ग्रीक तत्त्वज्ञानाची सुरुवात थेलीझ (इ.स.पू. सातवे-सहावे शतक) ह्या विचारवंतापासून झाली आणि त्याचा शेवट इ.स. ५२९ मध्ये अथेन्स येथील नव-प्लेटोमताचे पीठ बंद होऊन झाला. सुरुवातीच्या कालखंडात म्हणजे इ.स.पू. सहावे शतक ते इ.स.पू. पाचव्या शतकाच्या मध्यापर्यंत विश्वाच्या स्वरूपासंबंधीचाच विचार प्रामुख्याने होत होता. ह्याच्या पुढच्या कालखंडात (इ.स.पू.पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात) तत्त्वज्ञानाच्या कुतूहलाचा विषय बदलला व मानवी जीवन, नीती, सद्‌गुण इ. विचारांचे मुख्य विषय झाले. ह्यांनतरचा कालखंड (इ.स.पू. चौथे शतक) म्हणजे प्लेटो व ॲरिस्टॉटल ह्यांची विश्वाची घडण व मानवी जीवन ह्यांविषयीची समग्र आणि सुव्यवस्थित दर्शने. ॲरिस्टॉटलनंतर ग्रीक तत्त्वज्ञानाला उतरती कळा लागली व त्याची निर्मितिक्षमता क्षीण झाली.

प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञानाला एक विशिष्ट पार्श्वभूमी असल्याचे दिसून येते. आदिम समाजात प्रचलित असलेले विधी, मंत्रतंत्र, त्यांच्याभोवती गुंफलेल्या मिथ्यकथा, समजुती ह्यांच्या पार्श्वभूमीवर विश्वाचे स्वरूप, उत्पत्ती ह्यांविषयीचे तत्त्वज्ञान हळूहळू निर्माण होते. होमर, हीसिअड ह्यांच्या काव्यांत संकलित करण्यात आलेल्या मिथ्यकथांमध्ये ग्रीक तत्त्वज्ञानाचा उगम दिसून येतो. ग्रीक तत्त्वज्ञानात बौद्धिक युक्तिवादांवर आधारलेले वैचारिक मंथन थेलीझपासून सुरू झाले व म्हणूनच त्याला ग्रीक तत्त्वज्ञानाचा संस्थापक मानतात.

आयोनियन किंवा मायलीशियन मत : थेलीझ हा आयोनिया ह्या ग्रीसच्या आशिया मायनरमधील वसाहतीतील मायलीटस ह्या नगराचा रहिवासी होता. आयोनिया हा प्रदेश आणि विशेषतः मायलीटस हे नगर, हे ग्रीसच्या इतर देशांशी चालत असलेल्या व्यापाराचे एक मोठे केंद्र होते. अशा व्यापाराच्या केंद्रात अनेक भिन्न संस्कृतींच्या जमातींचा परस्परांशी परिचय होतो. कल्पनांची देवाणघेवाण होते व ही परिस्थिती परंपरेच्या कोशातून बाहेर पडायला आणि नवीन विचारांच्या निर्मितीला अनुकूल असते. थेलीझच्या विचारांचा मायलीटसचेच रहिवाशी असलेल्या ॲनॅक्झिमँडर (इ.स.पू. सहावे शतक) आणि ॲनॅक्झिमीनीझ (इ.स.पू. सहावे शतक) ह्या तत्त्ववेत्त्यांनी विकास केला आणि त्यांना मुरडही घातली. ह्यामुळे हे तिघे तत्त्ववेत्ते आयोनियन किंवा मायलीशियन विचारपंथाचे होते, असे म्हणण्यात येते.

थेलीझपुढचा मुख्य प्रश्न असा होता की, ह्या विश्वामध्ये अनेक भिन्न प्रकारच्या वस्तू आहेत. ह्या वस्तू उत्पन्न होतात, टिकून राहतात, विलयाला जातात आणि त्यांची जागा दुसऱ्या वस्तू घेतात. ह्या अनेकतेचा, विविधतेचा, बदलांचा उलगडा कसा करायचा? ह्या अनेकतेमागे एकतेचे तत्त्व असले पाहिजे, हे थेलीझचे गृहीतकृत्य आहे. हे एकतेचे तत्त्व म्हणजे एक एकजिनसी, चिरंतन असे द्रव्य असले पाहिजे व विश्वातील साऱ्या वस्तू ह्या द्रव्याच्या बनलेल्या असल्या पाहिजेत. थेलीझचा हा सिद्धांत आहे. तेव्हा थेलीझने जो प्रश्न उपस्थित केला, तो असा की, विश्वातील नाना प्रकारच्या विनाशी वस्तू कशाच्या, म्हणजे कोणत्या एका एकजिनसी मूलभूत द्रव्याच्या बनलेल्या आहेत? ह्या प्रश्नाशी निगडित असा दुसराही एक प्रश्न आहे. जर एकजिनसी असे मूलभूत द्रव्य हे विश्वाचे आदिम स्वरूप आहे, तर त्याच्यापासून भिन्न प्रकारच्या विशिष्ट वस्तूंची उत्पत्ती का होते? म्हणजे कोणत्या प्रकारे होते? थेलीझने पहिल्या प्रश्नाचे दिलेले उत्तर असे की, पाणी हे विश्वाचे मूलभूत द्रव्य होय. हे उत्तर त्याने का दिले, ह्याविषयी करण्यात आलेले तर्क असे : जर एका मूलभूत द्रव्यापासून सर्व भिन्न वस्तूंची उत्पत्ती होते असे असेल, तर हे मलभूत द्रव्य स्वयंचलित असले पाहिजे आणि पाणी प्रवाही असते. शिवाय ॲरिस्टॉटलने सूचित केल्याप्रमाणे वनस्पतींचे, प्राण्यांचे पोषण करणारी सर्व द्रव्ये द्रवरूपच असतात; ज्या शुक्रापासून नवीन जीवांची उत्पत्ती होते, तेही द्रवरूप असते; म्हणजे पाणी हेच ह्या साऱ्यांचे सार असते. तेव्हा पाण्यापासून भिन्न वस्तूंची उत्पत्ती कशी होते, ह्याचा उलगडा करता येतो.

थेलीझच्या ह्या विचारसूत्राचा ॲनॅक्झिमँडरने विकास केला. जगातील वस्तू परस्परविरोधी स्वभावाच्या, उष्ण आणि शीत, आर्द्र आणि शुष्क अशा परस्परविरोधी धर्मांच्या असतात, असे आढळून येते. उष्ण आणि शीत किंवा आर्द्र आणि शुष्क हे ॲनॅक्झिमँडरच्या मते गुण आहेत की वस्तू आहेत, हे सांगणे कठीण आहे. वस्तू आणि तिच्या अंगी असलेले गुण हा भेद अजून करण्यात आला नव्हता. आपण त्यांना द्रव्ये म्हणू. ही द्रव्ये परस्परविरोधी आहेत; कारण ती एकमेकांवर आक्रमण करतात व एकमेकांचा नाश करतात. उदा., उष्ण हे आर्द्राचा नाश करते, सूर्याची उष्णता पाणी शोषून टाकते. उलट, पाणी विस्तव विझविते. आता ज्या अर्थी ही द्रव्ये अशी परस्परविरोधी आहेत, त्या अर्थी त्यांच्यापैकी कोणतेही एक द्रव्य मूलभूत द्रव्य असू शकणार नाही. म्हणजे पाणी मूलभूत द्रव्य असू शकणार नाही; कारण पाणी म्हणजे आर्द्र आणि आर्द्र हे उष्णाची निर्मिती करीत नाही, तर उष्णाचा नाश करते. तेव्हा मूलभूत द्रव्य हे स्वतः निर्गुण, अविभक्त असे असले पाहिजे; त्याच्यात सर्व परस्परविरोधी धर्म किंवा द्रव्ये एकजीव होऊन विलीन झालेली असली पाहिजेत. अशा मूलभूत द्रव्याला ॲनॅक्झिमँडर ‘असीमित’ म्हणतो. ‘असीमित’ ह्याचा अर्थ ज्याला बाहेरून मर्यादा नाही व म्हणून जे अनंत आहे असा नाही, तर ज्याच्या भिन्न भागांमध्ये भेद पाडणाऱ्या अंतर्गत सीमा ज्याच्यामध्ये नाहीत ते; म्हणजे जे एकजिनसी आहे ते. हे मूलभूत द्रव्य प्रचंड प्रमाणावर विस्तारलेले असते आणि सदैव गतिमान असते. ह्या मंथनामुळे त्याच्या एखाद्या ठिकाणी त्याच्यात लुप्त असलेली उष्ण व शीत, आर्द्र व शुष्क ही परस्परविरोधी द्रव्ये एकमेकांपासून विभक्त होतात आणि त्यांचे एक जग बनते. उदा., आपल्या जगाच्या मध्यभागी शीत आणि आर्द्र ह्या द्रव्यांची मिळून बनलेली जमीन व जलाशय आहेत आणि त्याच्याभोवती उष्ण व शुष्क ह्या द्रव्यांचे बनलेले अग्नी, सूर्य, तारे इ. आहेत. ही परस्परविरोधी द्रव्ये जोपर्यंत आपापल्या योग्य त्या स्थानांच्या मर्यादेत राहतात, तोपर्यंत हे जग टिकून राहते; पण एका द्रव्याने मर्यादातिक्रमण करून जर दुसऱ्या द्रव्याचा नाश केला, तर तो ‘अन्याय’ ठरतो आणि ह्या अन्यायाचे स्वाभाविक शासन म्हणून ते विशिष्ट जग नष्ट पावते. विश्वात अशी अनेक जगे उदयाला येतात, टिकतात व नष्ट होतात. एकसंघ मूलभूत द्रव्यातून विभाजनाने भिन्न आणि परस्परविरोधी द्रव्ये निर्माण होतात. जोपर्यंत ही सर्व द्रव्ये आपापल्या मर्यादा सांभाळतात, तोपर्यंत जग टिकून राहते; पण जेव्हा ती आपली मर्यादा सोडून अन्याय करतात तेव्हा जग नष्ट हाते, ह्या विचारावर सामाजिक परिवर्तनाचा प्रभाव पडला असणे शक्य आहे. एकसंध अशा आदिम समाजातून विभाजनाने भिन्न व परस्परविरोधी हितसंबंध असलेले वर्ग निर्माण होतात, प्रत्येक वर्गाने आपली मर्यादा राखण्यात न्याय असतो; पण कुणी ह्या मर्यादेचा भंग करून अन्याय केला तर तो समाज नष्ट होतो, ह्या नैतिक विचाराचे प्रतिबिंबच ह्या विश्वाविषयीच्या विचारात पडले आहे.

ॲनॅक्झिमँडरनंतरचा विचारवंत ॲनॅक्झिमीनीझ हा परत मूलभूत द्रव्याच्या स्वरूपाकडे वळला. निर्गुण, असीमित असे मूलभूत द्रव्य गूढ राहते; कारण त्याचे स्वतःचे असे विशिष्ट स्वरूप असत नाही. ह्या निर्गुण मूलभूत द्रव्यापासून विभाजनाने भिन्न, विशिष्ट द्रव्ये आविर्भूत होतात, ही प्रकियाही गूढच आहे. ॲनॅक्झिमीनीझने वायू हे मूलभूत द्रव्य आहे असे मानले. वायू स्वयंचलित असतो. वायूचे घनीभवन झाले की, द्रवपदार्थ व घनपदार्थ लाभतात. उदा., बाष्पाचे पाणी व बर्फ होते. उलट विरलीभवनाने घनपदार्थापासून वायू आणि वायूचेही विरलीभवन झाले की, त्याच्यापासून अग्नी प्राप्त होतो. तेव्हा वायू हे मूलभूत द्रव्य आहे आणि त्याच्यापासून घनीभवन आणि विरलीभवन ह्या आपल्याला अनुभवात परिचित असलेल्या प्रक्रियांनी सर्व द्रव्ये निर्माण होतात, असे ॲनॅक्झिमीनीझचे मत होते. वायू हे जसे विश्वाचे मूलभूत द्रव्य आहे, त्याप्रमाणे माणसाचा आत्माही शुद्ध वायूच असतो.

मायलीशियन तत्त्ववेत्त्यांच्या विचारात दोन प्रमुख तत्त्वे आढळतात. मिथ्यकथा व त्यांच्यात विश्वाचे स्वरूप, त्याची उत्पत्ती ह्यांविषयी आढळणारे कल्पनारंजित विचार त्यांनी बाजूला सारले आणि विश्वात आढळणारी द्रव्ये, अनुभवाला येणाऱ्या प्रक्रिया ह्यांच्याच केवळ साहाय्याने विश्वाच्या स्वरूपाचा, त्याच्या उत्पत्तीचा, त्याच्यात घडणाऱ्या घडामोडींचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला, हा एक धागा. ह्याच दृष्टिकोणाचा विकास निसर्गविज्ञानात झाला. पण आदिम समाजातील संकल्पना व समजुती ह्यांचाही पगडा ह्या तत्त्ववेत्त्यांवर होता. हे विश्व, त्याचे मूलभूत द्रव्य त्यांच्या दृष्टीने सजीव, सचेतन होते. म्हणजे विश्व देवस्वरूप होते. ‘प्रत्येक वस्तूत देव ओतप्रोत भरलेले असतात’, असे थेलीझचे वचन आहे. ह्याचा अर्थ असा की, ज्या विश्वाची ती वस्तू घटक असते, ते विश्व देव आहे. ॲनॅक्झिमीनीझच्या मताप्रमाणे माणसाचा आत्मा ज्या वायूचा बनलेला असतो, तो म्हणजे शुद्ध वायू. विश्वाचे जे मूलभूत द्रव्य असते, त्याचा हा शुद्ध वायू घटक असतो. माणूस आणि विश्व ह्यांच्यात अशी एकात्मता असते. चैतन्य आणि जडद्रव्य, मन आणि भौतिक वस्तू ह्यांतील भेद स्पष्ट होण्यापूर्वीचे हे विचारविश्व आहे.

मायलीशियन तत्त्ववेत्त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला, तो असा मांडता येईल : एक आणि अनेक ह्यांचा परस्परसंबंध काय आहे? म्हणजे विश्वाची एकता आणि त्याच्यात आढळणारी अनेकता ह्याचा परस्परसंबंध काय आहे? ह्याचे मायलीशियन तत्त्ववेत्त्यांनी दिलेले उत्तर असे आहे की, विश्वात अनेक भिन्न वस्तू असल्या, तरी त्या एकाच मूलभूत द्रव्याच्या बनलेल्या असतात. ह्याच्यात विश्वाची एकता सामावलेली असते; पण द्रव्य हे जसे एकतेचे तत्त्व आहे, तसेच रूप किंवा आकार हेही एकतेचेच तत्त्व असू शकते. चिकणमातीच्या एकाच गोळ्याला वेगवेगळे आकार देऊन त्याच्या अनेक वस्तू बनविता येतात त्याचप्रमाणे टेबलाचा एक विशिष्ट आकार आपण घेतला, तर लाकडाला हा आकार देता येतो, पोलादाला देता येतो इत्यादी. येथे आकार हे एकतेचे तत्त्व आहे आणि द्रव्याच्या भिन्नतेमुळे अनेकता निर्माण होते. आकार हे एकतेचे तत्त्व आहे, ही कल्पना ग्रीक तत्त्वज्ञानात पायथॅगोरसने (इ.स.पू.सु. ५७२–४९७) प्रथम मांडली आणि तिचा ग्रीक तत्त्वज्ञानाच्या विकासावर विलक्षण प्रभावही पडलेला आहे. ग्रीक तत्त्वज्ञानात प्रामुख्याने दोन प्रवाह आहेत, असे मानण्यात येते : एक आयोनियन व दुसरा इटालियन. ह्याचा उगम पायथॅगोरसच्या मतात आढळतो. पायथॅगोरस जरी पूर्व ग्रीसमध्ये सेमॉस ह्या बेटात जन्मला होता, तरी प्रौढ वयात दक्षिण इटलीतील क्रोतोने ह्या नगरात तो वसतीला आला व तेथेच त्याने आपल्या पंथाची स्थापना केली.

