आधुनिक नीतिशास्त्राच्या विवेचनात हॉब्ज, सिज्विक, बेंथॅम, मिल यांनी मांडलेल्या सुखवादाची, उपयुक्ततावादाची व उदारमतवादी विचारांची मीमांसा प्रामुख्याने केली जाते. सिज्विकने बेंथॅम, मिल ह्या दोघांच्या उपयुक्ततावादी सुखवादाची सुव्यवस्थित पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. ह्या सुव्यवस्थित मांडणीमुळे त्यातील तार्किक अडचणी लक्षात आल्या व व्यक्तिवाद ह्या अडचणींचे कारण आहे, हेही निदर्शनास आले. ह्या व्यक्तिवादी उपयुक्ततावादी सुखवादाच्या विरोधात ‘केवल चिद्वाद’ (Absolute Idealism) इंग्लंडमध्ये उदयास आला. या वादाचे समर्थक व प्रवर्तक टी. एच. ग्रीन व एफ. एच. ब्रॅडली, बोझांकेट, मॅक्टॅगार्ट आदी होते व हेगेल त्या सर्वांच्या प्रेरणास्थानी होते. एकंदरीत, आधुनिक नीतिशास्त्राचा पाया चिद्वादी नीतिशास्त्र आहे.

  • चिद्वादी नीतिशास्त्र : एकोणिसाव्या शतकात यूरोप-अमेरिकेत मान्यता पावलेल्या चिद्वादी दृष्टीकोनाप्रमाणे व्यक्ती हा समाजाचा घटक आहे. केवळ व्यक्तीचा स्वतंत्र विचार करून चालणार नाही. व्यक्तीचा विचार हा समाजाच्या अनुषंगाने होणे गरजेचे आहे. कांटच्याही विचारसरणीत देखील आपणास असेच दिसते. मी नैतिक का असावे ? (Why should be moral?) हा प्रश्न विचारून नैतिकतेला दूर करता येणे शक्य नाही, हे आत्मप्राप्तीला ब्रॅडली याने अनन्यसाधारण महत्त्व देत दाखवून दिले. ‘माझे स्थान आणि माझी कर्तव्ये’ (My station and its duties) या सूत्रात ब्रॅडली मानवी जीवनातील कर्तव्याचे महत्त्व व्यक्त करतो. कांटने आपल्या नैतिक विचारात कर्तव्याला अनन्यसाधारण महत्त्व दिले. परंतु ब्रॅडलीची भूमिका कांटपेक्षा येथे भिन्न आहे. ब्रॅडलीच्या मते समाजात आपल्या असणाऱ्या स्थानावरून आपली कर्तव्ये निश्चित होतात. त्यामुळे ती कर्तव्ये व्यक्तीसाठी बंधनकारक ठरतात. पण व्यक्तीचा ‘स्व’ त्या स्थानाशी जोडलेला असल्यामुळे व्यक्तीला कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळतो व तो सामाजिक कर्तव्यपूर्तीद्वारे शक्य होतो. हाच ब्रॅडलीसारख्याच्या चिद्वादी नीतिशास्त्राचा गाभा आहे. विश्वातील ही नैतिक व्यवस्था पूर्णतेकडे घेऊन जाणारी आहे, असा विश्वास येथे अभिप्रेत आहे.
  • अधिनीतिशास्त्र : हा विश्वास व मुळात चिद्वाद जॉर्ज एडवर्ड मूरला मान्य नाही. नैतिक विचारातील मूळ संकल्पनांचा अर्थ शोधण्याचा त्याने प्रयत्न केला. उदा., ‘चांगले’ म्हणजे काय? हा प्रश्न त्याच्या तत्त्वज्ञानात केंद्रस्थानी आहे आणि येथे अधिनीतिशास्त्राला सुरुवात झाली. १९०३ मध्ये प्रकाशित प्रिन्सिपिया एथिका यात सर्वप्रथम त्यानेच चांगले, उचित, कर्तव्य ह्या नैतिक शब्दांच्या अर्थाविषयी प्रश्न विचारून नीतिशास्त्राला नवीन दिशा दिली. ‘चांगले’ ही संकल्पना ‘पिवळे’ या संकल्पनेसारखी आहे; पिवळे म्हणजे काय हे सांगता येत नाही; त्याची व्याख्या करता येत नाही; त्याचा फक्त निर्देश करता येतो. तसेच चांगले म्हणजे काय हे दर्शविता येते; पण त्याची व्याख्या देता येत नाही. ते मुळात अव्याख्येय आहे. ज्या प्रमाणे पिवळेपणा दिसल्यावर त्याचे ज्ञान आपल्याला होते, त्याप्रमाणे चांगुलपणा या गुणाचे ज्ञानही साक्षात दिसल्यावर आपल्याला होते; पण पिवळेपणा इंद्रियसंवेदनाद्वारा दिसतो तसा चांगुलपणा इंद्रियसंवेदनाद्वारा कळत नाही. पिवळेपणा हा जसा इंद्रियानुभवात प्रतीत होणारा गुण आहे, तसा चांगुलपणा नाही. मग ह्या गुणाशी आपला परिचय कसा होतो ? मूरचे म्हणणे असे की, चांगुलपणा या गुणाचे आपल्याला अंत:ज्ञान होते. गुणांचे ज्ञान इंद्रियजन्य अनुभवाने किंवा अंतर्निरीक्षणाने न होता अंतःप्रज्ञेने होते, असे न-निसर्गवाद (Non-naturalism) स्वीकारतो. म्हणून या सिद्धांताला अंतःप्रज्ञावाद असेही म्हणतात.

