भारतीय परिचर्या क्षेत्राचा इतिहास अत्यंत समृद्ध आणि गौरवशाली आहे. प्राचीन काळातील सेवावृत्तीपासून ते आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठित परिचर्येपर्यंतचा हा प्रवास विस्मयकारक आहे.
प्राचीन भारतीय परिचर्या : भारतात परिचर्येची मुळे प्राचीन वैदिक काळात आढळतात. प्राचीन आयुर्वेदात उत्तम आरोग्यासाठी भिषक (डॉक्टर), द्रव्य (औषध), उपस्थाता (परिचारक) आणि रोगी (रुग्ण) हे ‘चतुष्पाद’ (चार स्तंभ) सांगितले आहेत.
- सुश्रुत आणि चरक संहिता : या ग्रंथांमध्ये परिचारकाचे गुण वर्णन केले आहेत. त्या काळी परिचारक हा ‘शुचि’ (स्वच्छ), ‘दक्ष’ (कुशल), ‘अनुराग’ (रुग्णाबद्दल प्रेम असलेला) आणि ‘बुद्धिमान’ असावा असे मानले जाई.
- पुरुष परिचारक : प्राचीन काळात परिचर्येचे कार्य प्रामुख्याने पुरुषांकडेच होते. स्त्रिया केवळ प्रसूती काळात ‘प्रसविका’ (सुईण) म्हणून मदत करत असत. सम्राट अशोकाच्या काळात ठिकठिकाणी रुग्णालये आणि औषधालये उभारली गेली, जिथे रुग्णांची सेवा करण्यासाठी प्रशिक्षित सेवक नेमले जात.
- प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांना अजिबात स्वातंत्र्य नव्हते. विविध जाती धर्मातील चालीरीती, अंधश्रद्धा यांमुळे स्त्रियांना परिचर्या व्यवसायाला वाव नव्हता. परिचर्या करणे हे नोकरांचे काम असून त्याला कमी दर्जाचे समजले जात होते.
स्वातंत्र्यपूर्व काळातील परिचर्या : पंधराव्या शतकानंतर पोर्तुगीज सरकारने गोवा आणि मद्रास येथे युरोपीय पद्धतीचे दवाखाने उघडले व त्यात कामासाठी यूरोपमधूनच वैद्यक आणले. मध्ययुगीन काळात परिचर्या व्यवसायाची प्रगती काहीशी मंदावली, परंतु आधुनिक परिचर्येचा पाया ब्रिटिश काळात घातला गेला.
प्रारंभिक प्रयत्न :
- १६६४ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सैनिकांसाठी पहिले रुग्णालय मद्रास (चेन्नई) येथे सुरू केले. या सैनिकी रुग्णालयात शुश्रूषा करण्यासाठी युरोपीय परिचारिकांना पाचारण करण्यात आले. त्याला लष्करी परिचर्या (military nursing) म्हणून ओळखले जात असे.
- १८५९ मध्ये स्वच्छताविषयक शाही आयोगाने (the Royal Commission on Sanitation) भारतात मोठ्या संख्येने मृत्यू पावणाऱ्या ब्रिटिश सैनिकांच्या आरोग्याची पाहणी करण्याची विनंती सुश्री नाइटिंगेल यांना केली. फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी भारतातील लष्करी आणि नागरी रुग्णालयांच्या स्वच्छतेवर भर दिला. त्यांच्या शिफारशींनुसार व मार्गदर्शनाखाली, भारतात परिचर्या या व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी दहा पात्र ब्रिटिश परिचारिका आल्या. त्या भारतीय लष्करी वैद्यकीय सेवेच्या सदस्या बनल्या.
- पहिले प्रशिक्षण केंद्र : १८७१ मध्ये, मद्रास येथील पूर्वीच्या सैनिकी रुग्णालयाचे रूपांतर सामान्य रुग्णालयात करण्यात आले व या शासकीय सामान्य रुग्णालयात (Government General Hospital) परिचर्येची पहिली शाळा सुरू करण्यात आली; यामध्ये सहा विद्यार्थिनींसह सहा महिन्यांचा प्रसाविका पदविका (midwifery) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. इंग्लंडमधून महिला अधीक्षक आणि प्रशिक्षित परिचारिकांची मद्रास येथे नियुक्ती करण्यात आली.