पायथॅगोरसचा पंथ : पायथॅगोरसचा पंथ धार्मिक होता. आयोनियन तत्त्ववेत्त्यांप्रमाणे त्याला विश्वाविषयी केवळ बौद्धिक कुतूहल नव्हते. त्याने एका धार्मिक संघाची स्थापना केली होती. इतर धार्मिक पंथांप्रमाणे ह्या पंथानेही आपली काही मते आणि विधी गुह्य मानले होते. सामान्य लोकांपुढे ते प्रकट करणे निषिद्ध मानले जाई. ह्यामुळे ह्या पंथाभोवती गूढतेचे आवरण आहे. पायथॅगोरसच्या पंथावर ऑर्फिक ह्या ग्रीक धार्मिक पंथाचा गहिरा प्रभाव पडला होता. ह्या पंथाच्या मताप्रमाणे मानवी आत्म्याचे मूळचे स्वरूप दिव्य असते; तो देवलोकाचा रहिवासी असतो. त्याचे पतन झाल्यामुळे अशुद्ध अशा मानवी शरीरामध्ये त्याला वास करावा लागतो. इंद्रियनिग्रह, वैराग्य आणि विविध प्रकारचे कर्मकांड व व्रते ह्यांच्या योगाने त्याला स्वतःचे मूळचे शुद्ध स्वरूप प्राप्त करून घेता येते आणि मग इहलोकी व परलोकी दिव्य जीवन जगता येते. पण मूळचे शुद्ध स्वरूप प्राप्त होईपर्यंत त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. पायथॅगोरसच्या पंथानेही हे सिद्धांत स्वीकारले होते. त्याच्या मते आत्मा अमर आहे. तो अनेकदा जन्म-मृत्यूंच्या फेऱ्यांतून जातो. आत्मा केवळ मानवी शरीरच धारण करतो असे नाही, तर अनेकदा तो प्राण्यांच्या जन्मला येतो म्हणूनच पायथॅगोरस पंथीयांना मांसाहार वर्ज्य होता. ह्या विश्वात जे दिव्य तत्त्व आहे त्याचा मानवी आत्मा हा एक अंश आहे आणि म्हणून तो अमर व दिव्य आहे; पण तो मर्त्य शरीरात बंदिस्त झालेला असतो. आपले शुद्ध स्वरूप परत प्राप्त करून घेईपर्यंत तो जन्ममरणाच्या फेऱ्यांत अडकून राहतो. त्याचे शुद्ध स्वरूप परत प्राप्त झाले की, तो देहाच्या बंधनातून मुक्त होतो व विश्वाच्या दिव्य तत्त्वाशी एकरूप होतो. आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी ऑर्फिक पंथाने जी साधना सांगितली होती, तिचा बराचसा भाग पायथॅगोरसने स्वीकारला होता. पण त्याचे वैशिष्ट्य असे की, तिच्यात त्याने वेगळ्याच प्रकारची भर घातली. ही भर अशी की, तत्त्ववेत्त्याचे जीवन जगणे हीसुद्धा आत्म्याच्या शुद्धीकरणाचीच साधना होय; ज्ञानसाधना हाही आध्यात्मिक साधनेचाच एक प्रकार आहे. विश्वातील दिव्य तत्त्वाचे ज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळे आपला आत्मा त्या तत्त्वासारखा होतो व त्याच्याशी एकरूप होतो.

ह्या दिव्य तत्त्वाचे स्वरूप समजून घेण्यासाठी पायथॅगोरसने ग्रीक तत्त्वज्ञानात समाविष्ट केलेली महत्त्वाची संकल्पना म्हणजे ‘सीमा’. जे सीमित असते, मर्यादित असते, त्याला विशिष्ट आकार असतो, रूप असते, ते सुव्यवस्थित असते आणि म्हणून ते चांगले असते, सुंदर असते. हे विश्वही सीमित आहे, सुव्यवस्थित आहे म्हणून ते चांगले, सुंदर, दिव्य आहे. पायथॅगोरस विश्वाला ‘कॉस्मॉस’ म्हणत असे आणि कॉस्मॉस ह्या शब्दाने विश्वाचा सुव्यवस्थितपणा, सुयोग्यता, सौंदर्य हे गुण ध्वनित होतात. उलट जे अमर्याद, असीम असते ते अव्यवस्थित असते आणि त्याला मर्यादित, सीमित करून योग्य रूप द्यावे लागते.

ह्या व्यवस्थेचे मूलतत्त्व म्हणजे संख्या होय. पायथॅगोरसचा मूलभूत आणि क्रांतिकारक शोध म्हणजे सप्तकातील षड्ज व वरचा षड्ज, षड्ज व मध्य आणि षड्ज व पंचम ह्या परस्परांशी सुसंवादी असलेल्या सुरांमध्ये १ : २, २ : ३, ३ : ४ हे प्रमाण असते. ह्या शोधापासून पायथॅगोरसने जो सामान्य निष्कर्ष काढला तो हा की, वरवर पाहता असंबंधित भासणाऱ्या वस्तूंमध्येही काही व्यवस्था दडलेली असते. सूर म्हणजे ध्वनी आणि ध्वनी अमर्यादित असतो. कारण तो कितीही उंच आणि कितीही मंद असू शकतो. पण ह्या अमर्यादित ध्वनींना मर्यादा घालून प्रमाणबद्ध केले की, त्यांचा एकमेकांशी संवाद साधला जातो व ते सुंदर ठरतात. हेच विश्वाच्या स्वरूपामागील तत्त्व आहे. विश्व किंवा कॉस्मॉस हे अमर्याद द्रव्याला मर्यादा घालून प्रमाणबद्ध रूप दिल्याने घडलेले असते आणि हे प्रमाण अर्थात संख्यांच्या द्वारा व्यक्त होते. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आपण घेतल्या, तर त्या भिन्न द्रव्यांच्या बनलेल्या असतात, म्हणून भिन्न असतात. सर्व वस्तू त्याच घटकांच्या बनलेल्या असतात, पण हे घटक वेगवगळ्या प्रमाणांत एकत्रित केले गेल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनतात. म्हणजे वस्तू वेगळ्या असतात त्या त्यांचे घटक वेगळे असतात म्हणून नव्हे, तर त्यांची घडण वेगळी असते म्हणून घडण, आकार, रचना, रूप हे एक वेगळे तत्त्व पायथॅगोरसने ग्रीक विचारात प्रविष्ट केले. ही घडण म्हणजे योग्य त्या प्रमाणात भिन्न घटकांची केलेली रचना संख्यांच्या द्वारा व्यक्त होते; म्हणून पायथॅगोरसने ‘सर्व वस्तू संख्या होत’, असे म्हटले आहे. थोडक्यात, आयोनियन पंथ द्रव्यवादी होता, तर पायथॅगोरसचा पंथ आकारवादी होता, असे म्हणता येईल.

जे प्रमाणबद्ध, सुव्यवस्थित व म्हणून सुसंवादी असते ते चांगले असते, ह्या पायथॅगोरसच्या तत्त्वाचा पुढे अनेक क्षेत्रांत विस्तार करण्यात आला. त्यांतील एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे वैद्यक. प्राण्याचे शरीर अनेक परस्परविरोधी अमर्याद द्रव्यांचे बनलेले असते. उदा., शीत व उष्ण, आर्द्र व शुष्क, जोपर्यंत ह्या द्रव्यांचे शरीरात परस्परांशी असलेले प्रमाण योग्य असते, तोपर्यंत ही द्रव्ये सुसंवादी असतात व शरीर निरोगी असते; पण हा समतोल किंवा संवाद बिघडला की, शरीर रोगग्रस्त होते. विश्वात अंतर्हित असलेल्या ह्या सुव्यवस्थेचा शोध घेणे आणि त्याचे चिंतन करणे, हा तत्त्ववेत्त्यांचा जीवनमार्ग होय. अशा चिंतनाने त्याचा आत्माही सुव्यवस्थित होतो व विश्वातील दिव्य तत्त्वाशी एकरूप होतो. पायथॅगोरसच्या पंथाच्या प्रभावाचा एक अर्थ असा की, पारंपरिक धर्माच्या कोशातून ग्रीक समाज बाहेर पडू लागला होता. कॉलोफॉनचा झीनॉफानीझ (इ.स.पू.सु. ५७o–सु. ४८o) ह्या आयोनियन तत्त्ववेत्त्याने आपल्या काव्यातून ग्रीक परंपरेकडे चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिले. पुढे पार्मेनिडीझने जे मत मांडले त्याची बीजे झीनॉफानीझच्या विचारात आढळतात. होमरच्या ग्रंथांतून जे मानव देहधारी, अनैतिक कृत्ये करणारे देव आढळतात, त्यांची त्याने आपल्या काव्यांतून टीका केली. त्याच्या मते अचल असा एकमेव देव किंवा ईश्वर आहे. तो विश्वाचा निर्माता नाही, पण विश्वात जे बदल घडतात त्यांचा तो नियंता आहे. विश्व अनादी आहे. पृथ्वी आणि आप ह्या दोन महाभूतांपासून सर्व पदार्थांचा उगम होतो आणि विश्वावर ह्या दोन महाभूतांचे आळीपाळीने वर्चस्व असते, असे बहुधा त्याचे मत असावे. झीनॉफानीझने ज्ञानमीमांसेत एक महत्त्वाचे पाऊल टाकले. निश्चितपणे सत्य असलेले असे ज्ञान व जे सत्य असणे संभवनीय आहे असे आपल्याला वाटणारे मत, ह्यांच्यांत त्याने भेद केला. माणसांना वस्तूंविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेता येणे अशक्य आहे, त्यांना फक्त वस्तूंचे स्वरूप कसे असेल ह्याविषयीचे मत प्राप्त करून घेता येते, आपल्या मतांत आपल्याला अधिकाधिक सुधारणा करता येते. पण आपल्याला ज्ञान कधीही प्राप्त करून घेता येणार नाही. ह्या भूमिकेचा त्याने पुरस्कार केला.

विश्वात जी अनेकता, परस्परविरोधी द्रव्ये आढळतात त्यांच्या मागचे एकतेचे सूत्र आयोनियन पंथीयांना एकजिनसी द्रव्यात आढळले, तर पायथॅगोरस पंथीयांना ते ह्या द्रव्यांचा योग्य प्रमाणात समन्वय साधणाऱ्या सुसंवादात आढळते. ह्या पार्श्वभूमीवर हेराक्लायटस (इ.स.पू.सु. ५३६–४७o) याच्या तत्त्वज्ञानाचा उलगडा करता येईल. हेराक्लायटसला ‘गूढ’, ‘कोड्यांत बोलाणारा’ ही विशेषणे प्राचीन काळीही लावण्यात आली होती. आपली मते तो सूत्रवजा वचनांत मांडतो. यांपैकी अनेक वचने लुप्तही झाली आहेत. शिवाय आपल्या वचनांत ‘मी आपली मते उघड करीत नाही किंवा दडवूनही ठेवीत नाही, तर ती व्यंजित करतो’, असे त्यानेच म्हटले आहे. असे असले तरी त्याच्या तत्त्वज्ञानाचे सार स्पष्ट आहे.

चिरंतन आणि स्थिर अशा द्रव्याच्या शोधात आयोनियन तत्त्ववेत्ते होते. वस्तूंची उत्पत्ती, स्थिती, लय ह्या घटना घडतात खऱ्या; पण त्या तात्कालिक असतात आणि चिरंतन, स्थिर असे द्रव्य हेच त्यांचे अधिष्ठान असते. ह्याच्या उलट हेराक्लायटसचे मत असे की, विश्वात स्थिर असे काहीच नाही; जे आहे ते प्रवाही, गतिशील आहे. नदीच्या ठिकाणी, प्रवाहाच्या ठिकाणी जी एकता असते, तशी एकता विश्वाच्या ठिकाणी आहे. तसेच विश्वाच्या बुडाशी प्रमाणबद्धतेतून निर्माण होणारी सुसंवादी व्यवस्था आहे, असे पायथॅगोरसचे म्हणणे होते; पण अशी व्यवस्था केवळ स्थितिशील असेल. द्रव्यांच्या परस्परविरोधातून जो ताण निर्माण होतो, त्याच्यात ह्या सुसंवादाचे सार शोधले पाहिजे. ताण, विरोध, झगडा हे गतिमानतेचे व म्हणून अस्तित्वाचे, जीवनाचे, चांगुलपणाचे रहस्य आहे. ‘साऱ्या वस्तुजाताचा युद्ध हे जनक आहे’, ‘कलह म्हणजेच न्याय’ अशी हेराक्लायटसची वचने आहेत. परस्परविरोधातून वस्तूंना स्वतःचे विशिष्ट स्वरूप प्राप्त होते; म्हणून ‘चांगले आणि वाईट ही एकच गोष्ट आहे’, असे तो म्हणतो.

ह्यामुळे ‘विश्व म्हणजे चिरंजीवी असा अग्नी आहे, तो सतत योग्य प्रमाणात पेटविला जातो आणि योग्य प्रमाणात विझविला जातो’, असे हेराक्लायटस मानतो. एका मूलभूत द्रव्यापासून परस्परविरोधी द्रव्यांचे बनलेले जग निर्माण होते, असे तो ॲनॅक्झिमँडरप्रमाणे मानीत नाही. विश्व आज आहे तसेच पूर्वीही होते आणि भविष्यातही राहणार आहे ते कोणत्याही आदि द्रव्यापासून निर्माण झालेले नाही किंवा त्याच्यात ते विलीनही होणार नाही. योग्य प्रमाणात पेटविला जाणारा आणि योग्य प्रमाणात विझविला जाणारा अग्नी, हे त्याचे चिरंतन स्वरूप आहे; पेटविणे आणि विझविणे ह्या परस्परविरोधी प्रक्रियांच्या ताणातून स्थिर राहणारे असे ते स्वरूप आहे. प्रमाणात स्वतःला चेतवून व प्रमाणात स्वतःला विझवून स्वतःचे अस्तित्व चिरंतन राखणारा हा अग्नी म्हणजे अर्थात दिव्य तत्त्व आहे; तो स्वतःचा नियामक व इतर सर्व वस्तूंचाही नियामक आहे. तो ‘लॉगॉस’ म्हणजे शब्द किंवा प्रज्ञा आहे. अनेक फुटकळ वस्तूंचे ज्ञान मिळविण्याऐवजी साऱ्या विश्वाचे नियमन करणाऱ्या ह्या प्रज्ञेचे ज्ञान मिळविणे श्रेयस्कर आहे, असे हेराक्लायटसचे म्हणणे होते.

हेराक्लायटसमुळे गती, बदल, स्थित्यंतर ह्यांचे स्वरूप आणि विश्वातील स्थान काय, हा प्रश्न मध्यवर्ती बनला. त्याला पार्मेनिडीझ (इ.स.पू. सहावे-पाचवे शतक) याने जे उत्तर दिले आणि ज्या पद्धतीने त्याने हे उत्तर दिले, त्यामुळे ग्रीक तत्त्वज्ञानाचा सारा रोखच बदलला आणि ह्या तत्त्वज्ञानाचे नवीन पर्व सुरू झाले.

आयोनियन पंथीयांच्या म्हणण्याप्रमाणे विश्व एकजिनसी द्रव्य असते आणि मग ते नानाविध बनते; पण ‘बनणे’, ‘घडणे’, ‘बदलणे’ म्हणजे काय, ह्याचा अर्थच स्पष्ट करता येत नाही, ह्यांना अर्थच देता येत नाही, असा पार्मेनिडीझचा सिद्धांत आहे. कारण बदल घडून येणे म्हणजे जे होते ते नाहीसे (नाही असे) होणे आणि जे नव्हते (न होते) ते होणे; पण जे आहे ते नाही असे कसे होऊ शकेल व जे न होते ते कसे होऊ शकेल? पार्मेनिडीझचे म्हणणे असे की, जे आहे त्याच्याविषयी ‘ते आहे’ एवढेच म्हणता येईल ‘ते नाही’ असे म्हणता येणार नाही. यामुळे बदल अशक्य आहे. कारण बदल म्हणजे जे नाही ते आहे आणि जे आहे ते नाही असे होणे आणि हे अशक्य आहे. ह्याच कारणामुळे गती, स्थलांतर हेसुद्धा अशक्य आहे. कारण गतीमध्येसुद्धा वस्तू जिथे होती तिथे ती नाही आणि जिथे ती नव्हती तिथे ती आहे, असे घडून येते व हे अशक्य आहे. शिवाय वस्तू हलायची तर त्यासाठी पोकळी किंवा रिक्त अवकाश असावे लागते; पण रिक्त अवकाश म्हणजे जेथे वस्तू (म्हणजे जे आहे ते) नाही अशी जागा आणि जे आहे ते नाही, असे असू शकत नाही.

तेव्हा विश्व किंवा सत् किंवा ‘जे आहे’ त्याच्याविषयी ते आहे, एवढेच आपण म्हणू शकतो. ते अपरिवर्तनीय, अचल आणि चिरंतन असे असले पाहिजे. हे आपल्याला बुद्धीने, विचाराने समजून घेता येते. आता विश्वात अनेक वस्तू आहेत, अनेक वस्तू उत्पन्न होतात, बदलतात, नष्ट होतात असे आपल्या ज्ञानेंद्रियांना आढळते. पण पार्मेनिडीझच्या मते हा आभास आहे. ‘असणे’ म्हणजे काय ह्याचा अर्थ आपण स्पष्ट केला की, जे आहे त्याचे स्वरूप कसे असले पाहिजे, हे सिद्ध होते. जे सत् आहे त्याच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान आपल्याला बुद्धीनेच प्राप्त करून घेता येते. बुद्धिग्राह्य अतींद्रिय असे सत् आणि इंद्रियांना प्रतीत होणाऱ्या आभासरूप वस्तू हा भेद ग्रीक तत्त्वज्ञानात प्रथम पार्मेनिडीझने स्पष्टपणे केला व बुद्धीने प्राप्त होणारे सत्‌चे खरेखुरे ज्ञान आणि इंद्रियज्ञानावर आधारलेल्या समजुती अथवा मते, हा ह्याच्याशी संबंधित असलेला भेदही त्यानेच स्पष्ट केला. पायथॅगोरसच्या तत्त्वज्ञानात हा भेद अनुस्यूत होता; पण पार्मेनिडीझने तो स्पष्ट केला.

