अजिंक्यतारा : सातारा जिल्ह्यातील एक इतिहासप्रसिद्ध डोंगरी किल्ला. सह्याद्रीच्या बामणोली-घेरादातेगड डोंगररांगेत हा तटबंदीयुक्त किल्ला असून किल्ल्याच्या पायथ्याशीच उत्तरेस सातारा शहर वसले आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुण्यापासून दक्षिणेस सु. १२० किमी. अंतरावर आणि कोल्हापूरपासून उत्तरेस सु. १३० किमी. अंतरावर असलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची सु. १००० मी. तर सभोवतालच्या सखल भागापासून उंची सु. ३६५ मी. आहे. किल्ल्याची सप्तर्षी, मंगळाई, उकाबैन, इसमतआरा, शाहगड, आझमतारा आदी नावे असून अजिंक्यतारा हेच नाव मात्र कायम रूढ झाले. राजगड, रायगड, जिंजीनंतर मराठा साम्राज्यातील हा एक महत्त्वाचा राजधानीचा किल्ला होता. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पायथ्यापर्यंत गाडी रस्ता असून सातारा बसस्थानकापासून राजवाडामार्गे तसेच गोडोली नाका परिसरातूनही किल्ल्यावर जाता येते. पायी गड गाठण्यास सु. १ तासाची चढण पार करावी लागते.
अजिंक्यतारा हा एक अभेद्य पुरातन किल्ला असून याची बहुतांश बांधणी शिलाहार राजा दुसरा भोज (कार. ११७५-१२१२) याच्या राजवटीत झाली. बहमनी राजवटीत किल्ल्यावर काही बांधकामे झाली. बहमनी सत्तेच्या विभाजनानंतर हा किल्ला आदिलशाही अंमलाखाली आला. राज्य संरक्षणाबरोबर तुरुंग म्हणूनही या किल्ल्याचे महत्त्व होते. १५८० मध्ये पहिल्या अली आदिलशहाची (कार. १५५७-१५८०) पत्नी चांदबीबी काही काळ येथे कैदेत होती. पुढे आदिलशाहीत दिलावरखान हा कटकारस्थानांवरून येथे तुरुंगात होता (१५९२). त्यातच त्याचे निधन झाले.
छ. शिवाजी महाराज यांनी सज्जनगड (परळी) पाठोपाठ हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला (१६७३). कर्नाटक मोहिमेच्या आधी आजारपणाच्या काळात महाराजांचा मुक्काम काही काळ या किल्ल्यावर होता (१६७५; १६७६). जिंजीच्या वेढ्यातून सुटल्यानंतर छ. राजाराम महाराज (१६७०-१७००) यांनी विशाळगड आणि अजिंक्यतारा किल्ल्यावरूनच भविष्यातील मोहिमांची दिशा ठरविली होती. औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेत त्याने हा किल्ला ताब्यात घेतला (२१ एप्रिल १७००) व किल्ल्याचे नाव ‘आझमतारा’ असे ठेवले. पुढे महाराणी ताराराणींचे सरदार परशुराम त्रिंबक यांनी मोगलांकडून किल्ला परत मिळविला (१७०६) आणि त्याचे नाव ‘अजिंक्यतारा’ ठेवले. छ. शाहू (१६८२-१७४९) आणि ताराराणी यांच्या कलहात अजिंक्यताराचा किल्लेदार शेख मिरा हा सुरुवातीला ताराराणी यांच्या पक्षात होता, पुढे तो छ. शाहूंच्या पक्षात आला. अजिंक्यतारा छ. शाहूंनी जिंकून स्वतःस किल्ल्यावर राज्याभिषेक केला (१७०८) आणि सातारा संस्थानची स्थापना केली. अजिंक्यतारा किल्ल्यावरील हा विजय मराठेशाहीच्या इतिहासात शनिवारची नौबत म्हणून प्रसिद्ध आहे. छ. शाहूंनीच शाहूनगर तथा सातारा गाव वसविल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांतून मिळतात. १८१८ मध्ये मराठी सत्तेच्या पाडावानंतर ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला.
सांप्रत किल्ल्यावर मंगळाई, हनुमान आणि महादेव यांची मंदिरे, २-३ तलाव, तेलातुपाचे रांजण तसेच बुरूज, तटबंदी, दोन महादरवाजे, महाराणी ताराराणींच्या राजवाड्याचे काही अवशिष्ट भाग आहेत. महादरवाजाच्या देवड्यांच्या जोत्यावर कोरलेली वाली-सुग्रीव युद्धाची कथा आणि बुरुजावर तळवटी खोदलेले नागांचे शिल्पांकन दिसून येते. किल्ल्यावर आकाशवाणी व दूरदर्शन प्रक्षेपण केंद्रांचा मनोरा आहे. येथून यवतेश्वर पठार, किल्ले चंदन-वंदन, नांदगिरी उर्फ कल्याणगड, सज्जनगड आदी सभोवतीचा नयनरम्य परिसर दिसतो. पर्यटक आणि गिर्यारोहकांचे आकर्षण ठरलेल्या या किल्ल्यावर विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता आणि वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येते.
संदर्भ :
- Basu, B. D., Story of Satara, Calcutta, 1922.
- Parasanis, D. B., Notes on Satara, Bombay, 1919.
- घाणेकर, प्र. के., ‘साद सह्याद्रीची! भटकंती किल्ल्यांची!!’, स्नेहल प्रकाशन, पुणे, १९८५.
- पाठक, अरुणचंद्र, ‘महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर : सातारा जिल्हा’, दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, १९९९.
समीक्षक : संदीप परांजपे