- १८७४ ते १८८० या दशकादरम्यान, भारताच्या विविध भागांमध्ये मिशनरी संस्थांच्या माध्यमातून परिचर्या प्रशिक्षण सुरू करण्यात आले . ज्यामध्ये अँग्लो इंडियन ख्रिश्चन आणि यूरोपीय मुलीही प्रशिक्षण घेत होत्या.
- १८८६ मध्ये मुंबई येथे जेजे रुग्णालयात प्रथमतः पूर्ण वेळेचे परिचर्या प्रशिक्षण सुरू करण्यात आले. सुरुवातीला ते २ वर्ष कालावधीचे होते.
- १८९१ साली भारतीय वंशाच्या महाराष्ट्रातून पहिल्या स्त्री काशीबाई गणपत या जेजे रुग्णालयात प्रथमतः परिचर्या प्रशिक्षण घेण्यासाठी पुढे आल्या. त्या भारतातील पहिली नोंदणीकृत परिचारिका म्हणून ओळखल्या जातात.
- जे जे रुग्णालयातून टी. के. एडरेनवाला या उत्कृष्टपणे उत्तीर्ण झालेल्या पहिल्या परिचारिका होय. त्यांनी वॉर्ड परिचारिकेपासून परिचर्या अधीक्षकापर्यंत विविध पदांवर काम केले. त्या १९४८ ते १९६६ या काळात भारत सरकारच्या एक अग्रणी परिचर्या सल्लागार आणि परिचर्या शिक्षण व प्रशासनाच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण नेत्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिचर्या परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आणि भारतीय प्रशिक्षित परिचर्या परिषदेच्या (TNAI) नेत्या म्हणून त्यांनी या व्यवसायाची प्रतिष्ठा वाढवली आणि १९५६ मध्ये त्यांना फ्लॉरेन्स नाइटिंगेल पदकाने सन्मानित करण्यात आले.
- १९०५ साली परिचर्या अधीक्षक संघटनेची (association of nursing superintendent) स्थापना लखनौ येथे करण्यात आली.
- १९०८ साली प्रशिक्षित परिचारिका संघटनेची स्थापना मुंबई येथे करण्यात आली.
- बॉम्बे अध्यक्षीय परिचर्या परिषद (Bombay Presidency Nurses Association : परिचारिकांच्या विविध संस्थांना एकत्र करण्यासाठी १९०९ मध्ये बॉम्बे अध्यक्षीय परिचर्या परिषदेची स्थापना करण्यात आली. तदनंतर सुरवातीचे २ वर्षाचे प्रशिक्षण ३ वर्षाचे करण्यात आले.
- १९०९ च्या सुरुवातीलाच, पुरेसे प्रशिक्षित परिचारिका तयार करण्याची गरज जाणवली. त्यामुळे सेवेचा दर्जा कायम राखण्यासाठी, वैयक्तिक तसेच रुग्णालयांच्या गटांनी काही प्रकारच्या सूचनांसाठी नियम घालून दिले. यामुळे १९११ मध्ये दक्षिण भारत परीक्षा मंडळ आणि १९१२ मध्ये उत्तर भारत परीक्षा मंडळाची स्थापना झाली. या मंडळांनी गुणांची योजना आणि अभ्यासक्रमाचा एकसमान नमुना निश्चित केला. अशाप्रकारे, मिशन रुग्णालयातील परिचर्या नेत्यांनी परिचारिकांसाठी प्रशिक्षणाचा एकसमान नमुना साध्य करण्याचे उद्दिष्ट गाठून, १९११ सालीच भारतात पद्धतशीर परिचर्या शिक्षणाचा पाया घातला. १९३४ मध्ये मध्य-भारत परीक्षा मंडळ अस्तित्वात आले. सुरुवातीला प्रत्येक रुग्णालय आणि नंतर मंडळे परिचारिकांना प्रमाणपत्रे देत असत, कारण नोंदणीसाठी कोणतेही नियम नव्हते.
- १९२२ साली परिचर्या अधीक्षक संघटना व प्रशिक्षित परिचर्या परिषद एकत्रित येऊन “भारतीय प्रशिक्षित परिचर्या परिषद” म्हणून ओळखली जाऊ लागली.
