बिनफर्ड, लुईस : (२१ नोव्हेंबर १९३१–११ एप्रिल २०११). ल्यूईस बिनफोर्ड. अमेरिकन मानवशास्त्रज्ञ व पुरातत्त्वज्ञ. पुरातत्त्वविद्येतील उद्दिष्टे, सैद्धांतिक मांडणी आणि पद्धतींमध्ये बदल घडवून नवपुरातत्त्वाला जन्म देण्यात व पुरातत्त्वविद्येकडे बघण्याच्या विज्ञानाच्या दृष्टिकोनात जागतिक पातळीवर आमूलाग्र बदल घडविण्यात लुईस बिनफर्ड यांचे मोठे योगदान आहे. [ नवपुरातत्त्व, पुरातत्त्वीय विज्ञान आणि प्रक्रियावादी पुरातत्त्वाचा कालखंड ]
लुईस रॉबर्ट्स बिनफर्ड यांचा जन्म अमेरिकेच्या व्हर्जिनिया राज्यातील नॉरफोक येथे झाला. त्यांचे वडील जोसेफ लुईस बिनफर्ड कोळसा खाणीवर काम करत असत. कुटुंबाच्या कमकुवत आर्थिक स्थितीमुळे लुईस बिनफर्ड यांना अनेक नातेवाईकांकडे राहून शालेय शिक्षण पूर्ण करावे लागले. तसेच त्यांनी बांधकामांवर अनेक प्रकारची कामे करून घरखर्चाला हातभार लावला. बिनफर्ड यांनी व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून (ब्लॅक्सबर्ग) वन्यजीव विज्ञानात प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला; पण लगेचच पुढील शिक्षण थांबवून ते सैन्यात भरती झाले. त्यांची मानवशास्त्रज्ञांच्या एका गटाबरोबर काम करण्यासाठी नियुक्ती झाली. अमेरिकेच्या नियंत्रणाखालील पॅसिफिक बेटांवर लोकांच्या पुनर्वसनात मदत करणे, हे या गटाचे काम होते. तसेच ओकिनावामधील दफनांचे पुरातत्त्वीय उत्खनन करण्याच्या कामात त्यांचा सहभाग होता. लष्करातील त्यांच्या या सेवाकाळात बिनफर्ड यांना पुरातत्त्व आणि मानवशास्त्रात रस निर्माण झाला.
लष्करी सेवेतून परतल्यावर (१९५४) बिनफर्ड यांनी उत्तर कॅरोलिना विद्यापीठात प्रवेश घेतला आणि मानवशास्त्राचा अभ्यास सुरू केला. दरम्यान शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी स्वतःचा कंत्राटी व्यवसाय सुरू केला होता. या विद्यापीठातून बी. ए. (१९५७) पदवी मिळवल्यानंतर, त्यांनी मिशिगन विद्यापीठातून एम. ए. (१९५८) आणि पीएच. डी. (१९६४) पदव्या प्राप्त केल्या. त्यांनी शिकागो विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ (सांता बार्बरा) आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ (लॉस एंजेलिस) येथे अध्यापनाचे काम केले. १९६४ ते १९६८ या काळात सहकाऱ्यांबरोबरच्या मतभेदांमुळे त्यांची नोकरी क्वचितच अनेक महिने टिकत असे. ‘आपल्याला अमेरिकेतील अनेक नामवंत विद्यापीठांनी हाकलून दिलेʼ असे त्यांनी स्वतःच नमूद केले आहे. बिनफर्ड १९६८ मध्ये न्यू मेक्सिको विद्यापीठात प्राध्यापक झाले. तेथे तेवीस वर्षे राहिल्यानंतर १९९१ मध्ये ते टेक्सस राज्यातील सदर्न मेथॉडिस्ट विद्यापीठात रुजू झाले व तेथून २००३ मध्ये निवृत्त झाले.