विसाव्या शतकाच्या पूर्वी असे स्वीकारले जात होते की, जीवन, जगत, ईश्वर, आत्मा, धर्म, सत्य, ज्ञान, सौंदर्य वगैरेंशी संबंधित समस्यांचा विचार करणे आणि त्यांची उत्तरे शोधणे हेच तत्त्वज्ञानाचे मुख्य कार्य आहे. परंतु पहिल्या महायुद्धानंतर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात या पारंपरिक विचारधारेच्या स्थानी विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान यावे, हा विचार प्रबळ झाला. भाषेचे विश्लेषण करणे हे तत्त्वज्ञानाचे एकमेव कार्य मानले गेले. नीतीच्या मापदंडांचा विचार पारंपरिक नीतिशास्त्रात केला जातो; तर अधिनीतिशास्त्रात नैतिक संकल्पनांचे विश्लेषण करणे, त्यांचा अर्थ स्पष्ट करणे, परस्परसंबंध विशद करणे अभिप्रेत असते. तार्किक प्रत्यक्षार्थवादाचे समर्थक मॉरिझ श्लिक, रूडॉल्फ कार्नेप, ए. जे. एअर इत्यादी होते. लूटव्हिख व्हिट्गेन्श्टाइन याने १९२१ साली ट्रॅक्टेटस लॉजिको-फिलॉसॉफिकस या ग्रंथातून भाषेच्या अर्थासंबंधी विचार व्यक्त केले. ह्या विचारांचा प्रभाव तार्किक प्रत्यक्षार्थवादाच्या मांडणीवर आहे. ‘विधानांची सत्यासत्यता त्याच्या प्रचितीक्षमतेवर अवलंबून असते’, या प्रचितीक्षमतेच्या तत्त्वानुसार जे विधान सैद्धांतिक दृष्ट्या तरी इंद्रियजन्य अनुभवाद्वारे पडताळून पाहता येते, तेच विधान अर्थपूर्ण असते. अन्यथा ती निरर्थक, व्यर्थ, बडबड असते. या सिद्धांतानुसार पारंपरिक नीतिशास्त्रातील विधाने प्रचितीक्षम नसल्यामुळे ती निरर्थक किंवा अर्थशून्य ठरतात. प्रचितीक्षमतेच्या तत्त्वाचे फलित म्हणून अधिनीतिशास्त्रात भावनावादासारखे महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडले गेले. एखादी कृती चांगली किंवा वाईट म्हणताना आपण आपल्या त्याविषयीच्या भावना प्रगट करतो, त्यापलीकडे कृतीत भलेबुरेपणा नसतो, असा मथितार्थ आहे. चांगले/योग्य ठरवून आपण त्याची शिफारस इतरांस करतो; तर वाईट/अयोग्य ठरवून आपण इतरांस त्यापासून लांब राहण्याचा संदेश देतो. एकंदरीत नैतिक निर्णयाद्वारा, निर्धारणाद्वारा वक्त्याची पसंती/नापसंती व्यक्त होते, असे  एअरचा भावनावाद मानतो; तर नैतिक निर्धारणातून आदेश व्यक्त होतात, असे हेअरचा आदेशवाद मानतो.

व्हिट्गेन्श्टाइन याने आपल्या फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स  या ग्रंथात जुन्या भूमिकेचा त्याग करून भाषेच्या उपयोग/वापर सिद्धांतावर भर दिला. अर्थपूर्णतेचा निकष उपयोग/वापर हा असतो, असे म्हणणे आहे. यास ‘उपयोग-सिद्धांत’ असेही म्हणतात. जॉन विजडम, गिल्बर्ट राईल, डी. झेड. फिलिप्स, पी. एच. नोवल-स्मिथ, जी. जे. वॉरनॉक, चार्ल्स स्टीव्हन्सन, स्टीफन टोल्मीन यांचेही योगदान बहुमूल्य आहे.