- परिचारिका कायदा : नोंदणी परिषद स्थापन करण्याचे पहिले पाऊल मुंबईत उचलले गेले. बॉम्बे अध्यक्षीय परिचर्या परिषदेने या दिशेने काम सुरू केले आणि १९३५ मध्ये बॉम्बे परिषदेची स्थापना झाली.
१९२६ मध्ये मद्रास परिचारिका आणि प्रसविका कायदा
१९३२ मध्ये पंजाब परिचारिका नोंदणी कायदा
१९३४ मध्ये बंगाल परिचारिका कायदा
१९३५ मध्ये बिहार आणि ओरिसा परिचारिका आणि प्रसविका नोंदणी कायदा
इतर राज्यांनी त्यांच्या राज्य परिचारिका परिषदेची स्थापना खूप नंतर केली.
- लष्करी परिचर्या सेवेचा विकास : १ ऑक्टोबर १९२६ रोजी, भारतीय सैन्यासाठी (Indian Troops) कायमस्वरूपी परिचर्या सेवा स्थापन करण्यात आली. ही तारीख आता लष्करी परिचर्या सेवेचा ‘कॉर्प्स डे’ म्हणून साजरी केली जाते.
- याच काळात १९२६ मध्ये मुंबईच्या केईएम (KEM) रुग्णालयात परिचर्या शाळेचीची स्थापना झाली, जिथे ‘कमवा आणि शिका’ या तत्त्वावर परिचारिकांचे प्रशिक्षण सुरू झाले.
- पूर्वीच्या काळात, बहुतेक शाळांमध्ये शिक्षणाचे माध्यम स्थानिक भाषा होती आणि शैक्षणिक पात्रता फक्त आठवीपर्यंतच होती. १९३६ मध्ये, परिचर्या परिषदांनी शैक्षणिक पात्रता वाढवून ती ‘मॅट्रिक्युलेशन’ (दहावी) पर्यंत केली आणि मंडळांनीही याच निकषांचे अनुसरण केले.
- उच्च शिक्षण : १९४६ मध्ये राज कुमारी अमृत कौर परिचर्या विद्यालय दिल्ली आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर येथे परिचर्येचे पदवी अभ्यासक्रम (B.Sc. Nursing) सुरू झाले. पुढे १९५९ साली एम.एस्सी (M.Sc.) आणि १९८६ साली पीएचडीपर्यंतचे शिक्षण राज कुमारी अमृत कौर परिचर्या विद्यालय दिल्ली येथे उपलब्ध झाले.
- १९४७ मध्ये ‘भारतीय परिचर्या परिषद’ कायदा पास झाला व पुढे १९४९ साली ‘भारतीय परिचर्या परिषदे‘ची (INC) स्थापना झाली, ज्यामुळे देशभरातील परिचर्या शिक्षणात सुसूत्रता आली.
ब्रिटिश परिचर्या पद्धतीचा प्रभाव : भारतातील आधुनिक परिचर्या पद्धतीवर फ्लोरेन्स नाइटिंगेल यांच्या विचारांचा आणि ब्रिटिश व्यवस्थेचा खोलवर प्रभाव आहे.
- प्रशासकीय रचना : ब्रिटिश काळात परिचर्येला एक शिस्तबद्ध स्वरूप आले. गणवेशाची पद्धत, कामकाजाच्या वेळा आणि रुग्णालयातील श्रेणीबद्ध व्यवस्था (अधिसेविका; Matrons, परिसेविका; Sisters, अधिपरिचारिका; Staff Nurses) ही सर्व ब्रिटीश पद्धतीची देण आहे.
- फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी आधुनिक परिचर्येचा पाया रोवला तसेच भारतात व्यावसायिक परिचर्येची सुरुवात केली. त्यामुळे त्यांचा जन्म दिवस दिनांक १२ मे हा जगभरात जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो.
संदर्भ :
- Dhaulta, Jaiwanti P. Nursing administration and management, 2000.
- The Trained Nurses Association of India, Nursing In India, 2006.
- मोमीन, एस. एस. परिचर्या : शास्त्र, तंत्र, कला, २०१७.
समीक्षक : मराठी विश्वकोश संपादक
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