पार्मेनिडीझचे ‘सत्’ जडद्रव्य आहे की चैतन्य आहे, असा प्रश्न कधीकधी उपस्थित करण्यात येतो; पण पार्मेनिडीझचे तत्त्वज्ञान जड किंवा भौतिक वस्तू आणि मन किंवा चैतन्य यांमधील भेद स्पष्ट होण्यापूर्वीचे आहे. महत्त्वाची गोष्ट ही की, त्याचे ‘सत्’ बुद्धिग्राह्य आहे. हे सत् आणि नानाविध व बदलत जाणाऱ्या वस्तूंचे इंद्रियगोचर, आभासरूप जग हा भेद त्याने केला.

पार्मेनिडीझहून सु. पंचवीस वर्षांनी कनिष्ठ असलेला त्याचा अनुयायी एलियाचा झीनो (इ.स.पू.सु. ४९o–४३o) ह्या तत्त्ववेत्त्याला ग्रीक तत्त्वज्ञानात, तसेच पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात महत्त्वाचे स्थान आहे. संकल्पनांचे विश्लेषण करून त्यांतील आत्मविसंगती उघडकीला आणायच्या आणि त्यांचे अप्रामाण्य सिद्ध करायचे ह्या द्वंद्वात्मक (Dialectical) पद्धतीचा झीनो जनक होय. उदा., अनेक वस्तू आहेत असे आपल्या अनुभवाला येते. मग एकच आहे, अनेक नाहीत, असे पार्मेनिडीझ कसे म्हणू शकतो? तेव्हा ‘अनेक असणे’ किंवा ‘अनेकत्व’ ही संकल्पनाच आत्मविसंगत आहे, असे झीनो दाखवून देतो. अनेक असतील तर त्यांतील प्रत्येक एक असणारी. जे एक आहे त्याच्या ठिकाणी परिमाण असणार नाही; कारण त्याच्या ठिकाणी परिमाण असेल, तर त्याचे भाग पाडता येतील व मग ते एक असणार नाही. ते अनेक भागांचे बनलेले असेल, तेव्हा जे एक आहे त्याला परिमाण असणार नाही व म्हणून अशा एकांच्या मिळून बनलेल्या अनेकांनाही परिमाण असणार नाही. उलट जे आहे त्याच्या ठिकाणी काहीतरी परिमाण असणार व म्हणून त्याचे भाग असणार आणि ह्या भागांच्या ठिकाणीही परिमाण असणार. ह्याचा अर्थ असा होतो की, जे आहे त्याचे अनंत भाग असणार, ह्या प्रत्येक भागाच्या ठिकाणी परिमाण असणार व म्हणून जे आहे त्याचे परिमाण अनंत असणार. तेव्हा जर अनेक असतील, तर त्यांचे एकत्रित परिमाण शून्यही असणार व अनंतही असणार. तेव्हा अनेकत्वाची संकल्पनाच आत्मव्याघाती आहे व म्हणून अप्रमाण आहे. ह्याच प्रकारचे विश्लेषण करून झीनोने ‘गती’, ‘अवकाश’ इ. संकल्पनाही अप्रमाण आहेत तसेच इंद्रियसंवेदनांवर आधारलेले प्रत्यक्षज्ञान अप्रमाण आहे, असे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. ह्यापासून काढायचा निष्कर्ष असा की, इंद्रियगोचर विश्व हा आभास आहे आणि पार्मेनिडीझचे बुद्धिग्राह्य सत् हेच सत्य आहे.

पार्मेनिडीझचा दुसरा प्रसिद्ध अनुयायी म्हणजे मीलिसस (इ.स.पू. पाचवे शतक). सत् हे अनंत असले पाहिजे हे त्याने दाखवून दिले. कारण सत् सान्त असेल, तर जेथे सत् नाही असा अवकाश म्हणजे पोकळी असणार आणि जेथे सत् नाही ते असत् असल्यामुळे ते असू शकणार नाही. म्हणजे सत् सर्वत्र असणार व म्हणून ते अनंत असले पाहिजे. तसेच सत् बदलू शकत नसल्यामुळे त्याच्या ठिकाणी दुःखाची भावना असणार नाही. कारण बदलामुळेच दुःख प्राप्त होते. म्हणजे मीलिससही जडतत्त्व व चैतन्य ह्यात स्पष्ट भेद करीत नाही.

पार्मेनिडीझनंतर बदलाचा अर्थ स्पष्ट करणे आणि त्याच्या शक्यतेचा उलगडा करणे आवश्यक झाले. एकाच मूलभूत द्रव्यात परिवर्तन घडून येऊन त्याच्यातून नानाविध वस्तू निर्माण होतात, असे मानणे यापुढे अशक्य झाले होते. पण नानाविध, बदलत जाणाऱ्या वस्तू तर आहेत. त्यांचा आपल्याला अनुभवही येत असतो. त्यांचा उलगडा करायचा, तर मूलभूत द्रव्य एकच आहे, हा सिद्धांत सोडून द्यावा लागतो. ह्यामुळे पार्मेनिडीझनंतरचे तत्त्ववेत्ते बहुसत्तावादी वा अनेकतावादी आहेत.

ह्या अनेकतावादी तत्त्ववेत्त्यांत एम्पेडोक्लीझ, ॲनॅक्सॅगोरस आणि डीमॉक्रिटस हे प्रमुख होत. एम्पेडोक्लीझ (इ.स.पू.सु. ४९o–४३o) हा तत्त्ववेत्ता होता, त्याप्रमाणे पायथॅगोरससारखा साधक व धार्मिक प्रेषितही होता. तो पुनर्जन्म मानीत असे. नैसर्गिक शक्तींचे ज्ञान मिळवून त्यांना काबूत ठेवता येते, चमत्कार घडवून आणता येतात, असाही त्याचा विश्वास होता. तथापि तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात पार्मेनिडीझने उभ्या केलेल्या समस्येची उकल करण्याचा त्याने गंभीरपणे प्रयत्न केला आणि तात्त्विक विचारात मोलाची भर घातली.

मूलभूत द्रव्य एकच असते ही कल्पना सोडून देऊन त्याने पृथ्वी, आप, वायू आणि अग्नी ही चार मूलभूत द्रव्ये मानली. प्रत्येक मूलभूत द्रव्य अपरिवर्तनीय असते, ते बदलत नाही; पण ह्या चार मूलभूत द्रव्यांच्या वेगवेगळ्या प्रमाणांत होणाऱ्या संयोगाने वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू निर्माण होतात आणि ज्या मूलभूत द्रव्यांच्या संयोगाने वस्तू बनलेली असते ती मूलभूत द्रव्ये विभक्त झाली की, ती वस्तू नष्ट होते. तेव्हा वस्तुतः काहीच बदलत नाही. ज्याला आपण बदल म्हणतो, तो म्हणजे स्वतः न बदलणाऱ्या मूलभूत द्रव्यांचा होणारा संयोग किंवा त्यांचे होणारे विभाजन. आयोनियन पंथीयांनी जे एक मूलभूत द्रव्य मानले होते, ते स्वयंचलित असते, असेही त्यांनी मानले होते; पण अपरिवर्तनीय अशी अनेक मूलभूत द्रव्ये मानल्यानंतर त्यांचा संयोग-वियोग घडवून आणणारे वेगळे कारण कल्पिणे आवश्यक झाले. ह्यासाठी एम्पेडोक्लीझने प्रेम आणि संघर्ष अशी दोन कारणे मानली आहेत. प्रेम ह्या शक्तीमुळे असमान द्रव्ये–उदा., पृथ्वी व आप–एकमेकांशी संयोग पावतात. उलट संघर्ष ह्या शक्तीमुळे असमान द्रव्ये एकमेकांपासून विभक्त होतात; म्हणजेच समान द्रव्य एकत्रित होते. तेव्हा विश्वावर प्रेमाचा पूर्णपणे पगडा असतो, तेव्हा सर्व मूलभूत द्रव्ये एकमेकांत पूर्णपणे मिसळून गेलेली असतात. उलट जेव्हा विश्वावर कलहाचा पगडा पूर्णपणे बसलेला असतो, तेव्हा सर्व मूलभूत द्रव्ये एकमेकांपासून विभक्त झालेली असतात आणि प्रत्येक मूलभूत द्रव्ये पूर्णपणे एकत्रित आलेले असते. ह्या एका आत्यंतिक अवस्थेपासून दुसऱ्या आत्यंतिक अवस्थेकडे व दुसऱ्या अवस्थेपासून पहिल्या अवस्थेकडे अशी विश्वाची वाटचाल आळीपाळीने सतत चालू असते. विश्वाची सध्याची अवस्था ह्या दोन टोकांमध्ये कुठेतरी आहे. म्हणजे आजच्या अवस्थेत अनेक मूलभूत द्रव्यांच्या संयोगाने बनलेल्या वस्तूही आढळतात आणि समान मूलभूत द्रव्य–उदा., पृथ्वी किंवा आप–मोठ्या प्रमाणावर एकत्रित झालेलेही आढळते. ह्या शक्तींना एम्पेडोक्लीझ ‘प्रेम’ आणि ‘संघर्ष’ म्हणतो; म्हणून त्या मानसिक शक्ती होत्या असे तो मानीत होता, असे समजता कामा नये. भौतिक आणि मानसिक ह्यांतील भेद स्पष्ट होण्यापूर्वीचे हे तत्त्वज्ञान आहे, ही गोष्ट परत ध्यानात घेतली पाहिजे.

क्लाझॉमेनीचा ॲनॅक्सॅगोरस (इ.स.पू.सु. ५oo–४२८) याने बदलाचा वा परिवर्तनाचा उलगडा वेगळ्याच पद्धतीने केला. परस्परांहून भिन्न असलेली अनंत प्रकारची सूक्ष्म अशी बीजे त्याने मानली. प्रत्येक बीज अपरिवर्तनीय असते. सुरुवातीला ही बीजे एकमेकांत पूर्णपणे मिसळून गेलेली असतात आणि त्या वेळी सर्व विश्व साम्यावस्थेत असते; पण ‘मन’ विश्वाला चक्राकार गती देते. ह्यामुळे साम्यावस्थेत असलेले विश्व ढवळून निघते व बीजांची एकमेकांपासून फारकत झाल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू उद्‌भवतात; पण बीजांची एकमेकांपासून पूर्ण फारकत होत नाही. प्रत्येक प्रकारच्या पदार्थात सर्व प्रकारची बीजे अंतर्भूत असतात; पण त्याच्यात ज्या प्रकारची बीजे प्राधान्याने असतात त्यांच्यावरून त्या पदार्थांचा प्रकार ठरतो. उदा., तांदूळ हा एक प्रकारचा पदार्थ आहे, कारण तांदळात एका प्रकारची बीजे प्राधान्याने असतात पण तांदळात इतर सर्व प्रकारची बीजेही अल्प प्रमाणात असतात व म्हणून तांदळापासून रक्त, मांस, केस इ. प्रकारचे पदार्थ निर्माण होऊ शकतात. ॲनॅक्सॅगोरसचे वैशिष्ट्य असे की, ग्रीक तत्त्वज्ञानात त्याने प्रथमच मनाला स्वतंत्र पदार्थाचे स्थान दिले. मन कशातही मिसळलेले नसते आणि मनात काही मिसळलेले नसते; पण मनाचा सर्व वस्तूंशी संपर्क असतो व म्हणून मन सर्व वस्तूंना गती देऊ शकते. असे असले तरी ॲनॅक्सॅगोरसचे हे ‘मन’ भौतिकच आहे. कारण अतिशय तरल अशा बीजांचे ते बनलेले असते. पण पार्मेनिडीझने निर्माण केलेल्या समस्येला एम्पेडोक्लीझ आणि ॲनॅक्सॅगोरस यांच्यापेक्षा अधिक तर्कसंगत उत्तर परमाणुवाद्यांनी दिले. ल्युसिपस (इ.स.पू.सु. ४५o ) हा ग्रीक परमाणुवादाचा प्रवर्तक मानला जातो; पण त्याच्याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. परमाणुवादाचा खरा विकास डीमॉक्रिटस (इ.स.पू.सु. ४६०–३६०) याने केला. पार्मेनिडीझने पोकळीचा अर्थ ‘जे नाही ते’ असा लावला होता व जे नाही ते नसते व म्हणून पोकळी नाही, असा निष्कर्ष काढला होता. ह्याच्या उलट परमाणुवाद्यांनी ‘जे नाही तेही आहे’ व म्हणून पोकळी आहे, असे ठामपणे मानले. पार्मेनिडीझने अपरिवर्तनीय असे सत् आहे आणि हे सत् एक आहे, असे मानले. परमाणुवाद्यांनी अनेक परमाणू आहेत; पण प्रत्येक परमाणूचे स्वरूप पार्मेनिडीझच्या सत्‌प्रमाणेच असते, म्हणजे प्रत्येक परमाणू अपरिवर्तनीय असतो, त्याचे स्वरूप बदलत नाही, तो अस्तित्वात येत नाही किंवा नष्ट होत नाही, असे मानले. म्हणजे थोडक्यात एक सत् नसून अनेक सत् आहेत व असत्‌ही आहे, हा सिद्धांत त्यांनी स्वीकारला. ह्या असत्‌मध्ये म्हणजे पोकळीमध्ये परमाणूंचा सतत संचार चालू असतो. परमाणूंच्या गतीचे कारण काय? ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही कारण हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने उपस्थितच होत नव्हता. परमाणूंना नैसर्गिकपणे गती असते. पोकळी नाही त्यामुळे वस्तूंना गती असणे शक्य नाही, असे पार्मेनिडीझचे मत होते. उलट पोकळी आहे म्हणून वस्तूंना म्हणजे परमाणूंना गती असली पाहिजे, हे मत परमाणुवाद्यांनी स्वीकारले. परमाणूंचे त्यांच्या भागांत विभाजन करता येत नाही. ते सूक्ष्म असल्यामुळे इंद्रियगम्य नसतात. सर्व परमाणूंचे आंतरिक स्वरूप सारखेच असते फक्त त्यांचे आकार व आकारमान वेगवेगळे असते. पोकळीत सर्वत्र संचार करीत असताना परमाणू एकमेकांत अडकून एकत्र येतात व त्यांच्या वेगवेगळ्या वस्तू बनतात आणि त्या इंद्रियगोचर असतात. इंद्रियांना वस्तूंचा जो अनुभव येतो, ते खरे ज्ञान नसते खरेखुरे ज्ञान बुद्धीला होते, असे पार्मेनिडीझचे मत होते. परमाणुवादीही इंद्रियांना वस्तूंचे जे गुण जाणवतात–उदा., रंग, चव, गंध इ.–ते वस्तूंचे, म्हणजे परमाणूचे स्वतःचे अंगभूत गुण आहेत, असे मानीत नाहीत. आकार आणि आकारमान हे गुण सोडले, तर सर्व परमाणूंचे स्वरूप सारखेच असते. मग वेगवेगळे वेदनगम्य गुण अंगी असलेल्या–म्हणजे तांबड्या, हिरव्या, मऊ, कठीण, सुवासिक, आंबट, खारट इ. असलेल्या–वस्तू कशा अस्तित्वात येतात? परमाणुवाद्यांचे म्हणणे असे की, परमाणूंचे स्वरूप सारखे असले, तरी त्यांचे आकार वेगळे असतात किंवा त्यांची रचना वेगवेगळी असू शकते. ॲरिस्टॉटल हे भेद असे दाखवितो : आकारभेद : AN; रचनाभेद : AN, NA; स्थितिभेद : A &gt. म्हणून सर्व वस्तू ज्या परमाणूंच्या बनलेल्या असतात त्यांचे स्वरूप जरी सारखे असले, तरी वेगवेगळ्या आकाराचे परमाणू एकत्र आल्यामुळे किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची रचना झालेली असल्यामुळे वेगवेगळ्या वस्तू आपल्या इंद्रियांवर वेगवेगळे परिणाम घडवून आणतात आणि ह्यांमुळे त्यांचे इंद्रियगोचर गुण वेगवेगळे आहेत असे भासते. प्राण्यांचे आणि माणसाचे आत्मेही परमाणूंचे बनलेले असतात. मात्र हे परमाणू अत्यंत सूक्ष्म, आकाराने पूर्णपणे गोल आणि म्हणून अतिशय चपळ असतात. थोडक्यात परमाणू आणि पोकळी ह्यांशिवाय विश्वात काहीच नाही.