  • उपयोजित नीतिशास्त्र : विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात उपयोजित नीतिशास्त्र उदयास आले. अधिनीतिशास्त्रात संकल्पनांचा केवळ कोरडा अर्थ व विश्लेषण होते. नीतिव्यवहार आणि संकल्पना वास्तवापासून दूर गेल्या होत्या; परंतु उपयोजित नीतिशास्त्राने हा संबंध जोडण्याचे काम केले. जेव्हा माणसांचे हितसंबंध परस्परविरोधी असतात, दोन किंवा दोनांहून अधिक नीतितत्त्वे परस्परांस छेद देणारी असतात, किंवा कालबाह्य ठरवयाची असतात, त्या वेळी उपयोजित नीतिशास्त्राची गरज भासते. आधुनिक काळात मानवाचे आयुष्य अधिक गुंतागुंतीचे होत आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जशी भौतिक सुखे आपल्या पायाशी लोळण घालीत आहेत, तशाच काही जटिल समस्याही निर्माण होत आहेत. शहरीकरण, औद्योगिकीकरण, माहिती तंत्रज्ञानातील क्रांती इत्यादींमुळे बदललेल्या जीवनशैलीने पर्यावरणसंबंधी प्रश्नांपासून वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरील अनेक प्रश्नांना जन्म दिला आहे. वैद्यकीय प्रगतीने जसे दीर्घायुष्य लाभते आहे, तसेच गर्भपात, इच्छामरण, आत्महत्या यांसारखे प्रश्नही उभे होत आहेत. व्यवसायात गरजेची असणारी नीतिमत्ता याही संबंधी विचार होणे गरजेचे आहे. उपयोजित नीतिशास्त्र नवीन काळातील समस्यांना सामोरे जाणारे, समस्या असतात हे स्वीकारणारे, समस्यांची उत्तरे नव्या पद्धतीने शोधणारे व विविध पर्यायांचा मागोवा घेणारे नीतिशास्त्र आहे. नव्या पद्धतीने नैतिक समस्या हाताळण्याची आवश्यकता या काळात निर्माण झाली. अमूर्त तत्त्वे आणि नियम यांचे विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट नैतिक पेच सोडविण्यासाठी उपयोजन करण्याऐवजी, परिस्थितीचा संदर्भ विचारात घेऊन समस्या संपूर्णपणे समजून घेऊन त्यासाठी सुयोग्य नीतितत्त्वांची शिफारस उपयोजित नीतिशास्त्रात केली जाते.

सुरुवातीच्या काळात उपयोजित नीतिशास्त्राच्या पुढीलप्रमाणे मुख्यत्त्वे तीन शाखा होत्या : १) पर्यावरणीय नीतिशास्त्र, २) जैव-वैद्यकीय नीतिशास्त्र आणि ३) व्यावसायिक नीतिशास्त्र. यांमध्ये नंतरच्या काळात क्रीडा नीतिशास्त्र, उद्योगांचे नीतिशास्त्र, प्रसार माध्यमांचे नीतिशास्त्र, कायद्याचे नीतिशास्त्र अशा अनेक शाखांची भर पडत गेली आहे.

१) पर्यावरणीय नीतिशास्त्र : या शाखेचा आरंभबिंदू सांगणे कठीण आहे; परंतु विद्यापीठ स्तरावर १९७१ साली विस्कॉन्सिन स्टीव्हन्स पॉइंट ह्या विद्यापीठात तत्त्वज्ञानात एक शाखारूपात ह्याचा अभ्यास सुरू झाला. जॉन बेअर्ड कॅलिकॉट ह्याने हा विषय सर्वप्रथम शिकविला. पर्यावरणीय नीतिशास्त्रात मानव व अन्य सजीव सृष्टी, तसेच अन्य घटक यांचा विचार होतो. पर्यावरणीय नीतिशास्त्र या शब्दावरून त्याचे स्वरूप लक्षात येते. या शाखेत निसर्गाचा, पर्यावरणाचा व मानव आणि पर्यावरणाच्या संबंधांचा नैतिक दृष्टीकोनातून अभ्यास होतो. ह्या शास्त्राचे कार्य पर्यावरणाशी संबंधित पारंपरिक नीतीच्या सिद्धांताची तपासणी करणे, त्यांचे या कालानुरूप औचित्य विचारात घेणे, पर्यावरणास विघातक असल्यास जुन्या नैतिक सिद्धांतांचा त्याग करून नवीन पर्यावरण पोषक नीती मांडणे, हे आहे.

जॉन पासमोर ह्याच्या मॅन्स रिस्पॉन्सिबिलिटी फॉर नेचर (१९७४) या ग्रंथात लीन व्हाईट ह्याच्या ‘द हिस्टॉरिकल रूट्स ऑफ प्रेझेंट डे इकॉलॉजीक क्रिसिस’ या लेखात पर्यावरणात उद्भविलेल्या आणीबाणीसदृश्य परिस्थिती ज्युडाईक ख्रिश्चन परंपरांमध्ये कशी शोधता येतील याचे उत्कृष्ट विवेचन आहे. फ्रान्सिस शेपर्ड ह्याचेही कार्य मोलाचे आहे. आर्ने नेस ह्याने पर्यावरण चळवळ राबविली. पर्यावरणाच्या संदर्भात त्याने आठ तत्त्वे मांडली.

