वित्तव्यवस्थेच्या एकूण संरचनेतील महत्त्वपूर्ण संस्था म्हणजे बँका आणि बँकिंग, तसेच बिगर बँका होय. पारंपरिक संस्थांच्या बरोबरीने महत्त्वाची कामगिरी पार पाडणाऱ्या नवीन प्रकारच्या संस्थांचा उगम एकोणिसाव्या शतकात झाला, ज्यांना पतमानांकन संस्था असे म्हणतात. पतमानांकन म्हणजे एखादी व्यक्ती अथवा संस्था यांच्या भूतपूर्व वित्तीय व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर वर्तमानकाळातील वित्तीय जबाबदाऱ्या पार पडण्याची क्षमता तपासून त्यांना स्पर्धात्मक पद्धतीने क्रमवारी निश्चित करून देणे. ही पतक्रमवारी अक्षर संख्यात्मक (अल्फा न्युमेरिकल) स्वरूपाची असते. उदा., AAA+, BB- इत्यादी.

वित्तीय संस्था अथवा वित्तीय साधने यांसाठी पतमानांकन केले जाऊ शकते. वित्तसंस्थांच्या व्यवहारांच्या पार्श्वभूमीचा अभ्यास करून त्या विशिष्ट संस्थेचे वित्तीय दायित्व आणि बाजारातील पत या संबंधाने एक विश्लेषणात्मक अहवाल तयार केला जातो. या अहवालाच्या माध्यमातून त्या वित्त संस्थेचे पतमानांकन प्रसिद्ध केले जाते. भांडवली बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या व्यक्तिगत आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी हे पतमानांकन अतिशय उपयुक्त ठरते. गुंतवणूकदारांच्या निर्णयप्रक्रियेत पतमानांकन महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय वित्तसंस्थांच्या बरोबरीने कर्जदार, धनको आणि ऋणको अशा सर्व वैयक्तिक आणि संस्थात्मक आस्थापनांचे पतमानांकन करता येते. या सर्व वित्तीय घटकांच्या बाजारातील विश्वासार्हतेचा पुरावा किंवा लेखाजोखा म्हणजे पतमानांकन होय.

वित्तीय व्यवहारांना लागू होणाऱ्या पत जोखमीवर उपाययोजना म्हणून पतमानांकन उपयुक्त ठरते. ऋणकोची कर्ज फेडण्याची क्षमता तपासण्यासाठी पतमानांकन केले जाते. त्याच्या भूतकाळातील व्यवहारांच्या अभ्यासातून भविष्यात कर्ज बुडण्याच्या अथवा परत फेडले जाण्याच्या शक्यतेविषयी अंदाज बांधला जातो. हा अंदाज बांधण्यासाठी अनेक प्रकारच्या संख्यात्मक व गुणात्मक माहितीचा आधार घेतला जातो. या माहितीच्या विश्लेषणातून दिले जाणारे मानांकन हा या प्रक्रियेचा केवळ एक भाग असून ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत व्यापक आणि संशोधनात्मक अशा स्वरूपाची असते.

पतमानांकनाचे प्रकार : पतमानांकन हे दोन प्रकारच्या संस्थांचे केले जाऊ शकते. एक, सार्वजनिक किंवा शासकीय वित्तीय संस्था. दोन, बिगर शासकीय किंवा खाजगी वित्तीय संस्था. यांपैकी पहिल्या प्रकारचे पतमानांकन हे सरकारी अथवा शासकीय वित्तीय साधनांसाठी (सरकारी रोखे, भाग भांडवल इत्यादी) असते; तर बिगर शासकीय पतमानांकन हे खाजगी संस्थांच्या साधनांचे केले जाते. उदा., खाजगी कंपन्यांचे रोखे, ठेवी, शेअर्स इत्यादी. पतमानांकन हे अल्पकाळासाठी अथवा मध्यम काळासाठी लागू होते. १ वर्ष अथवा त्यापेक्षा कमी काळासाठी अल्पकालीन, तर १ वर्षापेक्षा अधिक काळासाठी मध्यम अथवा दीर्घकालीन पतमानांकन लागू होते.

भारतामध्ये क्रिसिल (क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड), सिबील (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) आणि इक्रा (इन्व्हेसमेंट इम्फॉर्मेसन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी) या तीन राष्ट्रीय पतमानांकन संस्था असून त्या स्वतंत्र पद्धतीने काम करतात. त्यांच्या कार्यावर कोणत्याही नियामक संस्थेचे नियंत्रण नसते. याशिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या स्टँडर्ड अँड पुअर्स, मुडीज, फीच अशा अनेक पतमानांकन संस्था आहेत. क्रिसिल ही २००५ मध्ये जागतिक पातळीवरील स्टँडर्ड अँड पुअर्स या कंपनीचा हिस्सा बनली आहे. आता ती स्टँडर्ड अँड पुअर्स या कंपनीची उपकंपनी म्हणून काम करत आहे. इक्रा ही मुडीज कंपनीची उपकंपनी म्हणून काम करत आहे. सिबील ही कंपनी कर्जदार व्यक्तींचे ३०० ते ९०० अंकांमध्ये पतगुणांकन करते. या संस्था प्रामुख्याने विविध देशांतील सरकारी वित्त साधनांचे पतमानांकन करतात. आंतरराष्ट्रीय पत बाजारात गुंतवणुकीचे सातत्य राखण्यासाठी व देशाची पत कायम राखण्यासाठी या विदेशी पतमानांकन संस्थांकडून चांगले पतमानांकन मिळणे आवश्यक असते. या विदेशी संस्था अर्थव्यवस्थेतील चढ-उतार व स्थूल आर्थिक धोरणे यांचा विचार करून पतमानांकन बदलतात. याचा परिणाम भांडवली बाजारावर, तसेच विदेशी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर होतो. हा परिणाम नियंत्रित राखून विदेशी गुंतवणुकीचे सातत्य कायम ठेवण्यासाठी धोरण सातत्य, किंमत नियंत्रण, व्याजदर सातत्य या उपायांचा अवलंब करणे गरजेचे असते.

भारतात भांडवल बाजाराची नियामक संस्था म्हणून काम करणाऱ्या सेबी या संस्थेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार भारतीय पतमानांकन संस्था पतमानांकनाची पद्धत ठरवतात. गुंतवणूकदार, धनको, ऋणको, सरकारी वित्तीय आस्थापना आणि खाजगी कंपन्या या सर्व घटकांच्या वित्तीय स्थैर्याच्या व वृद्धीच्या दृष्टीने पतमानांकन हे अतिशय महत्त्वाचे आहे. पत जोखमीची तीव्रता कमी करून लाभ किंवा नफा मिळविण्याच्या दृष्टीने पतमानांकन मार्गदर्शक ठरते. याशिवाय, बाजारातील पत निर्देशक म्हणून मदत करते.

थोडक्यात, भांडवली बाजाराच्या असमान माहितीच्या समस्यांवर तोडगा म्हणून पतमानांकनाकडे पाहता येते. सर्व वित्तीय घटकांना माहितीचे समान वाटप होण्यासाठी व बाजारातील फसवणूक, कर्जबुडवेगिरी, वित्तीय नुकसान हे परिणाम टाळण्यासाठी पतमानांकन अतिशय उपयुक्त आहे. भारतासारख्या विकसनशील वित्तीय बाजारांमध्ये पतमानांकन खूप मोलाची भूमिका बजावत आहे.

संदर्भ : https://www.sebi.gov.in/sebi_data/attachdocs/1288588001441.pdf

समीक्षक : अविनाश कुलकर्णी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.