सॉफिस्ट : इ.स.पू. पाचच्या शतकाच्या उत्तरार्धात ग्रीक तत्त्वज्ञानाने एक वेगळे वळण घेतले. ‘विश्वाचे अंतिम किंवा खरेखुरे स्वरूप काय आहे?’ ह्या प्रश्नाशी पार्मेनिडीझ, परमाणुवादी, ॲनॅक्सॅगोरस इ. तत्त्ववेत्ते झुंजत होते. ह्या प्रश्नावरून आपले लक्ष काढून घेऊन ‘मानवी जीवनाचे अंतिम साध्य काय आहे, ते प्राप्त करून घेण्यासाठी वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाची आखणी कशी करावी?’ इ. व्यावहारिक प्रश्नांकडे नंतरच्या ग्रीक तत्त्ववेत्त्यांनी आपले लक्ष वळविले. ह्याची कारणे अनेक होती. एकतर विश्वाचे खरेखुरे स्वरूप काय आहे, ह्याविषयी वेगवेगळ्या तत्त्ववेत्त्यांनी मांडलेली मते एकमेकांशी अगदी विरोधी तर होतीच; पण आपल्या नेहमीच्या अनुभवाने त्यांची प्रचीती घेता येणेही शक्य नव्हते. आपल्या नेहमीच्या अनुभवात गोचर होणाऱ्या वस्तूपासून पार्मेनिडीझचे ‘सत्’ जेवढे दूर आहे, तेवढेच डीमॉक्रिटसचे परमाणूही दूर आहेत. तेव्हा ह्या परस्परविरोधी मतांतील कोणते मत ग्राह्य मानावे ह्याचा निर्णय करण्याचा काही मार्ग नव्हता. दुसरे असे की, व्यावहारिक प्रश्न आता निकडीचे बनत चालले होते. ह्या कालखंडात ग्रीसमध्ये जी नगरराज्ये विकसित झाली होती, त्यांच्यात अनेक दृष्टींनी अथेन्स अग्रेसर होते. अथेन्समध्ये लोकशाही राज्यपद्धती होती आणि स्वतंत्र नागरिक असलेल्या–म्हणजे गुलाम नसलेल्या–प्रत्येक प्रौढ अथेनियन नागरिकाला कायदे करण्यात, राज्याचे धोरण ठरविण्यात, न्यायदान करण्यात स्वतः सहभागी होता येत असे. ह्यामुळे वादविवाद करण्याचे, आपली मते लोकांच्या गळी उतरतील अशा रीतीने प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य कमविण्याची त्यांची इच्छा असे. न्याय म्हणजे काय? राज्याचे धोरण कसे असावे? घटना कशी असावी? योग्य काय, अयोग्य काय? ह्या स्वरूपाचे नैतिक, सामाजिक प्रश्नही त्यांच्यापुढे उपस्थित होत. हे कौशल्य आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याची जी गरज लोकांना भासू लागली होती, तिचे समाधान करणारे काही विचारवंत ह्या सुमारास स्वाभाविकपणेच उदयाला आले. ते म्हणजे सॉफिस्ट.

‘सॉफिस्ट’ ह्या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘ज्ञानी माणूस’ असा होतो. लोकांना हवे असलेले आणि आवश्यक असलेले ज्ञान आपल्यापाशी आहे, असा सॉफिस्टांचा दावा होता आणि हे ज्ञान लोकांना शिकविणे हा त्यांचा व्यवसाय होता. पुढे सॉक्रेटिस व प्लेटो ह्यांनी सॉफिस्टांवर टीका केल्यामुळे ‘सॉफिस्ट’ ह्या शब्दाला निंदाव्यंजक अर्थ प्राप्त झाला आणि शब्दच्छल करून आणि फसवे युक्तिवाद करून जो लोकांच्या डोळ्यात धूळ फेकतो व ज्ञानाची पोकळ घमेंड मिरवितो तो सॉफिस्ट, असा अर्थ रूढ झाला; पण सुरुवातीला ‘सॉफिस्ट’ हा शब्द आदराने वापरण्यात येत असे. ज्या विचारवंतांचा ‘सॉफिस्ट’ असा उल्लेख होतो आणि जे स्वतःला अभिमानाने सॉफिस्ट म्हणवून घेत, ते एका विशिष्ट तात्त्विक पंथाचे अनुयायी किंवा पुरस्कर्ते होते असे नव्हे. प्रोटॅगोरस (इ.स.पू.सु. ४८o–४१०), गॉर्जिअस (इ.स.पू.सु. ४८५–सु. ३८o), एलिसचा हिपिअस (इ.स.पू. पाचवे शतक) हे प्रमुख सॉफिस्ट होते. काही विशिष्ट सिद्धांत स्वीकारल्यामुळे ह्या विचारवंतांना सॉफिस्ट म्हणण्यात येत असे असे नसून, नगरानगरांतून ते भटकत, जेथे मागणी असेल तेथे लोकांना शिकविण्याचा समान व्यवसाय ते करीत, म्हणून त्यांना सॉफिस्ट म्हणण्यात येत असे. असे असले, तरी त्यांनी स्वीकारलेल्या भिन्न मतांमध्येही काही समान सूत्र आढळते.

एकतर त्यांची शिकवण व्यावहारिक, नेहमीच्या जीवनात उपयुक्त ठरेल अशी असे. आपण सद्‌गुण शिकवितो, म्हणजे शिक्षणाने लोकांना सद्‌गुणी बनवितो, असा त्यांचा दावा होता. ह्या संदर्भात सद्‌गुण म्हणजे कौशल्याने, यशस्वीपणे व्यवहार करण्याची कुवत. सॉफिस्टांच्या दृष्टिकोणातील दुसरे समान सूत्र म्हणजे ज्यांचा संशयवाद. विश्वासंबंधीचे किंवा मानवी जीवनातील नैतिक आदर्श, नैतिक तत्त्वे ह्यांच्या विषयीचे वस्तुनिष्ठ ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकते किंवा असे ज्ञान असते, ही गोष्ट त्यांनी नाकारली. आपल्याला वस्तू जशा दिसतात ते त्यांचे खरे, स्वतःचे स्वरूप नसते, असे परमाणुवाद्यांनी म्हटले होते. उदा., मला एखादी वस्तू हिरवी दिसते; पण ज्या परमाणूंची ती बनलेली असते ते स्वतः हिरवे नसतात, तर रंगहीन असतात. हाच दृष्टिकोण सॉफिस्टांनी नैतिक क्षेत्राला लावला. एखादे कृत्य न्याय्य आहे किंवा योग्य आहे असे मला वाटत असले, तर ते माझ्या दृष्टीने न्याय्य, योग्य असते. दुसऱ्याला ते अन्याय्य, अनैतिक आहे असे वाटत असेल, तर त्याच्या दृष्टीने ते अन्याय्य, अनैतिक असते. त्या ‘कृत्याचे स्वतःचे स्वरूप कसे आहे?’, ‘कुणाला ते न्याय्य, नैतिक दिसते कुणाला ते अन्याय्य, अनैतिक दिसते; पण ते स्वतः न्याय्य, नैतिक आहे का?’ हा प्रश्न उपस्थितच होत नाही; कारण वस्तू ज्याला जशा भासतात तशाच त्या त्याच्या दृष्टीने असतात. वस्तूचे स्वतःचे स्वरूप आणि एखाद्याला तिचे भासणारे स्वरूप असा भेद करताच येत नाही.

हा दृष्टिकोण प्रोटॅगोरसच्या ‘मानव हा सर्व वस्तूंचा मानदंड आहे’, ह्या वचनात व्यक्त झाला आहे. वस्तूचे स्वरूप कसे आहे, याचा मानव हा मानदंड आहे. म्हणजे वस्तू व्यक्तीला जशी दिसते तशीच ती त्याच्या दृष्टीने असते, असा ह्या वचनाचा अर्थ प्लेटोने लावला आहे. तेव्हा कुणाचेही मत त्याच्या दृष्टीने सत्य असते. कुणाचेही मत इतर कुणाच्याही मतापेक्षा अधिक सत्य आहे, असे म्हणता येत नाही; पण एखादे मत दुसऱ्या मतापेक्षा अधिक सत्य नसले, तरी ते दुसऱ्या मतापेक्षा अधिक चांगले असणे शक्य असते. मला कावीळ झाली असेल, तर सर्व वस्तू मला पिवळ्या दिसतात. इतरांना त्या नाना रंगांच्या दिसतात. मला दिसते ते चूक आहे आणि इतरांना दिसते ते बरोबर आहे, असे म्हणता येत नाही; पण इतर सर्वांना वस्तू जशा दिसतात तशाच त्या मला दिसल्या, तर ते इष्ट ठरेल. मला इतरांशी संवाद साधता येईल. तेव्हा वैद्याने मला औषध देऊन इतरांना वस्तू जशा दिसतात तशाच मला दिसतील अशी व्यवस्था केली, तर ती उपयुक्त कामगिरी ठरेल. सॉफिस्ट असेच करतो. तो आपल्या शिष्याला शिकवितो म्हणजे त्याची असत्य मते खोडून काढून त्यांच्या जागी अधिक यथार्थ मतांची स्थापना करतो असे नाही, तर तो त्याची मते दुरुस्त करतो. म्हणजे त्याच्या मूळच्या मतांच्या जागी अधिक चांगली, व्यवहाराच्या दृष्टीने अधिक उपयुक्त मते स्थापन करतो.

प्रोटॅगोरसच्या मते माणूस समाज करून राहणारा प्राणी असल्यामुळे सामूहिक व्यवहाराला जी मते अनुकूल असतील, ती चांगली असतात; ती सर्वांनी स्वीकारणे इष्ट असते. सामाजिक व्यवहार सुरळीतपणे चालायचे, तर सर्वांवर बंधनकारक असे कायदे असावे लागतात आणि सर्वांनी असे कायदे पाळणे चांगले. पण कोणतेही कृत्य स्वतः चांगले किंवा वाईट नसते, व्यक्तीला ते चांगले किंवा वाईट वाटत असेल, तर ते तिच्या दृष्टीने चांगले किंवा वाईट असते, ह्या भूमिकेपासून इतरही निष्कर्ष काढता येतात. उदा., कोणत्याही व्यक्तीच्या तिच्या स्वतःच्या हिताच्या दृष्टीने जे अनुकूल असते, ते तिच्या दृष्टीने योग्य असते. उदा., एखादा समर्थ, बलवान माणूस इतरांना दडपून टाकून स्वतःचे हित साधू शकत असेल, तर त्याच्या दृष्टीने असे वागणे योग्य असते. पण दुबळ्या लोकांच्या दृष्टीने सर्वांनी काही सामान्य नियम पाळावे हे त्यांच्या हिताचे असल्यामुळे ह्या स्वरूपाची कृत्ये यांच्या दृष्टीने योग्य असतात. सारांश, वस्तुनिष्ठ, निरपेक्ष अशी नैतिक मूल्ये असत नाहीत.

सॉक्रेटीस : सॉक्रेटीस, प्लेटो व ॲरिस्टॉटल हे तीन सर्वश्रेष्ठ ग्रीक तत्त्ववेत्ते होत. सॉक्रेटीस (इ.स.पू.सु. ४७o–३९९) याचा विचार सॉफिस्टांच्या दृष्टिकोणाच्या पार्श्वभूमीवर समजून घेतला पाहिजे. सॉफिस्टांचा दावा दुहेरी होता : (१) ते लोकांना सद्‌गुण शिकवत किंवा लोकांना सद्‌गुणी बनवीत. ‘सद्‌गुण’ ह्याचा अर्थ ह्या ठिकाणी एखाद्या प्रकारचा व्यवहार यशस्वीपणे करण्याचे कौशल्य. सॉफिस्टांना अर्थात सामाजिक व राजकीय व्यवहार अभिप्रेत होता. (२) वस्तुनिष्ठ किंवा यथार्थ ज्ञान असे काही नसते. ह्याच्या विरुद्ध ‘सद्‌गुण म्हणजे ज्ञान’ हा सॉक्रेटीसचा मूलभूत सिद्धांत होता.

हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी सॉक्रेटीस वेगवेगळ्या प्रकारच्या कारागिरांचा आधार घेतो. उदा., चांभार जोडे बनवितो, तेव्हा चांभाराचे चांभार म्हणून कौशल्य–चांभाराचा चांभार म्हणून सद्‌गुण–जोडे यशस्वीपणे बनविण्यात, म्हणजे चांगले जोडे बनविण्यात प्रकट होते. आता एखाद्याने चांगला जोडा बनवायचा तर चांगला जोडा कसा असतो, जोडा चांगला कधी असतो, ह्याचे ज्ञान त्याला असले पाहिजे आणि चांगला जोडा म्हणजे ज्या उद्दिष्टाने बनवितात, जोड्याचे जे प्रयोजन असते, ते शक्य तितक्या परिपूर्णतेने साधणारा जोडा. हे प्रयोजन माहीत असले, तरच ते कोणत्या साधनांनी यशस्वीपणे साधता येईल, ह्याचे ज्ञान होऊ शकेल. तेव्हा जोडे बनविण्याच्या प्रयोजनाचे ज्ञान असेल तरच चांभार, चांभार म्हणून चांगला असू शकतो, चांभाराचा विशिष्ट सद्‌गुण त्याच्या ठिकाणी असू शकतो. आता सॉफिस्ट जो सद्‌गुण शिकवू पाहतात तो म्हणजे चांभाराच्या ठिकाणी चांभार म्हणून जो सद्‌गुण असतो किंवा कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या कारागिराच्या ठिकाणी त्या प्रकारचा कारागीर म्हणून जो सद्‌गुण असू शकतो तो नव्हे तर मानवी व्यक्तीच्या ठिकाणी माणूस म्हणून जो सद्‌गुण असणे इष्ट असते, तो सद्‌गुण. थोडक्यात, सॉफिस्ट माणसाला चांगला माणूस बनवू पाहतात; पण हे साधायचे तर मानवी जीवनाचे प्रयोजन काय आहे आणि कशा रीतीने वागल्याने ते साधता येते, ह्याचे ज्ञान सॉफिस्टांना असले पाहिजे आणि ते त्यांनी आपल्या शिष्यांना दिले पाहिजे. तेव्हा सद्‌गुण म्हणजे ज्ञान होय.

मानवी जीवनाचे अंतिम प्रयोजन काय आहे, ह्याचे सॉक्रेटीसने निःसंदिग्ध उत्तर दिलेले नाही. ह्याचे एक महत्त्वाचे कारण असे की, सॉफिस्ट करीत त्याप्रमाणे स्वतःपाशी ज्ञान आहे आणि आपण ते इतरांना देतो, असा दावा सॉक्रेटस करीत नसे. मानवी जीवनाला सफल करणारी अशी वस्तुनिष्ठ मूल्ये आहेत, त्यांचे ज्ञान होऊ शकते, अशी त्याची दृढ धारणा होती; पण ह्यासाठी आपले मन पूर्वग्रहांपासून अलिप्त असले पाहिजे आणि स्वतःच्या मतांची व इतरांनी मांडलेल्या मतांची आपण चिकित्सक दृष्टीने परीक्षा केली पाहिजे. असा चिकित्सक विचार करायला लोकांना प्रवृत्त करणे, हे सॉक्रेटीसचे जीवितकार्य होते. ह्यासाठी हे ज्ञान आपल्याला अगोदरच अवगत आहे, हा लोकांच्या मनात घर करून राहिलेला भ्रम दूर करणे आवश्यक होते. हे साध्य करण्यासाठी त्याने उपरोधाचा–‘सॉक्रेटीक आयरनी’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या क्लृप्तीचा–उपयोग केला. आपल्याजवळ ज्ञान नाही, ज्यांच्यापाशी ते आहे त्यांच्यापासून आपण ते शिकून घेणार आहोत, अशी भूमिका स्वीकारून तो चर्चेला प्रारंभ करी. ‘न्याय म्हणजे काय?’, ‘धैर्य म्हणजे काय?’ असे नैतिक मूल्यांच्या किंवा संकल्पनांच्या स्वरूपाविषयीचे प्रश्न तो उपस्थित करी. ह्या प्रश्नांची निश्चित उत्तरे आपल्याला माहीत आहेत असे ज्यांना वाटे–आणि असे अनेकांना वाटे–ते त्यांची ठामपणे उत्तरे देत. ह्या उत्तरावर सॉक्रेटीस एक लहानशी शंका काढी, तिचे उत्तर त्याला मिळे, त्याच्यावर तो आणखी एक लहानशी शंका घेई… असे करता करता मूळ उत्तरातील सारा गोंधळ, अंतर्विसंगती, अर्धकच्चेपणा बाहेर येई; त्यामुळे उत्तर देणाऱ्याचा आत्मविश्वास भ्रामक होता, हे स्पष्ट होई. अशा रीतीने अथेन्समधील अनेक दुढ्ढाचार्यांचे अज्ञान सॉक्रेटीसने बाहेर काढले होते व म्हणून तो साहजिकच त्यांच्यात अप्रिय ठरला.