२) जैव-वैद्यकीय नीतिशास्त्र : आज वैद्यकीय क्षेत्रात फार मोठे परिवर्तन आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात पायाभूत असणाऱ्या हिपोक्रॅटिस ह्यांच्या शपथेसंदर्भात तात्त्विक विचार केला जात आहे. त्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात वैद्य (Doctor), रुग्ण, उपचारासाठी लागणारी किंमत, जगण्याचा हक्क एवढेच नव्हे, तर मृत्यूविषयी, त्याच्या हक्काविषयीदेखील प्रश्नांची मालिका उभी आहे. या सर्वांचा अभ्यास जीव-वैद्यकीय उपयोजित नीतिशास्त्र यात केला जातो. या काळात ‘रुग्णांचे हक्क’ ही संकल्पना मान्यता पावली आहे. वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या वैद्याला वैद्यकीय व नैतिक दृष्टीकोनातून निर्णय घ्यावे लागतात. वैद्यकीय व्यवसाय करताना त्याच्या बाबतीत कोणती आचारसंहिता म्हणजे नीतिनियम असावेत, वैद्य व रुग्ण यांच्यामधील संबंध कशा स्वरूपाचे असतात, रुग्णाच्या जीवन-मरणाचा प्रश्न असेल, तर प्रसंगी त्याने खोटे बोलणे योग्य असेल काय, एखाद्या रुग्णाच्या शारीरिक वेदना अथवा आजार कोणत्याही मार्गांनी बरा होत नसेल, तर अशा वेळी त्या रुग्णाने वैद्यांकडे इच्छामरण किंवा दयामरण याविषयी याचना केल्यास वैद्यांनी काय करावे ? वैद्यकीय व्यवसायाची मूल्ये कोणती असावीत ? वैद्यांची कर्तव्ये कोणती असावीत ? याचा विचार करून १८ व्या व १९ व्या शतकात वैद्यांसाठी एक आचारसंहिता तयार केली गेली व १९४७ साली अमेरिकन मेडिकल काउन्सिलने तिचा स्वीकार केला. १९९० च्या दशकात त्या आचारसंहितेचा अधिक विकास झाला.

एखाद्या प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली वैद्याने चुकीचा अहवाल द्यावा का ? वैद्याला विशिष्ट परिस्थिती हाताळताना सत्य, प्रामाणिकपणा, सचोटी निष्ठा इत्यादी मूल्यांनुसार उत्तर देता येईल असे नाही; पण जेव्हा नैतिक मूल्यांमध्ये संघर्ष निर्माण होतो, अशा वेळी संघर्ष सोडविण्यासाठी एक उपयोगी चौकट म्हणून ही मूल्ये उपयोगी ठरतात. उदा., स्त्रीभ्रूण हत्येला बंदी आहे; पण अपवादात्मक परिस्थितीत म्हणजेच गर्भात काही दोष असेल, तर वैद्याला गर्भपात करावा लागतो. इच्छामरण, गर्भपात नैतिक दृष्ट्या योग्य की अयोग्य ? अशा वैद्यकीय क्षेत्राला भेडसाविणाऱ्या विविध प्रश्नांचा वैद्यकीय नीतिशास्त्रात विचार केला जातो.

३) व्यवसाय नीतिशास्त्र : व्यवसाय नीतिशास्त्र ही उपयोजित नीतिशास्त्राची एक शाखा आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या अस्तित्वासाठी व चरितार्थासाठी कोणतातरी व्यवसाय अथवा नोकरी करावी लागते. व्यवसाय नीतिशास्त्र अंतर्गत व्यक्तीच्या दृष्टीने विचार करता कर्मचारी, व्यवस्थापक, ग्राहक, भांडवलदार, उद्योगपती ह्या सर्वांच्या परस्परसंबंधांचा, त्यांच्या आचारांचा विचार केला जातो. व्यवसाय नीतिशास्त्रात प्रामाणिकपणा, सत्य, जबाबदारी, स्वातंत्र्य, न्याय यांना अतिशय महत्त्व आहे; पण ही मूल्ये पणाला लागतात आणि कधी संघर्ष, तर कधी तडजोड अपरिहार्य वाटावी अशी परिस्थिती उद्भवते. अशा पेचप्रश्नांचा ऊहापोह व्यावसायिक नीतिशास्त्रात केला जातो. कायदा क्षेत्रात न्याय व अन्याय या गोष्टींवर निर्णय घेण्यासाठी न्यायव्यवस्थेला आधारभूत मानले जाते. कायद्याच्या कार्यक्षेत्रात वकिलीव्यवसाय करणाऱ्या वकिलांना आचारसंहिता असावी काय? पक्षकार आणि त्याचा वकील यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध असावयास हवेत? पैसेवाला व गरीब अशील यांच्यात शुल्का (Fee) च्या बाबतीत एकच धोरण वकिलाने राबवावे काय? न्यायदान करताना न्यायाधीशांनी कोणत्या नीतिनियमांना अनुसरून न्यायदान करावे? या आणि यांसारखे अनेक प्रश्न विधी अथवा कायदा नीतिशास्त्रात येतात.

