अभ्यासातून ऑरिग्नेसियन (Aurignacian) ते मॅग्डलिनियन (Magdalenian) या यूरोपातील उत्तर पुराश्मयुगीन संस्कृतींमधील सलग चार चित्रशैलींमधील उत्क्रांतीची व्याख्या करता आली आहे. त्याप्रमाणे स्पेनमधील अल्तामिरा येथील गुंफाचित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांचा काळ १४,००० ते १३,००० वर्षपूर्व असा आहे.

इंडोनेशियातील सुलावेसी (Sulawesi) या बेटावरील २०१४ मधील शोधांनी चित्रकलेच्या उगमाबद्दलच्या प्रस्थापित ज्ञानाला कलाटणी मिळाली. चुनखडीच्या गुहेतील अवशेषांचा शोध घेत असताना पुरातत्त्वज्ञांना बाबिरूसाचे चित्र (डुक्कर जातीचा वन्य प्राणी) मिळाले हे चित्र किमान ३९,९०० वर्षे जुने आहे. ते आतापर्यंत जगभरात आढळलेल्या चित्रांमधील सर्वांत जुने उदाहरण आहे. हे व तेथील इतर चित्रे निःसंशयपणे प्रारंभीच्या आधुनिक मानवांनी काढलेली आहेत. या शोधापूर्वी चित्रांमधून कलात्मक अभिव्यक्ती आद्य यूरोपात सुरू झाली, असे मानले जात होते.

चित्रपत्र :

लांडग्याचा दात, रिपोलस्ट गुहा (ऑस्ट्रिया),  (संदर्भ : बेडनरिक, २००९).
छोटे खळगे, दर की चट्टान गुहा (मध्य प्रदेश),  (संदर्भ : बेडनरिक, २००९).
आदिमूर्ती, बेरेखत राम (इझ्राएल), (संदर्भ : बेडनरिक,२००९).
हत्तीचे हाड, बिलझिंग्सलेबेन (जर्मनी), (संदर्भ : बेडनरिक, २००९).
मॅन्युपोर्ट, माकापन्सगात (द. आफ्रिका), (संदर्भ : बेडनरिक, २००९).
अलंकार, ग्रोटे डेस पिजन गुहा (मोरोक्को), (संदर्भ : https://c14.arch.ox.ac.uk)
शहामृगांच्या अंड्याच्या कवचापासून बनवलेले मणी, पाटणे (महाराष्ट्र).
महाकाय हरणाच्या पायाचे हाड, आइनहॉर्नह्योल गुहा (जर्मनी). (संदर्भ : फोल्कर मिंकुस, गॉटिंगन)
प्राणी चित्रे, कॉस्के गुहा (फ्रान्स).
लास्को गुहाचित्रे (फ्रान्स),  (संदर्भ : https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/j.1469-7580.2009.01160.x
गुहाचित्र, सुलावेसी बेट (इंडोनेशिया), (संदर्भ : मॅक्सिम ऑबर्ट, ग्रिफिथ विद्यापीठ, ऑस्ट्रेलिया)

संदर्भ :

  • Bednarik, Robert G. ‘The Global Context of Lower Palaeolithic Indian Palaeoart’, Man and Environment, XXXIV (2): 1-16, 2009.
  • Clottes, J.; Beltran, A.; Courtin, J. & Collina-Girard, J. ‘The Cosquer Cave, Marseilles, France’, The Archaeology of Underwater Caves (Ed., Campbell, P. B.), pp. 105-118, Highfield Press, Southampton, 2017.
  • Cyranoski, David, ‘World’s oldest art found in Indonesian cave’, Analysis of images discovered in 1950s counters Eurocentric view of creativity’s origins, Nature, 2014.
  • Morriss-Kay, Gillian M. ‘The evolution of human artistic creativity’, Journal of Anatomy, Vol.216, pp. 158-176, 2010.
  • McDermott, Amy 2019. ‘What was the first “art”? How would we know?, Proceedings of the National Academy of Sciences, 118 (44), 2021.
  • Zaidel, Dahlia W. 2014. ‘Creativity, brain, and art: biological and neurological Considerations’, Frontiers in Human Neuroscience, Vol.8, Article 389, pp. 1-19, 2014.

समीक्षक : सुषमा देव


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.