‘न्याय म्हणजे काय?’ ह्या प्रकारच्या प्रश्नाचे एका प्रकारचे उत्तर द्यायचा मोह सॉक्रेटीसच्या श्रोत्यांना होत असे. आपल्या मते न्याय्य असलेल्या एका विशिष्ट कृत्याचा उल्लेख करून असे कृत्य करणे म्हणजे न्यायाने वागणे, अशा स्वरूपाचे ते उत्तर असे. उदा., एखाद्याची उसनी घेतलेली वस्तू परत करण्यात न्याय असतो. पण ह्या प्रकारच्या उत्तराने सॉक्रेटीसचे समाधान होत नसे. एखादे विशिष्ट कृत्य जर न्याय्य असेल, तर ते न्याय्य का आहे, ह्याचे उत्तर त्याला पाहिजे असे. म्हणजे कोणते विशिष्ट गुण अंगी असले तर आणि तरच कोणतेही कृत्य न्याय्य असते, हा त्याचा प्रश्न होता. त्याला ‘न्याय’, ‘धैर्य’, ‘श्रद्धा’ इ. नैतिक संकल्पनांच्या सामान्य आणि सुस्पष्ट व्याख्या पाहिजे होत्या. अशा व्याख्या सिद्ध करण्यासाठी त्याने जी रीत वापरली ती अशी : समजा, न्यायाची व्याख्या करायची आहे, तर जी कृत्ये न्याय्य आहेत असे आपण सर्व मान्य करू अशा कृत्यांची उदाहरणे घेऊन त्यांच्यात कोणते समान सूत्र आढळते ते शोधून काढायचे. ही पहिली पायरी. मग न्याय्य कृत्यांची सर्वमान्य अशी दुसरी उदाहरणे घेऊन हे सूत्र त्या सर्वांना लागू पडते की नाही, म्हणजे ह्या सूत्राप्रमाणे ती न्याय्य ठरतात की नाही, हे तपासून पाहायचे. ते लागू पडत असेल, तर ती व्याख्या स्वीकारायची पडत नसेल, तर त्या सूत्राला आवश्यक ती मुरड घालायची व ह्या सुधारित सूत्राचे परत तसेच परीक्षण करायचे. ह्या रीतीने अखेरीस समाधानकारक अशी व्याख्या प्राप्त होते. सॉक्रेटीसने प्रचलित केलेल्या ह्या रीतीला ॲरिस्टॉटलने ‘विगामी रीत’ (Inductive Method) असे म्हटले आहे.

आपले जीवन सफल व्हावे, जीवनाचे जे अंतिम साध्य आहे ते आपल्याला लाभावे, अशी प्रत्येक माणसाची स्वाभाविक व अपरिहार्य इच्छा असते. तेव्हा ह्या साध्याचे ज्ञान झाले आणि कोणत्या रीतीने वागले असता हे साध्य प्राप्त करून घेता येते ह्याचे ज्ञान झाले की, माणूस अपरिहार्यपणे त्या रीतीने वागणार हे उघड आहे. म्हणून कुणीही माणूस जाणूनबुजून अयोग्य वर्तन करीत नाही, असे सॉक्रेटीसचे मत होते. दुष्कृत्य हा अज्ञानाचा आविष्कार असतो. तेव्हा ज्ञानाशिवाय माणूस सद्‌गुणी असू शकत नाही आणि माणसाला ज्ञान असले तर माणूस सद्‌गुणी असतोच, ही दोन्ही विधाने ‘सद्‌गुण म्हणजे ज्ञान’ ह्या सॉक्रेटीसच्या वचनात अंतर्भूत आहेत.

अथेन्सच्या नागरिकांना अंतर्मुख होऊन जीवनाविषयी विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी सुरुवातीला प्रतिष्ठित मंडळींचे अज्ञान उघडकीला आणणे आवश्यक होते व ते सॉक्रेटीसने शक्य तितक्या सौम्यपणे, विनयाने पण चिकाटीने केले; पण त्याचे परिणामही त्याला भोगावे लागले. अनेकांचा रोष त्याला सहन करावा लागला आणि ‘सॉक्रेटीस तरुणांची मने भ्रष्ट करतो आणि अथेन्सच्या नगरदेवतांवर श्रद्धा ठेवीत नाही’, असे आरोप त्याच्यावर ठेवून त्याला देहान्ताची शिक्षा देण्यात आली. तुरुंगातून पळून जाण्याची संधी त्याला देण्यात आली असतानासुद्धा, तिचा अव्हेर करून सॉक्रेटीस स्थितप्रज्ञवृत्तीने व धीरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला.

सॉक्रेटीसचा सर्वप्रसिद्ध अनुयायी म्हणजे अर्थात प्लेटो. पण त्याच्या इतर अनुयायांचाही भावी ग्रीक तत्त्वज्ञानावर प्रभाव पडला असल्यामुळे त्यांची दखल घेणे आवश्यक आहे. सॉक्रेटीसने जीवनाचे अंतिम साध्य काय आहे, ह्या प्रश्नाचे निःसंदिग्ध उत्तर दिलेले नाही; पण हे जे काही साध्य असेल, ते सद्‌गुणामुळेच प्राप्त होऊ शकते, असे त्याचे दृढ मत होते. ॲरिस्टिपस (इ.स.पू.सु. ४३५–३५६) ह्या त्याच्या शिष्याने सुख हे जीवनाचे अंतिम साध्य मानले. त्याच्या मताप्रमाणे जीवनाचे साध्य असलेले हे सुख शारीरिकच असते आणि ज्या क्षणी ते जाणवत असते, त्या क्षणीचे ते असते. आपण सुखाच्या अधीन होता कामा नये; पण सुखाच्या अधीन होऊ ह्या भीतीने सुख वर्ज्यही मानता कामा नये. ज्ञानमीमांसेत तो वेदनवादी होता. आपल्याला केवळ आपल्या वेदनांचेच विश्वसनीय ज्ञान असते आणि ज्या क्षणी ते वेदन लाभत असते, त्या क्षणापुरते ते ज्ञान असते. ॲरिस्टिपस व्यक्तिवादी होता. एका विशिष्ट राज्याचा नागरिक म्हणून जगणे त्याला योग्य वाटत नव्हते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे सर्वच राज्यांत तो परका होता. ॲरिस्टिपस हा मूळचा सायरीनीचा रहिवासी असल्यामुळे त्याच्या पंथाला सायरीनीइक्स पंथ  म्हणतात.

सॉक्रेटीसचा दुसरा अनुयायी म्हणजे अँटिस्थिनीझ (इ.स.पू.सु. ४४४–३६८). सॉक्रेटीसच्या वैराग्याचा, ऐहिक सुखसाधनांविषयीच्या त्याच्या उदासीनतेचा फार मोठा प्रभाव अँटिस्थिनीझवर पडला होता. सुरुवातीला तो गॉर्जिअस ह्या सॉफिस्ट पंथाच्या व्यक्तीचा शिष्य होता; पण सॉक्रेटीसच्या प्रभावळीत दाखल झाला. सद्‌गुणी बनणे हेच आयुष्याचे साध्य आहे, सद्‌गुणी माणूस सुखी असतोच; कारण सुख हे इच्छांच्या समाधानात नसते, तर इच्छांपासून मुक्त होण्यात असते. सद्‌गुण शिकविता येतो, पण तो प्रवचनाने शिकविता येत नाही, तर उदाहरणाने शिकविता येतो, तो कष्टसाध्य असतो. शहाणा माणूस प्रस्थापित कायद्यांप्रमाणे वागत नाही, तर सद्‌गुणाला अनुसरून वागतो. हे त्याच्या नैतिक शिकवणीचे सार होते. सॉफिस्टांमुळे खंडनमंडनात्मक युक्तिवादांचा अभ्यास सुरू झाला होता व तर्कशास्त्राला चालना मिळाली होती. जे आहे त्याचा आपण फक्त निर्देश करू शकतो, त्याचे वर्णन करू शकत नाही, अशी अँटिस्थिनीझची भूमिका होती. ह्यामुळे खोटे विधान करणे अशक्य असते, कारण खोटे विधान करणे म्हणजे जे नाही त्याचा निर्देश करणे आणि जे नाही त्याचा निर्देश करताच येणार नाही. तसेच एक विधान दुसऱ्या विधानाच्या विरोधी असू शकत नाही. दोन विधाने जर एकाच वस्तूचा निर्देश करीत असतील, तर त्यांच्यात विरोध संभवत नाही. उलट ती भिन्न वस्तूंचा निर्देश करीत असतील, तर ती केवळ भिन्न विधाने असतात आणि त्यांच्यात विरोध असायचे कारण नाही. आपण असत्य विधाने कशी करू शकतो, ही अँटिस्थिनीझने प्लेटोकडे सुपूर्द केलेली समस्या आहे.

अँटिस्थिनीझच्या शिकवणीने प्रभावित झालेला सर्वांत प्रसिद्ध तत्त्ववेत्ता म्हणजे सीनोपीचा (सध्याचे सिनॉप) डायोजीनीझ (इ.स.पू.सु. ४१२–३२३). ह्याच्या व्यक्तिमत्त्वाभोवती अनेक दंतकथांचे वेष्टन पडल्यामुळे त्याचे खरेखुरे व्यक्तिमत्त्व कसे होते, हे निश्चित करणे सोपे नाही; पण ह्या दंतकथांचे सार सुसंगत आहे. त्याच्या वेळच्या भ्रष्ट व विलासी सामाजिक जीवनाचा त्याला उबग आला होता. व्यक्तीने आपल्या सुखासाठी बाह्य वस्तूवर अवलंबून राहता कामा नये, आत्यंतिक शारीरिक व मानसिक प्रयत्न करून स्वतःला तिने स्वयंपूर्ण बनविले पाहिजे, हा त्याच्या शिकवणीचा व आचरणाचा गाभा होता. ही स्वयंपूर्णता साधण्यासाठी माणसाने आपल्या गरजा शक्य तितक्या कमी केल्या पाहिजेत. ह्या मुक्तीमध्ये आणि तिच्यातून निर्माण होणाऱ्या परिपूर्ण स्वाधीनतेमध्ये सुख सामावलेले असते. ही जीवनपद्धती म्हणजे निसर्गाला अनुसरणारी जीवनपद्धती होय, असे डायोजीनीझचे म्हणणे होते. डायोजीनीझ आपल्या शिकवणीप्रमाणे जगला व असे जगण्यात सभ्य आचाराविषयीच्या अनेक रूढ संकेतांचा त्याने भंग केल्यामुळे त्याला कुत्रा (श्वान) हे अभिदान देण्यात आले. ह्यामुळे त्याच्या पंथाचे सिनिक पंथ असे नाव पडले.

सॉक्रेटीसच्या अनुयायांचा तिसरा पंथ म्हणजे ‘मेगारियन’ पंथ. मेगारा हे अथेन्सजवळचे एक नगर होते. त्यावरून हे नाव पडले. युक्लायडीझ वा यूक्लिड (इ.स.पू.सु. ४३o–३६o) हा सॉक्रेटीसचा अनुयायी मेगारा येथील रहिवासी असून ह्या पंथाचा प्रवर्तक होता. एलिॲटिक पंथाचे तत्त्वज्ञान व सॉक्रेटीसची विचारसरणी ह्यांचा प्रभाव ह्या पंथाच्या शिकवणीवर पडला होता. उदा., ‘शिव’ हे एकमेव आणि अपरिवर्तनीय तत्त्व आहे, त्याचाच वेगवेगळ्या नावांनी आपण उल्लेख करतो, असे युक्लायडीझचे मत होते. त्याच्यानंतरच्या मेगारियन पंथीयांनी प्लेटो, ॲरिस्टॉटल इ. तत्त्ववेत्त्यांच्या सिद्धांतांचे खंडन करण्यासाठी एलिॲटिक पद्धतीला अनुसरून अनेक सूक्ष्म युक्तिवाद रचले. सिनिक व मेगारियन ह्या पंथांचा स्टोइक तत्त्वज्ञानावर बराच प्रभाव पडला होता.

प्लेटो : (इ.स.पू. ४२८–३४८). प्लेटो हा ग्रीक तत्तवज्ञानातील सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्ता होय. तो सॉक्रेटीसचा पट्टशिष्य होता. ह्यामुळे सॉक्रेटीसच्या विचारांचा त्याच्यावर अर्थात मोठा प्रभाव होता; पण सॉक्रेटीसप्रमाणे त्याचे कुतूहल केवळ नैतिक प्रश्नापुरते मर्यादित नव्हते. आपल्या पूर्वीच्या सर्वश्रेष्ठ तत्त्ववेत्त्यांच्या विचारांतील मध्यवर्ती सूत्रे एकत्र गुंफून विश्व आणि मानवी जीवन ह्यांविषयीचे एक नवीन, समावेशक आणि सुसंगत दर्शन रचायचा प्रयत्न त्याने केला. ‘नीती’ म्हणजे काय?’, ‘माणसाने कसे जगावे?’ ह्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, तर माणसाची प्रकृती समजावून घेतली पाहिजे आणि माणसाची प्रकृती समजावून घ्यायची, तर ज्या विश्वाने ती घडविलेली असते आणि जे विश्व तिच्यात प्रतिबिंबित झालेले असते, त्या विश्वाचे स्वरूप समजावून घेतले पाहिजे, अशी प्लेटोची भूमिका होती. ह्यामुळे प्लेटोच्या तत्त्वज्ञानात ‘विश्वाचे स्वरूप काय आहे?’ हा वस्तुमीमांसात्मक प्रश्न, ‘मानवी ज्ञानाचे स्वरूप काय आहे?’ हा ज्ञानमीमांसात्मक प्रश्न आणि ‘जीवनाचे परमोच्च साध्य काय?’, ‘माणसाने कसे जगावे?’ हे मूल्यविषयक, नैतिक प्रश्न एकवटले आहेत. त्यांना त्याने दिलेली उत्तरे एकमेकांशी संबंधित आहेत, एकमेकांत गुंतलेली आहेत व म्हणूनच त्यांची एकमेकांपासून फारकत करता येणार नाही.

वस्तुनिष्ठ, यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेणे आपल्याला शक्य असते, असा प्लेटोचा दृढ विश्वास आहे. ह्याचे मूळ अर्थात सॉक्रेटीसच्या त्याच्यावर असलेल्या प्रभावात आहे. पण जे आहे ते सतत बदलत असते, असा हेराक्लायटसचा सिद्धांत होता. आता ज्ञान हे सत्य विधानांचे बनलेले असते. ज्ञानाचा विषय जर सतत बदलत असेल, तर त्याच्याविषयी ज्ञान प्राप्त होऊ शकणार नाही. कारण ह्या विषयाबाबत कोणतेही विधान सत्य म्हणून आपण करू गेलो, तर ते उच्चारीपर्यंत तो विषय बदललेला असणार, म्हणजे ते विधान असत्य ठरणार. इंद्रियगम्य वस्तू–मी पाहतो ते टेबल, झाड इ.–अशा सतत बदलत असतात शिवाय त्यांचे आपल्याला होणारे संवेदन व्यक्तिसापेक्ष असते, हे मत प्लेटो प्रोटॅगोरसपासून स्वीकारतो आणि म्हणून इंद्रियगम्य वस्तूंचे वस्तुनिष्ठ ज्ञान होऊ शकत नाही, इंद्रियगम्य वस्तू ह्या ज्ञानाचा विषय असू शकत नाहीत, असा निष्कर्ष तो काढतो. ज्ञानाचे विषय हे स्थिर, अपरिवर्तनीय, नित्य असे पदार्थ असले पाहिजेत. हा अर्थात पार्मेनिडीझने प्रतिपादिलेला सिद्धांत आहे. असे पदार्थ अर्थात इंद्रियातीत, बुद्धिगम्य असणार. हाही पायथॅगोरस व पार्मेनिडीझ यांनी मांडलेला सिद्धांत आहे. ज्ञानाचे विषय होऊ शकणारे आणि असलेले हे स्थिर, नित्य पदार्थ कोणते? ह्याचे उत्तर देताना प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा सॉक्रेटीसच्या विचाराशी सांधा जुळतो. सॉक्रेटीसने ‘न्याय म्हणजे काय?’, ‘धैर्य म्हणजे काय?’, ह्या स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले होते. ‘अमुक अमुक कृत्य न्यायाचे आहे’, अशी विशिष्ट न्याय्य कृत्यांची उदाहरणे दिल्याने ह्या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. जो गुण अंगी असल्यामुळे (किंवा नसल्यामुळे) विशिष्ट कृत्ये न्यायाची ठरतात (किंवा ठरत नाहीत), त्या न्याय ह्या सामान्य धर्माचे स्वतःचे स्वरूप काय आहे हे सांगूनच, म्हणजे न्याय ह्या सामान्य धर्माची व्याख्या करूनच ह्या प्रश्नाचे उत्तर देता येते, असे सॉक्रेटीसचे म्हणणे हाते. आता एखादे कृत्य विशिष्ट परिस्थितीत न्यायाचे ठरेल; पण त्याच प्रकारचे कृत्य वेगळ्या परिस्थितीत न्यायाचे ठरणार नाही. परंतु जो धर्म अंगी असल्यामुळे (किंवा नसल्यामुळे) विशिष्ट कृत्ये न्यायाची ठरतात (किंवा ठरत नाहीत), तो स्वतः न्याय हा सामान्य धर्म नेहमी न्याय हा धर्म राहतो; तो बदलू शकत नाही. शिवाय विशिष्ट कृत्ये कमीअधिक प्रमाणात न्यायाची कृत्ये असतात; ज्या प्रमाणात न्याय हा धर्म त्यांच्या ठिकाणी वसत असेल, त्या प्रमाणात ती न्यायाची कृत्ये असतात. पण स्वतः न्याय हा धर्म कमीअधिक प्रमाणात न्याय नसतो; तो परिपूर्णपणे न्याय असतो. तेव्हा न्याय, धैर्य, सद्‌गुण, शहाणपण इ. नैतिक मूल्ये ही सत्-सामान्ये असतात आणि अपरिवर्तनीय, स्थिर, नित्य, परिपूर्ण असे ते पदार्थ असतात. ह्यामुळे ते खऱ्याखुऱ्या ज्ञानाचे विषय असतात. प्लेटोच्या वेळी भूमिती हे सर्वांत प्रगत असे शास्त्र होते. त्रिकोण, वर्तुळ इ. आकृती हे भूमितीचे विषय असतात. आता त्रिकोणाविषयी एखादा सिद्धांत सिद्ध करताना आपण फळ्यावर किंवा कागदावर त्रिकाणाची आकृती काढतो. पण ही आकृती म्हणजे खराखुरा त्रिकोण नसतो. उदा., भूमितीत ज्याची व्याख्या केलेली असते, तो खराखुरा त्रिकोण; म्हणजे तीन सरळ रेषांनी बंदिस्त अशी आकृती असते आणि खऱ्याखुऱ्या रेषेला केवळ लांबी असते, रुंदी नसते. पण आपण काढलेल्या आकृतीच्या बाजूंना थोडीतरी रुंदी असते आणि म्हणून त्या खऱ्याखुऱ्या रेषा नसतात व त्यांनी बंदिस्त केलेली आकृती म्हणजे खराखुरा त्रिकोण नसतो. खराखुरा, परिपूर्ण त्रिकोण बुद्धिग्राह्य असतो. शिवाय तो म्हणजे एक सत्-सामान्य असते. जे विशिष्ट, इंद्रियगोचर, त्रिकोण आपण पाहतो, ती ह्या बुद्धिग्राह्य, परिपूर्ण त्रिकोणची अपूर्ण अशी विशिष्ट उदाहरणे असतात. ह्याच न्यायाने सर्वच सत्-सामान्ये अपरिवर्तनीय, नित्य आणि परिपूर्ण असतात, हे सिद्ध होते. उदा., हिरवी वस्तू पिवळी होऊ शकते; पण हिरवेपणाचे पिवळेपणात रूपांतर होऊ शकत नाही. हिरवेपणा हे नित्य हिरवेपण राहते.