४) क्रीडा नीतिशास्त्र : सद्यकाळात क्रीडा क्षेत्रात विविध प्रकारच्या अनैतिक गोष्टी घडताना दिसतात. प्रत्येक खेळाडूने खेळ कसा खेळावा याचे प्रशिक्षण त्याला मिळालेले असते. मात्र तो खेळ खेळताना खेळविषयक नीती किंवा नैतिक मूल्ये काय आहेत? व ती कशी जपावीत? याचे त्याला ज्ञान असणे आवश्यक असते. निरोगी मानसिकवृत्ती, समानता, आदर आणि खेळाप्रती निष्ठा ही क्रीडाविषयक आवश्यक असणारी नीतितत्त्वे आहेत. खेळ हा वैयक्तिक फायद्यासाठी नसून आपण संघाचे प्रतिनिधित्व करीत असल्याची भावना खेळामध्ये असते. प्रतिपक्षाकडे द्वेष व सूडाच्या भावनेने न पाहता खिलाडूवृत्तीने खेळाला सामोरे जाणे हे नीतिमूल्य जपण्याचे साधन असते. खेळामध्ये विजय किंवा पराजय ह्या गोष्टी दुय्यम आहेत; तर नैतिक अधिष्ठान असलेला खेळ हेच सर्वोच्च ध्येय प्रत्येक खेळाचे असते. त्याला बाधा होणे हे खेळाबद्दल नैतिकतेचा प्रश्न निर्माण करणारे असते.

५) उद्योगाचे नीतिशास्त्र : उद्योगाच्या नीतिशास्त्रात व्यवस्थापन व कर्मचारी, ग्राहक, उत्पादन, कंपनी (आस्थापन)चे आर्थिक व्यवहार या बाबींचा विचार केला जातो. उद्योगात गैरमार्गाने, अनैतिकतेने व्यवहार होऊ नये यासाठी उद्योगाच्या नीतिशास्त्राचा विचार झाला. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेत ‘उद्योगाचे नीतिशास्त्र’ हा शब्द वापरला गेला. उद्योगाच्या नीतिशास्त्रात आचारसंहिता तयार करण्यात आली. त्यात खालील मुद्यांचा विचार उद्योगाशी संबंधी झाला.

  • विश्वासार्हता : उद्योगात विश्वासार्हता असणे अत्यंत गरजेचे आहे. उद्योगात उत्पादनासंबंधी, त्याच्या आर्थिक व्यवहारासंबंधी, व्यवस्थापन व कर्मचारी यांच्यातील संबंधात विश्वासार्हता असल्याशिवाय ग्राहक कंपनी (आस्थापन) जवळ येणे शक्य नाही. जेव्हा एखादा व्यवस्थापक व्यवसायाचे नीतिनियम पाळतो, तेव्हा ते कर्मचार्‍यांच्या मनात त्याची एक उत्तम प्रतिमा तयार होते. परिणामी, कर्मचारी त्याचे नेतृत्व सहजतेने स्वीकारून आपली संपूर्ण मानसिक, शारीरिक व बौद्धिक ऊर्जा त्या उद्योगासाठी समर्पित करतात. शिस्तविषयक समस्या होतात. कर्मचार्‍यासंबंधी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता राहात नाही. जेव्हा कर्मचारी व व्यवस्थापक आपल्या कामाबद्दल आणि आपण ज्यांबरोबर काम करीत असतो, त्याबद्दल सकारात्मक असेल, तर आपल्या कामाची गुणवत्ता निश्चितच वाढते.
  • प्रामाणिकपणा : या तत्त्वात सत्य सांगणे, पारदर्शक असणे आणि आपला शब्द पाळणे हा भाग येतो. आपण एखादी चूक केली असेल, तर शक्य तितक्या लवकर ती स्वीकारणे गरजेचे आहे. ग्राहकास उत्पादन निर्मिती करताना उत्पादनात ज्या मालाचा वापर केला जाणार आहे असे मान्य केले असेल, तेच ग्राहकापर्यंत पोहोचवावे व कर्माचार्‍यास दिलेली आश्वासने पाळावीत.
  • सचोटी : उद्योगात शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व असते. दिलेला शब्द पाळण्यासाठी कधी कधी फायद्याकडेही दुर्लक्ष करण्याचे प्रसंग उद्योगात येतात. अशा वेळी सचोटी तपासली जाते व हा भाग उद्योगात महत्त्वाचा ठरतो.
  • निष्ठा : या तत्त्वात आपल्या नियोक्ता आणि संस्थेच्या सकारात्मक प्रतिमेचा प्रचार करणे समाविष्ट आहे, विशेषत: ग्राहक, सहकारी, कुटुंब आणि कंपनीबाहेरील मित्र आणि समाज माध्यमांवर आपल्या उद्योगाच्या संदर्भात सकारात्मक विचार मांडले पाहिजे.
  • आदर : औद्योगिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या आचारणातून स्वतःसंबंधी आणि तुमच्या सहकार्‍यांबद्दलचा आदर दर्शविला पाहिजे. आपण स्वतःला कसे सादर करतो आणि संप्रेषण करतो त्यावरून स्वतःबद्दलचा आदर व इतरांबद्दल असणारा आदर दिसून येतो. कार्यसंघातील सदस्यांपेक्षा आपले विचार जरी भिन्न, विरोधी असले, तरी त्या मतांबद्दल आदर दाखविला पाहिजे.
  • उद्योगाचे पर्यावरणरक्षणासंबंधी असणारे दायित्व लक्षात घेऊन कायदे केले गेले. तसेच समाजाप्रती असणाऱ्या बांधिलकीतून ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’सारख्या संकल्पना साकारल्या गेल्या.