बिनफर्ड यांनी कोणत्याही जगप्रसिद्ध पुरातत्त्वीय वास्तूचे उत्खनन केले नाही अथवा प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे शोधली नाहीत; परंतु त्यांचा उत्तर अमेरिका, आफ्रिका, यूरोप आणि मध्य पूर्वेसह विविध देशांमधील उत्खननात सहभाग होता. प्रागैतिहासिक दगडी अवजारांचा अभ्यास आणि मानवी जीवनातील विविध क्रियांशी त्यांचा संबंध उलगडून दाखवणे, हे पुरातत्त्वातील त्यांचे सर्वांत मोठे योगदान आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया येथील शिकार करून व अन्न गोळा करून जगणाऱ्या लोकांच्या दैनंदिन वर्तनाच्या आकृतीबंधांचा त्यांनी वीस वर्षे सखोल अभ्यास केला [ लोकजीवनशास्त्रीय पुरातत्त्व ].
बिनफर्ड यांनी शिकागो विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक असतानाच पुरातत्त्वज्ञांनी आपली अभ्यासाची जुनी पद्धत बदलायला हवी, असे सुचवणारा पहिला लेख लिहिला (१९६२). आजवर पुरातत्त्वविद्येत फक्त मिळालेल्या अवशेषांची सूची करणे यापेक्षा वेगळे काही केले जात नाही आणि म्हणून मिळालेल्या माहितीला सिद्ध झालेल्या ज्ञानाचा दर्जा प्राप्त होत नाही, असा आक्षेप त्यांनी पारंपरिक पुरातत्त्वाबद्दल सातत्याने घेतला. त्यांनी सतत युक्तिवाद करून पारंपरिक पुरातत्त्वीय पद्धतीला चिमटे काढले, छोटेछोटे धक्के दिले आणि पुरातत्त्वात वेगळी वैचारिक चौकट उभी करण्याला चालना दिली. पुरातत्त्व हे विज्ञानच आहे, असे त्यांचे अनेकांना न आवडलेले पण ठाम मत होते. संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग, संशोधन पद्धतीची नवीन रचना, सिद्धांतकल्पना (hypotheses) मांडून त्यांची चाचणी घेणे, पुरातत्त्वीय अवशेषांच्या विश्लेषणासाठी विविध वैज्ञानिक तंत्रांचा वापर करणे आणि अनुमानासाठी निगमन (deduction) पद्धत या सगळ्यांचा त्यांनी पुरस्कार केला. बिनफर्ड यांच्याबरोबरच स्विडिश पुरातत्त्वज्ञ एम. पी. माल्मर आणि ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ डेव्हिड क्लार्क यांच्या कामांमुळे बिनफर्ड यांनी सुचवलेला पुरातत्त्वीय संशोधनाचा नवीन प्रवाह नवपुरातत्त्व (New Archaeology) या नावाने विकसित झाला. नवपुरातत्त्व चळवळीने पुरातत्त्वशास्त्राची पद्धत आमूलाग्र बदलून टाकली. विशेषतः बिनफर्ड यांच्यामुळे पुरातत्त्वविद्येचा दर्जा बदलला व १९७०-८० या दशकात या ज्ञानशाखेला विज्ञानाचा दर्जा प्राप्त झाला. नवपुरातत्त्व हा केवळ संशोधनाचा नवीन मार्ग नाही, तर तो एक ज्ञानशास्त्रीय सिद्धांत (Epistemology) आहे, असे बिनफर्ड म्हणत. निव्वळ पुरातत्त्वीय अवशेष गोळा करून काहीही साध्य होत नाही, तर ही माहिती वापरून भूतकाळातील मानवी वर्तनाबद्दल ‘काʼ व ‘कसेʼ हे प्रश्न विज्ञानाप्रमाणे विचारणे गरजेचे आहे, असे बिनफर्ड यांनी ठामपणाने सांगितले.