सारांश, स्थिर, अपरिवर्तनीय, नित्य, परिपूर्ण, बुद्धिग्राह्य अशी सत्-सामान्ये ही खऱ्याखुऱ्या ज्ञानाचे विषय होत. अशा नित्य, परिपूर्ण व म्हणून आदर्शरूप असलेल्या सत्-सामान्यांना प्लेटो ‘आयडिया’ म्हणतो. ‘आयडिया’ ह्याचा अर्थ आकार (फॉर्म) असा आहे. प्लेटोच्या ह्या आयडिया म्हणजे मूलाकार होत. त्रिकोणाची आयडिया म्हणजे शाश्वत, परिपूर्ण व म्हणून आदर्श असा त्रिकोण होय. आपण जे इंद्रियगोचर त्रिकोण पाहतो किंवा आपल्याला आढळतात; त्या ह्या परिपूर्ण त्रिकाणाच्या अपूर्ण अशा प्रतिकृती असतात आणि अशा प्रतिकृती असल्यामुळेच ते, अपूर्ण असे का होईना, त्रिकोण ठरतात. सौंदर्याची आयडिया म्हणजे केवल, परिपूर्ण सौंदर्य. हे बुद्धिग्राह्य असते. ज्या इंद्रियगोचर वस्तूंना आपण सुंदर म्हणतो त्या ह्या सौंदर्याच्या प्रतिकृती असतात व ज्या प्रमाणात त्या सौंदर्याची प्रतिकृती असतात, त्या प्रमाणात त्या सुंदर ठरतात. ह्या आयडियांना आपण ह्यापुढे आकार म्हणू.

हे शाश्वत, आदर्श असे सामान्य आकार आणि परिवर्तनशील व अपूर्ण अशा इंद्रियगोचर वस्तू ह्यांच्यामधील संबंधाचे वर्णन करण्यासाठी प्लेटोने दोन उपमा वापरल्या आहेत. एक अशी की, बुद्धिग्राह्य अशा सत्-सामान्यामध्ये त्या सत्-सामान्याखाली मोडणाऱ्या अनेक विशिष्ट इंद्रियगोचर वस्तू ‘सहभागी’ असतात. उदा., ज्या विशिष्ट पिवळ्या वस्तू आपण पाहतो, त्या ‘पिवळेपणा’ ह्या सत्-सामान्यात सहभागी झाल्यामुळे पिवळ्या असतात. ह्या उपमेतील महत्त्वाची अडचण अशी की, अनेक वस्तू जर पिवळेपणा हा आकार विभागून घेत असतील, तर त्यांच्यापैकी कोणत्याच वस्तूच्या ठिकाणी पिवळेपणा हा धर्म असणार नाही, पिवळेपणाचा केवळ एक भाग असेल; म्हणजे कोणतीच वस्तू पिवळी असणार नाही. उलट ह्यांतील प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी पिवळेपणा हा धर्म असला, तर पिवळेपणा हे एक सत्-सामान्य आहे असे म्हणता येणार नाही; प्रत्येक पिवळ्या असलेल्या वस्तूगणिक पिवळेपणा हे सत्-सामान्य असेल. प्लेटोने वापरलेली दुसरी उपमा अनुकृतीची होय. ‘अ’ आणि ‘ब’ ह्या विशिष्ट वस्तू (आणि अशाच इतर अनेक वस्तू) पिवळ्या आहेत असे आपण म्हणतो, ह्याचे कारण त्या दोन्हींचे (आणि ह्या इतर वस्तूंचे) पिवळेपणा ह्या सत्-सामान्याशी काही प्रमाणात साम्य असते आणि म्हणून त्यांचे एकमेकींशी साम्य असते. त्या एकमेकींसारख्या असतात म्हणून त्या सर्वांना आपण ‘पिवळ्या’ म्हणतो. पंरतु ‘अ’ आणि ‘ब’ ह्यांचे परस्परांशी साम्य असते ह्याचे कारण पिवळेपणा ह्या एकाच आकाराशी (सत्-सामान्याशी) ‘अ’ आणि ’ब’ ह्या दोहोंचेही साम्य असते असे असेल, तर मग ‘अ’ आणि पिवळेपण ह्यांच्यात साम्य असले पाहिजे आणि ह्या साम्याचा उलगडा ’अ’ आणि पिवळेपणा ह्या दोहोंचेही पिवळेपणा ह्या दुसऱ्या एका सत्-सामान्याशी साम्य असते, असे कारण देऊन करावा लागेल. म्हणजे अनवस्थाप्रसंग ओढवेल. प्लेटोला ह्या अडचणींची चांगलीच कल्पना होती; पण ज्ञानाचा उलगडा करायचा तर स्थिर, शाश्वत, परिपूर्ण असे आकार आहेत असे मानल्यावाचून गत्यंतर नाही, अशी त्याची धारणा होती. अर्थात ह्या आकारांचे अस्तित्व परिपूर्ण व स्वायत्त असे अस्तित्व असते. त्यांच्यात सहभागी होणाऱ्या किंवा त्यांची अनुकृती करणाऱ्या इंद्रियगोचर वस्तूंचे अस्तित्व अपूर्ण आणि दुय्यम असते. ह्या इंद्रियगोचर वस्तूंचे ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही. पण त्यांच्याविषयी बरीच माहिती आपल्याला अनुभवाने लाभलेली असते आणि ह्या माहितीच्या आधाराने इंद्रियगोचर जगातील आपले व्यवहार आपण पार पाडतो. ह्या माहितीला ‘ज्ञान’ म्हणता येत नाही. प्लेटो तिला ‘मत’ म्हणतो. ज्ञान हे बुद्धिजन्य असते व ते आकारांचे असते; उदा., भूमिती. मत हे इंद्रियजन्य असते आणि ते इंद्रियगोचर वस्तूंचे असते.

ज्ञानाचे विषय असलेल्या आकारांचे विश्व आपण घेतले, तर त्याची एक तार्किक घडण असते, त्याच्यात एक तार्किक व्यवस्था असते, असे आढळून येते. धैर्य ह्या आकारात जशा विशिष्ट कृती सहभागी होतात व म्हणून त्या धैर्याच्या कृती ठरतात, त्याचप्रमाणे धैर्य, शहाणपण, संयम इ. आकार सद्‌गुण ह्या त्यांच्या वरच्या आकारात सहभागी होतात व म्हणून सद्‌गुण ठरतात. तसेच त्रिकोण, वर्तुळ इ. विशिष्ट प्रकारच्या आकृती, ह्या वरच्या सत्-सामान्यात सहभागी होतात आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या आकृती ठरतात. म्हणजे आकारांची एक उतरंड असते. कनिष्ठ आकार किंवा सत्-सामान्ये त्यांच्या वरच्या आकारांत सहभागी होतात; हे आकार त्यांच्या वरच्या आकारांत सहभागी होतात इत्यादी. ह्या उतरंडीच्या शिखराला असलेल्या आकाराला प्लेटो ‘आयडिया ऑफ धी गुड’–शिवतत्त्वाचा आकार–हे नाव देतो. दृश्य विश्वात सूर्याचे जे स्थान आहे, तेच आकारांच्या विश्वात शिवतत्त्वाच्या आकाराचे आहे. म्हणजे ज्याप्रमाणे सूर्यापासून शक्ती लाभल्याने सर्व दृश्य वस्तूंची धारणा होते व सूर्यप्रकाशामुळे त्या दृश्य होतात, त्याप्रमाणे सर्व आकार शिवतत्त्वापासून निष्पन्न होतात, त्याचे अस्तित्व त्यांना शिवतत्त्वापासून लाभते आणि त्यांची ज्ञेयताही–ज्ञानाचे विषय होण्याची त्यांची क्षमताही–त्यांना शिवतत्त्वापासून लाभते. सर्व आकार शिवतत्त्वात सहभागी असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी शिवत्व असते आणि इंद्रियगोचर विश्वही ह्या आकारांत सहभागी होत असल्यामुळे तेही अपूर्ण प्रमाणात का होईना, शिव असते. शिवाय हे शिवतत्त्व जसे केवल शिव आहे, तसेच ते केवळ सौंदर्यही आहे, असे मत प्लेटोने मांडले आहे. तेव्हा शिवतत्त्वाच्या ठिकाणी शिवत्व, सौंदर्य व सत्ता हे तिन्ही धर्म एकवटलेले आहेत. भूमिती, नीतिशास्त्र इ. शास्त्रांचा अभ्यास केल्याने तत्त्ववेत्त्याच्या बुद्धीला वळण लागते, त्याची बुद्धी वर्तुळ, त्रिकोण किंवा धैर्य, सद्‌गुण इ. आकारांचे तसेच ह्या आकांरामधील परस्परसंबंधांचे ग्रहण करते आणि अशा रीतीने त्याला खरेखुरे ज्ञान प्राप्त होते. तसेच ह्या शास्त्रांत ज्या आकारांचे ज्ञान ग्रथित करण्यात आलेले असते, ते आकार ज्या अधिकाधिक वरिष्ठ आकारांवर आधारलेले असतात त्यांचा शोध घेत घेत, बुद्धी अखेरीस शिवतत्त्वाच्या आकाराशी येऊन ठेपते आणि तिला शिवतत्त्वाच्या आकाराचे साक्षात ‘दर्शन’ होते. शिवतत्त्वाचे असे साक्षात दर्शन होणे, हे जीवनाचे परमोच्च श्रेय होय. तेव्हा प्लेटोच्या मताप्रमाणे खरेखुरे ज्ञान बुद्धिजन्य आकार व आकारांमधील तार्किक परस्परसंबंध ह्यांच्या आकलनावर तर आधारलेले असतेच; पण त्याची परिणती विश्वातील मूलभूत आणि अंतिम तत्त्वाच्या साक्षात किंवा प्रातिभ दर्शनात होते. तेव्हा प्लेटो बुद्धिवादी होता तसाच गूढवादीही होता. तत्त्ववेत्त्याने जीवन ही जशी बौद्धिक साधना असते, तशीच ती आधात्मिक साधनाही असते.

ज्ञानाच्या ह्या मीमांसेवर मानवी आत्म्याच्या स्वरूपाची मीमांसा प्लेटोने आधारली आहे. मानवी आत्म्याच्या शुद्ध आकारांच्या विश्वाशी संबंध जोडणारी शक्ती म्हणजे त्याची बुद्धी. बुद्धी आत्म्याला शुद्ध आकारांचे ज्ञान करून देते. शिवाय शुद्ध आकारांचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे, अशी प्रेरणाही बुद्धीशी संलग्न असते. उलट इंद्रियांद्वारा इंद्रियगोचर वस्तूंशी आत्म्याचे संबंध जोडले जातात आणि ह्या संबंधांतून आत्म्यात अनेक विकार जागृत होतात. हा आत्म्याचा विकारी भाग. बुद्धी आणि आत्म्याचा विकारी भाग हे जसे आत्म्याचे भाग प्लेटोने मानले आहेत, त्याप्रमाणे ह्या दोन भागांना जोडणारा दुवा म्हणून आत्म्याचा आणखी एक भाग प्लेटोने मानला आहे. तो म्हणजे आत्म्याचा ओजस्वी भाग. मानवी आत्मा ह्या तीन भागांचा मिळून बनलेला असतो. ह्या प्रत्येक भागाचे एक विशिष्ट कार्य असते. बुद्धीचे कार्य आकारांचे, विशेषतः शिवतत्त्वाचे ज्ञान प्राप्त करून घेणे हे आहे; पण शिवाय कोणतीही वस्तू, कृती किंवा घटना शिवतत्त्वात सहभागी झाल्यामुळे चांगली ठरते. तेव्हा शिवतत्त्वाचे ज्ञान झाल्यामुळे कोणतेही साध्य किंवा कृती किती प्रमाणात चांगली आहे, ह्याचे ज्ञान बुद्धीला होते. म्हणून आपल्या सर्व विकारांचे वा वासनांचे नियमन करणे, हेही बुद्धीचे कार्य ठरते. प्रत्येक वासना अंध आणि स्वार्थी असते. ती केवळ स्वतःची तृप्ती करण्यासाठी धडपडते; पण कोणतीही वासना तृप्त करणे किती प्रमाणात श्रेयस्कर ठरेल, हा निर्णय घेणे आणि त्यानुसार वासनांचे नियमन करणे, हे बुद्धीचे कार्य असते. त्याचप्रमाणे वासनांचे नियमन करण्यात बुद्धीला साहाय्य करणे, हे आत्म्याच्या ओजस्वी भागाचे विशिष्ट कार्य आहे आणि बुद्धीचे नियमन मान्य करणे, त्याला अनुसरून स्वतःची तृप्ती करणे, हे वासनांचे किंवा आत्म्याच्या विकारी भागाचे कार्य आहे. आत्म्याचा प्रत्येक भाग जेव्हा आपले विशिष्ट कार्य चांगल्या रीतीने पार पाडत असतो, तेव्हा त्या त्या भागाचा विशिष्ट असा सद्‌गुण त्यांच्या ठिकाणी असतो. तेव्हा ज्ञान किंवा शहाणपण हा बुद्धीचा सद्‌गुण तसेच धैर्य हा आत्म्याच्या ओजस्वी भागाचा सद्‌गुण आहे. काय करणे योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्याचा बुद्धीने निर्णय दिला की, त्याला अनुसरून वागणे म्हणजे धैर्याने वागणे. आत्म्याच्या विकारी भागाचा सद्‌गुण म्हणजे संयम. ज्या आत्म्याचे हे तिन्ही भाग आपापली कार्ये योग्य रीतीने पार पाडतात, तो आत्मा सुव्यवस्थित असतो. अशा सुव्यवस्थित आत्म्याच्या ठिकाणी असलेला सद्‌गुण म्हणजे न्याय होय. न्यायी माणूस उत्तम रीतीने जगतो आणि असे न्यायी जीवन जगण्यात माणसाला खरे सौख्य लाभते. प्लेटोच्या ह्या नैतिक विचारावर पायथॅगोरसच्या पंथाची छाप स्पष्ट आहे. आत्म्याच्या वेगवेगळ्या भागांत जेव्हा सुसंवाद असतो, तेव्हा तो आत्मा सुव्यवस्थित व म्हणून सद्‌गुणी व सुखी असतो. जसे शरीर वेगवेगळ्या द्रव्यांचे बनलेले असते आणि ह्या द्रव्यांत सुसंवाद असला की ते निरोगी असते, त्याप्रमाणे जेव्हा आत्म्याच्या वेगवगळ्या भागांत सुसंवाद असला की आत्मा निरोगी, म्हणजे सद्‌गुणी व सुखी असतो. न्याय, शहाणपण, धैर्य व संयम हे चार प्रमुख सद्‌गुण होत, असे ग्रीक लोकनीतीत मानण्यात येत असे. त्यांची व्यवस्था प्लेटोने वरील प्रकारे लावली.