६) प्रसार माध्यमांचे नीतिशास्त्र : यात प्रसारमाध्यमांचा नैतिकतेच्या दृष्टीकोनातून विचार झाला. पत्रकारितेत याचा विशेष विचार झाला. वृत्त प्रकाशित करताना त्यातील सत्यता कमी करून ते मनोरंजक, कित्येकदा ते भावना भडकविणारे असते. त्यावर निर्बंध आणण्याच्या दृष्टीकोनातून त्यासंबंधी आचारसंहिता तयार झाली. त्यातून नैतिकतेची शिकवण दिली गेली. घटना जशी घडली तसे त्याचे वृत्त बनावे हा यामागील उद्देश होता. त्याचबरोबर दूरदर्शन, भ्रमणध्वनी (Mobile) यांच्याही बाबतीत नैतिकता पाळण्याच्या दृष्टीने आचारसंहिता आली.

अस्तित्ववादी नीतिशास्त्र : दोन महायुद्धांच्या काळात जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क यांसारख्या यूरोपियन देशात विसाव्या शतकात अस्तित्ववादी नीतिशास्त्र विकसित झाले. ‘अस्तित्ववाद’ हे नामाभिधान जरी बहुतेक सर्व अस्तित्ववाद्यांनी नाकारले असले, तरी त्यांची दृष्टी नैतिकतेकडे वेगळ्या रीतीने पाहणारी होती. मानवी अस्तित्वाची प्रतिष्ठा जपू पाहणारी होती. नीतिमूल्ये सर्वत्र समान असतात, त्यांचे महत्त्व त्रिकालाबाधित असते, म्हणून त्यांचे निमूट पालन करण्यात इतिकर्तव्यता असते, हा प्रचलित विचार अस्तित्ववाद्यांनी नाकारला. मार्सेल, बूबर, किर्केगॉर सश्रद्ध असले, तरी नैतिक-सामाजिक मूल्यनिर्धारण संबंधित व्यक्ती करत असते असा त्यांचा ठाम विश्वास आहे. नित्शे, हायडेगर, सार्त्र निरीश्वरवादी असल्याने ईश्वरी कृपेचा प्रश्न येत नाही. किंबहुना श्रद्धा लोपल्याची खंत, विशेषत: नित्शेच्या साहित्यातून प्रकटते. नित्शे, पास्काल, शोपेनहौअर, उनमुनो, बरद्येव, काम्यू, सार्त्र, यास्पर्स आदींनी चाकोरीबद्ध मूल्यव्यवस्था नाकारत नवमूल्यनिर्धारणाची गरज सांगितली व स्वत: तसा प्रयत्न केला. महायुद्धांच्या पार्श्वभूमीवर मृत्यूची जाणीव सातत्याने राखणे, नातेसंबंधातील ताणतणाव, दुरावा, आत्मदुरावा जाणून परिस्थितीवश येणाऱ्या मर्यादांची दखल घेत उत्कटतेने सर्व शक्तीनिशी जीवनाला भिडणे व व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राखणे हे अस्तित्ववादात अत्यंत महत्त्वाचे होय. मूल्ये आयती मिळत नसून उत्स्फूर्त, जिवंत जीवनानुभवाद्वारे अभिव्यक्त होतात. बांधिलकीयुक्त कृतींमधून माणूस ती घडवतो; ईश्वरीकृपा, अनुग्रह अशा अलौकिक शक्तींवरील विश्वास विज्ञानयुगात टिकत नाही, आधुनिक माणसाच्या आस्तिक्यभावाला तडे गेले म्हणून तो असहाय झाला आणि त्यातून सावरण्यासाठी यंत्रवत जीवनात प्रेम, आशा, उमेद शोधू लागला. त्याच्या तत्त्वनिष्ठेतून विपुल साहित्यनिर्मिती झाली. कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, आत्मचरित्र, पत्रलेखन अशा विविध साहित्यप्रकारांद्वारे आपले नीतिविचार अस्तित्ववाद्यांनी व्यक्त केले. ते प्रस्थापित नीतिसंकेत झुगारणारे होते. अशा बंडखोर नीतिविचारांना शिरोधार्य मानणारे नीतिशास्त्र अस्तित्ववादी तत्त्वज्ञांनी विकसित केले. किर्केगॉरने व्यक्तिगतता अधोरेखित केली. जीवन मुळात अर्थशून्य असते, असंगत (Absurd) असते. जीवनाला माणसाने विविध कृतींद्वारा अर्थपूर्ण करावयाचे असते, हा अस्तित्ववादी नीतिशास्त्राचा गाभा होय.