प्रागैतिहासिक मानवसमूहांनी पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेताना सांस्कृतिक क्षमतांचा कसा वापर केला, या प्रश्नाचा त्यांनी सतत मागोवा घेतला. ते म्हणत असत की, मानवी कुतूहलाला मर्यादा नसल्याने भूतकाळाबद्दल विचारलेल्या अशा प्रश्नांना मर्यादा असू शकत नाही. तसेच फक्त पुरातत्त्वशास्त्रज्ञच नाही, तर समाजातल्या प्रत्येकानेच भूतकाळातील मानवी जीवनासंबंधी ‘काʼ व ‘कसेʼ हे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे शोधण्यात सक्षम व्हायला हवे, असे ते मानत असत. त्यामुळे पुरातत्त्वीय अवशेष व स्थळे ही भूतकाळातील मानवी संस्कृतीकडे बघण्याचे झरोके व्हायला हवेत, अशी त्यांची इच्छा होती. पुरातत्त्वाचे उद्दिष्ट केवळ प्राचीन काळाचे वर्णन करणे आणि त्या काळाचे स्मरणरंजन करणे हे असून चालणार नाही, तर पुरातत्त्वाने प्राचीन काळात मानवी समाजात घडलेल्या बदलांचे स्पष्टीकरण (explanation) देण्याची जबाबदारी स्वीकारायलाच हवी, असा बिनफर्ड यांचा आग्रह होता.
बिनफर्ड यांनी १९६८ मध्ये फ्रान्समधील कोंबे ग्रेनाल या यूरोपातील मध्य पुराश्मयुगीन मुस्टेरियन (Mousterian) संस्कृतीच्या स्थळावरील दगडी अवजारे आणि प्राण्यांच्या अवशेषांचा अभ्यास सुरू केला. कोंबे ग्रेनाल येथील संशोधनामुळे बिनफर्ड यांचा प्रसिद्ध फ्रेंच पुरातत्त्वज्ञ फ्रान्स्वा बोर्डे (François Bordes) यांच्याशी वादविवाद झाला. या स्थळावर मिळालेल्या दगडी अवजारांवरून तेथे अनेकदा निअँडरथल मानवी टोळ्यांनी वसाहत केली असावी, असा बोर्डे यांचा निष्कर्ष बिनफर्ड यांना पटला नाही. कारण असा निष्कर्ष काढण्याची पद्धत सदोष आहे, असे त्यांना वाटले. पुरातत्त्वीय उत्खननातून मिळालेली माहिती एक प्रकारे स्थिर (static) असते. या माहितीचा वापर करून प्राचीन काळातील मानव-पर्यावरण यांच्यातील प्रवाही (dynamic) नातेसंबंध शोधण्यासाठी बिनफर्ड यांनी ‘मिडल रेंज थिएरीʼ (Middle Range Theory) ही संकल्पना मांडली. आपले पुरातत्त्वीय निष्कर्ष बळकट असावेत, यासाठी अलास्कातील नुनामियूट (Nunamiut) जमातीच्या लोकजीवनशास्त्रीय निरीक्षणांना १९६९ मध्ये प्रारंभ केला, हे संशोधन दशकभर चालू होते.
भूतकाळातील मानवी वर्तनाच्या संबंधात पुरातत्त्वातील प्राण्यांच्या हाडांच्या अभ्यासात बिनफर्ड यांनी क्रांती केली [ पुरातत्त्वीय प्राणिविज्ञान ]. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेतील त्यांच्या अभ्यासातून मिळालेल्या माहितीवर आधारित बोन्सः एन्शंट मेन अँड मॉडर्न मिथ्स (१९८१) हे पुस्तक त्यातील नवीन संशोधन पद्धत आणि वादग्रस्त निष्कर्ष यामुळे गाजले. बीजिंगजवळील झाउकाउडियन (Zhoukoudian Caves) गुहांमधील होमो इरेक्टस (Homo erectus) मानव प्रजातीच्या अवशेषांच्या अभ्यासानंतर बिनफर्ड यांनी हे मानव तरस, गिधाडे वगैरे प्राण्यांप्रमाणे अगोदरच मेलेल्या प्राण्यांचे मांस खात असत, असे प्रतिपादन केले. त्यांच्या या निष्कर्षामुळे प्रागैतिहासिक मानव हे अत्यंत कुशल व महान शिकारी होते, ही प्रचलित कल्पना मोडीत निघाली आणि त्यामुळे पुरातत्त्व व मानवशास्त्रात विलक्षण खळबळ उडाली.