प्लेटोचे राजकीय विचार त्याच्या नैतिक विचारांवर आधारलेले आहेत. आत्म्याचे विविध भाग आणि समाजातील विविध वर्ग ह्यांच्यात महत्त्वाचे साम्य असते. प्लेटोला अभिप्रेत असलेला समाज म्हणजे नगरराज्यांच्या स्वरूपात संघटित असलेला ग्रीक समाज. आत्म्याच्या बुद्धी ह्या भागाशी अनुरूप असा समाजातील वर्ग म्हणजे तत्त्ववेत्त्यांचा वर्ग. खडतर नैतिक आणि बौद्धिक साधनेने तत्त्ववेत्त्यांना शिवतत्त्वाचे साक्षात ज्ञान झालेले असते आणि म्हणून समाजाचे नियमन करण्याचा अधिकार त्यांना असतो. ह्या खडतर साधनेत जे शेवटपर्यंत टिकून राहतात, तेच तत्त्ववेत्ते होऊ शकतात व राज्याचे नियमन करायला लायक बनतात. जे बौद्धिक साधनेत शेवटपर्यंत टिकू शकत नाहीत; पण अशा साधनेमुळे ज्यांच्या शरीरांना व मनांना योग्य ते वळण लागलेले असते, अशा व्यक्तींचा वर्ग म्हणजे रक्षकांचा वर्ग. हा वर्ग आत्म्याच्या ओजस्वी भागाशी अनुरूप असा आहे आणि राज्याचे परचक्रापासून संरक्षण करणे व तत्त्ववेत्त्या धुरिणांनी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करणे, हे त्यांचे कार्य असते. समाजातील तिसरा वर्ग म्हणजे आत्म्याच्या विकारी भागाशी अनुरूप असा सर्वसामान्य माणसांचा वर्ग. प्रत्येक वासना ज्याप्रमाणे आत्मकेंद्री असते, त्याप्रमाणे ह्या वर्गातील प्रत्येक व्यक्ती अर्थार्जनात व आपापल्या खाजगी संसारात गढून गेलेले असते. धुरिणांनी व रक्षकांनी दिलेल्या आदेशांचे पालन करणे, हे ह्या वर्गाचे कार्य असते. ज्या सामाजातील प्रत्येक वर्ग आपापले विशिष्ट कार्य सुसंवादीपणे पार पाडीत असेल, तो समाज सुव्यवस्थित असतो व म्हणून न्यायावर आधारलेला व सुखी असतो. उलट ह्या व्यवस्थेत विसंवाद निर्माण झाला, एखादा वर्ग आपले योग्य ते कार्य सोडून वेगळे कार्य करू लागला, तर सामाजात विकृती निर्माण होते. उदा., रक्षकवर्ग तत्त्ववेत्त्यांच्या आदेशांचे पालन करण्याऐवजी स्वतःच शासन करू लागला, तर समाजात उमरावशाही निर्माण होईल व सर्वसाधारण जनता सत्ता चालवू लागली, तर लोकशाही निर्माण होईल. ह्या विकृती आहेत. कारण सत्तेचा वापर सबंध समाजाच्या हितासाठी करण्यात येण्याऐवजी एका विशिष्ट वर्गाच्या हितासाठी करण्यात येईल व असा समाज अन्यायी ठरेल. प्लेटोच्या ह्या आदर्श समाजव्यवस्थेची दोन ठळक वैशिष्ट्ये आहेत. एक, तिच्यात पुरुष व स्त्रिया यांच्यात भेद करण्यात येत नाही. पुरुष व स्त्रिया ह्या दोघांनाही समान शिक्षण देऊन त्यांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास घडवून आणण्यात येतो व त्यांच्या कुवतीप्रमाणे योग्य त्या वर्गात त्यांना स्थान देण्यात येते. दुसरे असे की, समाजातील शासकवर्गाला म्हणजे तत्त्ववेत्ते व रक्षक यांना स्वार्थासाठी सत्तेचा वापर करण्याचा मोह होऊ नये म्हणून त्यांना स्वतःचा संसार करण्याची परवानगी नसते. त्यांना खाजगी मालमत्ता बाळगता येत नाही, लग्न करून घर करता येत नाही, स्वतःची मुले त्यांना ओळखता येत नाहीत; पण शासकवर्गातील स्त्रीपुरुषांपासून जी संतती होईल तिच्या अंगी श्रेष्ठ दर्जाचे आनुवंशिक गुण असल्यामुळे, तिच्यातूनच योग्य ते शिक्षण घेतल्यावर भावी शासक निर्माण होतील, हे अतिशय संभवनीय आहे. पण तिच्यातील एखादी विशिष्ट व्यक्ती जर शासक व्हायला लायक नाही असे आढळून आले, तर तिला शासकवर्गातून वगळण्यात येते व ती सर्वसाधारण लोकांत समाविष्ट होते. उलट सर्वसामान्यांच्या वर्गातील मूल आपल्या गुणांनी आवश्यक त्या शिक्षणानंतर शासकवर्गात प्रविष्ट करण्यात येते.

प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचे सार येथे देण्यात आले आहे. तत्त्वमीमांसेतील अधिक सूक्ष्म प्रश्न तसेच विश्वोत्पत्तिशास्त्र, धर्म, कला इ. प्रश्नांविषयीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत. मानवी संस्कृतीच्या सर्व अंगांचा वेध घेऊ पाहणाऱ्या प्लेटोच्या तत्त्वज्ञानाचा खोल प्रभाव केवळ नंतरच्या ग्रीक तत्त्वज्ञानावरच नव्हे, तर एकंदर पाश्चात्त्य तत्त्वज्ञानावरही पडलेला आढळतो.

ॲरिस्टॉटल : (इ.स.पू. ३८४–३२२). ॲरिस्टॉटल प्लेटोचा शिष्य होता, काहीसा अनुयायी होता आणि काहीसा विरोधकही होता. प्लेटोच्या अकादमीत त्याने वीस वर्षे अध्ययन केले. इ.स.पू. ३३९ च्या सुमारास त्याने लायशियम् ह्या नावाचे आपले पीठ अथेन्स येथेच सुरू केले. ह्या पीठात एक–पेरिपॅटॉस (छायाच्छादित)–मार्ग होता व त्यावरून ॲरिस्टॉटलच्या अनुयायांना ‘पेरिपॅटेटिक’ म्हणजे ‘परिक्रमी’ हे नाव पडले. लायशियम्‌मध्ये ॲरिस्टॉटलने एक ग्रंथालय स्थापन केले होते व शास्त्रीय संशोधनाची सोयही केली होती.

मूर्त, इंद्रियगोचर वस्तूंचे बनलेले विश्व हेच खरेखुरे विश्व होय, अशी ॲरिस्टॉटलची धारणा होती. ह्या विश्वाचे स्वरूप समजून घेणे, हे तत्त्वज्ञानाचे कार्य होय. इंद्रियगोचर वस्तूंचे स्वरूप समजून घ्यायचे, तर त्यांचे निरीक्षण करून त्यांचे गुण, त्यांचे वर्तन ह्यांविषयी विश्वसनीय माहिती गोळा करावी लागते व तिचा आधार घ्यावा लागतो. ह्या अर्थाने ॲरिस्टॉटल अनुभववादी होता आणि पद्धतशीर निरीक्षणावर आधारलेल्या वैज्ञानिक संशोधनाला त्याने चालना दिली होती. इंद्रियगोचर वस्तूंचे अस्तित्व अपूर्ण, दुय्यम असते, ह्या वस्तूंपलीकडे असलेल्या बुद्धिग्राह्य अशा सत्-तत्त्वांच्या ठिकाणीच परिपूर्ण असे अस्तित्व असते, ह्या प्लेटोच्या मताचा त्याने प्रतिवाद केला; पण प्लेटोचा हा वैचारिक वारसा त्याला पूर्णपणे टाळता आला नाही, असे आपल्याला आढळून येईल. कारण एखादी मूर्त वस्तू–एखादे विशिष्ट झाड, विशिष्ट माणूस इ.–आपण घेतली व तिचे स्वरूप समजून घेऊ लागलो, तर आपल्याला काय आढळते? ॲरिस्टॉटलच्या म्हणण्याप्रमाणे त्या झाडाचे जे रूप असते, त्यामुळे ते झाड एक झाड असते. हे रूप सामान्य असते. कारण इतर वस्तूंच्या ठिकाणीही ते असते व म्हणून त्या वस्तू झाडे ठरतात. झाडाच्या ह्या रूपात किंवा आकारात त्या झाडाचे झाडपण, त्याचे सत्त्व सामावलेले असते आणि झाड समजून घ्यायचे म्हणजे झाडाचा हा आकार समजून घ्यायचा. अर्थात प्लेटो मानीत असे त्याप्रमाणे झाडाच्या ह्या आकाराला झाडाहून अलग असे अस्तित्व नसते. हा आकार त्या झाडातच वसत असतो व म्हणून तो आकार त्या झाडाचे रूप असते. आता झाडाचा आकार ज्याच्यात वसत असतो ते म्हणजे द्रव्य. तेव्हा विशिष्ट झाड म्हणजे द्रव्य अधिक झाडाचा आकार. पण असे म्हणण्यापेक्षा विशिष्ट झाड म्हणजे झाडाच्या आकाराने मंडित असे द्रव्य, ‘झाडपण’ ह्या आकाराने आकारित द्रव्य, असे म्हणणे योग्य ठरेल. झाडाचे जे द्रव्य असते, ते झाडपणाचा आकार धारण करायला अनुकूल असे द्रव्य असते.

इंद्रियगोचर वस्तू बदलत असतात, स्थित्यंतर पावत असतात व म्हणून त्यांचे ज्ञान होऊ शकत नाही, ही प्लेटोची भूमिका. तेव्हा मूर्त, इंद्रियगोचर वस्तूंनाच खरेखुरे अस्तित्व असते, असे मानणाऱ्या ॲरिस्टॉटलला बदलाचा वा परिवर्तनाचा उलगडा करणे प्राप्त होते. जे शीत आहे त्याचे उष्णात कसे परिवर्तन होणार जे शीत आहे ते शीतच असणार व म्हणून परिवर्तन अशक्य आहे. हा जुना युक्तिवाद होता; पण द्रव्य आणि आकार हा भेद आपण केला की, परिवर्तन कसे घडून येऊ शकते हे समजते, असे ॲरिस्टॉटलचे म्हणणे होते. शीत वस्तू म्हणजे ज्याच्यात शीतत्व हा आकार वसत असतो असे द्रव्य किंवा अधिष्ठान. ह्या द्रव्यातून शीतत्वाचा आकार निघून जाऊन जेव्हा उष्णत्वाचा आकार त्याची जागा घेतो, तेव्हा शीत वस्तू बदलून उष्ण बनते. द्रव्य हे केवळ द्रव्य म्हणून घेतले, तर निराकार असते; पण निराकार द्रव्य पृथक्‌पणे अस्तित्वात असत नाही. ज्याला पृथक्, स्वतंत्र अस्तित्व असते, ती म्हणजे मूर्त वस्तू आणि मूर्त वस्तू म्हणजे कोणतातरी आकार धारण केलेले असे द्रव्य असते.

वस्तूंमध्ये जे बदल किंवा स्थित्यंतरे घडतात त्यांचे मूळ त्या वस्तूंमध्येच असते, असे ॲरिस्टॉटलचे मत होते. एखादे झाड, हे झाड असते; कारण झाडपणाचा आकार त्याच्या ठिकाणी असतो. उलट त्या झाडाचे बी आपण घेतले, तर ते आहे त्या अवस्थेत झाड नसते, त्याच्या ठिकाणी झाडपणाचा आकार नसतो. पण बी झाड बनू शकते, त्याचे झाडात परिवर्तन होऊ शकते आणि अनुकूल परिस्थितीत स्वतःचे झाडात परिवर्तन करून घेण्याची प्रवृत्ती त्याच्या ठिकाणी असते. बीजाचे झाडात परिवर्तन होणे, म्हणजे त्याच्या ठिकाणी झाडपणाचा आकार अधिकाधिक पर्याप्ततेने आविर्भूत होणे. बीजामध्ये झाडपणाचा आकार सुप्त किंवा तीरोभूत असतो. स्वतःचे परिवर्तन करून हा आकार पर्याप्ततेने धारण करण्याची प्रवृत्ती बीजामध्ये असते आणि जेव्हा हा आकार बीजामध्ये पूर्ण पर्याप्ततेने प्रकट होतो, म्हणजे जेव्हा बीजाचे झाड बनते, तेव्हा ही परिवर्तनाची प्रक्रिया थांबते. तेव्हा वस्तूमध्ये होणारे परिवर्तन उद्दिष्टानुसारी असते. स्वतःमध्ये अंतर्हित असलेला आकार पर्याप्ततेने व्यक्त करणे, हे ह्या परिवर्तनाचे उद्दिष्ट असते. बीज हे बीज असताना झाड नसते, एवढेच बीजाचे वर्णन पुरेसे नाही; कारण एखादा दगड हासुद्धा झाड नसतो. झाडपणाचा आकार धारण करण्याची क्षमता व प्रवृत्ती बीजाच्या ठिकाणी असते, हेच त्याचे वर्णन यथार्थ ठरेल. तेव्हा बीज हे प्रत्यक्षात बीजच असते, तरी क्षमतेने झाड असते. आता द्रव्याच्या ठिकाणी आकार धारण करण्याची क्षमता असते, हे आपण पाहिलेच आहे. तेव्हा झाडपणाचा आकार धारण करण्याची क्षमता असलेले बीज हे झाडाचे द्रव्य आहे, असे म्हणणे योग्य ठरते.

एखादा विशिष्ट आकार अनुकूल अशा द्रव्यातच, म्हणजे योग्य अशा स्वरूपाच्या द्रव्यातच, वसू शकतो. तेव्हा आकाराच्या उच्चनीच अशा श्रेणी असतात. उदा., पंचरसी धातू हे विशिष्ट स्वरूपाचे, एका विशिष्ट आकाराने आकारित असलेले, असे द्रव्य आहे. पंचरसी धातूचा तुकडा ही एक मूर्त वस्तू आहे; पण जेव्हा त्याचा आपण पुतळा बनवितो, तेव्हा ते त्या पुतळ्याचे द्रव्य असते; म्हणजे ‘पंचरसी धातूपण’ ह्या आकाराहून उच्च असा पुतळ्याचा आकार धारण करण्याची क्षमता असलेले, असे ते असते. अस्थी, मांस ह्या विशिष्ट स्वरूपाच्या वस्तू आहेत; पण ह्या वस्तू म्हणजे प्राणीपणा हा उच्चतर आकार धारण करू शकणारे द्रव्य होय. आता कनिष्ठश्रेष्ठ अशी आकारांची श्रेणी घेतली, तर तिच्या एका टोकाला केवलद्रव्य–पूर्णपणे आकारहीन असे द्रव्य–असणार व दुसऱ्या टोकाला सर्वश्रेष्ठ आकार असणार, असे आपल्याला वाटेल. पण केवलद्रव्य, आकारहीन असे द्रव्य, असूच शकत नाही; मूर्त वस्तूलाच, आकारित अशा द्रव्यालाच अस्तित्व असू शकते, अशी ॲरिस्टॉटलची भूमिका आहे. सर्वश्रेष्ठ आकाराचे स्वरूप काय असते, हे आपण पुढे पाहू. त्यापूर्वी एका गोष्टीचा खुलासा केला पाहिजे. आकार स्थितिशील नसतो. तो विशिष्ट स्वरूपाच्या व्यापारामध्येच मूर्त होतो. जेव्हा बीजाचे झाडात परिवर्तन होते, तेव्हा ही परिवर्तनाची प्रक्रिया तिचे उद्दिष्ट साध्य झाल्यामुळे थांबते; पण झाडाचे झाडपण, झाड म्हणून जगण्याच्या व्यापारात मूर्त होते. तेव्हा प्रत्येक आकार हा विशिष्ट स्वरूपाचा व्यापार असतो. म्हणून बदल किंवा परिवर्तन अथवा स्थित्यंतर व व्यापार ह्यांच्यात भेद केला पाहिजे. बदल उद्दिष्टानुसारी असतो, हे उद्दिष्ट एक आकार असतो व उद्दिष्ट साध्य झाल्यावर बदल विराम पावतो. व्यापार म्हणजे आकाराचे मूर्त रूप व्यापार आकारात व्यक्त होतो.