स्त्रीवादी नीतिशास्त्र : सीमॉन द बोव्हारसारख्या लेखिकेमुळे स्त्रीवादी पैलू अस्तित्ववादास प्राप्त झाला. अस्तित्ववादी तसेच स्त्रीवादी नीतिशास्त्र केवळ बौद्धिक आकलनासाठी नसून ते जाणणे म्हणजे त्या प्रकारे जगणे होय. लिंग (sex) जन्माने मिळत असले, तरी लिंगभाव (Gender) हा सामाजिक असतो. लिंगाधारित भेदभाव समाजात पदोपदी दिसून येतो. त्याकडे स्त्रीवादी नीतिशास्त्र आपले लक्ष वेधते व त्यानुसार आदर्श वर्तनाचे निकष पुरविते. अर्थात, स्त्रीवाद ही एकजिनसी विचारसरणी नसून बहुपेडी, बहुआयामी आहे. त्यामध्ये अनेक विचारधारांचा समावेश होतो. या विचारधारा काही वेळा परस्परविरोधी असतात. उदा., निगा (care) हा खास स्त्रीचा प्रांत मानला जातो. कॅरल गिलिगनसारख्या स्त्रीवाद्यांनी सौहार्द, समंजसपणा, सोशिकता, हळुवारपणा हे स्त्रीचे स्वभावविशेष मानले आहेत. त्यांना अनुसरून गिलिगनने निगेचे नीतिशास्त्रा (Ethics of Care) ची मांडणी केली आणि स्त्रीशक्ती अधोरेखित केली आहे.

जहाल स्त्रीवाद्यांनी मात्र हे स्वभावविशेष स्त्रैण असल्याचे नाकारले. हे स्त्रियांना जन्मजात मिळतात, स्त्री जात्याच सोशिक असते, निसर्गत: समजूतदार, चाणाक्ष, गृहकृत्यदक्ष, करुणामय, क्षमाशील, शांत असते असे चित्र पुरुषप्रधान संस्कृतीमुळे/पितृसत्ताक पद्धतीने निर्मिलेल्या मूल्यव्यवस्थेच्या प्रभावातून तयार झाले, असे मत मांडून वरील प्रकारच्या विचारसरणीचे खंडन करण्याचा प्रयत्न केला आणि स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. प्राचीन काळापासून स्त्रीला सर्वत्र दुय्यम स्थान दिले गेले. तिच्या श्रमाचे मोल न जाणता विविध दोषांचे खापर तिच्या माथी फोडले. सर्व ज्ञानक्षेत्रे पुरुषांनी काबीज केली. स्वतःच्या ताब्यात राखली. परिणामी, स्त्रियांच्या कर्तृत्वाची मोहोर कोणत्याही ज्ञानक्षेत्रात (काही अपवाद वगळता) उमटू शकली नाही. हीच ‘स्त्रियांची अदृश्यता’ (Invisibility of Women) होय. ही परिस्थिती एका कुटुंबापुरती मर्यादित नाही, तर राजकीय आहे, हे स्त्रीवादी नीतिशास्त्र दाखवते व स्त्रीशक्तीस भगिनीभावाने साद घालते.