बिनफर्ड यांची २० पुस्तके आणि १२६ शोधनिबंध प्रकाशित झाले. त्यातील ॲन आर्किऑलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह (१९७२), नुनामियूट एथ्नोआर्किऑलॉजी (१९७८), वर्किंग ॲट आर्किऑलॉजी (१९८३), इन पर्स्युट ऑफ द पास्ट (१९८३) आणि डिबेटिंग आर्किऑलॉजी (१९८९) ही पुस्तके नवपुरातत्त्व आणि पुरातत्त्वीय सिद्धांतांच्या संदर्भात मैलाचे दगड मानली जातात. तथापि बिनफर्ड यांची कारकिर्द वादविवादांनी भरलेली आहे. सुरुवातीच्या काळातले त्यांचे पीएच. डी. मार्गदर्शक व विख्यात अमेरिकन पुरातत्त्वज्ञ जेम्स ग्रिफीन, गॉर्डन विली, जेरेमी सोब्लॉफ, फ्रान्स्वा बोर्डे आणि नंतरच्या काळात पॉल मेलार्स, ग्लिन आयझॅक, जॉन येलेन, इयान हॉडर, रिचर्ड गूड, हेन्री बून आणि मायकेल शिफर अशा अनेक पुरातत्त्वज्ञांबरोबर त्यांच्या चकमकी उडाल्या. यातले हेन्री बून, रिचर्ड गूड आणि मायकेल शिफर हे तर त्यांचे विद्यार्थीच होते. बिनफर्ड यांची वाद घालण्याची पद्धत उद्धटपणाची आणि धसमुसळी असे. ‘मी स्वतःच वाद उकरून काढतो आणि टोकाला जाईपर्यंत मुद्दामच युक्तिवाद ताणतोʼ असे बिनफर्ड यांनी लिहून ठेवले आहे. अर्थातच या वादविवादांमुळेच १९७० ते २००० या काळात पुरातत्त्व व मानवशास्त्रात क्रांतिकारक बदल घडून आले, हे मात्र बिनफर्ड यांचे टीकाकारही मान्य करतात.
बिनफर्ड जरी अमेरिकन पुरातत्त्वज्ञ असले, तरी त्यांचा प्रभाव संपूर्ण जगभर जवळजवळ पाच दशके होता. त्यांना साउथँप्टन आणि लायडेन विद्यापीठांनी मानद पदव्या दिल्या. ते अमेरिकेच्या नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आणि ब्रिटिश अॅकॅडमीचे फेलो होते. ब्रिटनच्या रॉयल अँथ्रोपॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचे हक्सले मेमोरियल मेडल, सोसायटी फॉर अमेरिकन आर्किऑलॉजीचा सन्मान व ब्रिटिश अॅकॅडमीचा जीवनभराच्या कामगिरीसाठीचा पुरस्कार यांसह अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.
अमेरिकेतील मिझुरी राज्यातील कर्क्सव्हील येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Binford, L. R. ‘A Consideration of Archaeological Research Designʼ, American Antiquity, 29: 425-41, 1964.
- Binford, L. R. ‘Archaeology as Anthropologyʼ, American Antiquity, 28: 217-25, 1962.
- Kelly, J. H. & Hanen, M. P. Archaeology and the Methodology of Science, Albuquerque, 1990.
- Paddayya, K. ‘Obitury: Lewis Robert Binfordʼ, Man and Environment, 36 (1): 124-128, 2011.
- जोगळेकर, प्रमोद, ‘पुरातत्त्वविद्येतील नवीन प्रवाहʼ, नवभारत, ७४ (४) : १२-१९, २०२१.
- https://msu-anthropology.github.io/deoa-ss16/binford/binford.html
समीक्षक : जयेंद्र जोगळेकर