आता बीजाचे जे झाडात परिवर्तन होते, त्याचे कारण काय? एक तर बीजामध्ये झाडपणाचा आकार अंतर्हित असतो व तो स्वतःमध्ये पूर्णपणे प्रकट करण्याची प्रेरणा बीजामध्ये असते. पण ज्याच्यामध्ये झाडपणाचा आकार सुप्त आहे असे बीज अगोदरच्या एका झाडापासून, म्हणजे झाडपणाचा आकार ज्याच्यात वसत आहे अशा वस्तूपासून, निर्माण झालेले असते. हे झाड बीज निर्माण करते म्हणजे स्वतःचा झाडपणाचा आकार आपल्या ठिकाणी पर्याप्ततेने प्रकट व्हावा, अशी प्रेरणा अंगी असलेली वस्तू ते निर्माण करते. प्रत्यक्ष अस्तित्वात असलेला आकारच–म्हणजे असा आकार अंगी असलेली वस्तूच–ज्या द्रव्यात तो आकार सुप्त आहे व तो स्वतःमध्ये प्रकट करण्याची प्रेरणा अंगी असलेले द्रव्य निर्माण करते. तेव्हा प्रत्येक परिवर्तनाला एक बाह्यकारण असते. बीजाचे जे झाडामध्ये परिवर्तन होते, त्या परिवर्तनाचे ते बीज निर्माण करणारे झाड, हे बाह्यकारण असते. आता परिवर्तन पावणाऱ्या वस्तूंचे संबंध विश्व जर आपण घेतले, तर त्याच्यात घडणाऱ्या परिवर्तनांचेही एक बाह्यकारण असले पाहिजे. हे विश्व अनादी आहे, असे ॲरिस्टॉटल मानतो व म्हणून त्याचा कुणी निर्माता नाही. पण आकार आणि आकार स्वतःमध्ये मूर्त करण्याची ओढ हे परिवर्तनाचे कारण असल्यामुळे विश्वातील साऱ्या परिवर्तनांचे कारण अस्तित्वात असलेला आकार असला पाहिजे. हा आकार उच्चतम आकार असल्यामुळे शुद्ध आकार असला पाहिजे. कनिष्ठ आकार हे दुसऱ्या दृष्टीने उच्चतर आकार अंगी धारण करण्याची क्षमता असलेले द्रव्य असते. पण उच्चतम आकाराच्या ठिकाणी अशी क्षमता असायचे कारण नसल्यामुळे, तो केवळ आकार असला पाहिजे. आकार हा व्यापार असतो आणि शुद्ध किंवा परिपूर्ण आकार हा शुद्ध विचारात मूर्त होतो. शुद्ध विचार परिपूर्ण असल्यामुळे त्याचा विषयही परिपूर्ण असला पाहिजे. पण हा शुद्ध आकार किंवा शुद्ध विचार हीच परिपूर्ण गोष्ट असल्यामुळे ह्या शुद्ध विचाराचा विषयही हा शुद्ध विचारच असतो. स्वतःचाच विचार करणारा परिपूर्ण विचार, असेच शुद्ध आकाराचे स्वरूप असते व हा शुद्ध आकार म्हणजे ईश्वर होय. हा न बदलणारा आकार जगातील सर्व बदलांचे कारण होय. स्वतःला शक्य असलेला आकार स्वतःमध्ये प्रकट करण्याची धडपड करणारी प्रत्येक वस्तू ह्या शुद्ध आकाराचे आपल्या पायरीवर अनुकरण करीत असते व म्हणून परिवर्तन पावत असते. वस्तूचा आकार मूर्त वस्तूमध्ये वसतो, ह्या ॲरिस्टॉटलच्या तत्त्वाचा ‘विश्वाबाहेर वसणारा विश्वाचा शुद्ध आकार’ ह्या संकल्पनेने भंग झाला आहे.

द्रव्य आणि आकार ह्या संकल्पनांचा उपयोग विश्वातील सर्वच प्रकारच्या वस्तूंच्या स्वरूपाचा उलगडा करण्यासाठी ज्याप्रमाणे अरिस्टॉटल करतो, त्याप्रमाणेच जीवसृष्टीच्या आणि मानवाच्या स्वरूपाचा उलगडा करण्यासाठीही तो करतो. शरीर हे द्रव्य होय आणि आत्मा हा शरीराचा आकार होय. शिवाय आकार हा विशिष्ट व्यापारात मूर्त होत असल्यामुळे शरीराचा जीवनव्यापार हा शरीराचा आकार असतो. इंद्रियांचेही असेच आहे. पाहण्याची कृती किंवा व्यापार हा डोळा ह्या इंद्रियाचा आकार होय. आता आपण वनस्पती घेतली, तर स्वतःचे पोषण करण्याचा व्यापार हे तिचे जीवन, तिचा आत्मा, तिचा आकार असतो. तसेच वेदने अनुभविणे आणि त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या वासनांचे समाधान करण्यासाठी हालचाली करणे हा व्यापार, म्हणजे प्राण्याचा आत्मा वा आकार होय. प्राण्याच्या ठिकाणी स्वतःचे पोषण करण्याची शक्ती असते व ही शक्ती वेदने व वासना अनुभविण्याच्या त्याच्या शक्तीचा आधार असतो. तेव्हा प्राण्याचा आत्मा वनस्पतीच्या आत्म्याहून श्रेष्ठ असतो. वेदने अनुभविण्याची शक्ती, म्हणजे इंद्रियगोचर वस्तूचे द्रव्य वगळून तिचा इंद्रियगोचर असा आकार ग्रहण करण्याची शक्ती. मानवी आत्म्याच्या ठिकाणी ह्या दोन शक्तींशिवाय त्यांच्यावर आधारलेली अशी बुद्धी ही शक्ती असते. बुद्धी म्हणजे इंद्रियगोचर आकारात गुंतलेला शुद्ध म्हणजे सामान्य असा आकार ग्रहण करण्याची शक्ती. मानवी आत्मा म्हणजे मानवी देहाचा आकार किंवा मानवाचा मानव म्हणून व्यापार असल्यामुळे, तो देहापासून अलग राहू शकत नाही. देह नष्ट झाल्यावर आत्माही नष्ट होतो; पण ॲरिस्टॉटल मानवी बुद्धीमध्ये क्षमतास्वरूप अथवा अक्रिय (पॅसिव्ह) बुद्धी आणि क्रियाशील (ॲक्टिव्ह) बुद्धी असा भेद करतो. अक्रिय बुद्धी ही ज्ञानग्रहणाची केवळ क्षमता असते, जेव्हा तिचा ज्ञानरूप अशा सक्रिय बुद्धीशी संबंध येतो, तेव्हाच तिला ज्ञान प्राप्त होते आणि ही सक्रिय बुद्धी मानवी आत्म्यात वसत असली, तरी तिला पृथक् असे अस्तित्व असते, असे तो मानतो. तेव्हा मानवी आत्म्याचा एकतरी घटक देहाचे व म्हणून आत्म्याचे विसर्जन झाल्यानंतरही टिकून राहतो, असे ॲरिस्टॉटलचे मत दिसते. येथे ॲरिस्टॉटलवरील प्लेटोच्या प्रभावाच्या खाणाखुणा दिसतात.

व्यवहाराचे मार्गदर्शन आणि नियमन करणे हे नीतिशास्त्राचे प्रयोजन आहे, असे ॲरिस्टॉटल मानीत असे. आकार आणि द्रव्ये ह्या आपल्या मूलभूत तत्त्वांच्या साहाय्याने नैतिक जीवनाचे स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न त्याने केला. प्रत्येक माणसाला आपले हित साधायचे असते. मानवी आत्म्याचा आकार ज्या कृतीतून मूर्त व फलद्रूप होतो, अशा उचित जीवनव्यापारात माणसाचे हित असते. असे जीवन सुखी असते. पण सुख हे माणसाचे साध्य नसते. स्वतःचे हित हे त्याचे साध्य असते; पण जेव्हा माणूस आपले हित साधतो, तेव्हा अशा जीवनाचे सुख हे अविभाज्य अंग असते. आता माणसाला जगण्यासाठी आपल्या भौतिक गरजा भागवाव्या लागतात आणि ह्यासाठी माणसांना एकत्र यावे लागते. म्हणून माणूस हा समाज करून राहणारा प्राणी आहे. समाजाचा एक घटक म्हणून माणसाचे जे योग्य वर्तन ठरते, ते नैतिक वर्तन होय. आपल्या प्रेरणांचे समाधान करण्यासाठी माणसे कृती करतात. ह्या प्राकृत प्रेरणा म्हणजे नैतिक वर्तनाचे द्रव्य होय. ह्या प्रेरणांचे योग्य त्या प्रमाणात–फार कमी प्रमाणात नव्हे आणि अतिरिक्त प्रमाणात नव्हे–समाधान करणे, म्हणजे नैतिक वर्तन करणे. हे योग्य प्रमाण म्हणजे नैतिक कृतीचा आकार होय. ह्या योग्य प्रमाणाला ॲरिस्टॉटल मध्य–अतिशय कमी आणि अतिशय अधिक ह्यांच्यातील मध्य–म्हणतो. पण एखाद्या प्रेरणेचे समाधान करण्याचा हा मध्य कोणता, हे सामान्य नियमांनी ठरविता येत नाही; तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या प्रकृतीच्या आणि परिस्थितीच्या संदर्भात व्यावहारिक शहाणपणाने ते ठरवावे लागते. आपल्या प्रेरणांचे समाधान करताना ह्या स्वतःला योग्य अशा मध्याची निवड करण्याची सवय म्हणजे सद्‌गुण. उदा., धैर्य म्हणजे भीरुता व बेछूटपणा ह्यातील मध्याची निवड. सुरुवातीला अशी निवड आपण शहाण्या माणसांच्या सल्ल्याला अनुसरून करतो. पण हळूहळू ही सवय आपण आपल्या अंगी बाणवून घेतो. हे नैतिक सद्‌गुणांचे विवेचन झाले. पण ॲरिस्टॉटलच्या नीतिमीमांसेचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. मानवाची बुद्धी ही मानवाची विशिष्ट शक्ती आहे, मानवाला इतर प्राण्यांपासून भिन्न करणारे असे मानवी आत्म्याचे ते सर्वोच्च वैशिष्ट्य आहे. तेव्हा हे वैशिष्ट्य ज्याच्यात फलद्रूप होते अशा व्यापारात, म्हणजे शुद्ध बौद्धिक व्यापारात, माणसाचे सर्वोच्च हित सामावलेले असते. असे शुद्ध बौद्धिक जीवन जगणारा माणूस ईश्वरसदृश असतो. येथेही ॲरिस्टॉटलच्या तत्त्वज्ञानातील ताण उघड होतो. द्रव्य आणि आकार यांची मिळून बनलेली मानवी प्रकृती व्यावहारिक-नैतिक जीवनात फलद्रूप होते; पण मानवी प्रकृतीत ईश्वरसम असे एक शुद्ध तत्त्व अंतर्भूत असते आणि हे तत्त्व फलद्रूप करण्याचे सर्वोच्च हित व सुख असते.

ॲरिस्टॉटलनंतर ग्रीक तत्त्वज्ञानाला उतरती कळा लागली. अलेक्झांडरच्या उदयापर्यंत ग्रीक संस्कृती व तत्त्वज्ञान नगरराज्याच्या सामाजिक चौकटीत विकसित झाले होते. नगरराज्याच्या सर्वच व्यवहारांत नागरिक सहभागी होऊ शकत असे. ही त्याची जबाबदारीही होती आणि त्याचा हक्कही होता. आपण आपल्या कृत्यांनी सामाजिक जीवनाला इष्ट ते वळण लावू शकतो, असा आत्मविश्वास त्याच्या ठिकाणी असे. ग्रीक नगरराज्याच्या ऐवजी ज्याच्यात अनेक भिन्न वंशांचे, भिन्न संस्कृतींचे जनसमूह एकत्र नांदताहेत, अशी प्रचंड साम्राज्ये अलेक्झांडर व त्याच्या पश्चात अधिकार ग्रहण केलेल्या त्याच्या अनुयायांनी स्थापन केली. अशा एकतंत्री साम्राज्यात व्यक्तीचे स्वातंत्र्य नष्ट होते व सामाजिक जबाबदारीची जाणीव लोपते. ॲरिस्टॉटलनंतर वेगळ्या प्रकारचे तत्त्वज्ञान उदयाला आले. विमुक्त विचाराने निसर्गाचे व जीवनाचे कोडे उलगडण्याची त्यातील ईर्षा लोपली. तिची जागा व्यक्तीच्या असहायतेतून जन्माला आलेला आत्यंतिक व्यक्तिवाद, खडतर परिस्थितीत स्वतःचे सत्त्व टिकवून धरील अशा जीवनमार्गाचा शोध व गूढवाद यांनी घेतली. स्टोइक पंथ, एपिक्यूरसचा पंथ आणि नव-प्लेटोमत ह्या तात्त्विक दर्शनांत हा दृष्टिकोण प्रतिबिंबित झालेला आढळतो.

अकादमी : प्लेटोने इ.स.पू. ३८७ नंतर लवकरच अथेन्स नगराच्या जवळ ‘अकादमस’ ह्या नावाच्या उपवनात आपले विद्यापीठ सुरू केले. ह्या उपवनावरून त्याचे नाव ‘अकॅडमी’ किंवा ‘अकादमी’ असे पडले. रोमन सम्राट जस्टिनियनने इ.स. ५२९ मध्ये सर्व ख्रिस्तीतर ज्ञानपीठे बंद करीपर्यंत जरी अकादमी अस्तित्वात होती, तरी तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात तिच्या हातून झालेली महत्त्वाची कामगिरी इ.स.पू. ६८ च्या सुमारास संपुष्टात आली होती, असे म्हणता येईल.प्लेटोच्या हयातीत अर्थात प्लेटोच अकादमीचा प्रमुख होता. आपल्या मागून आपला भाचा स्प्यूसिपस ह्याची पीठप्रमुख म्हणून प्लेटोने नेमणूक केली. नंतरचे पीठप्रमुख अकादमीचे सदस्य बहुमताने निवडीत असत. अकादमीचे संघटन एखाद्या धार्मिक पंथाच्या संघटनेसारखे होते. अकादमतीत ज्ञानदेवता–म्यूझेस–ह्याची सांघिक उपासना होत असे आणि अनेक विधीही सांघिक रीतीने पार पाडण्यात येते असत. पण शुद्ध सत्याचा शोध घेणे, ही तेथील प्रमुख उपासना होती. अकादमीच्या नऊ शतकांच्या प्रदीर्घ कालखंडात अनेक मतमतांतरे उदयाला आली व भिन्न कालखंडांत प्रभावी ठरली. पण अकादमीच्या सदस्यांत आपल्या संस्थापकाविषयी उत्कट पूज्यभाव नेहमीच वसत होता आणि प्लेटोची शैक्षणिक ध्येये आणि ज्ञानसाधनेचा त्याने घालून दिलेला मार्ग ह्यांचा सर्वांनी आदराने स्वीकार केला होता.

अकादमीच्या स्थापनेपासून तो इ.स.पू. ६८ पर्यंतच्या कालखंडाचे साधरणपणे तीन विभाग पाडण्यात येतात : (१) जुनी अकादमी (प्लेटो व त्याचे लगतचे शिष्य) (२) मध्य अकादमी (इ. स. पू. तिसऱ्या शतकापर्यंत) (३) नव-अकादमी (उरलेला कालखंड). कधीकधी चौथी अकादमी (इ.स.पू. ११o–१o९ ते ८o) पाचवी अकादमी (इ.स.पू. ६८ पर्यंत) असे विभागही मानण्यात येतात.

पेरिपॅटेटिक्स वा पारिक्रमिकी पंथ : ॲरिस्टॉटलच्या अनुयायांना ‘पेरिपॅटेटिक’ म्हणत. ॲरिस्टॉटलनंतर त्याच्या पीठाचे थिओफ्रॅस्टस (इ.स.पू. ३७o–२८७) आणि त्याच्यानंतर स्ट्रेटो (इ.स.पू ?–सु. २६९) हे प्रमुख बनले. प्लेटोने कल्पिलेल्या इंद्रियातील विश्वाकडून लक्ष वळवून इंद्रियगोचर विश्वाचे स्वरूप समजून घेण्यावर ॲरिस्टॉटलने भर दिला होता. ह्याच प्रवृत्तीचा विकास थिओफ्रॅस्टस व स्ट्रेटो ह्यांच्या अमदानीत झालेला आढळतो. विशेषतः स्ट्रेटोने विश्वाची जडवादी उपपत्ती लावण्याचा सुव्यवस्थित प्रयत्न केलेला आढळतो. स्ट्रेटो इ.स.पू. २६९च्या सुमारास निधन पावला. त्यानंतर पेरिपॅटेटिक्स पंथाला उतरती कळा लागली. पण इ.स.पू. ४oच्या सुमाराला अँड्रॉनिकस ह्याने ॲरिस्टॉटलचे समग्र ग्रंथ संपादून प्रसिद्ध केले व पेरिपॅटेटिक्स पंथाला परत बहर आला. टॉलेमी (इ.स. दुसरे शतक) हा भूगोलवेत्ता आणि गेलेन (इ.स. दुसरे शतक) हा शरीरवैज्ञानिक यांच्यावर पेरिपॅटेटिक्स पंथाचा मोठाच प्रभाव होता. ॲफ्रोडिझिअसचा अलेक्झांडर (इ.स.सु. २oo) ह्याने ॲरिस्टॉटलच्या प्रमुख ग्रंथांवर भाष्ये लिहिली. अशी भाष्ये लिहिण्याची परंपरा बराच काळ चालू होती; पण भाष्यांनी तत्त्वज्ञानात नवीन भर घातली, असे म्हणता येणार नाही. ॲरिस्टॉटलच्या मतांना प्रमाण मानून त्यांचे स्पष्टीकरण करणे, हाच त्यांच्या मागचा दृष्टिकोण होता आणि त्यांच्यावर स्टोइक व प्लेटो यांच्या मतांचा बराच प्रभाव होता.

संदर्भ :

  • Burnet, John, Early Greek Philosophy, London, 1930.
  • Fuller, B. A. G. A History of Philosophy, Vol.I, New York, 1959.
  • Guthrie, W. K. C. A History of Greek Philosophy, 4 Vols., Cambridge, 1962.
  • Zeller, Eduward, Outlines of the History of Greek Philosophy, New York, 1931.