स्त्रीवर होणाऱ्या अन्यायांस वाचा फोडणे, समाजात त्याविषयी जागृती निर्माण करणे, स्त्रियांस आर्थिक, शैक्षणिक व मानसिक दृष्ट्या अबला न मानता आत्मनिर्भर करणे, ही स्त्रीवादी नीतिशास्त्राची कार्ये होत. लिंगाधारित भेदभावांना आणि प्रस्थापित नीतिविचारांना खोडणे, पुरुषी वर्चस्वाऐवजी समानता राखणे येथे अपेक्षित आहे. मेरी वूलस्टोन क्राफ्ट, ज्युडिथ बटलर, जुलिया क्रिस्तेवा, ॲनी बेझंट, ताराबाई शिंदे (स्त्री-पुरुषतुलना), पंडिता रमाबाई (स्त्रीधर्मनीती), सावित्रीबाई फुले (काव्यफुले) आदींनी स्त्रीवादी नीतिशास्त्राचे धडे आपल्या जीवनाद्वारा दिले. एकंदरीत, पारंपरिक नीतिशास्त्रीय विचार पुरुषांच्या दृष्टीकोनातून झालेला आहे, हे निदर्शनास आणून पुरुषप्रधान नीतिशास्त्रीय भूमिकांना स्त्रीवादी नीतिशास्त्राने पर्याय निर्माण केला. विसाव्या शतकात विकसित झालेल्या स्त्रीवादी विचारसरणीमुळे नीतिशास्त्राने वेगळे वळण घेतले. आधुनिकोत्तर तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यातून मूल्यांची पडझड, कोसळलेले आदर्श, ढासळलेली व्यवस्था आणि शून्यमूल्यवादाचा अन्वयार्थ लावला गेला.

विसाव्या शतकातील राजकीय, सामाजिक आणि वैचारिक घडामोडींच्या प्रभावामुळे एकविसाव्या शतकात नीतिशास्त्रात अनेक वेगवेगळे विचारप्रवाह निर्माण झाले. पारंपरिक मूल्यात्मक नीतिशास्त्राच्या मर्यादा त्यामधून स्पष्ट होताना दिसतात, त्याचबरोबर या काळात निर्माण झालेल्या नव्या समस्यांना सामोरे जाण्याचा प्रयत्नही दिसतो. माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या क्षेत्रांत तंत्रज्ञानाची झपाट्याने प्रगती होते आहे. प्रचंड प्रमाणात माहिती गोळा होत आहे आणि उपलब्ध विदा वापरून व्यक्तीच्या वर्तनावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण करता येण्याची शक्यता मानवाच्या इच्छास्वातंत्र्यासाठी धोका निर्माण करते आहे, मेंदू-विज्ञानातील संशोधन मानवाला इच्छास्वातंत्र्य आहे असे वाटत असले, तरी ते खरेतर नसतेच असे सिद्ध करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यामुळे जुन्या प्रश्नांच्या बरोबरच एकविसाव्या शतकात नवी आव्हाने सद्यकालीन नीतिशास्त्रापुढे उभी राहिली आहेत.

https://www.youtube.com/watch?v=dv-Ut3LFjXI&feature=youtu.be

संदर्भ :

  • गोखले, प्रदीप, संपा. ‘नीतिविमर्श’, परामर्श, खंड २४, अंक १, पुणे विद्यापीठ, पुणे, जून-जुलै २००२.
  • गोखले, प्रदीप, संपा. ‘पर्यावरण विषयक तत्त्वज्ञान ‘, परामर्श, खंड १७, अंक ३, पुणे विद्यापीठ, पुणे, ऑगस्ट १९९५.
  • गोखले, प्रदीप; बारलिंगे, सुरेंद्र, संपा. ‘महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद’, परामर्श, खंड १०, अंक २ , पुणे विद्यापीठ, पुणे, ऑगस्ट १९८८.
  • जोशी, विद्या, भारतीय व पाश्चात्य नीतिशास्त्र, नागपूर, २००४.
  • देशपांडे, दि. य. नीतिशास्त्राचे प्रश्न, नागपूर, १९८७.
  • मारडकर, राजेसाहेब, पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, नागपूर, २०१७.
  • मिश्र, अर्जुन, दर्शन की मूल धाराएँ, भोपाल, १९९७.
  • रॉय, मुक्तिबसु, आधुनिक पाश्चात्य दर्शन, भोपाल, १.
  • रेगे, मे. पुं. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास, पुणे, १९७१.
  • वर्मा, वेद प्रकाश, अधिनीतिशास्त्र के मुख्य सिद्धांत, मुंबई, २००७.
  • साळुंके, सुनील, उपयोजित नीतिशास्त्र : समस्या व उपाय, लातूर, २०१९.
  • https://www.economicsdiscussion.net/business/business-ethics/31798
  • https://www.tandfonline.com/loi/hmme21
  • https://www.tandfonline.com/toc/hmme21/current
  • https://www.thestreet.com/personal-finance/what-is-business-ethics-15026364 
  • https://youtu.be/tpHnYKwNqi8
  • https://youtube.com/playlist?list=PLbMVogVj5nJQ20ZixllzM69agBq-m8ndV

                                                                                                                                                                    समीक्षक : दीप्ती गंगावणे